आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता दोन प्रकारांतील अर्थवाही आणि शब्दवाही

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मृगाच्या पहिल्या पावसाने मृद्गंधासह कवितेला आणि ललित लेखनाला धुमारे फुटतात. अंतर्मनातील वेदना, उत्कटता वा आनंद उत्स्फूर्तपणे शब्दांतून उमटणारे भाव कविता व ललित लेखनातून व्यक्त होतात. त्या अर्थाने पावसाळा साहित्यिक व नवकवींसाठी पर्वणीच. उत्स्फूर्तपणे व कवीपणाचं भान सतत जागं ठेवण्यासाठी शब्दाला शब्द जोडण्याची धडपड करीत रचली जाणारी कविता व ललित या दोहोंमधलं अंतर तसं कैक मैलांचं. त्यामुळे अर्थवाही कविता आणि शब्दवाही कविता अशा दोन प्रकारांमध्ये कोणत्या कवितेला कोणतं स्थान द्यायचं हे आधुनिकतावाद जोपासणा-या सृजनशील लेखकांच्या, कवींच्या लेखनाकडे पाहून ठरवणं तसं कठीणच. ललित लेखनाचीही याहून वेगळी स्थिती नाही. या पावसाचं पाणी लेखनात कधी मांडू, ही अवस्था असणा-या आज-काल व उद्याच्या कवितेच्या आणि ललित लेखनाच्या सद्य:स्थितीचा पावसाळ्यानिमित्त हा खास धांडोळा...

* मर्ढेकरांमुळे कवितेचे नवयुग सुरू :
मर्ढेकरांच्या कवितेने तथाकथित शब्दबंबाळ आणि विशिष्ट विषयांपुरत्याच मर्यादित असलेल्या कवितेला मागे टाकीत बंड पुकारले आणि कवितेसाठी नवयुग सुरू झाले. कवी अनिलांना लिहिलेली कुसुमतार्इंची पत्रे असोत वा दुर्गा भागवतांची निसर्गगान गाणारे ललित लेख असोत, ललित लेखांनाही मुक्त स्वरूप यायला लागले आणि मराठी साहित्यातील या दोन महत्त्वाच्या प्रकारांना ख-या अर्थाने विस्तारित स्वरूप प्राप्त व्हायला लागले. हा प्रवास तसा सर्वश्रुत आहेच, पण इथे या प्रवासाचा धांडोळा घेणे कवितेच्या व ललित लेखाच्या आजच्या स्थितीची कारणमीमांसा करण्यासाठी इष्ट ठरेल.
* कवितांचा प्रवास अनेक स्थित्यंतरांचा :
कवितेतील अनेक स्थित्यंतरे मराठी भाषेने आजवर पाहिली आहेत. कवितेचा साचा मोडण्यापासून कवितेचे विषय विस्तृत करण्यापर्यंत केशवसुत, मर्ढेकर, बोरकर, बालकवी आदी अनेक कवींनी आपापल्या लेखनशैलीने बदल घडवून आणले आहेत. सरळ-साधा अर्थ सांगणा-या कवितेपासून कवितेचा अर्थ हा नेहमी तिच्या सावलीशी उभा असतो, अशा अ‍ॅबसर्ड कवितेपर्यंत मराठी साहित्य येऊन पोहोचले. पण हा बदल लेखनक्षेत्रात जसा होत गेला तसा त्याचा परिणाम तितक्या वेगाने वाचकवर्गावर मात्र झाला नाही, असे आजची एकंदर स्थिती पाहता जाणवते.


* आजची कविता समाजव्यवस्थेवर परखड भाष्य, अनुवादित कवितेत वास्तव :
एकीकडे परंपरागत शैलीत लिहिणारे कवी आज अस्तित्वात असताना दुसरीकडे अरुण कोल्हटकर, अरुण काळे ही परंपरा मोडणारी कविता लिहून गेले. सध्या नामदेव ढसाळ, सतीश काळसेकर ही चौकट मोडत कधी समाजव्यवस्थेवर परखड भाष्य करीत, तर कधी अंतरंगांमधील अस्वस्थता मांडत कवितेला नेहमीच गहनतेचा स्पर्श बहाल करीत आले आहेत. याचदरम्यान कविता महाजन यांनी संपादित केलेल्या इतर भाषिक कवयित्रींच्या कविता मराठीत अनुवादित स्वरूपात आणून कवितेला बहुभाषिक आयाम देण्याचा चांगला प्रयत्न केला. यात सुषमा करोगल यांच्या कविता असोत वा वोल्गा यांच्या लघुकथा असोत, वास्तववादी कवितांचा प्रवाह चालवण्यामध्ये या अनुवादित कवितांचा फार मोठा वाटा आहे.


* वितरण व्यवस्थाच कवितासंग्रहांना नाकारते :
प्रश्न आहे तो कवितेचा आणि ललित लेख वाचणा-या वाचकवर्गाचा. या वाचकवर्गापर्यंत पोहोचणारी वितरण व्यवस्थाच बहुतांशी कवितासंग्रहाला नाकारत आली, हे आजचे दुर्दैव आहे. कविता वाचणारा वर्गच आता अत्यंत कमी होत चालला आहे, अशी या वितरण व्यवस्थेची ओरड आहे. ती बव्हंशी खरीदेखील आहे. अनेक मोठे, प्रथितयश बुक डेपो कवितासंग्रह ठेवून घेण्यासच तयार होत नाहीत. ललितसंग्रहांना अजून तितके वाईट दिवस आले नसले तरी काही वर्षांमध्ये त्यांच्या वाट्यालाही हे दिवस येण्याची दाट शक्यता आहे.


* कारणे काय ?
कवितांचे आलेले सुमार पीक आणि स्वस्त झालेली प्रकाशन व छपाई व्यवस्था ही तांत्रिक कारणे कवितासंग्रहांच्या वितरण व्यवस्थेवर होणा-या परिणामांस कारणीभूत आहे असे बोलले जाते. कविता खरे तर अत्यंत अवघड असणारा साहित्यप्रकार अलीकडे अभिव्यक्तीसाठी अत्यंत सहज-सोपे माध्यम आता झाले आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे हाताशी पंधरा ते तीस हजार रक्कम असली की पाचशे ते हजार कॉपीज काढणे सध्या मध्यमवर्गाला परवडू लागले आहे. त्यामुळे कवितांचे पीक दरवर्षी उगवते, पण ते किती विकले जाते हे ज्याच्या त्याच्या जनसंपर्कावर अवलंबून. पण बुक डेपोजना असे कवितासंग्रह विकले जाण्याची शाश्वतीच आता राहिली नसल्याने कवितासंग्रहांना वितरणासाठी खूप झिजावे लागते. अनेकदा चांगल्या कवितांवर अन्यायही त्यामुळे होतो वा एखादा महत्त्वाचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशा कवितांचा वितरणाच्या बाजारामध्ये चांगले दिवस असतात.


मान्यवर काय म्हणतात ?
एक आवृत्ती संपायला 8-10 वर्षे लागतात
कवितासंग्रहांच्या किंमती अत्यंत कमी असतात. त्यामुळे तेवढी टायटल्स सांभाळणं मोठ्या बुक डेपोजना जड जातं. किमतीच्या मानाने नफ्याचं गणित अनेकदा विस्कटतं. त्यामुळे जुने डेपोज, पुस्तकप्रेमी कवितासंग्रह ठेवतात, पण व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणारे बुक डेपो कवितासंग्रह ठेवून घेण्यास तयार होत नाहीत. शिवाय कवितासंग्रह कमी प्रमाणात विकले जातात हे वास्तव आहे. मोठ्या कवींच्या कवितासंग्रहांचीही एक आवृत्ती संपायला किमान 8 ते 10 वर्षे लागतात. क्वचितच एखाद्या कवींच्या वाट्याला पुस्तके पटकन विकली गेल्याचे भाग्य येते. पण हे वास्तव आहे, जे थोडेतरी बदलणे आपल्या हाती आहे.
प्रकाश होळकर, प्रसिद्ध कवी,नाशिक


ललितसंग्रहांनाही हे दिवस दूर नाहीत
एक वाचक म्हणून कवितेला नेहमीच हिणवलं गेलंय. याचं नेहमीच आश्चर्य वाटत आलंय. मात्र, कविता हा अत्यंत मार्मिक आणि कमी शब्दांत गहन अर्थ सांगणारा साहित्यप्रकार आहे. मात्र, आज कवितासंग्रहांना जे दिवस आले आहेत त्याला वाचकांबरोबरच वितरण व्यवस्थाही तितकीच जबाबदार आहे. स्वत:च लिहून, स्वत:च कविता प्रकाशित करणा-यांची वाढती संख्या जबाबदार आहे. प्रकाशकांवरचा नवोदितांचा विश्वास उडाल्याची जाणीव सध्या वाढत चालली आहे. त्यामुळे प्रकाशनानंतरची वितरण व्यवस्था अधिक क्लिष्ट होते. ललितलेख संग्रहांना सुदैवाने आजही वाचकवर्ग शाबूत आहे. पण तोदेखील आता उपयुक्ततावादी लेखनाकडे वळायला लागल्याने त्यांनाही भविष्यात वितरण व्यवस्थेशी झगडण्याची वेळ येईल, असे वाटते.
लक्ष्मण राठिवडेकर,
अक्षरधारा पुस्तक वितरणसंस्था