आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जीबीएस’च्या विळख्यात दोन वर्षे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जीबीएस होऊन दोन महिने उलटले तरी शरीराच्या कोणत्याच अवयवाची हालचाल करता येत नव्हती. सतत झोपून राहिल्याने डोक्याच्या मागील भागातील केस गळून चट्टा पडलेला. नऊ महिन्यांनी स्वत:च्या हाताने जेवू शकलो होतो. वर्षभरानंतरही शर्टाची बटणं लावायची शक्ती नव्हती. प्रत्येक स्नायूला पूर्ववत करण्यासाठी कित्येक आठवडे फिजिओथेरपिस्टकडून विशिष्ट व्यायाम न कंटाळता केला. हाताने डोक्याला स्पर्श करणे ही साधी क्रिया स्नायूंना टप्प्याटप्प्याने शिकवावी लागली. त्याला वर्षाचा कालावधी लागला. कशाचाही आधार न घेता उठून उभे राहण्यासाठी 13 महिने लागले. बोटांत पेन धरून लहानपणी शिकलो तसे पुन्हा अक्षरं गिरवावी लागली.

पण हा आजार झाला कसा ?
11 ऑगस्ट 2009 रोजी मित्राचे वडील हार्ट अ‍ॅटॅकने गेले. मित्राला घेऊन त्याच्या गावी गेलो. दिवसभर पोटात अन्नाचा कण नाही. रात्री थोडा थकवा जाणवला. दुस-या दिवशी पायातून शक्ती कमी झाल्यासारखी वाटू लागली. डॉक्टर रायते यांनी तपासणी केली. दुस-या दिवशी हातात पेलासुद्धा धरता येईना. उठून उभे राहताही येईना. क्षार वाढावेत म्हणून डॉक्टरांनी सांगितल्यानुसार इलेक्ट्रॉल पीत राहिलो आणि शरीर निपचित होत गेले.

लुळं शरीर सोडलं तर आजाराची कोणतीच लक्षणं नव्हती. त्यामुळेच पहिले दोन दिवस गांभीर्य समजलं नव्हतं. अतिदक्षता विभागात नेताना पाहत होतो, आई-बाबा शेतातली कामं तशीच टाकून धावत पळत आले. मातीने माखलेले कपडे तसेच होते. अतिदक्षता विभागात विविध चाचण्या सुरू झाल्या होत्या. तिथल्या डॉक्टरांच्या चर्चेवरून मला समजलं होतं की, पाठीच्या मणक्याला काही इजा झालेली नसेल, तर जीबीएसचे उपचार सुरू करणार. पाठीच्या मणक्यात काही दोष असल्यास कायमचं पंगुत्व येणं शक्य होतं. कायमस्वरूपी आपल्या हातापायांत शक्ती नसणार? वैरी न चिंती ते मन चिंती, असं झालं. पाय दोन्ही निकामी झाले, तर जीवन कसं जगायचं? हा विचार छळत होता. मला उत्तर मिळालं... प्रायोपवेषन्. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी याचा अवलंब केला होता. आपलं शरीर जेव्हा स्वत:च्या आणि समाजाच्या उपयोगाचं राहत नाही तेव्हा अन्न, पाणी, औषधं त्यागून मृत्यूला आलिंगन द्यायचं. त्याक्षणी या विचाराने बळ दिलं आणि मी चिंतामुक्त झालो.

संध्याकाळी आजाराने श्वसनसंस्थेवर ताबा मिळवायला सुरुवात केली होती. चार-पाच हजार रुपये खर्चाचा सुरुवातीचा अंदाज होता, तो आता तीन-चार लाखांपर्यंत जाईल असे समजले होते. एकीकडे पैशांची जुळवाजुळव आणि दुसरीकडे क्षणाक्षणाला गंभीर होत असलेली स्थिती असे दुहेरी आव्हान होते. रुग्ण वाचणे अवघड आहे याची बहुतेकांना कल्पना आली होती. मज्जातंतू मेंदूकडून येणा-या कोणत्याही हालचालीसंबंधी आज्ञा मानण्यास असमर्थ ठरतात. सुरुवातीला इम्युनोग्लोब्युलीन थेरपी देणार असे सांगण्यात आले. या इंजेक्शन्सचीच किंमत दीड-दोन लाखांपर्यंत असते. मज्जातंतूंवरील हल्ला त्वरित रोखण्यासाठी ही थेरपी. साइड इफेक्ट्स असतात. प्लाजमा फेरसिस उपचार करायचे ठरले. सात वेळा प्लाजमा फेरसिसला सामोरा गेलो. प्लाजमा फेरसिस म्हणजे प्रत्यक्ष मृत्यू पाहणंच.

गळ्यातून एक वीतभर लांब नळी हृदयाच्या दिशेने घालण्यात आली. प्लाजमा शरीरात घालण्याची क्रिया सुरू झाली आणि मी घाबरून गेलो. डोळे उघडे ठेवणेही अशक्य झाले. त्रास होतोय हे सांगण्यासाठी तोंड उघडणेही कठीण होते. संपूर्ण शरीरात जणू भूकंप सुरू होता. शरीर जोरजोरात हलू लागले आहे, सारे अवयव तुटून हृदयात घुसताहेत, शरीर कागदाप्रमाणे टू डायमेन्शनल बनत आहे, असं वाटू लागलं. डोळे किलकिले करून पाहतो तर बाहेरून सारं शरीर शांत. संपूर्ण शरीरात तांडव सुरू होतं. तेव्हा सहन करण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं. शेवटचे ब्रह्मास्त्र काढले- शरीराकडे त्रयस्थपणे पाहायचे. श्वास घेताना आणि सोडताना मनातल्या मनात ओम् म्हणायचे. साधारण पाऊण तासापर्यंत ही स्थिती होती. आजारातून बाहेर आल्यानंतर मागोवा घेतला तेव्हा ध्यानात आले की, मदतीला धावून आलेल्यांमध्ये परिचित आहेत तसे अपरिचितही आहेत. ज्या व्यक्तीचा मासिक पगार 3 हजार रुपयेही नाही तिने तीन हजारांची मदत आपले नाव कुठेही येणार नाही या रीतीने केली होती.

मदतीला तरुण भारत, विवेकानंद केंद्र परिवारातील कार्यकर्ते धावून आले होते. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवणारा प्रा. सुनील. त्याचा दिवस पहाटे चारलाच सुरू होत होता. पहाटे खोली झाडून डेटॉलच्या पाण्याने पुसून घेणे. मला दिवसभर पिण्यासाठी पाणी तापवून ठेवणे. नंतर माझे दात घासणे, अंघोळ घालणे, अंग पुसणे, कपडे घालणे, एक एक करून ड्रायफ्रूट्स भरवणे आणि कॉलेजला रवाना. का करत होता तो हे सगळं? आम्ही एका विचाराने बांधलो होतो. असे अनेक सुनील या काळात धावून आले. मला नेहमी उपदेश करणारे माझे एक जवळचे नातेवाईक आले आणि आज वेगळेच सांगू लागले. अरे, केवळ पैशामुळेच सा-या गोष्टी होतात असा माझा भ्रम होता. मी गेले कित्येक दिवस पाहतोय, जे पैशानेही शक्य होणार नाही ते सारं मी पाहतोय. मला सांग, काय आहे हे विवेकानंद केंद्र? ही माणसं का करताहेत तुझ्यासाठी एवढं? समाजासाठी निरपेक्षपणे थोडेसे काम केल्याची ही पुण्याई असावी, असे मनोमन वाटते.

(संपूर्ण अनुभव www.psiddharam.blogspot.com वर उपलब्ध)