कुशल महिलांना अधिक कुशल बनवणारी तर गृहिणींना घरच्या घरी अर्थार्जनाची सोय उपलब्ध करून देणारी सोलापूरची उद्योगवर्धिनी ही संस्था. संधीचं व्यवसायात रूपांतर करून महिलांना उद्योगमंत्र देणाऱ्या या संस्थेच्या चंद्रिका चौहान यांचा हा शब्दगौरव...
हजाराे महिला तिच्या आश्रयाला आहेत. कित्येकींची घरं तिच्या आधाराने सुरळीत सुरू आहेत. शेकडो लोकांच्या तोंडी सुखाचा घास विनासायास जात आहे. त्या वटवृक्षाचं नाव आहे उद्योगवर्धिनी, आणि त्याच्या संस्थापक आहेत चंद्रिका चौहान. सोलापुरातील अतिशय नावाजलेल्या अशा या संस्थेच्या तपपूर्तीचे कार्यक्रम सुरू आहेत. त्यानिमित्त उद्योगवर्धिनीची ओळख.
कोणतीही महिला आत्मविश्वासाने उभी राहते ती आर्थिकदृष्ट्या निर्भर असेल तेव्हाच. अशीच एक उज्ज्वल यशाची कथा आहे चंद्रिका चौहान यांची. एकाच वेळी असंख्य कामे पार पाडत, समोरच्या व्यक्तीशी गोड बोलत, त्याच्या अडीअडचणी ऐकून त्यांचे निराकरण करणाऱ्या चंद्रिकाताई. सोलापुरात उद्योगवर्धिनी म्हणजे चंद्रिकाताई, हे समीकरण सर्वांना ज्ञात आहे. समोर आलेल्या प्रत्येक संधीचे व्यवसायात रूपांतर करताना त्यांचं ध्येय निश्चित असतं. उद्योगाविषयी चंद्रिकाताई सांगतात, आम्हाला बचत गटाच्या मालाचे मार्केटिंग करून विक्रीसाठी सुपरमार्केटसारखे माध्यम उपलब्ध करून द्यायचे आहे. उद्योगवर्धिनीला स्वत:चा व्यवसाय करायचा नाही, तर उद्योजिका तयार करायच्या आहेत. आत्तापर्यंतच्या चंद्रिकाताईंच्या प्रवासाने हेच सिद्ध केले आहे.
जिद्दीने काही करायचे ठरवले की, मागे हटायचे नाही, हे जणू चंद्रिकाताईंचे ब्रीदच. याच वृत्तीमुळे उद्योगवर्धिनीतून शेकडो उद्योजिका तयार झाल्या, हजारो महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले. मूळ गुजरातचे असलेले चंद्रिकाताईंचे कुटुंब १९८३मध्ये सोलापुरात स्थायिक झाले. त्यानंतर पती शंभुसिंग यांच्या आजारपणामुळे चंद्रिकाताई शिवणाचा क्लास लावून शिवणकाम शिकल्या. १९९२मध्ये घरगुती क्लासेस सुरू केले. झोपडपट्टी परिसरात शिलाई केंद्र सुरू केलं. तेथील महिलांना रोजगार मिळाला. पोळीभाजी केंद्र सुरू केले. सोलापूरची प्रसिद्ध अशी कडक भाकरी, शेंगदाण्याची चटणी, शेंगा पोळी याशिवाय कुरडया, पापड, भरल्या मिरच्या, शेवया, सांडगे असे पदार्थ बचत गटांच्या मार्फत बनवले. त्याला बाजारपेठ मिळवून दिली. उद्योगवर्धिनीच्या पोळीभाजी केंद्रात रोज तीन ते साडेतीन हजार लोकांचा स्वयंपाक केला जातो. टनावारी दिवाळी फराळ करून त्याची देश-विदेशात विक्री केली जाते. उद्योगवर्धिनीच्या शेंगा चटणीला सरकारकडून भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी प्रयत्न सुरू असून ही चटणी सोलापूर शेंगा चटणी या नावाने फूड मिनिस्ट्रीतर्फे बाजारात विक्रीसाठी आणली जाणार आहे. सोलापुरात रोज तीन ते चार हजार किलो चटणी बनवली जाते. त्याचे मानक ठरवले जाऊन एका प्रतीची आणि चांगल्या गुणवत्तेची चटणी निर्यात केली जाणार आहे. चंद्रिकाताईंचं पूर्ण कुटुंब यासाठी कष्ट करत आहे. पती, दोन्ही मुलं, मुलगी सर्वांनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. नगरसेविका म्हणूनही चंद्रिकाताईंनी आपली कारकिर्द सिद्ध केली आहे. सलग दोनदा नगरसेविका म्हणून निवडून येत त्यांनी दहा वर्षे प्रभागात काम केले.
अनेक महिलांना घराबाहेर जाऊन काम करता येत नव्हते. त्यांची ही अडचणी ओळखून अशा महिलांना घरच्या घरी करता येईल असे काम त्यांना दिले. कामांची वाढती जबाबदारी, एकत्र येणाऱ्या महिलांची वाढती संख्या यांचे नियोजन करण्याच्या उद्देेशाने ११ महिलांनी मिळून उद्योगवर्धिनी संस्थेची स्थापना २००३मध्ये केली. २००८मध्ये शहराच्या मध्यवर्ती भागात शुभराय मठाची जागा मिळाली. तसेच शुभांगी बुवा यांच्या पाखर संकुल या निराधार मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेची साथही मिळाली. आता उद्योगवर्धिनी संस्थेच्या मार्फत अनेक ठिकाणी पोळीभाजी केंद्रं चालवली जातात. अनेक धाब्यांवर भाकरी, चटणी पोहोचवली जाते. रोजच्या भाकऱ्यांच्या जेवणाच्या आॅर्डर असतातच. याशिवाय वालचंद काॅलेजची मेस, सिव्हिल हाॅस्पिटलमधले रुग्ण, कर्मचारी, जेष्ठ नागरिक यांना रोज जेवण पोहोचवले जाते. अंध मुली व निराधार महिलांसाठी मंगलदृष्टी योजना सुरू केली. त्यातून त्यांना रोजगारही मिळवून दिला.
या उत्तुंग कामगिरीची दखल अनेक संस्थांनी घेतली असून चंद्रिकाताईंना स्त्री उद्यमी अॅवाॅर्ड दिल्ली, अभिजीत कदम मानवता पुरस्कार, गगन सदन तेजोमय सन्मान मुंबई, प्राज महा आंत्रप्रुनर अॅवाॅर्ड अशा सुमारे दीडशे पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
madhavi.kulkarni0@gmail.com