आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नसते उद्योग !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपण लहान असतो तेव्हा घरातल्या मोठ्या माणसांना मिळणारं स्वातंत्र्य बघून आपल्याला लवकर मोठं व्हावंसं वाटतं. आणि एकदा का मोठे झालो की, पुन्हा वाटतं, लहान होतो तेच बरं होतं. पण काय करणार? काळ कोणासाठी थांबत नाही. तद्वत वाढणाऱ्या वयाला आपण थांबवू शकत नाही. वयाबरोबर येणारे बदल आपल्याला स्वीकारावेच लागतात. वाढत्या वयाबरोबर आपल्या दिसण्या, वागण्यातही अनेक बदल होतात. हळूहळू वयाच्या खुणा दिसू लागतात. म्हणजे असं की, चवळीच्या शेंगेचं रूपांतर भोपळ्यात होतं. कोणे एके काळी ‘चौदहवी का चांद’ असलेला किंवा भासणारा चेहरा ‘दिन ब दिन’ मेड अप व्हायला लागतो. चेहऱ्यासारखा आणखी एका गोष्टीवर परिणाम होतो ते म्हणजे आपले केस. ‘चेहरे पे गिरी जुल्फें’ म्हणण्याइतक्या केसाच्या बटाच उरलेल्या नसतात. काय चार केस उरलेले असतात त्याची काय स्टाइल करावी, हेच कळेनासं होतं. काय केलं की आपण पूर्वीसारखे छान दिसू, हे कळतच नाही. तरुणपणी आपण असल्या गोष्टींची काही फिकीरच केलेली नसते. मग उरलेसुरले केस वाचवण्यासाठी आपण एकदम ‘कॉन्शस’ होतो. कोणी तेल सांगितलं ते लाव, कुणी लेप सांगितला तो लाव, कुठे शाम्पू बदल, असे नानाविध उपाय करत बसतो.

माझं पण असंच झालं. केसांसाठी अनेकविध उपाय करता करता मी पेपरमध्ये एक जाहिरात पाहिली. ‘पुन्हा तरुण दिसण्यासाठी लागणारे दाट चमकदार केस हवे असल्यास आमच्याकडे या, Tricology चमत्कार, केसांचे गतवैभव पुन्हा मिळवण्याचा सोपा उपाय, स्त्रियांसाठी खास डिस्काउंट, मोफत सल्ला’ वगैरे वगैरे. विचार केला, अरे वा, हे तर छान झालं. मी पुन:पुन्हा ती जाहिरात वाचली. दिवसरात्र मनात तोच विचार येऊ लागला. एकदा वाटलं, नको उगाच, लोक हसायचे, म्हणायचे, हे काय भलत्या वयात भलते थेर. तर एकदा वाटलं, काय हरकत आहे? अजून काही आपलं एवढं वय झालेलं नाही आणि कोणत्याही वयात छान दिसण्याचा आपला हक्कच आहे. म्हणतात ना, Age is a state of mind over matter, if you don’t mind, it doesn’t matter! शेवटी हा उपचार करायचाच, असा विचार मनात पक्का झाला. ध्यानी, मनी, स्वप्नी मला तेच दिसू लागलं. केस पुन्हा दाट लांबसडक झाले आहेत, झुपकेदार शेपटा पाठीवर रुळतो आहे वगैरे. असं करता करता शेवटी एकदाची मी त्या पार्लरपर्यंत पोहोचले.

अतिशय सुसज्ज असं ते पार्लर त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होतं. काचेचं दार ढकलून मी आत शिरले. तिथं काउंटरपाशी बसलेल्या नाजूक रिसेप्शनिस्टने माझं यथोचित स्वागत केलं. मला बसण्याची विनंती केली आणि माझ्याकडून मोफत सल्ल्याचे ५०० रुपये घेऊन माझी अपॉइंटमेंट फिक्स केली. काय करणार? ५०० रुपये द्यावेच लागले. म्हणतात ना, गरजवंताला अक्कल नसते. तसंच काहीसं. माझा नंबर येण्याची वाट पाहात मी तिथल्या गुबगुबीत सोफ्यावर विराजमान झाले. त्या दालनात भिंतीवर वेगवेगळ्या हेअरस्टाइल केलेल्या बायांची आकर्षक चित्रं लावली होती. काही दिवसांनी आपले पण केस असेच दिसतील, या विचारात मी दंग झाले. इतक्यात त्या रिसेप्शनिस्टने मला आत जाण्याची खूण केली आणि मी तरंगतच आतमध्ये गेले. कारण माझ्या साऱ्या समस्यांचे ‘हल’ आतमध्ये होते. आतमध्ये मोठमोठे आरसे लावून सजवलेला ‘आरसेमहाल’च होता. सलूनसारख्या मोठ्या खुर्च्यादेखील होत्या. तेवढ्यात आतून एक मॅडम प्रकट झाल्या. त्यांनी मला त्या खुर्चीत बसवलं आणि माझ्या केसांचा ताबा घेतला. माझे केस हातात घेऊन त्याकडे एक दयनीय दृष्टीक्षेप टाकला. मी बसले होते, तिथे समोरच केसांची वेगवेगळी मॉडेल्स ठेवलेली होती. त्यात केसांचे वेगवेगळे प्रॉब्लेम दाखवले होते. म्हणजे तुम्हाला सांगू का, आपण हाडांच्या डॉक्टरकडे गेलो की तिथे एक हाडांचा सापळा असतो, त्यात स्पायनल कॉर्ड वगैरे दाखवलेला असतो. किंवा डेंटिस्टकडे गेलात तर तिकडे वेगवेगळ्या आकाराच्या कवळ्या ठेवलेल्या असतात, त्याला मध्येमध्ये सोन्या-चांदीचे दात बसवलेले असतात. थोडंफार तसंच. मग त्या मॅडमनी मला प्रत्येक मॉडेलच्या केसाचे काय काय प्रॉब्लेम आहेत आणि या साऱ्या प्रॉब्लेम्सवर त्यांच्याकडे कशी सोल्युशन्स आहेत, हे मला अगदी आश्वासक शब्दांत पटवून दिलं. मग त्यांनी मसाजरसारखं एक मशीन आणलं आणि हळुवारपणे माझ्या केसातून फिरवायला सुरुवात केली.

वेगवेगळ्या अँगलमधून हे केसाचं टेस्टिंग जवळजवळ दहा मिनिटं तरी चाललं. त्यानंतर अतिशय गंभीर चेहरा करून माझ्या केसांची कंडिशन किती वाईट आहे आणि ट्रीटमेंट घेतली नाही तर ती आणखी बिघडू शकते, पण लगेच ट्रीटमेंट घेतली तर किती फायदा होईल, हेही पटवण्यात आलं. मीपण विचार केला, घ्यायचीच आहे ट्रीटमेंट तर उगाच उशीर कशाला? ‘शुभस्य शीघ्रम्.’ मग माझी रवानगी आणखी आतल्या दालनात झाली. एका उंच चेअरवर मी विराजमान झाले. तिथे आणखी दोन कन्यका पांढरेशुभ्र अॅप्रन घालून कात्र्या, रेझर, पिना, क्लच अशा अनेक आयुधांसह सज्ज होत्या. मला एक क्षण ऑपरेशन थिएटरचीच आठवण झाली. एवढ्यात त्या बाहेरच्या मॅडम आत आल्या आणि त्यांनी माझ्या केसांची एक बट हातात धरून मुळापासून कापायला सुरुवात केली. आपण इकडे केस कापायला थोडेच आलो? मी तिला म्हटलं, अहो, केस कापता कशाला? केस वाढायची ट्रीटमेंट द्या ना. यावर तिने मला राष्ट्रभाषेत सुनावलं, ‘बाल तो सब निकालने पडेंगे, उस के बादही ट्रीटमेंट होगा! ते ऐकून माझ्या छातीत धस्स झालं. तेवढ्यात तिने माझी आणखी एक बट उडवली. माझ्या लक्षात आलं, आता आपलं काही खरं नाही. डोळ्यासमोर ते जावळ केलेल्या बाळाचे चेहरे फिरू लागले. आपण तसे दिसणार, या कल्पनेने मला भोवळच यायला लागली. मी तिला म्हटलं, ‘नहीं नहीं, मुझे ऐसी ट्रीटमेंट नहीं चाहिए.’ पण ती ऐकेचना. ‘आपने ५०० रुपया भरा है अभी आप को पूरा ट्रीटमेंट लेना पडेगा.’

अरे बापरे! आता काय करायचं? मला तर काही सुचेना. समोर आरशाकडे बघवेना. मी खुर्चीतून उठण्याचा प्रयत्न केला तर त्या दोन्ही कन्यकांनी मला गच्च धरून ठेवलं. मनात सर्व देवांचा धावा केला, पण कोणताही देव माझ्या हाकेला धावून आला नाही. आता काही खरं नाही, हे मला कळून चुकलं. शेवटी मनाचा हिय्या करून मी खुर्चीतून उडी मारली आणि त्या बयेच्या हाताला हिसडा देऊन, तिला ढकलून दरवाजाच्या दिशेने पळाले. मी पुढे आणि ‘पकडो, पकडो’ म्हणत त्या तिघी माझ्या मागे, अशी रेसच सुरू झाली. मी अगदी जीव मुठीत धरून पळत होते. त्या नादात ते पार्लरचं भलंमोठं काचेचं दार मला दिसलंच नाही. मी धाडकन त्या दारावर आपटले. जोरात आवाज झाला. मी डोळे मिटले आणि धपकन खाली पडले. डोळे उघडले आणि इकडेतिकडे पाहिलं, तेव्हा लक्षात आलं की, आपण झोपेत कॉटवरून खाली पडलोय. जाग आल्यामुळे ते दु:स्वप्न संपलं होतं. तो जाहिरातीचा कागद अजूनही माझ्या हातात होता. तो मी शक्य तितक्या लांब भिरकावून दिला आणि स्वत:ला बजावलं की, पुन्हा स्वप्नातही असा विचार करायचा नाही. हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं नाही. तुम्ही पण लक्षात ठेवा, असले नसते उद्योग करू नका बरं!

उल्का मिरजकर, नाशिक
बातम्या आणखी आहेत...