आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहिणींची समांतर अर्थव्‍यवस्‍था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या काही वर्षांपासून आपण जागतिक मंदीबाबत ऐकतोय. युरोपातील पोर्तुगाल, इटली, ग्रीस, स्पेनमधल्या अर्थव्यवस्था अडचणीत सापडल्या आहेत. अमेरिका, चीन, रशिया व इतरही अनेक देश मंदीच्या विळख्यात सापडले होते. पण एक देश यातून लवकर सावरला आणि पुढे जातोय तो म्हणजे आपला भारत देश.

कारणं काय असतील असं विचारलं तर काही म्हणतील नवीन सरकार. किंवा रिझर्व बँकेचे धोरण, खासकरून गवर्नर रघुराम राजन यांची शिस्तबध्दता, इत्यादि.

अजून एक महत्त्वाचं कारण जे आपण विसरतोय, ते म्हणजे भारतीय स्त्रिया, ज्या अर्थव्यवस्थेमागचे अदृश्य बळ आहेत. या महिला बचत करतात, घराची आर्थिक घडी सांभाळतात, घर सांभाळतात. मुलं, नवरा, सासूसासरे, नातेवाईक, शेजारीपाजारी या सर्वांची काळजी घेत सणही साजरे करतात. भारतीय महिला प्रेमाने, आपुलकीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. आपण त्यांच्या प्रत्येक सेवांबद्दल किमान शुल्क वा पगार ठरवला तर?

जसे मुलांना सांभाळणे - साधारण २,००० रुपये प्रति महिना
स्वयंपाक करणे - २,००० ते २,५०० रुपये प्रति महिना
कपडे, भांडी, फरशी पुसणे - १,००० ते १,५०० रुपये प्रति महिना
मुलांचा अभ्यास घेणे व त्यांना प्रोत्साहित करणे - १,००० ते १,५०० रुपये प्रति महिना
वयोवृध्दांची देखभाल म्हणजे त्यांचे जेवण, वेळेवर औषध देणे, सेवा करणे, - ३,००० रुपये प्रति महिना.

गृहिणी किंवा महिलांच्या या कामांची आपण किंमत करत नाही. त्यांनी फक्त या कामांमध्येच अडकून राहावे, असे नाही, परंतु या मेहनतीचा सन्मान करायला हवा, एवढे नक्की. भारतातील लोकसंख्या १२५ कोटी. ढोबळरीत्या पुरुष ५० ते ६० कोटी. वृध्द, आजारी महिला, लहान मुलंमुली हे ३० ते ४० कोटीच्या आत. उरलेल्या ३० कोटी महिला असे आपण धरूया ज्या गृहिणी आहेत किंवा नोकरी करून घर सांभाळतात.

वर उल्लेख केलेल्या सर्व कामांमधून त्यांना कमीत कमी १० हजार रुपये एवढा त्यांचा वाटा आहे, जरी या कामाचे उत्पन्न मिळत नाही. म्हणजे १०,००० x ३० कोटी असे गणित होते. उत्तर आहे तीन लाख कोटी साधारण प्रत्येक महिन्याला. पण राष्ट्रीय सकल उत्पन्नात याचा वाटा नसतो किंवा हे गृहीत धरलं जात नाही. अर्थशास्त्र्यांनी हे उत्पन्न आपल्या राष्ट्रीय सकल उत्पन्नात धरले नाही तरी निदान या महिलांच्या कामाची, मेहनतीची जाणीव म्हणून नोंद किंवा उल्लेख तरी करावा या Invisible Working, earning, saving forceचा. म्हणजे आपल्या घरातील व समाजातील, देशातील सर्व महिलांची दखल अार्थिक सर्वेक्षण, केंद्र व राज्य सरकारचे अर्थसंकल्प, अर्थतज्ज्ञ, रिजर्व बँकेने घेतली पाहिजे, असे ठामपण वाटते.

भारताबाहेरच्या महिलाही गृहिणी म्हणून काम करतात किंवा नोकरी करतात पण भारतीय महिलांच्या जबाबदाऱ्या थोड्या जास्त आहेत. जसे सण, उत्सव, कुटुंबाची जबाबदारी, मुलांची देखभाल व अभ्यास, ज्येष्ठ मंडळींची सेवा, देखभाल, नातेवाइकांचा पाहुणचार, धुणी-भांडी, कपडे, स्वयंपाक, मुलांच्या जन्मापासून लग्नापर्यंत व नंतर त्यांची मुले झाली तर त्यांची म्हणजे नातवंडांची देखभाल... अशा कधी न संपणाऱ्या जबाबदाऱ्या असतात. म्हणून भारतीय महिलांचे कष्ट, मेहनत व त्यांचे आयुष्य हे इतर महिलांपेक्षा वेगळे आहे असे वाटते. ही परिस्थिती छोट्या शहरांपासून मोठ्या शहरांपर्यंत सारखीच आहे. खेडेगावातली महिला नोकरी करत नसली तरी घर सांभाळून ती शेतात काम करते, पिकलेली माल विकायची जबाबदारी तिची असते.

भारतीय महिलांचा हा न दिसणारा व दखल न घेतला जाणारा हातभार आपल्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे टिकवून ठेवतो आहे. त्यांचं काम आणि त्यांना न मिळणारे मानधन एक प्रकारे समांतर अर्थव्यवस्थेसारखे (Parallel economy) आहे, जे देशाच्या अर्थव्यवथेला नकळत योगदान देत राहते.

ही सगळी कामं करताना महिला पैशांची अपेक्षा करत नसल्या तरी त्यांच्या कामाची दखल घेतली जावी, त्यांच्याशी प्रेमाने व आदराने वागावे, चार शब्द आपुलकीचे बोलले जावे, ही अपेक्षा असतेच.
ती चुकीची आहे का?
समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की, त्यांना त्यांच्या कामाची पावती म्हणून सन्मान, आदर दिला पाहिजे. गृहिणी असो किंवा नोकरदार महिला, कुठल्याच स्त्रीच्या मेहनतीची, कष्टाची, धावपळीची दखल घेतली जात नाही. हे आता आपण बदललं पाहिजे.
umakantkamuni@gmail.com
बातम्या आणखी आहेत...