आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या जगण्याचा धांडोळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अवकाळी विळखा’ या कथासंग्रहातून सचिन वसंत पाटील यांनी शेतकरी जीवनाचा धांडोळा घेतलेला आहे. आजच्या शेतकरी वर्गाच्या समस्या, परिस्थितीमुळे आलेली असहाय्यता, आतली घुसमट, आपल्या माणसांकडूनच होणारे शोषण इत्यादी बाबींवर त्यांनी या कथांद्वारे प्रकाशझोत टाकला आहे.
सचिन वसंत पाटील हे आजच्या ग्रामीण लेखकातील एक आश्वासक नाव. त्यांचा ‘अवकाळी विळखा’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. आणि ‘सांगावा’ या पहिल्या कथासंग्रहानंतर त्यांच्याकडून निर्माण झालेल्या अपेक्षांची पूर्तता हा कथासंग्रह करतो आहे, यामुळे लेखक अभिनंदनास पात्र ठरला आहे. त्यांचे अभिनंदन दोन कारणांसाठी- (१) सुमारे १७-१८ वर्षांपूर्वी त्यांना अपघातात अपंगत्व आले, पण खचून न जाता ते निष्ठेने लेखन करीत आहेत. आपल्या भोवतीच्या शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या सुख-दु:ख, व्यथा-वेदना, समस्या शब्दबद्ध करून आपल्या परीने उत्तरे शोधत आहेत. यासाठी त्यांची लेखणी कार्यरत झाली आहे म्हणून...!

(२) ‘अवकाळी विळखा’मधून त्यांची कथा अधिकच सशक्त होत चालली आहे, याची प्रचिती आली म्हणून...! असो.
‘अवकाळी विळखा’ या कथासंग्रहामध्ये एकूण १५ कथा असून या सर्व कथा महाराष्ट्रातील विविध नियतकालिके, दिवाळी अंक यांमधून पूर्वप्रकाशित आहेत. या कथांमधून लेखक सचिन पाटील यांनी ग्रामीण परिसरातील समस्यांचा वेध घेतलेला आहे. श्रद्धा, अंधश्रद्धा, अस्मानी सुलतानी संकटे, ग्रामीण भागातील चंगळवाद, व्यसनाधीनता, शेतकऱ्यांच्या समस्या, खत टंचाई, बदललेला निसर्ग, प्लाटींग व्यवसायाचे आक्रमण, नवे औद्योगीकरण हे या कथांचे विषय आहेत. आणि लेखकाने हे सर्व विषय सामर्थ्याने हाताळल्याचे जाणवते. याचे एक महत्त्वाचे कारण, लेखक प्रत्यक्ष कर्नाळसारख्या एका खेडेगावात वास्तव्यास असल्याने लेखकाच्या अनुभूतीस जिवंत रसरशीतपणा लाभलेला आहे. आणि सचिन पाटील यांची ही जमेची बाजू आहे. कारण त्यांच्या कथेतून साकारणारी ही माणसे त्यांच्या भोवती आजही आहेत. या कारणाने त्यांची कथा रसरशीत, जिवंत झालेली आहे.

‘घुसमट’ नावाच्या पहिल्याच कथेत विलास नावाच्या तरुण शेतकऱ्याची मनोव्यथा आहे. सुशिक्षित असलेल्या विलासला नोकरी मिळत नाही, म्हणून शेती करावी लागते. पण या शेतीच्या आतबट्ट्याच्या व्यवहारामुळे तो वैतागून जातो. वखारवाला बज्या त्याला त्याचं वैभव दाखवतो, तेव्हा विलास त्याचं सारं ऐश्वर्य पाहून भांबावून जातो आणि त्याचे संवेदनशील मन तुलना करू लागते. अशोक चावरे हा वर्गमित्र भेटतो तेव्हाही या नोकरदार मित्राची सुस्थिती बघून त्याचे मन फाटलेले असते. या तुलनेतून आपला अंधकारमय असा भविष्यकाळ त्याला जाणवतो. रोडटच असलेली शेतजमीन विकण्याचा आपल्या मुलाचा सल्ला तो अमलात आणण्याचे ठरवतो. पण पुन्हा त्याचं मन कोंडीत सापडतं. परिस्थितीने बेजार झालेला विलास शेतीतून बाहेर पडण्याचा निर्धार करतो, पण त्याचं मन काळीआई विकण्यास राजी होत नाही. अशी विलासची भावनिक स्पंदने टिपणारी कथा वाचनीय झाली असून वाचक मन हेलावणारी आहे.

या कथासंग्रहातील ‘टांगती तलवार’, ‘करणी’, ‘लढत’, ‘सांभाळ रे’ आदी कथाही त्यातील आशयामुळे आगळ्यावेगळ्या ठरतात. ‘रान’ या कथेत सखाराम या बेकार तरुणाचे मनोविश्व लेखकाने साकारले आहे. गावशिव सोडून हा सखाराम पोट भरण्यासाठी शहरात येतो. एका खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करू लागतो. पण जेव्हा पावसाळा सुरू होतो, तेव्हा मात्र कामावरचे लक्ष उडते. तो गावाकडे जाण्यासाठी हवालदिल होतो. त्यामुळे त्याची मनोवस्था मालकाच्या लक्षात येते व मग त्याला आपल्या गावाकडे जाण्याची परवानगी मिळते. ही कथा वाचल्यावर, कै. व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘वेडा पारिजात’ या कथेची आठवण आल्याशिवाय राहात नाही. ‘बुजगावणं’ या कथेत दोन पिढ्यांतील अटळ संघर्ष सचिन पाटील यांनी चितारला आहे. वय झालेल्या शामुआण्णाचं आपल्या मुलासोबत पटत नाही. एम.आय.डी.सी.साठी सहाशे शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घ्यायची योजना सरकार आखते. लाखो रुपये दाम भेटणार, म्हणून काही शेतकरी जमीन हस्तांतरणासाठी तयार होतात, तर काही जण विरोध करतात. शेतीमध्ये हातात काही येत नाही, म्हणून नव्या विचारांचा सदू फाॅर्मवर सही करून मोकळा होतो. मात्र म्हातारा शामुआण्णा तयार होत नाही. दोघांची घरातच जुंपते. आजापणजोबांनी कष्टलेली काळीआई गमावण्यास शामुआण्णा काही राजी नसतो. पण अखेरीस त्यांना राजी व्हावे लागते. पण तेव्हा त्यांना आपली स्थिती एखाद्या बुजगावण्यासारखी झाली असल्याचे जाणवते. शेवटी ते भ्रमिष्ठासारखे वागतात. अशी ही कथा नवा-जुना संघर्ष मांडणारी. सचिन पाटील यांनी नेमकेपणाने हे नाट्य शब्दांत पकडले आहे.

कुटुंबातील परकेपणा ‘दिवसमान’ या कथेत लेखकाने शब्दांकित केला आहे. महादेवबापूंना दोन मुले असतात. थोरला शिकून चांगल्या हुद्द्यावर बसतो. मात्र तो घरादाराला विसरतो. उलट शेतीमधील उत्पन्नाचा वाटा मागतो. तेव्हा म्हातारा महादेवबापू कोसळून पडतो. आपल्या नशिबालाच दोष देतो. दिवसमानच असले आहे, म्हणून शांत राहतो. ‘वाट’ या कथेत पांडबा या ऊसउत्पादक शेतकऱ्याची दमकोंडी प्रत्ययाला येते. त्याच्या शेतात वाहन जाण्यासाठी रस्ता नसतो. पांडबा शेजारी असलेल्या पाटलाला वाटेसाठी एकरी पैसे द्यायचे कबूल करतो. मग त्याला स्लिपबॉय, मुकादम व तोडकरी लुटतात. या सगळ्यांची भरपाई करण्यासाठी त्याला दारापुढची शेरडी विकावी लागते. एकूणातच त्याची या सर्व शोषकांकडून कशी वाट लागते, याचं ज्वलंत चित्रण या कथेत लेखकाने केलं आहे. मन गलबलून टाकणारी ही कथा आहे.

या कथासंग्रहातील ‘अवकाळी विळखा’ या शीर्षक कथेत अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या उभ्या आयुष्याची कशी माती होते, हे चितारलं आहे. तर ‘मैत्री’ या कथेत झटपट श्रीमंत व्हायच्या योजना ग्रामीण भागातही कशा धुमाकूळ घालत आहेत, याचे चित्रण लेखकाने केले आहे. आणि या मोहामुळे जिवलग मित्र फसवतो तेव्हा कथानायक त्याला क्षमा करतो, सारे काही विसरून जातो. सचिन वसंत पाटील यांनी ‘अवकाळी विळखा’ या संग्रहातून शेतकरी जीवनाचा मन:पूर्वकतेनं धांडोळा घेतलेला आहे. आजच्या शेतकरी वर्गाच्या समस्या, अस्मानी-सुलतानी संकटे, मानवी स्वभावातील वैचित्र्य, परिस्थितीमुळे आलेली असहाय्यता, आतली घुसमट, आपल्या माणसांकडूनच होणारे शोषण इत्यादी बाबींवर त्यांनी या कथांद्वारे प्रकाशझोत टाकला आहे. नेटके संवाद, चित्रमय भाषा व ओघवत्या शैलीमुळे या कथा मनाची पकड घेतात. या कथा वाचकाच्या मनात रेंगाळतात. ‘घुसमट’, ‘बुजगावणं’ या कथांमधील नायकांची भावस्थिती अनुभवून वाचक मन व्यथित होते. आणि हेच सचिन पाटील यांचे यश आहे, असे म्हटले तर चूक ठरणार नाही. याशिवाय ‘इळभर’, ‘मनाजोगतं’, ‘बाटूक’, ‘इचका’, ‘वकुत’, ‘हाबका’, असे खास बोलीभाषेतील शब्द मनाला आनंद देतात. लेखकाने ग्रामीण म्हणी वाक‌्प्रचार यांचा माफक वापर करून संवादी शैली व नेटके निवेदन कौशल्य योजून कथा खुलवली आहे. या सर्व बाबींमुळे ‘अवकाळी विळखा’ हा संग्रह देखणा झाला आहे.

अवकाळी विळखा
लेखक : सचिन वसंत पाटील
प्रकाशन : गवळी प्रकाशन, इस्लामपूर
पाने : २०४
मूल्य : 3१०/-
उमेश मोहिते-थाटकर
uthatkar94@gmail.com
बातम्या आणखी आहेत...