आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रियांचं आत्‍मभान जागवणा-या कविता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या संपन्न वारश्यातून सामाजिक बांधिलकी जपत स्त्रियांचं आत्मभान जागवणाऱ्या कविता प्रा. सुनिता यांच्या संग्रहात वाचायला मिळतात.  स्त्रीमनाच्या अस्तित्व स्थापनेसाठीचा  संघर्ष अतिशय सहजतेनं कवियत्रिनं व्यक्त केला आहे.

प्रा. सुनिता बोर्डे - खडसे लिखित ‘अस्तित्वाचा अजिंठा कोरताना’ हा पहिलाच कवितासंग्रह! यात एकूण ८५ कविता असून सर्वच मुक्तछंदातील आहेत. या कवितांमधून फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांतून संपन्न झालेले कवयित्री खडसे यांचे आत्मभान प्रकर्षाने जाणवते व ही कविता सामाजिक बांधिलकी आत्मीयतेने जोपासताना दिसते. पण म्हणून ही प्रचारकी थाटाची कविता होत नाही. तर या विचारांची कवयित्री पाईक असल्याने ही कविता सहजसुंदरतेने व्यक्त झाली आहे.  आजच्या सुशिक्षित स्त्रीमनाचा अस्तित्व प्रस्थापनेसाठीचा संघर्ष कवितेमधून अकृत्रिमतेने व्यक्त झाला आहे.
भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीला एक तर देवता म्हणून गौरवले जाते नाहीतर उपभोग्य वस्तू मानले जाते. यावर संयतपणे पण मार्मिक पध्दतीने कवयित्री ‘माणूस’ या कवितेत म्हणते :
मी लक्ष्मी
मी दुर्गा
मी सरस्वती
मी काली
नाही फक्त
माणूस मी.
असा प्रश्न ही स्त्री केवळ शिक्षण प्राप्त केल्याने आलेल्या आत्मभानातूनच इथल्या व्यवस्थेला विचारते. पिढ्यान् पिढ्यांच्या या अन्यायकारक पुरुषप्रधानतेलाच आता ती आव्हान देते आहे. कारण तिचा हा संघर्ष माणूस म्हणून पुरुषाच्या बरोबरीने स्त्रियांना समानतेचा मूल्यभाव प्राप्त व्हावा यासाठीच आहे. कवयित्री असेही म्हणते :
मलाही जगू द्या
माणूस म्हणून
तुम्हीही जगा
माणूस म्हणून
माणसासारखे.
थोडक्यात या कवितेमधून कवयित्रीने स्त्रीला माणूस म्हणून प्रतिष्ठापित करण्याची आर्त भावना संयतपणे शब्दबद्ध केली आहे. आजची स्त्री आपल्या जगण्याचा व अस्तित्वाचा सजगपणे विचार करते आहे. कारण तिला आपणही एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे धनी आहोत, या बाबीचे आत्मभान आले आहे. आणि या आत्मभानाच्या प्रत्ययामधूनच मग ती इथल्या व्यवस्थेला व संस्कृतीला प्रश्न विचारते आहे. आपल्या इच्छित लक्ष्याच्या दिशेने तिची आगेकूच सुरू आहे. ती आपल्या अस्तित्वाचे अजिंठ्यासमान चिरकाल टिकणारे शिल्प स्वतःच्या सामर्थ्याने घडवण्यास सज्ज झाली आहे. कवयित्री म्हणतात :
मी मुक्त करते
दबलेल्या माझ्याच मूर्तीला
व्यवस्थेच्या पाषाणातून
आणि मीच माझी
मलाच आकारते नव्याने.
अशी ही आजच्या स्त्रीमनाला जागवणारी आणि काहीएक दिशा देणारी रचना!
प्रा. खडसे यांची कविता केवळ आजच्या स्त्रीजीवनातील व्यथावेदनांचे आविष्करणच करत नाही तर स्त्रीमनाला संघर्षरत राहण्यासाठी आत्मबळही देते. स्त्री-पुरुषांमध्ये स्त्रीची जागा ही नेहमी डावीकडेच असते. हे डावेपण झुगारून देण्याची प्रेरणा कवयित्री देते. कवयित्री म्हणते :
एकदा बघ ना
स्वतःची जागा बदलून
डावीकडून उजवीकडे.
फुले - शाहू - आंबेडकरी विचारांचा स्पर्श झालेली कवयित्री आपल्या हव्या त्या आशयाचा परिणाम साधण्यासाठी भारतीय समाजव्यवस्थेतील काही मिथकांचाही कधी उलटा अन्वयार्थ तर कधी नवाच अर्थ शोधताना दिसते. ‘तीन पावलं’ या कवितेमध्ये बळीला वामनाने तीन पावलाचे दान मागून पाताळात गाडल्याच्या मिथकाचा आधार घेऊन कवयित्री निष्कर्ष काढते की, इथल्या अन्यायी व्यवस्थेने स्त्रीच्या मनावर, शीलावर व तोंडावर अशा एकूण तीन ठिकाणी तीन पावले ठेवून तिला कायमचे अस्तित्वहीन करून टाकले आहे. तर ‘कृष्णा’ या कवितेमधून एक नवाच अन्वयार्थ लावून कवयित्रीने स्त्रीवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरोधात भाष्य केले आहे. कवयित्री या कवितेत म्हणते :
कृष्णा, तू त्याच वेळी
वस्त्र पुरवण्यापेक्षा
हरामी हात छाटले असतेस तर
पुढे कोणत्याच दुर्योधनाची
छाती नसती झाली, कोणत्याच द्रोपदीला
हात लावण्याची.
कवयित्री सत्यवानाची सावित्री व आधुनिक विद्येची देवता सावित्रीबाई फुले यांचा तौलनिक अभ्यास करून सावित्रीबाई फुलेंचा वारसा आजच्या स्त्रीने अंगिकारण्याची भूमिका मांडतात. सत्यवानाच्या सावित्रीने स्त्री वडाच्या फेऱ्यात गुंतली. सावित्रीबाईंच्या शिकवणुकीतून स्त्रीची गुलामगिरीतून मुक्तता झाल्याचे मांडते. त्या लिहितात
हे सावित्री
तुझ्या वारशाने
पिढ्यान् पिढ्या सुटल्या
गुलामीच्या फेऱ्यातून.
 
बोर्डे त्यांच्या कवितेतून स्त्री दु:ख मांडतात. पण त्या दु:खाचं त्या उदात्तीकरण अजिबात करत नाही. मात्र दिवसेंदिवस असुरक्षित बनत चाललेल्या वातावरणात बाईनं कसं रहायला हवं हे त्या सांगतात. आणि त्याचवेळी सामाजिक वृत्तीवर कोरडे ओढत, कवितेची उपहासात्मक मांडणी करतांना त्या म्हणतात,
बाई...
हे एकविसावं शतक आहे
काळोख्या रात्रींना घाबरण्याचे
दिवस आता गेले
आता
भर दिवसाही
रस्त्यावर तू लुटली जाऊ शकतेेस
त्यामुळं
नुसतं रात्रींनाच नाही
तर आता तू
दिवसांनाही घाबरलेलं बरं...
थोडक्यात ‘अस्तित्वाचा अजिंठा कोरताना’ या संग्रहातून कवयित्री सुनिता बोर्डे- खडसे यांना प्रस्थापित समाजरचनेविरोधात नवनिर्माणासाठी संघर्ष करून स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांवर आधारित एक नवा समाज उभा करायचा आहे. ज्या समाजात कसल्याच भेदभावाला थारा असणार नाही आणि स्त्रियांना या समाजरचनेत पुरुषांच्या बरोबरीने प्रतिष्ठा असेल. या स्वप्नपूर्तीसाठी ही कविता बळ देणारी आहे. शिवाय भारतीय समाजव्यवस्थेतील अन्यायकारक रूढी व परंपरा यांना नकार देऊन स्त्रीमनाला ही कविता उभारी देते. ही कविता इथल्या संस्कृतीला व व्यवस्थेला केवळ प्रश्नच करत नाही तर त्यांवर प्रहार करून त्यांचे फोलपणही निदर्शनास आणून देते. प्रस्तावनेत प्रा. गौतमीपुत्र कांबळे म्हणतात त्याप्रमाणे ‘ही कविता समताधीष्ठित समाज निर्माण करण्याचं स्वप्न बघणारांना बळ देणारी आहे.’ अशा ह्या कविता परिवर्तनवादी कविता आहेत.
 
अस्तित्वाचा अजिंठा कोरताना
कवयित्री : सुनिता बोर्डे- खडसे
प्रकाशक : कनिष्क पब्लिकेशन, सांगली.
पृष्ठे : १०९
मूल्य : १०० रुपये.
 
बातम्या आणखी आहेत...