आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समजूतदार आणि विवेकी वार्धक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हा एक अत्यंत नाजूक विषय आहे. याबद्दल कोणतंही एकच असं धोरण ठरवता येणार नाही. समजूतदारपणा महत्त्वाचा, व्यक्तिश: विवेकही तितकाच महत्त्वाचा. मानसिक पोकळीची ही समस्या उत्तर आयुष्यात कमीअधिक प्रमाणात उद्भवतेच. स्वत:शी प्रामाणिक असण्याच्या नावाखाली कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ्य आणि स्थैर्य नष्ट होईल, असं वर्तन करण्याचा अधिकार कुणालाच असू शकत नाही.
या विषयाच्या संदर्भात दोन उदाहरणं वृत्तपत्रात ‘बातमी’ स्वरूपात वाचनात आली. ही टोकाची उदाहरणं आहेत. त्यांचं सामान्यीकरण करता येणार नाही. तरीही ती लक्षात घेण्यासारखी आहेत. कारण ती मानवी आयुष्याला, विशेषत: उत्तर आयुष्याला स्पर्श करणारी आहेत.
एका जमान्यात हॉलीवूडची ‘सेक्स बॉम्ब’ म्हणून चर्चेत असलेली एलिझाबेथ टेलर हिचं नाव बहुतेक सगळ्या ज्येष्ठ नागरिकांच्या परिचयाचं आहे. ऐंशी वर्षांची ही अभिनेत्री आता नवव्यांदा लग्न करणार आहे, अशी बातमी होती. याआधी तिनं आठ लग्न केली आहेत आणि त्यातली दोन तर एकाच नवरदेवाशी! ऐंशी वर्षांची ही अभिनेत्री आता एकाकी अवस्थेत जगत असताना तिनं एका अभिनेत्याशी लग्न करायचं ठरवलं आहे. आपल्या देशात हे घडताना दिसत नाही. कारण आपली संस्कृती आणि आपले सामाजिक निर्बंध त्या दिशेला जाऊ देत नाहीत. आता आपल्याकडेही दोन-तीन घटस्फोट घेणा-यांची संख्या वाढताना दिसते आहे. शारीरिक आकर्षण हेच याचं मुख्य कारण असतं. पण ऐंशीव्या वर्षी शारीरिक आकर्षण हे एकमेव कारण असू शकत नाही, आपण वर ज्याबद्दल बोललो ती उत्तरावस्थेतील पोकळी भरून काढण्यासाठी मूर्खासारख्या केलेल्या उपद््व्यापाचे हे उदाहरण आहे.
दुसरं उदाहरण गेल्या तीस वर्षांपासून पतीपासून अलग राहणा-या स्त्रीचं आहे. 81 वर्षांच्या या स्त्रीनं आपल्या 83 वर्षांच्या पतीविरुद्ध कोर्टात दावा दाखल केला आहे. तिची मागणी आहे, की कोर्टाने तिच्या पतीला तिच्याबरोबर राहण्याचा आदेश द्यावा. तीस वर्षांपूर्वी एकत्र राहणा-या या पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण झाला होता. पतीनं आर्थिक कारणास्तव आपला व्यवसाय बदलला होता. मुंबईपासून काही अंतरावर एक फार्महाऊस खरेदी करून तिथे शेती आणि कुक्कुटपालनाच्या उद्योगावर त्यानं आपलं लक्ष केंद्रित केलं. या काळात पत्नी एका राजकीय पक्षाची सक्रिय कार्यकर्ता होती. पक्षात पद होतं आणि अधिक मोठं स्थान मिळवण्याच्या अपेक्षेनं ती काम करत होती. याच कारणामुळे पतीबरोबर फार्महाऊसवर जाऊन राहण्यास तिने असंमती दर्शवली. परिणामी तीस वर्षे दोघं एकमेकांपासून वेगळेच राहिले. पत्नीला राजकारणात अपेक्षित यश मिळालं नाही. राजकारणातून ती दूर फेकली गेली. प्रकृतिस्वास्थ्य बिघडलं त्याबरोबर आर्थिक परिस्थितीही. बाईंवर अंथरुणावर पडून राहण्याची पाळी आली. आता पतीनं आपल्याबरोबर राहावं, यासाठी बाईंनी न्यायालयात धाव घेतली आहे.
पत्नी घर सोडून गेली आणि पती आपल्या वैवाहिक जीवनाच्या हक्कासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावतो, असे अनेक किस्से आपण पाहतो. पण पत्नीने उत्तरआयुष्यात पतीविरुद्ध अशा प्रकारची फिर्याद करण्याचा हा पहिलाच किस्सा असावा. मूळ मुद्दा उत्तरावस्थेतील पोकळी भरून काढण्याचा आहे.
या दोन्ही उदाहरणांतून मानवी स्वभावाचं जे दर्शन घडतं, ते लक्षात घेण्यासारखं आहे. आपल्या समाजात फार क्वचित कुणावर असा प्रसंग येतो. असे प्रसंग आल्याशिवाय त्याविषयी आपण छातीठोकपणे काही सांगू शकत नाही.
आजवरच्या जीवनात आलेल्या विविध प्रसंगांत संघर्ष करण्याचं बळ माणूस स्वत:मध्ये निर्माण करतो. प्रत्येक वेळी त्याला यश येतंच असं नाही, कधी अपयशही पदरी पडतं. परिणामी बदनामीला तोंड द्यावं लागतं. पण हे सगळं पचवता येईल असं आंतरिक बळ असतं. वाढत्या वयाबरोबर हे बळ घटतं किंवा सरतंही! आपल्यात आता अशा प्रकारचं बळ नाही, ही वस्तुस्थिती वरिष्ठजनांनी मान्य करायला हवी. यावरचा सर्वात सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे, माणसानं वय वाढण्यापूर्वीच स्वत:ला काही विधायक कामात गुंतवणं. हे काम म्हणजे रोज देवळात किंवा आश्रमात जाणं असेल किंवा समाजसेवेचं क्षेत्र असेल. ज्याप्रमाणे निवृत्तीनंतरच्या आर्थिक जीवनाचं नियोजन आपण आधीच्या काही वर्षांतच सुरू करतो, त्याचप्रमाणे मनाला कोणत्याही प्रकारच्या पोकळीनं, रिकामपणानं ग्रासू नये यासाठी आधीच तयारी करायला हवी. जो यात कमी पडतो त्याला सहन करावं लागतं.
आजवरच्या 70-75 वर्षांच्या काळात तुम्ही जी परिवर्तनं अनुभवलीत, त्यापेक्षा अनेक पटींनी जास्त परिवर्तनं पुढच्या पाच-सात वर्षांत येणार आहेत. या परिवर्तनाचं स्वरूप इतकं उग्र असेल की, आपल्या धारणांना चिकटून राहण्याचा प्रयत्न हे अवघड समस्यांना आमंत्रण ठरेल. तेव्हा परिवर्तनाशी जितकं जुळवून घ्याल, आपल्या धारणा जितक्या बदलाल, तितकं जगणं सोपं होईल. ‘सुखी होईल’ असे शब्द जाणूनबुजून वापरले नाहीत. मानसिक तडजोडी करूनही मनातली वादळं शमत नाहीत. सुख नाही तरी समाधान मिळतं आणि समाधानालाच सुख मानून जगणं जमलं की इतर काही नाही तरी खिन्नता कमी होते.
अनुवाद-प्रतिभा काटीकर, सोलापूर