आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वातंत्र्याचा उद्गाता!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘महापुरुषांचा पराभव’ शीर्षकाचा जनार्दन वाघमारे यांचा आम्हाला दहावीला एक धडा होता. त्यातली परिच्छेदवजा वाक्ये त्या वयात झेपायला जरा अवघड जात, पण त्याचा सारांश जवळजवळ सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखा होता. लेखकाच्या मते, कुठल्याही महापुरुषाच्या पराभवास त्याचे अनुयायी अधिक जबाबदार असतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ते विधान लागू पडतेच पडते, असे कित्येकांना वाटते. अशा वेळी बाबासाहेबांच्या अनुयायांनी काय केले याहीपेक्षा त्यांनी आपल्यातल्या एकूणएक माणसाला स्वातंत्र्याची खरी व्याख्या शिकवल्यानंतर आपण त्या शिकवणुकीचे काय केले, हा प्रश्न एकदा तरी विचारायला हवा आणि देवपण मिळालेल्या बाबासाहेबांमधला माणूस शोधायला हवा.

पाकिस्तानचे नेमके काय होणार किंवा रुपया कमकुवत कसा ठरू शकतो; एवढेच काय, राज्यांना देशापेक्षा जास्त अधिकार दिल्यास सांप्रदायिकता अन् स्थानिक पक्षांच्या वर्चस्वामुळे देश कसा दुबळा होईल, याचे फार अगोदरच त्यांनी भविष्य करून ठेवलेले. आपला देश येत्या पन्नास वर्षांत नेमका कसा असेल, याचा त्यांच्याइतका परिपूर्ण विचार दुसर्‍या कुठल्या माणसाने केला नसेल. भारतातल्या अस्पृश्य वागणुकीनंतर अमेरिकेत ‘ब्राउन’ म्हणून काहींनी त्यांची हेटाळणी केली, तरी त्याचे फारसे वाईट न मानता प्रा. जॉन डेवीच्या सहवासात त्यांनी ‘स्वातंत्र्य’ आणि ‘राष्ट्रभावना’ या संकल्पनांचा सखोल अभ्यास केला. त्या अर्थाने बाबासाहेब हे देश स्वतंत्र होण्याअगोदरच स्वतंत्र झालेले एकमेव भारतीय. माझ्या मते, अमेरिकेचे थॉमस जेफरसन आणि भारताचे बाबासाहेब आंबेडकर हे स्वातंत्र्याच्या संकल्पनेचे खरे पितामह. त्यांनी स्वातंत्र्य शब्दाची व्याप्ती, केवळ ब्रिटिशांना हाकलून लावणे एवढीच मर्यादित न ठेवता, काळाच्याही पुढे नेऊन ठेवली. युरोप आणि अमेरिकेतल्या आपल्या पाच वर्षांच्या कालावधीत बाबासाहेबांनी अक्षरश: शेकडो विषय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून अभ्यासले, परंतु स्वातंत्र्याचा आणि अमेरिकेच्या राष्ट्रपित्यांचा जाणीवपूर्वक अभ्यास बाबासाहेबांना स्वस्थ बसू देत नसावा. भारत स्वतंत्र झाला किंवा त्याला निदान डोमेनियन दर्जा जरी मिळाला, तरी त्यात व्यक्तीचा नेमका दर्जा सर्वोच्च कसा असावा, याचे अगोदर ढोबळपणे आणि नंतर अगदी बारकाव्यांसह अभ्यासपूर्ण विश्लेषण होते फक्त बाबासाहेबांकडेच!

मग बाबासाहेबांची संवाद-संभाषणे सुरू झाली; गांधींसोबत, जिनांसोबत, अस्पृश्यांसोबत, ब्राह्मणांसोबत, ब्रिटिशांसोबतही. एक नवा देश जन्माला येतोय अन् तो येत्या काळात लोकशाहीचे सर्वात उत्तम उदाहरण असू शकतो, हे त्यांना स्पष्ट दिसत होते; पण त्यात सर्वांचा सहभाग असायला हवा, हेही त्यांना पूर्णत: ठाऊक होते. लढ्यातील लोकांना तात्कालिक स्वातंत्र्याच्या लढाईत व्यग्र राहून इतक्या सूक्ष्मदर्शी विचारांना वेळ देणे, नेहमीच शक्य नव्हते. नंतर बाबासाहेबांनाही वेळ कमी पडायला लागला, तेव्हा त्यांनी आपले विचार लिहून ठेवायला सुरुवात केली. अगदी भारताची अर्थव्यवस्था कशी असावी, इथपासून तर धर्म, कम्युनिझमची भारतातील प्रसंगोचितता, पाकिस्तानच्या जन्माच्या शक्यता, हे सगळे खरे होण्याच्या वर्ष-दोन वर्ष अगोदरच. ही पुस्तके नंतर एका नव्या क्रांतीचा पाया ठरली. अस्पृश्यतेचे चटके सहन करताना बाबासाहेबांना धर्माचा फोलपणा लक्षात येत होता. राज्यघटना लिहिताना खूप अगोदर त्यांनी हिंदू धर्म नाकारल्यामुळे त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेच्या बर्‍याचशा व्याख्यांवर सखोल चिंतन करता आले.

धर्मांतराचा निर्णय घेणे क्रमप्राप्त असले तरी फक्त आपल्या जातीचाच विचार न करता बाबासाहेबांनी देशाचा विचार अगोदर केला. त्यांनी जशी जातिव्यवस्था नाकारली, तशी धर्मव्यवस्थाही नाकारली असती तर बरे झाले असते, असे आजही कित्येकांना वाटते. पण अशाने समाज पुन्हा जुन्या जोखडात फार सहजतेने गुरफटला जाईल, हे त्यांना ठाऊक होते. धर्मांतर केल्यानंतर इतिहासात पहिल्यांदाच एका निश्चित गटात बसवता येईल असा त्यांचा अनुयायी वर्ग तयार झाला. मात्र अवघ्या दोन महिन्यांत त्यांचे निर्वाण झाले. त्यांना आरक्षणाच्या व्यापक अर्थावर काम करायचे होते, पण ते काम आता त्यांच्या अनुयायांवर येऊन पडले.

धर्मांतरानंतरच्या प्राथमिक वर्षात पहिल्या पिढीला सवलतींचा फारसा उपयोग करता आला नाही. पण त्या पिढीला बाबासाहेबांनी माणसाचे मूलभूत हक्क मात्र मिळवून दिले. ‘आपल्या मुलांना शिकवा’ हा मंत्र त्यांनी दिला. नंतरच्या दुसर्‍या पिढीला मात्र सवलतीमुळे हलाखीत का होईना, पण शिक्षणाच्या वाटा धुंडाळता आल्या. नोकरीतल्या आरक्षणामुळे स्वत:चा विकास करणेही शक्य झाले. पुढे नव्या अनुयायांची पिढी आपण कसे हलाखीतून वर आलो, याचे कथन करायला लागली. आत्मचरित्रे लिहायला लागली. संघटित व्हायला लागली. आपल्या हक्कांसाठी संघर्ष करू लागली. संघटना जसजशा आकार घ्यायला लागल्या, तसतशी त्याला एक साचेबद्धता यायला लागली. संघटना व संघर्ष जिथे येतात, तिथे राजकारणाचा शिरकाव होणे क्रमप्राप्तच असते. मग या साचेबद्ध संघटनांना राजकीय पक्ष आपापल्या सोयीनुसार वापरायला लागले अन् संघटना आपापल्या सोयीने राजकीय पक्षांशी पाट लावू लागल्या. या अनुयायांची तिसरी पिढीदेखील अनुयायीच बनायला हवी, पण यातल्या काहींच्या मते, तीही फक्त त्या अनुयायांची मुले होती, अनुयायी नाही. समूळ उच्चाटन झाले नसले तरी जातिवाद बराचसा कमी होत होता, काही स्तरांमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे उच्च व अति उच्च शिक्षणाची दारे उघडली जाऊ लागली होती, आरक्षणाच्या निकषांवर केलेल्या प्रगतीपेक्षा गुणवत्तेच्या निकषांवर जास्त मोठी प्रगती केली जाऊ शकते, असे हळूहळू जाणवायला लागले होते. घरात लहानपणापासून आपल्या पालकांचे कष्ट, बाबासाहेबांचा देवापेक्षा मोठा फोटो अन् त्यांची जातीच्या पलीकडे व्यापकता, पुसता न आलेला हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माचे व्यवस्थित न समजलेले अर्थ हे सर्व ही पिढी पाहत होती.

येशू ख्रिस्त जसा स्वत: ख्रिश्चन नव्हता; ख्रिस्त धर्म त्यांच्या अनुयायांनी काढलेला धर्म होता, तसे बाबासाहेबांनी आरक्षण दिले तरी त्यांनी स्वत:चा विकास हा सवलती वा आरक्षण घेऊन केला नव्हता. मग अनुयायी म्हणून पुढे जाण्यापेक्षा बाबासाहेबांसारखे पुढे जाता येईल का, हा प्रश्न या पिढीतले काही लोक स्वत:ला विचारू लागले. बाबासाहेबांच्या जन्माला शंभर वर्षे पूर्ण झाली त्याच वर्षी, या देशाने आपले दरवाजे मुक्त अर्थव्यवस्थेसाठी उघडले. लोकसंख्या वाढत होती, सरकारी नोकर्‍या कमी झाल्या होत्या, ज्या होत्या त्यात अजून दुसरीच पिढी काम करत होती, शिक्षणपद्धती अधिकाधिक गुणवत्तेच्या निकषांवर चालायला लागली होती. या देशाने सॉफ्टवेअर क्षेत्रात क्रांती केली. पाठोपाठ बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले जाळे वाढवायला सुरुवात केली. या क्षेत्रात नोकर्‍या तर खूप होत्या, पण त्या फक्त गुणवत्तेच्याच निकषांवर मिळू लागल्या, काम येत असले तर तुम्ही कुठल्या जातीचे, हे विचारण्याच्या भानगडीतदेखील कंपन्या पडत नव्हत्या. अनुयायांच्या दुसर्‍या आणि नवीन तिसर्‍या पिढीने आरक्षणासाठी मग पुन्हा संघर्ष करायला सुरुवात केली, पण या वेळेस ते जिंकणे जरासे दुरापास्त व्हायला झाले. एव्हाना अनुयायी न बनता बाबासाहेबांसारखे जगू इच्छिणार्‍यांचा वर्ग बराच पुढे सरकला होता, त्यांची जात एकतर गळून पडली किंवा ती त्यांनी सरळसरळ नाकारली. एवढेच काय, पण त्यांनी बाबासाहेबांसारखाच हिंदू धर्म झुगारला. नव्या युगात धर्माविना राहता येऊ शकते, म्हणून अर्धवट चिकटलेला बौद्ध धर्मदेखील नाकारला. ‘नास्तिक’ हा शब्द शिवी न राहता माणुसकीची नवी ओळख बनला. फीमध्ये दोन-चार हजारांची सूट हा सवलतीचा एकच फायदा उरल्यानंतर त्यांनी सवलतीदेखील सरळसरळ नाकारल्या. सरकारी नोकर्‍यांच्या पलीकडे बरेच मोठे विश्व आहे, आपल्यात धमक असली तर तिथपर्यंत पोहोचणे शक्य आहे, हे स्पष्ट दिसत होते. सोबत होता बाबासाहेबांनी दिलेला आत्मविश्वास अन् चिकित्सक बुद्धीने त्यांनी लिहून ठेवलेले काळाच्या पुढचे विचार.

मग एका नव्याच पर्वाची सुरुवात झाली. नाभिकाचा पोरगा पायलट बनला, कुणबी न्यूयॉर्कच्या आॅफिसात बसून अस्खलित जर्मन भाषेत क्लायंटशी संवाद साधू लागला, वंजार्‍याच्या पोराने स्ट्रॉबेरीचा मोठा बाग लावला, मांगाच्या मुलीने शास्त्रीय गायनासह पॉप म्युझिक शिकून देश नाचवला, किरवंत ब्राह्मणाचा मुलगा इंजिनिअर बनला, पिंजारी मुस्लिमाच्या मुलाने क्लिनिक थाटले, खाटकाचा मुलगा मल्टिनॅशनल बँकेचा मॅनेजर झाला, महार जातीत जन्माला आलेल्याने गाड्यांचे शोरूम टाकले. हे व असे अन्य समूहांचे लोक ना कुठल्या जातीचे; ना कुठल्या झेंड्याचे अन् माझ्या मते, खर्‍या अर्थाने स्वतंत्र झालेले लोक. बाबासाहेब पुन्हा जन्माला यावे, ही बर्‍याच जणांची इच्छा कधी पूर्ण होणे नाही. पण त्यांचे विचार समजून घेताना जातीविरहित लोकांचा एक मोठा समुदाय तयार झालाय, जो लोकशाहीवर आजही विश्वास ठेवण्यास प्रवृत्त करतो. येणारा दिवस आणखी चांगला असू शकेल, असे सांगतो. विजेचा दिवा लावताना दर वेळेस थॉमस एडिसन आठवेलच असे नाही, तसे स्वातंत्र्याचा खरा श्वास घेताना दर वेळी बाबासाहेब आठवतीलच असेही नाही. बदलत्या काळानुरूप बाबासाहेबांचे अनुयायी यापुढे चळवळ लावून धरतीलच, पण अनुयायी न बनता थेट बाबासाहेबांचीच वाट चोखाळून स्वतंत्र झालेले कितीतरी लोक बघून बाबासाहेब जिंकले, असेच म्हणता येईल.
rahulbaba@gmail.com