आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामानवाला समजून घेताना...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. आंबेडकरांसारख्या महामानवाचे व्यक्तिमत्त्व जेव्हा साकारायचे असते, त्या वेळी चित्रपटाचा, कथेचा फोकस ठरवावा लागतो. काही गोष्टी बाकी राहिल्या असे होता कामा नये, यासाठी अनेक बारीकसारीक बाबींवर लक्ष द्यावे लागते. महामानवाच्या प्रत्येक विधानामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये खोल अर्थ दडलेला असतो, त्याला मागचे-पुढचे संदर्भ असतात, ते लक्षात घेऊनच चित्रपटातील घटनांची, दृश्यांची साखळी जोडावी लागते.
जेव्हा डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व चित्रपटाच्या माध्यमातून साकारायचे ठरवले, त्या वेळी सुरुवात कुठून करायची, हा प्रश्न मला पडला होता. सुरुवातीपासूनच आंबेडकरांच्या कार्याची, त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची तीव्रता प्रेक्षकाला जाणवून देणे, त्या तीव्रतेचा प्रवास शेवटपर्यंत कायम राखणे महत्त्वाचे होते. त्यामुळे चित्रकथेतून दलितांचे त्या काळचे अत्यंत विदारक असे जीवन मी सुरुवातीला मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातून आंबेडकरांच्या कार्यास मांडण्यासाठी एक भक्कम पार्श्वभूमी मला मिळाली.
मग प्रश्न उभा राहतो तो त्यांच्या कार्याचे व त्याला समांतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू कसे व कुठल्या पद्धतीने, कुठल्या कोनातून मांडायचे? मला नेहमीच आंबेडकरांनी घेतलेले शिक्षण व त्यांनी शिक्षणाला दिलेले महत्त्व हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा वाटत आला. त्यांनी सरसकट दलित समाजाच्या उद्धारासाठी आंदोलनात वा सत्याग्रहात उडी घेतली नाही. त्यांची घडण एका शिक्षणाला महत्त्व देणार्‍या कुटुंबात झाली. त्यामुळे ते कसे घडले, हेही दाखवणे महत्त्वाचे होते. इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध अशा सगळ्याच धर्मांचा, मनुस्मृतीचा त्यांनी शिकत असताना केलेला सखोल अभ्यास मला दाखवणे आवश्यक वाटले. शिकत असताना त्यांनी कधीच ‘होमरुल लीग’सारख्या कुठल्याच चळवळीत भाग घेतला नाही. त्यामुळे चित्रपट करताना केवळ राजकीय व्यक्तिमत्त्व घेऊन चालणार नाही, हे निश्चित होते. साधेसुधे नाही, तर उच्च शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न होते. शिक्षणाअभावी दलितांची अवस्था त्यांनी अनुभवली होती.
अमेरिकेत ते ज्या ठिकाणी राहत होते, तो ‘हार्लेम’ हा कृष्णवर्णीय लोकांचा परिसर होता. त्यांनीही वर्षानुवर्षे अन्याय सहन केला होता. त्यांच्याबरोबर जगातल्या सगळ्याच समाजातील विषमतेचा त्यांनी सारासार अभ्यास केला होता. इतकेशिक्षण घेतलेला माणूस राजकीय क्षेत्रामध्ये विश्लेषण करण्याची क्षमता ठेवतो, रामायण-महाभारतापासून सगळ्याच धर्मग्रंथांचा अभ्यास करतो आणि त्यांनी केलेल्या अभ्यासाचेच प्रतिबिंब पुढे त्यांच्या कार्यामध्ये आपसूक दिसायला लागते. याचाच अर्थ, सनदशीर वैधानिक मार्गाने जगातील सर्व विषमतेचा, तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करायचा; मगच जाणतेपणाने या विषमतेला नष्ट करायचे, हे आंबेडकरांचे दूरदृष्टीचे धोरण लक्षात घेता ही बाब अधोरेखित करणे चित्रपट लक्ष्यकेंद्री बनवण्याकरिता मला आवश्यक वाटत होते.
उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर महाडचा, राममंदिराचा सत्याग्रह, विचारस्वातंत्र्य, आविष्कार स्वातंत्र्य व मानवी हक्कांना त्यांनी दिलेले महत्त्व आजच्या समाजानेही जाणणे गरजेचे आहे, असे मला वाटते. कारण काळानुसार महाडचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह हा बॅकड्रॉप बदलतो, पण प्रश्न मात्र त्याच प्रकारचे शिल्लक राहतात; उलट काळानुसार त्यांना अधिक धार येत राहते. अशा वेळी बदलाची भाषा करताना आंबेडकरांसारखी दूरदृष्टी राखणे आजच्या समाजाला आवश्यक आहे, असे मला वाटते.
सामाजिक व राजकीय उत्क्रांती आंबेडकरांच्या काळात होत होती. राजकीय स्वातंत्र्य मिळाले की सामाजिक स्वातंत्र्यही आपसूक येते, यावर आंबेडकरांचा विश्वास नव्हता; त्यामुळेच त्यांचे गांधीजींशी वैचारिक मतभेद होते. त्यांचे म्हणणे होते ब्रिटिश आहेत तोपर्यंत मला नियम करू देत. दोघांचे मार्ग स्वातंत्र्याकडे नेणारे होते, पण दोघे समांतर चालले आहेत, ही त्या वेळची वस्तुस्थिती होती. दोघांची भेटीदरम्यान असलेली समांतर विचारधारा वगळून मला चालणार नव्हते.
आंबेडकरांनी 1935मध्ये धर्मांतराची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात त्यांनी 14 आॅक्टोबर 1956 रोजी सामुदायिक धर्मांतर केले. मला वाटते, वर्णव्यवस्थेची उतरंड चढू न देणार्‍या हिंदू धर्मामध्ये राहणे डॉ. आंबेडकरांना अन्याय्य वाटणे साहजिक होते. पण त्याहीपेक्षा बौद्ध धर्मातील मानवतावाद त्यांना त्यांच्याबरोबर त्यांच्या समाजासाठी वैश्विक समानता प्रस्थापित करणारा असा होता. त्यामुळे धर्मांतराचा त्यांनी घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा, योग्य व काळाशी सुसंगत होता.
धर्मांतरापर्यंत मी चित्रपटाचा शेवट केला खरा; पण तिथून खरी सामाजिक बदलांची वा प्रश्नांच्या उकलेची वा गुंतागुंतीची सुरुवात झाली, असे आजची स्थिती पाहता मला वाटते.
चित्रपटाच्या निमित्ताने मला आंबेडकरांचे व्यक्तिमत्त्व असे दाखवायचे होते; हे जरी प्राथमिक पातळीवर ठरले होते, तरी प्रत्यक्षात हा चित्रपट साकारताना आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वातील, त्यांच्या जीवनातील अनेक मूल्ये मला नव्याने उमजत गेली, आपण आज कुठल्या प्रकारच्या, कुठल्या संस्कृतीचा जागर करणार्‍या समाजात राहतो, याची नव्याने उकल झाली. आजही पिचलेला समाज पूर्णत: वर आलेला नाही; त्यांच्या संदर्भातले प्रश्न आजही तसेच आहेत, असे म्हणण्यापेक्षा जागतिकीकरण झाले तरी अजूनही आपण जातिव्यवस्थेच्या, वर्णव्यवस्थेच्या संक्रमणांतून जात आहोत, हे कैक वर्षांपूर्वी घटना लिहिणार्‍या आंबेडकरांच्या नजरेतून समजून घेताना आजही अंगावर शहारा येतो.