आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाऊक नसलेली वाट

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलेजला असताना अभ्यासाला एक कविता होती, रॉबर्ट फ्रॉस्ट नावाच्या कवीची. शीर्षक होतं ‘द रोड नॉट टेकन’. एक रुळलेली, आखून दिलेली, सगळे टप्पे ठाऊक असलेली वाट आणि दुसरी अनोळखी, कुठल्या दिशेने जाईल त्याचा अंदाज नसलेली वाट. एक ओळखीचा नि सुरक्षित पर्याय आणि दुसरा कसलीही शाश्वस्ती नसलेला!
आणि कवितेच्या शेवटच्या दोन ओळी आहेत...

I took the one less traveled by
that has made all the difference

एकीकडे आपल्याला ठाऊक असलेला पर्याय असतो जगण्याचा. बालपणी खेळायचं, अभ्यास करायचा, कॉलेजला धमाल करायची, आपलं करिअर माहीत असलेल्या पर्यायांमधून निवडायचं, मग एक चांगल्या पॅकेजची नोकरी, लग्न, संसार, मुलं, सुट्ट्या. सगळंच तर आखून दिलेलं. त्यानुसार आनंदाच्या आणि सुखाच्या व्याख्या ठरवायच्या. आणि दुसरा पर्याय म्हणजे या पॅटर्नला आव्हान देत आपल्याला खरंच काय आवडतंय, पटतंय, ते शोधत जायचा पर्याय! जिथे कसलीच खात्री नसेल पण जिथे प्रयोग आपले असतात आणि त्यातून हाताशी आलेले निष्कर्ष हे आपण मिळवलेले असतात.
वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने मला हे वेगळ्या वाटा जोखणारे लोक भेटत राहिले. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’सारखा चित्रपट लिहिणारे आणि पडद्यावर जिवंत करणारे परेश मोकाशी, ‘मधली सुट्टी’च्या निमित्ताने भेटलेले रेणूताई आणि राजा दांडेकर, ज्यांनी चिखलगावला शिक्षणातले अनेक प्रयोग करणारी शाळा रुजवली आहे. ‘आम्ही ट्रॅव्हलकर’च्या निमित्ताने एका प्रवासात भेटलेला वाइल्डलाइफ फोटोग्राफर नयन खानोलकर!

या माणसांनी ही माहीत नसलेली वाट निवडली. त्यांच्या या प्रवासात ते धडपडले असतीलच, हरवले असतील, क्वचित कधीतरी एखाद्या डेड एंडलाही पोचले असतील. पण तिथून मागे येऊन, वळून पुन्हा रस्ता शोधत ते जिथे पोचत आहेत ते पाहता त्यांनी निवडलेला रस्ता किती सुरेख होता हे कळते की! पण ती त्यांची वाट असते तरीही. त्याने आपण प्रेरणा घेऊ शकू कदाचित, पण आपली वाट आपणच शोधायची असते.

या वाइल्डलाइफ फोटोग्राफर असलेल्या नयन खानोलकरनं त्याला भेटलेल्या एका माणसाबद्दल एका प्रवासात सांगितलं होतं. गीरच्या जंगलामधला मुराद नावाचा माणूस! वर्षानुवर्षं त्या जंगलात राहून जंगलाची भाषा अवगत झालेला! नयनला सिंहांची छायाचित्रे हवी होती आणि काही केल्या त्याला गीरमध्ये ती मिळत नव्हती. त्याने कशा प्रकारे सिंहांपर्यंत पोचता येईल याची चौकशी करायला सुरुवात केल्यावर त्याला कोणीतरी मुरादबद्दल सांगितलं. नयन मुरादला भेटला आणि एका पहाटे भर जंगलात तो मुरादसह गेला. तिथे गेल्यावर मुरादने वेगवेगळे आवाज काढायला सुरुवात केली आणि ते जिथे होते तिथे सिंह यायला लागले. हातात कोणतेही हत्यार न घेता मुराद त्या सिंहासमोर वावरत होता, कारण तिथल्या प्रत्येक सिंहाशी त्याची ओळख होती. आपल्याला माहीत असलेल्या शब्दांच्या पलीकडच्या भाषेने मुराद त्या सिंहांशी संवाद साधत होता. मुरादवर आपला जीव सोपवून नयनने अतिशय जवळून त्या सिंहांचे फोटो काढले, जे अर्थात नावाजले गेले.
हे सगळे रुळलेली वाट करू देत नाही, रुळलेल्या वाटेवर भीती नसते पण मग असे जगणं उजळवून टाकणारे अनुभवसुद्धा नसतात. गणित कदाचित मांडता येईल त्या वाटेचं बिनचूक पण मग कविता नाही लाभायची. अल्बर्ट आइन्स्टाइनचे एक खूप मस्त वाक्य आहे, ‘लॉजिक तुम्हाला अ पासून ब पर्यंत घेऊन जाईल, आणि कल्पनाशक्ती सगळीकडे’! ही कल्पनाशक्ती आणि कुतूहल जिवंत ठेवले तरी ती वाट गवसत जाते. एका जंगलामध्ये काम करणारा मुरादसारखा एक साधा माणूस असो किंव्हा शिक्षणविषयक काम करणा-या रेणूताई, काम कितीही वेगळं असलं तरी त्यांची जगण्याची बोली सारखी आहे!

खूप पूर्वी पुल आणि सुनीताबाई या दोघांबद्दलचा एक लेख वाचनात आला होता ‘महाराष्‍ट्राचा व्हॅलेंटाइन’नावाचा. पुलंचे एकपात्री प्रयोग जोरात सुरू असताना काही काळानं सुनीताबानी त्यांना विचारले होते, ‘काय भाई, रमलास तो?’ पुलंनी पुढच्या काळात ते कार्यक्रम थांबवून पुढच्या निर्मितीची सुरुवात केली. आहे त्यात न रमता नव्याची इच्छा बाळगत राहिलं की ठाऊक नसलेल्या वाटा आपोआप खुल्या होत जातात. त्यासाठी ती इच्छा असावी लागते.
‘झोका’ नावाच्या प्रतिमा कुलकर्णी यांनी केलेल्या एका मस्त मराठी मालिकेमध्ये एक वाक्य होतं, ‘कुठलीही गोष्ट जी तुम्हाला 100 टक्के हवी असते, ती तुम्हाला मिळतेच.’
या ठाऊक नसलेल्या वाटेचंही तसंच असेल बहुधा.
100 टक्के इच्छा असेल तर ती ज्याची त्याला गवसेलच!

aditimoghehere@gmail.com