आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्थिर मणिपूरचे अस्वस्थ वर्तमान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इम्फाळ या मणिपूरच्या राजधानीत असताना सतत दहशतीची जाणीव आपल्याला होत राहते. याचे एक कारण म्हणजे, अत्याधुनिक शस्त्रे बाळगणारे सैनिक आणि पोलिससुद्धा. अगदी अलीकडे म्हणजे, दोन-चार वर्षांपूर्वी, सूर्यास्तानंतर रस्त्यांवरून चालणे कठीण होते. तरुणांच्या टोळ्या कोणालाही अडवून लुटत. पण आता तसे सहसा होत नाही.


एकीकडे मणिपूरमध्ये सरकारने कोट्यवधी रुपये पर्यटनासाठी खर्च केले आहेत, असे सरकारी अधिकारी सांगतात. मात्र राजधानी इम्फाळमध्ये पर्यटकांसाठी चांगले हॉटेल अथवा शौचालये इत्यादी पायाभूत सुविधा आढळत नाहीत. हिंदी चित्रपट मणिपूरमध्ये कुठेही दाखवले जात नाहीत, कारण चित्रपटगृहांवर हल्ला होण्याची भीती असते. वर्तमानपत्रांच्या ‘मनोरंजन’ पानांमध्येदेखील हिंदी चित्रपट, नट-नट्या यांची छायाचित्रे (इतर वेळी सहज म्हणून कोणी एखाद्या हिंदी गाण्याची तान छेडली, तर भोवतालीचे लोक चमकून पाहतात. एका मणिपुरी नायिकेला आता चित्रपट मिळेनासे झाले आहेत, कारण तिने एका ‘नॉन लोकल’ म्हणजेच गैर-मणिपुरी व्यक्तीशी लग्न केले.) दिसत नाहीत. संपूर्ण पान हॉलीवूड चित्रपट आणि इंग्रजी चित्रपटांतील नट-नट्या यांनी व्यापलेले असते. रस्त्यांवर मात्र कोरियन चित्रपटांच्या सीडींचे ढीग सापडतात. काही वर्षांपूर्वी कोरियन चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात येथे पाहिले जात. मात्र असे आढळले की, कोरियन चित्रपटातील नाती आणि विशेषत: प्रेमसंबंध हे अनेक वेळा समलिंगी असतात. असे चित्रपट पाहिल्याने समाजावर विपरीत परिणाम होतील की काय, असे वाटून आता या चित्रपटांचे चित्रपटगृहात प्रदर्शन कमी झाले आहे. मणिपुरी भाषेतील चित्रपट मात्र चित्रपटगृहांतून सतत दाखवले जातात.


भरपूर मोकळ्या जागा आणि परिसर निसर्गरम्य असूनही इम्फाळमध्ये लोक क्रिकेट, फुटबॉल असे मैदानी खेळ खेळताना दिसत नाहीत. तरुण मंडळी लष्करी वा पोलिसी गणवेषात एकत्रित कवायती करताना दिसतात. आणि वयस्क ‘वॉक’ घेतात. इतरवेळी जागोजागी लोक पत्ते खेळताना दिसतात. क्रिकेटचा उल्लेख वर्तमानपत्रांमध्ये जवळजवळ अभावानेच असतो.


सगळा बाजार हा बहुतांश म्यानमारहून आलेल्या वस्तूंनी भरलेला असतो आणि मणिपुरी तेथेच ‘शॉपिंग’ करतात. तेथे कपाळापासून नाकापर्यंत लांब चंदनाची रेष काढलेल्या वैष्णवपंथी स्त्रिया घोंगड्या, लुंग्या, शाली इत्यादींचे ढीग रचून बसलेल्या असतात.


अमेरिकेतील मिशिगन नदीचे खूप कौतुक होते. का? तर म्हणे, नजर जाईल तिथपर्यंत ती नदी पसरली आहे. तसा अनुभव घ्यायचा असेल, तर मणिपुरमधील बिश्नुपूरच्या लोकटाक तलावाचा घेता येईल. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे, येथील मासेमार समाजाने उभारलेले फुम्शांग, म्हणजेच झोपड्या. या झोपड्या तलावातील वनस्पती, बांबू इत्यादींनी तयार केल्या जातात. तलावावर याच वनस्पतींच्या आधारे तरंगत राहतात. आता हे फुम्शांग सरकारने उद्ध्वस्त करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे मासेमारांच्या उदरनिर्वाहावर परिणाम झाला आहे, असे लोक सांगतात. मात्र त्याचबरोबर या फुम्शांगचा वापर अलीकडच्या काळात दहशतवाद्यांनी केला, हेही ते मान्य करतात. म्हणूनही कदाचित लोकटाक तलाव आता भारतीय सैन्याच्या छवणीने वेढला आहे. तेथील पर्यटकांसाठी राहण्यासाठीच्या जागी पोलिस छावणी करून राहतात.


निसर्गरम्य लोकटाक तलाव परिसरात विविध जातीचे पक्षी आढळत नाहीत. सर्वत्र चिमण्या तेवढ्या नजरेस पडतात. लोकटाक तलावाच्या अवतीभवती एकेकाळी हरणांचे कळप असत, असेही लोक सांगतात. तेव्हा हे पक्षी-प्राणी का नाहीत, असे विचारल्यावर लोक चमकून एखादा खाजगी प्रश्न केल्यासारखे करतात मग कोणीतरी हळूच सांगतो की ‘लोक’ पक्षी आणि जनावरे यांची शिकार करतात म्हणून ते आढळत नाहीत. हे ‘लोक’ म्हणजे नागा असे अभिप्रेत असते.


नागा लोकांना इम्फाळमधे तीव्र विरोध आहे. तो जाहीर नाही, मात्र नागा विषय काढला की लगेच जाणवतो. इम्फाळमधील लोक स्वत:ला प्रगत समजतात. त्यांच्या चालण्या, बोलण्या, वागण्यातून त्यांचा श्रेष्ठत्वाचा भाव सतत जाणवतो. मणिपुरमध्ये सगळ्यात गरीब असतील, तर ते नेपाळी आणि या नेपाळी लोकांवर मणिपुरी माणसांचा इतर जमातींबाबतचा रोष उतरतो. त्यामुळे नेपाळी माणसे दबकून वागताना दिसतात. दरीत राहणाºया समाजांचे हे गुण वैशिष्ट्य असते, की ते स्वत:ला डोंगरात राहणाºयांपेक्षा अधिक प्रगत मानतात, इतर समाज गटांना दुय्यम स्थान देतात, स्वत:त मग्न असतात. ते सगळे गुण वैशिष्ट्य मणिपुरी माणसांत दिसतात.


मणिपुरी समाजाची उतरंड खूप घट्ट पाय रोवून आहे. त्याचे काही गमतीशीर प्रसंग चित्रपटांमधे दिसतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला घरात घेताना ‘या, बसा’ असे कितीदा म्हणायचे, त्याचे प्रमाण ठरलेले असते. तितक्या वेळा ‘या, बसा’ म्हटले नाही, तर त्या व्यक्तीचा अपमान होऊ शकतो. मणिपुरी चित्रपटातील संवाद त्यामुळे पुन्हा पुन्हा म्हटल्यासारखे होतात आणि ज्यांना संस्कृतीचा हा भाग माहीत नाही, त्यांच्यासाठी प्रसंग विनोदी होतो.
मणिपूर हे गुजरातप्रमाणे दारू निषिद्ध क्षेत्र आहे, मात्र येथे स्थानिक तांदुळाची बनविलेली दारू प्लास्टिकच्या पिशव्यांतून सर्रास मिळते. लिटरला एकशेचाळीस रुपये या दराने हे प्लास्टिकचे ‘पाउच’ शंभर मिलिलीटरपासून ते एक लिटर पर्यंत सर्वत्र सहज मिळतात. शेजारच्या म्यानमारमधून देखील दारू मुबलक प्रमाणात येते. अमली पदार्थ येथे सदासर्वकाळ उपलब्ध आहेत आणि त्या धंद्यात सरकारी आणि सैनिकी यंत्रणेतील अधिकारी गुंतले आहेत. नुकतीच अमली पदार्थ नेणारी एक गाडी पकडली गेली. ती सैन्याच्या जनसंपर्क अधिकाºयाची होती.
चार दिवस मणिपूरमधील विद्यार्थ्यांसोबत काढल्यावर ऐकले, पाहिले, जाणवले ते मणिपूर अस्वस्थ करणारे आहे. मात्र ते भारतीय संघराज्यात ठेवायचे असेल, तर खूप मेहनतीची आवश्यकता आहे हे स्पष्ट झाले.

संघर्ष लिपींचाही...
मणिपूरमध्ये एकाच भाषेतील वर्तमापत्राच्या नावाचा मथळा दोन लिपीत असतो. वेगवेगळ्या बातम्यादेखील दोन वेगवेगळ्या लिपीत. मणिपूरची भाषा आहे मीतेयलाँ. ही भाषा दोन लिपीत सध्या लिहिली जाते आहे. एक बंगाली आणि दुसरी मेयतै मायेक. मेयतै मायेक ही लिपी एक सखण्ड लेखन पद्धती आहे, जिच्यात व्यंजन आणि स्वर हे एका एककात लिहिले जातात. मेयतै मायेक या लिपीचे वैशिष्ट्य असे की, प्रत्येक अक्षर हे आपल्या शरीराच्या एका भागाचे नाव आहे. उदाहरणार्थ पहिले अक्षर आहे ‘कोक’ म्हणजेच डोके; दुसरे आहे ‘साम’ म्हणजे केस; तिसरे ‘लाय’ म्हणजे कपाळ इत्यादी. ही लिपी आता मणिपूर राज्याची औपचारिक लिपी आहे. अठराव्या शतकात शांतिदास गोसाई नावाचा वैष्णवपंथी मणिपूरला आला आणि त्याने त्यावेळचा मणिपूरचा राजा, निंग्थाऊ पामहायबा, याला आपल्या पंथात वळवून घेतले. या राजाने आपले नाव बदलून ‘गरीबनवाज’ असे ठेवले, वैष्णव पंथाला राजकीय आश्रय दिला आणि मेयतै मायेक या लिपीतील ‘पुया’ हे प्राचीन ग्रंथ जाळून टाकले. त्यानंतर, संपूर्ण मणिपूरमधे बंगाली भाषेतील लिपीत व्यवहार सुरू झाला. मात्र, 1930च्या दशकापासून मणिपूरमध्ये मेयतै मायेक ही लिपी पुन्हा वापरली जावी, असा आग्रह धरणारी चळवळ सुरू झाली. या चळवळीतून मेयतै मायेक ही अठरा अक्षरांची लिपी तयार झाली. त्यानंतर याच लिपीत आणखी सहा अक्षरांची भर पडून एकूण संख्या 24 झाली. जानेवारी 1983मध्ये राज्याच्या शिक्षण विभागाने मेयतै मायेक लिपी शिकवण्यासाठी सहावीच्या वर्गातील मुलांसाठी अभ्यासक्रम तयार केला. अगदी अलीकडे राज्य सरकारने ही लिपी सक्तीची करून आता शाळांमधून हीच लिपी शिकवली जाईल, अशी सक्ती केली आहे. याचा अजब परिणाम म्हणजे, आईवडील मीतेयलाँ ही भाषा बंगाली लिपीत शिकले आहेत आणि त्यांची मुले तीच भाषा मेयतै मायेक या लिपीत लिहायला, वाचायला शिकताहेत. त्यामुळे आईवडलांना त्यांचीच मुले काय लिहितात ते कळत नाही आणि मुलांना आईवडील काय वाचतात ते कळत नाही.


आता एक नवीनच वाद या लिपीवरून सुरू झाला आहे. काही जणांच्या मते, या लिपीत 18 अक्षरे आहेत, तर काहींच्या मते 27; तर आणखी एका गटाच्या मते त्याहून अधिक. यातील कुठले योग्य त्यावरून प्रचंड वादविवाद आणि संघर्ष होतो आहे. तो इतका, की जर आपण या लिपीवरून चर्चा करू लागलो तर सामान्य मणिपुरी माणसे घाबरून इकडे तिकडे पाहू लागतात आणि आपल्याला यावर चर्चा अथवा विचारपूस न करण्याचा सल्ला देतात.