आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांचे अज्ञात पैलू!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महनीय व्यक्तींनी स्वत:ची जीवनशैली, आवडीनिवडी याबद्दलचे विचार त्यांच्या लेखनातून व्यक्त केले असतील तर पुढील पिढ्यांना त्या व्यक्तीसंबंधी लिहिताना या साहित्याचा संदर्भ म्हणून उपयोग होऊ शकतो. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात ते शक्य नाही. कारण त्यांनी आपल्या मुलखावेगळ्या जीवनपैलूंबद्दल काही म्हणून काहीच लिहून ठेवलेले नाही. जे काही आहे ते त्यांच्या सामाजिक व राजकीय चळवळींसंबंधी आहे. त्यामुळे अशा घटनांची निवड त्यांना ओळखणार्‍या, त्यांच्या सहवासात आलेल्या व्यक्तींच्या लिहिलेल्या अथवा सांगितलेल्या आठवणीतून चोखंदळपणे करावी लागते.
माझ्या सुदैवाने मला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी डॉ. सविता तथा माईसाहेब आंबेडकर यांचा प्रदीर्घ असा सहवास लाभला. शिवाय ‘साहेबां’च्या आठवणी सांगताना माईसाहेबांनी कधी हातचे राखून ठेवले, असे झाले नाही. त्यांच्या निखळ सत्यवचनाची आठवण सांगायची, तर डेप्युटी डायरेक्टर जनरल पदावरून निवृत्त झालेले मधुकरराव गायकवाड हे जळगाव आकाशवाणी केंद्राचे प्रमुख असताना त्यांनी माईसाहेबांची मुलाखत घेतली होती. त्या वेळी माईसाहेबांशी संवाद साधताना एका क्षणी त्यांनी सहज म्हटले की, ‘तुमच्या सहवासाच्या काळात बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला तसेच घटना लिहिली, घटनेत त्यांनी स्त्रियांना समान हक्कदिले. त्या वेळी तुमचा सल्ला त्यांनी घेतला असेलच...’ त्या वेळी माईसाहेबांनी म्हटले असते की, ‘हो! आमच्या चर्चा होऊन मी आग्रही भूमिका घेतली म्हणून साहेबांनी स्त्रियांना समान हक्क दिले.’ तरी त्यांच्या वक्तव्याला कोणी हरकत घेतली नसती. पण गायकवाडांना मध्येच थांबवून त्या म्हणाल्या, ‘छे! छे! असं मध्ये मध्ये केलेलं साहेबांना अजिबात खपत नसे. पार्लमेंटला जाताना साहेब मला पाली अथवा इंग्रजी भाषांतराचे गृहपाठ देऊन जात असत.
संध्याकाळी परत आल्यावर मला माझे ‘होमवर्क’ त्यांना दाखवावे लागायचे.’ त्यामुळे माईसाहेबांच्या बाबासाहेबांबद्दल सांगितलेल्या आठवणींना अधिकृततेबरोबरच सतत्येचे जणू अधिष्ठानच लाभते.
माईसाहेब एकदा अशीच बाबासाहेबांची एक आठवण सांगत होत्या. त्या म्हणाल्या, ‘कोणत्याही भाषणाची तयारी करताना साहेब बर्‍याच वेळा पॉकेट व मोठी डिक्शनरी उघडून त्यांना अपेक्षित त्या शब्दाचा अर्थ पाहत असत. ते पाहून मी त्यांना म्हणाले, ‘अहो, त्या डिक्शनर्‍यांच्या शब्दसंख्येपेक्षा तुमचे शब्दज्ञान अधिक आहे, तरीही तुम्ही ती डिक्शनरी वारंवार का पाहता?’ माझा प्रश्न ऐकून डिक्शनरीतील आपली शब्द शोधमोहीम न थांबवता बाबासाहेब म्हणाले होते, ‘अगं! तुला काय माहीत? प्रत्येक वेळी त्याच शब्दाचा वेगळाच अर्थ मला लागतो.’ खरं तर महाभारत अथवा ज्ञानेश्वरी वाचणार्‍यांच्या तोंडी शोभणारी भाषा बाबासाहेब शब्दकोशाबद्दल वापरत होते. हे त्यांचे वेगळेपण होते.
21 एप्रिल 1940 रोजी मुंबईतील ‘आशा प्रमोद’ मासिकाचे संपादक ह. वि. देसाई यांनी त्यांची घेतलेली प्रदीर्घ मुलाखत बाबासाहेबांचे अनेक प्रकाशात न आलेले पैलू दाखवते. संपादक त्यांना प्रश्न करतात, ‘आपण जुने मराठी वाङ्मय वाचले आहे का?’ त्यावर ते उत्तरतात, ‘बहुतेक सर्व संतवाङ्मय मी वाचले आहे.’ ‘कुणाचे वाङ्मय जास्त आवडले?’ विचारल्यावर ते ‘मुक्तेश्वर व ज्ञानेश्वर माझ्या आवडीचे आहेत’, असे सांगतात. ‘का आवडतात हेच कवी?’ असे विचारल्यावर त्यांचे आश्चर्यकारक वाटणारे उत्तर असते. ‘मुक्तेश्वर, ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान मला मान्य आहे असे नाही. मला ते आवडण्याचे कारण म्हणजे त्यांचे त्यातील भाषावैभव.’
गीतेविषयी प्रश्न विचारल्यावर बाबासाहेब इंग्रजीतून उत्तर देतात, ‘ती तर मला अजिबात मान्य नाही.’ ‘का?’ या प्रश्नावर त्यांचे उत्तर होते, ‘ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग असे तीन मार्ग गीतेने सांगितले आहेत. पण त्या मार्गातही विसंगतीचे अनेक नमुने सापडतात. आपण जीवनात केलेल्या सर्व चुका सावरून सांगण्याचं तत्त्वज्ञान त्यात आहे... एक साधेच उदाहरण पाहा. कृष्णाने अर्जुनाला युद्धप्रवृत्त करण्यासाठी कुरुक्षेत्रावर उपदेश केला तोसुद्धा विसंगतीने भरला आहे. पहिल्यांदा कृष्ण उपदेश करतो, ‘राज्यासाठी लढ.’ नंतर सांगतो, ‘क्षात्रधर्मासाठी शस्त्र हातात घे.’ आणि नंतर सांगतो, ‘मी सांगतो म्हणून युद्ध कर!’ आता यात नीती कुठे राहिली?’ संपादक म्हणाले, ‘गीता म्हणजे कॉम्प्रोमाइजेस ऑफ ऑल एरर्स’ असेच तुमचे मत आहे का?’ यावर त्यांचे म्हणणे ‘अलबत!it is irresponsible book of ethics.l
ज्ञानकोशकार केतकर डॉ. आंबेडकर यांना आपल्या ज्ञानकोशासाठी संपादक मंडळावर येण्यासाठी अथवा एका विषयावर लिहिण्याची विनंती करतात, असे एक पत्र उपलब्ध आहे. पण त्यावर आंबेडकर गप्पच राहतात, हेही त्यांचे एक वेगळेपण म्हणता येईल.
1937-38 मध्ये पी. जे. रोहम (संगमनेर) यांनी मुंबई विधानसभेत कुटुंब नियोजनासंदर्भात मुंबई विधानसभेत मांडलेल्या बिलाबाबत डॉ. आंबेडकरांनी जे विचार व्यक्त केले होते, त्याबद्दल अभ्यासकांना माहिती आहे. पण दक्षिण मुंबईतून निवडून आलेल्या आर. एस. आसावले यांनी ‘बॉम्बे कौन्सिल’मध्ये 28 जुलै 1928 रोजी मांडलेल्या ‘मॅटर्निटी बेनिफिट’ बिलावरही बाबासाहेबांनी आपले विचार मांडले होते, असे सांगितले तर हे अभ्यासक आश्चर्य व्यक्त करतील. पण हे सत्य आहे. खरं तर त्यांची भाषणे हा एका स्वतंत्र लेखाचा विषय असल्याने त्याचा परामर्श या लेखात घेता येत नाही. पण त्यांचे या संदर्भातील भाषण मात्र त्यांच्यातील अज्ञात पैलूचे दर्शन घडवणारे होते, असेच म्हणता येईल.