आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी लघुत्तम कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावनेचं रूप घेऊन शब्द कागदावर अवतरतात. भावनांच्या लडीतून कथाविश्व आकारास येत जातं. या विश्वाची काही वैशिष्ट्यं असतात. ती कधी दीर्घकथेतून उलगडतात, कधी लघुकथेतून. परंतु अत्यल्प शब्दांत अवघे विश्व सामावलेली कथा आपल्याला निराळ्या रूपात भेटते. एकदा भेटली की, कायमस्वरूपी आपली होऊन जाते. अशाच वाचकमनांवर प्रभाव टाकणाऱ्या लघुत्तम कथांना व्यासपीठ देणारे हे पाक्षिक सदर...
 
‘अनावृत लाज'
एक गरीब मुलगा वर्गात खूप कमी बोलायचा. रानू त्याचं नाव. त्याला आपल्या उसवलेल्या शर्टाच्या शिवणीची, काखेत जीर्ण झालेल्या बाहीची, ढुंगणावर विरलेल्या हाफपँटची लाज वाटायची. वडील तो अगदीच लहान असताना वारलेले. आई धुणीभांडी करून कसेबसे पोट भरायची. राहायला नीटसा निवारा नाही, पुस्तकं रद्दीतली, कुणा दादाचं दप्तर, पाय अनवाणी... त्याच्या लहानशा टाचेला पडलेल्या बऱ्याच लहान मोठ्या भेगा, त्याच्या दारिद्र्याच्या निशाण्या होत्या. इतर वर्गातल्या मुलांबरोबर जाण्याऐवजी तो एकटाच आडमार्गाच्या रस्त्यावरून घरी पोहोचायचा. कमी शब्दांत सांगायचं, तर त्याला लाज वाटायची गरिबीची... तो तिला जितकं झाकू पाहायचा, तितकी ती उघडीच पडायची.

एकदा मास्तर वर्गात राणी पद्मावतीच्या शीशमहालाचे वर्णन रंगवून सांगत होते. "आरशांचा महाल!... आयला, कसा असंल? सगळीकडे आरसेच आरसे...' तो स्वत:च्याच तंद्रित होता. त्याला आठवला हाताएवढा आरशाचा तुकडा त्याला मिळालेला, रस्त्यावर! शर्टाच्या लोंबणाऱ्या कोनातून अलगद पुसला तो नि पहिलं काय केलं तर पाहिलं स्वत:ला! तेवढ्यात मास्तरांचा चॉक त्याच्या कपाळावर टचकन लागला. तसा तो भानावर आला. "ए हे, कुठं हरवलं मठ्ठ ध्यान? काय आरशात दिसलं शीशमहालाच्या? ऊठ, उभा राहा बेंचवर...’ मास्तरांनी फर्मावलं. लांडी-तोकडी पँट डाव्या हाताने खाली खेचत, तो बेंचवर उभा राहिला. जे लपवतोय ते सगळ्यांना दिसणार, याने तो निराश झाला. 

मास्तरांचं लक्ष त्याच्या कपड्यांकडे गेलं. "अरे कपडे लहान होतायेत, शिवता नाही आले नवीन या वर्षी!’ मास्तरांनी दरडावलं. "नाही मास्तर’ तो अजीजीनं म्हणाला. मग राणी पद्मावती, तिचा शीशमहाल, तिचं सौंदर्य इतिहासाच्या पुस्तकात बंद झालं; नि "बघा त्याचे कपडे किती फाटके आहेत! अंगावर धड कपडे नाहीत, पण शिकायचंय त्याला!’... वगैरे काहीबाही बोलत राहिले. वर्गातल्या चाळीस मुलांच्या ऐंशी डोळ्यांनी त्याच्या विरविरीत कापडांना क्षणार्धात फाडून टाकले. तो त्या सगळ्यांच्या नजरेने अर्धमेला झाला.

तो कसाबसा घरी गेला, नि त्या दिवसापासून त्याची शाळा सुटली...
 
- unmuktaurmi1211adv@gmail.com
 
पुढील स्लाइडवर वाचा ‘चाँद' आणि ‘सोप्पं- अवघड' या दोन कथा...
बातम्या आणखी आहेत...