आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओव्यांची शब्दमाळ !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘अरे संसार संसार... अर्थात जात्यावरच्या ओव्या’ हा ऊर्मिला विश्वनाथ कराड यांनी संकलित केलेल्या व स्वरचित ओव्यांचा संग्रह संवेदनशील मनाला आकर्षित करणारा, संग्राह्य आहे. ‘ओवी’ हा स्त्रियांचा जिवाभावाचा विषय. जात्यावर दळताना कुणाही संवेदनशील स्त्रीच्या आपोआप ओठी येणारे हे काव्य. पूर्वी सासुरवाशिणी भल्या पहाटे उठून दळण-कांडण करायला, पीठ तयार करायला बसायच्या. जात्याच्या घरघरीबरोबरच ओवीचे मंजुळ स्वर घरभर पसरायचे. जात्यावरील पारंपरिक ओव्या म्हणजे ‘बहिणाई’, हे समीकरण आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. विलक्षण प्रतिभावान, तत्त्वज्ञानी, कवयित्री बहिणाई व तिची परंपरा जपणा-या तिच्या सर्व सख्या यांचे मानवजातीवर अपार ऋण आहे. बहिणाबाईंच्या शब्दांत सांगायचे तर-
अरे घरोटा घरोटा। तुझ्यातून पडे पिठी।
तसं संसाराचं गानं। पोटातून येतं व्हटी।।
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर उगवत्या सूर्याच्या पार्श्वभूमीवर आताच्या पिढीला जवळजवळ माहीतच नसलेले ‘जाते’ आपल्याला दिसते. जात्यावर दळणा-या दोन स्त्रियांचे हात बहुधा माय-लेकी वा सासू-सुनेचे असावेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष व जात्यावरील ओव्यांच्या अभ्यासक डॉ. माधवी वैद्य यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे. ‘अमेय इन्स्पायरिंग बुक्स’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. ‘आजी, जाते, जात्यावरची ओवी, चौसोपी वाडे, ढाळज, घरापुढील अंगण, तुळशीवृंदावन नामशेष होऊ नये, म्हणून या ग्रामीण आठवणींना उजाळा देण्यासाठी या जात्यावरील ओव्या पुस्तकरूपाने रसिकांपुढे ठेवत आहे.’ असे ऊर्मिलाताई मनोगतात म्हणतात.
ऊर्मिलाताईंचे बालपण नाशिकसारख्या शहरी वातावरणात गेले; मात्र लग्न होऊन त्या लातूर जिल्ह्यातील रामेश्वर (रुई) या छोट्या खेडेगावात गेल्या. गाव आणि शहर यातील विरोधाभास पाहून त्या गांगरून गेल्या. शेतकरी कुटुंबातील वातावरण, घरात सतत माणसांचा राबता, रगाडा आणि कष्टाची कामे सगळे हळूहळू अंगवळणी पडत गेले. आईच्या मुखातून उत्स्फूर्तपणे बाहेर पडणा-या जात्यावरील ओव्यांचे बाळकडू ऊर्मिलाताईंना शालेय जीवनात मिळाले होते. पुढे सासरी दळताना, जात्यावरील ओव्या ऐकताना ऊर्मिलाताईंच्या मनात दडलेल्या ओव्या शब्दरूप घेऊ लागल्या.
पुस्तकातीत प्रत्येक पानावर तळाशी तुळशी वृंदावन, विठोबा-रखुमाई, जात्यावर दळणासाठी बसलेल्या दोन स्त्रिया दिसतात. पुस्तकामध्ये पारंपरिक ओव्यांचा एक विभाग व ऊर्मिलाताईंच्या स्वरचित ओव्यांचा एक विभाग, अशी विभागणी आहे. पारंपरिक ओव्यांच्या विभागात हनुमंत, राम, सीतामाई, कृष्ण, माउली, तुकाराम, नामदेव, जनाबाई, त्र्यंबकेश्वर, परळी वैजनाथ, लक्ष्मणशक्ती, शंभू महादेव यांच्यावरील ओव्या आहेत. तसेच स्वरचित ओव्यांमध्ये राम मंदिर सोहळा, मानवी जीवनपट, राम अवतार, कृष्ण अवतार, काळी आई धरतीमाता, भारतीय सणवार, कौटुंबिक, तीर्थक्षेत्र व चारीधाम यात्रा या विषयांवरील ओव्या आहेत.
शालेय मुला-मुलींना ज्या वातावरणात लहानाचे मोठे व्हायचे असते, तसेच सध्याच्या वेगाने बदलणा-या प्रगत तंत्रज्ञानाच्या विश्वात स्वत:ची विचारसरणी तयार करणे व ती सकारात्मक दिशेकडे सदैव वळविणे सोपे नाही. बाह्य परिस्थिती प्रचंड वेगाने बदलत आहे. विभक्त कुटुंब पद्धती जोमाने रुजत आहे. पण अजूनही एकत्र कुटुंब पद्धती, प्रत्येक प्रांतात रुजलेली बोलीभाषा, पारंपरिक सणवार हे तितक्याच ठळकपणे अस्तित्व राखून आहेत. या सगळ्यांचा एकत्रित विचार करून आपली विचारसरणी सुदृढ करण्यासाठी ‘अरे संसार संसार’सारख्या पुस्तकांची खूप गरज आहे...
‘मानवी जीवनाचा जीवनपट’ या शीर्षकाखाली लिहिलेल्या ओव्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक प्रवास डोळ्यासमोर उभा करतात. ‘राम अवतार’ आदर्शांच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारे बळ देतो. ‘तीर्थक्षेत्र व चारीधाम यात्रा’ ही पारंपरिक पद्धती आपल्याला पर्यटन, पर्यावरण, पारंपरिक रूढी, पद्धती यांच्याविषयीचे विचार जागृत करतात.
मातृभूमीचे चरण। वंदी कन्याकुमारी सागर।
भारतमातेचे माझ्या त्या होई उदात्त दर्शन।।
‘अरे संसार संसार’मध्ये ऊर्मिलाताई म्हणतात-
जगताच्या बाजारात देई आदर्श शिक्षण।
देशसेवक घडवी करी मातृभूमीचे रक्षण।।
सर्व साधुसंतांनी पर्यावरणाचे रक्षण, संस्कृतीची परंपरा जोपासणारी मानसिकता, कर्तव्यपालन, जीवन समृद्ध करण्याची कला आपापल्या परीने आपल्या श्लोकांत, अभंगांत, ओव्यांमधून मांडलीच आहे. त्यांच्या या ज्ञानदानाच्या सोहळ्यात ऊर्मिला कराड यांचे योगदानही या काळाला अनुसरून आहे.
ushadeshpande@hotmail.com
अरे संसार संसार...
अर्थात जात्यावरच्या ओव्या
० लेखिका : ऊर्मिला विश्वनाथ कराड
अमेय इन्स्पायरिंग बुक्स
० मूल्य : रु. 195/- पृष्ठे : 117