आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Utpal Vb Article About Love Stories In Bollywood

प्रेम: एक करणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रेम म्हणजे नक्की काय असतं, याचा उलगडा नीटसा न होताही प्रेम या संकल्पनेने आजवर जगात कथा, कविता, कादंबरी, नाटक, चित्रपट, चित्र, शिल्प, नृत्य आणि इतर स्वरूपात जे जे निर्मिलं आहे ते अजोड आहे. पुलंना उद्धृत करायचा मोह अनावर होतोय. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे. तुझं माझ्यावर प्रेम आहे. आपलं दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. मग तो थेरडा असं काय करतोय? या कालवाकालवीतून प्रेमकाव्य वाहिले.’ (गरजूंनी पूर्ण मजकुरासाठी ‘हसवणूक’ पाहावे.’ आमचा धंदा : एक विलापिका’ पृ. ७) तर प्रेम ही एक कालवाकालव आहे, असं ढोबळमानाने म्हटलं आणि हिंदी चित्रपटात तरी प्रेमकथेला कारण बनायचं मुख्य श्रेय मुलांच्या प्रेमाला नकार देणा-या अनेक थेरड्यांना जातं हे खरं असलं, तरी प्रेमकथा आकर्षून घेते हे नक्की. आणि ती अगदी जमिनीवरची प्रेमकथा असेल (म्हणजे संजय भन्साळीची प्रेमकथा नसेल) तर त्याची बातच और आहे. चित्रपटात ज्यांच्या घराच्या नुसत्या दर्शनाने डोळे दिपतात अशांच्या प्रेमकथेबद्दल वैर असण्याचं काहीच कारण नाही, पण यश चोप्राच्या शिफॉन नेसलेल्या आणि स्वित्झर्लंडमध्ये बहरणा-या छान प्रेमकथेपेक्षाही मुंबईतल्या लोकलमधून प्रवास करणारी, घराचे ईएमआय जोडीने भरणारी प्रेमकथा अधिक जवळची वाटते. अलीकडेच ‘छोटी सी बात’ बघताना लक्षात आलं की, आपण कितीही प्रयत्न केला तरी यशराजच्या हृतिक रोशन-ऐश्वर्या राॅय किंवा शाहरुख खान-माधुरी दीक्षित तर सोडाच, पण ऋषी कपूर-श्रीदेवीशीदेखील आपण पटकन जोडून घेऊ शकत नाही. आपलं कनेक्शन जुळतं ते विद्या सिन्हा आणि अमोल पालेकरशी, ‘कथा’मधल्या दीप्ती नवल-नसिरुद्दीन शहाशी, ‘चष्मेबद्दूर’ आणि ‘साथ साथ’मधल्या फारुख शेख आणि दीप्ती नवलशी! अर्थात गंमत अशी आहे की, यशराज किंवा धर्मा प्रॉडक्शनच्या चकचकीत चित्रपटांतील शाहरुख खानचा राहुल जरी फारसा जवळचा वाटला नसला तरी ‘कभी हां कभी ना’मध्ये त्याच शाहरुख खानने रंगवलेल्या ‘सुनील’शी मी कनेक्ट होऊ शकलो होतो.
एकूणातच प्रेम आणि प्रेमाचे आयाम कलाकृतीतून लोकांपर्यंत पोहोचवणं काहीसं अवघडच. चित्रपटही त्याला अपवाद नाही. प्रेम या संकल्पनेची वीण उलगडून दाखवणारे, त्यातून अनुभूतीचं वैविध्य देणारे चित्रपट विरळा. बरेचदा असंही होतं की, प्रेमकथा हा मूळ विषय नसलेल्या चित्रपटातील प्रेमकथा स्पर्शून जाते, पण याच विषयावर बनलेला पूर्ण लांबीचा चित्रपट पकड घेऊ शकत नाही!
मला प्रेमकथेबाबत श्याम बेनेगलचा ‘सूरज का सातवाँ घोडा’ प्रकर्षाने आठवतो. धर्मवीर भारती यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट १९९२ मध्ये प्रदर्शित झाला. माणिक मुल्ला (रजत कपूर) आणि त्याच्या आयुष्यातील तीन मुली यांची ही कथा आहे. या तिघींपैकी एक गरीब, पण म्हणूनच करारी आहे, एक बुद्धिनिष्ठ, वाचनप्रेमी आहे आणि एक मध्यमवर्गीय, मध्यममार्गी आहे. या तिघींशी नायकाचे वेगवेगळ्या पातळ्यांवरील संबंध व त्यातून घडलेली त्याची प्रेमाविषयीची भूमिका याबद्दल तो मित्रांना सांगतोय. प्रेमालाही ‘वर्गचरित्र’ असतं हा यातला प्रमुख मुद्दा. आणि तीन प्रातिनिधिक कथांमधून तो फार प्रभावीपणे मांडला गेलाय. प्रेमाच्या ‘देवदासीकरणाला’ प्रश्न करणारा हा चित्रपट आवर्जून पाहावा असा आहे.
व्यावसायिक हिंदी चित्रपट प्रेमाकडे ज्या ‘पॉप्युलर’ दृष्टीने बघतो ती लक्षात घेता प्रेमाच्या बाबतीत काही तरी मूलभूत बोलणारे, ‘आणि ते सुखाने नांदू लागले’पेक्षाही प्रेमात असणा-यांचं स्वतंत्र व्यक्तित्व आणि त्यांचं प्रेम यांचा मेळ कसा बसला, बसला का? ते इतरांकडे ओढले गेले तेव्हा काय झालं? अशा आव्हानात्मक प्रश्नांना सामोरे जाणारे चित्रपट बघणं काही तरी ‘अधिक’ देतं. इथे फरक पडतो तो प्रेमाचं व्यक्तिकेंद्रित, व्यक्तीच्या बुद्धी-भावनांशी आणि व्यक्तीच्या एका परिघातील संघर्षाशी निगडित असं चित्रण आणि भोवतालचं सामाजिक-राजकीय वास्तव जेव्हा सगळ्यांनाच ढवळून काढत असतं अशा परिस्थितीत, एका मोठ्या कॅन्व्हासवर आपली जागा शोधणा-या प्रेमाचं चित्रण, या दोन प्रकारांमध्ये. या दोन्हीचा समावेश असलेल्या चित्रपटांबाबत बोलायचं झालं तर मला वर उल्लेख केलेल्या चित्रपटांबरोबर गोविंद निहलानीचा ‘दृष्टी’, बासू चॅटर्जींचा ‘रजनीगंधा’, गुलजारचे ‘मौसम’, ‘इजाजत’, रितुपर्णो घोषचा ‘रेनकोट’, इम्तियाज अलीचा ‘सोचा न था’, ‘जब वी मेट’, ‘हायवे’, शाद अलीचा ‘साथिया’, अभिषेक चौबेचा ‘इश्किया’, ‘डेढ इश्किया’ हे चित्रपट आठवतात.
प्रेमकथा ‘कालवाकालवीतून’ वाहते हे खरं असलं तरी प्रेमाची मोहिनी जबरदस्त आहे हेही खरं. पडद्यावर पहिल्यांदा आलं तेव्हापासून आजवर ‘त्या दोघांचं’ प्रेम चालू आहे आणि राहीलच.