आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअॅलिटी शो आणि रिअॅलिटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोबाइल आणि इंटरनेट हातात खेळायला लागायच्या आधीपासून ज्या एका गोष्टीनं लोकांवर गारूड केलं होतं आणि जे अजूनही कायम आहे, एवढंच नाही तर अनाकलनीयरीत्या वाढत चाललं आहे ते म्हणजे टीव्ही. मला स्वतःला खरं तर टीव्हीबद्दल फारशी आस्था नाही, किंबहुना तो चार तासांवरून चोवीस तासांवर जाण्याचे एकुणात वाईटच परिणाम झाले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे तो लवकरात लवकर पुन्हा चार तासांवर जावा अशी एक भाबडी, कदाचित हास्यास्पद, कदाचित अव्यवहार्य अशी आशा आहे. पण या माध्यमाची लोकांना प्रभावित करण्याची ताकद फार मोठी आहे हे मात्र मान्य करावंच लागेल. ‘द ट्रूमन शो’ हा १९९८ साली प्रदर्शित झालेला चित्रपट. त्या वेळी आपल्याकडचा सॅटेलाइट टीव्ही बाल्यावस्थेत, कदाचित किशोरावस्थेत, होता. अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये मात्र खासगी वाहिन्यांनी जनमानसाचा कधीच कब्जा घेतला होता. डेली सोप वगैरे प्रकार सुरू झाले होते आणि टेलिव्हिजनचा तिथला प्रेक्षकही त्यामुळे भारतीय प्रेक्षकांपेक्षा वेगळ्या मनोवस्थेचा होता. ‘द ट्रूमन शो’ या चित्रपटाला एकाहून जास्त पदर आहेत. म्हटलं तर हा चित्रपट म्हणजे टेलिव्हिजनवरचं एक प्रत्ययकारी भाष्य आहे, म्हटलं तर हा एक तात्त्विक ऊहापोह आहे किंवा एक गंभीर अस्तित्ववादी चर्चा आहे!
चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे ट्रूमन बरबँक (जिम कॅरी). ‘सीहेवन’ नावाच्या एका गावात तो राहतोय आणि तिथेच नोकरी करतोय. त्याची बायको मेरिल एका हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करते आहे. त्याचं सुखी, आखीवरेखीव आयुष्य नीट सुरू आहे. पण आपलं आयुष्य फार म्हणजे फार म्हणजे फारच आखीवरेखीव आहे याची जाणीव ट्रूमनला काही घटना आणि प्रसंगांमधून व्हायला लागते आणि अखेरीस त्याला त्याच्या आयुष्याचं सत्य उमगतं. आपलं रोजचं आयुष्य हा टीव्हीवर रोज चोवीस तास चालणारा एक ‘शो’ आहे, हे ते सत्य! हा टीव्ही शो आहे हे आपण सोडून सगळ्यांना माहीत आहे, आपली बायकोदेखील या शोमधली एक कलाकार आहे, हे पूर्ण गाव या शोकरता मुद्दाम वसवलं गेलं आहे आणि आपण ज्यांना रोज भेटतोय ते सगळे लोक आपल्या बायकोसारखेच या शोमधले कलाकार आहेत हे त्याला कळतं. आणि मग या आभासी जगातून मुक्त व्हायची त्याची धडपड सुरू होते. तो मुक्त होतोदेखील, पण ब-याच प्रयत्नांनंतर. या शोचा निर्माता, दिग्दर्शक क्रिस्टोफ (एड हॅरिस) ट्रूमनशी प्रत्यक्ष संवाद साधतो आणि ‘ख-या जगात तुझ्या या कृत्रिम पण स्वतःच्या जगाहून वेगळं असं काहीच सत्य नाही,’ असं सांगून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न करतो. पण ट्रूमन आपल्या स्वतःच्या, रोजच्या, पण खोट्या जगातून बाहेर पडायचा निर्णय घेतो.
हजारो छुप्या कॅमे-यांमार्फत ट्रूमनचं रोजचं जगणं लोकांसमोर कसं आणलं जातं, त्याला टप्प्याटप्प्याने आपल्या आयुष्याचं सत्य कसं उलगडत जातं, क्रिस्टोफ काय काय युक्त्या योजतो हे सगळं प्रत्यक्ष बघणं रोचक आहे, थरारक आहे आणि मुख्य म्हणजे आपल्याला खरं आयुष्य-खोटं आयुष्य आणि त्यातील सीमारेषा यावर विचार करायला लावणारं आहे. हा चित्रपट खूप गाजला आणि त्यावर पुष्कळ चर्चा झाली. धार्मिक अंगाने, तात्त्विक अंगाने आणि मानसशास्त्रीय अंगाने मतं मांडली गेली. मला स्वतःला हा चित्रपट बघताना जी.ए. कुलकर्णी यांच्या ‘स्वामी’ या कथेची आठवण येत होती. एका छोट्या जागेत मठाचा ‘स्वामी’ बनवून अडकवला जाणारा इसम आणि हे अडकणं स्वतंत्र असण्यापेक्षा खरं तर चांगलंच आहे हे तात्त्विक अंगाने त्याला पटवायचा प्रयत्न करणारा त्याला अडकवणारा इसम या दोघातला संवाद ज्यांनी वाचला आहे, त्यांना माझं म्हणणं लक्षात येईल. आपण ज्या जगात राहतो आहोत ते जग खरं तर मुक्त आहे, कारण इथला प्रत्येक जण त्याच्या प्रेरणेने जगतो आहे. पण ट्रूमनच्या भोवतीची माणसं जरी भाडोत्री कलाकार असली तरी अखेरीस आपल्या भोवतीच्या माणसांना तरी एका मर्यादेपलीकडे स्वातंत्र्य कुठे आहे? आपल्यालादेखील ते कुठे आहे? मग आपण जगतो आहोत ते ‘खरं’ जग आहे, असं तरी का म्हणायचं? कदाचित ‘खरं’, ‘मुक्त’ जग वेगळंच असेल. या जगात आपण सगळेच खरं तर बाहुल्यांसारखे आहोत. मात्र तरीदेखील आपलं ट्रूमनसारखं झालं तर आपणही या जगातून बाहेर पडायचा प्रयत्न करू. जरी तिथे लौकिकार्थाने सुखी असलो तरी. आणि याचं कारण हे, की मर्यादांनी निश्चित केलेलं का असेना, पण ते ‘आपलं’ स्वातंत्र्य आहे. आपल्यापुरतं आहे, कदाचित पूर्ण नाही, पण तरी ‘आपलं’ आहे.
‘द ट्रूमन शो’ची कल्पना भन्नाट आहे. आणि त्याहून भन्नाट आहे ते म्हणजे ट्रूमनला जेव्हा ‘हे सगळं खोटं आहे’ ही जाणीव होते ते क्षण बघणं आणि अनुभवणं. पडद्यावर ते बघत असताना आपण अस्वस्थ होतो. कारण त्या क्षणी ट्रूमनशी आपल्याला एक जोडलेपण जाणवत असतं. आपल्या भोवतालातला ‘खोटेपणा’ जाणवण्याचे क्षण आपल्याला आठवतात आणि मनातल्या मनात आपलाही ‘ट्रूमन शो’ सुरू होतो!