आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घुसमट कधी थांबणार ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुरुषाला बाईकडून काय हवं असतं? किंवा
बाईला पुरुषाकडून काय हवं असतं?
असा प्रश्न समोर आला तरी मनाचा रोख थेट लैंगिकतेकडे जातो. लैंगिकता म्हणजे फक्त बाई-पुरुषाची किंवा नर-मादीची जोडी. हे मनावर किती बिंबलं आहे, याची प्रचिती द्यायला अशा उदाहरणाचीही गरज पडू नये. तिथं एखादा टीम कुक समोर येतो. जगासमोर ओरडून सांगतो, ‘आय अॅम प्राउड टू बी गे.’ किंवा एखादा वेंडल रॉड्रिग्ज पुरुषाशीच लग्न करतो. आम्ही मनातल्या मनात ‘इन की हिम्मत की’ दाद देतो. चारचौघात मात्र यांचे वाभाडे काढतो. समाजात राहायचं म्हणजे झुंडीच्या सुरात सूर मिसळायलाच हवा भाऊ!
आम्ही थोडीच कुणाच्या बाजूने लढायला कवचकुंडलं घेऊन जन्माला आलोय. आणि आम्ही तर व्यवस्थित चौकटीत बसणारे असूनही आमचीच लैंगिक गोची काही कमी नाही, तिथं कुणाच्या पाठीशी राहण्याची करामत आम्ही काय करणार? समलिंगी संबंधाचं नाव काढताच विरोध, निंदा करणारे जितके दिसतात, तितकीच अशी पळपुटी भूमिका घेणा-यांचीही वानवा नाही. पारंपरिक निकषांना आव्हान द्यायचं नसेल तर मूग गिळून गप्प बसलेलं काय वाईट? आपण यातले की दुस-या गटातले?
दुसरा गट म्हणजे नीतिनियमांच्या लेझीमवर कायम ताल धरणारे. ते म्हणतात, आपल्याला आपल्यासारख्या देहाबद्दल प्रेम वाटता कामा नये. दया, करुणा, द्वेष काही वाटलं तरी चालेल, पण प्रेम वाटता कामा नये.
या ओळी जणू सामाजिक नैतिकतेचा तथाकथित नियमच. प्रणयाची भावना म्हणे निर्मितीचं माध्यम असते. आणि सामाजिक मूल्ये निसर्गनियमांच्या पायावर उभी असतात. त्यामुळे प्रणयाच्या भावनेतून उत्पत्तीच्या शक्यता समोर येत नसतील, तर त्या प्रणयाच्या भावनेलाच समाजात स्थान नाही. समलिंगी संबंधांबाबत अशा विचारांची तोफ नेहमीच डागली जाते. एकदा अनैसर्गिकतेचा ठपका मारला की, स्वीकाराचाही प्रश्नच उरत नाही. पण प्रश्न समाजाने स्वीकारण्याचा तरी असतो का? लैंगिकतेला खासगी बाब म्हणायचं आणि या खासगी बाबीचे सामाजिक धिंडवडे काढायचे हा विरोधाभास नाही का? या विरोधाभासाच्या कचाट्यात समलिंगी संबंधांना तर कायमच दावणीला बांधलं जातं.
समलिंगी संबंधांबाबतची आपली भूमिका अशाच चौकटीत फिरत राहते. पण ही भूमिका ठरवताना निव्वळ सामाजिक ठोकताळ्यांचाच आधार असतो. लैंगिक सुखाची पारंपरिक पद्धतच प्रमाण मानून ही भूमिका तयार होते. पण याला छेद देणाराही एखादा अवलिया असतो. मानसोपचार तज्ज्ञ अल्बर्ट एलिस त्या अवलियाचं नाव. त्याच्या विवेकशील विचारांच्या मानसिक थेअरीसाठी हा जगभर ओळखला जातो. समलिंगी संबंधांवर अभ्यास करताना निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी त्यानं स्वतःचं या अनुभवातून जाणं स्वीकारलं. अशा संबंधात आपला आनंद बसत नाही, हे त्यानं ताडलं. पण म्हणून अल्बर्ट एलिसनं समलिंगी संबंधांना अनैसर्गिकतेचा ठपका नाही चढवला तर माणसाच्या मूळ प्रवृत्तीच्या दृष्टिकोनातून तिचं विश्लेषण केलं. समलिंगी संबंधांविषयीची भूमिका ठरवताना म्हणूनच अल्बर्ट एलिसची वैचारिक पद्धत महत्त्वाची वाटते.
समलिंगी संबंध हा शब्द तरी कसा आहे पाहा ना? तो शारीरिक संबंधांनाच अधोरेखित करणारा असल्यासारखा वाटतो. समलिंगी प्रेम असा शब्द का बरं वापरला जात नाही? कारण त्या नात्यातल्या मानसिक जवळिकीचा विचारच समाजाला गरजेचा वाटत नाही.
समलिंगी आकर्षणाला विकृती म्हणल्यास त्या नात्यातले मानसिक बंध तपासण्याची जबाबदारीच संपून जाते. समलिंगी संबंधांबद्दल ज्या उघड चर्चा होतात त्यातही त्यांच्या शारीरिक गरजांच्या हक्काविषयी बोलले जाते. साहित्य किंवा कला क्षेत्रातही याविषयी अभावाने उल्लेख मिळतात. एखादाच ‘फायर’ त्या नात्यातलं गांभीर्य स्पष्ट करतो. नाही तर एरव्ही ‘दोस्ताना’च्या नावावर निव्वळ खिल्ली उडवण्याचे प्रकारच जास्त पाहायला मिळतात. समलिंगी नात्याचं चित्रण करताना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करून वास्तव मांडण्याचं भान बाळगलं जात नाही. तसा प्रयत्न झाला तर ऐकीव गोष्टींचे तकलादू इमले नक्कीच कोसळून पडतात; पण असा प्रयत्न फार होत नाही. मराठीत तो प्रयत्न मंगला आठलेकरांनी केला. लेस्बियन्सना भेटून त्यांनी त्यांची व्यथा समजून घेतली. या कथा ऐकताना त्यांनाही ‘हे दुःख कुण्या जन्माचे?’ असा प्रश्न पडला. हे दुःख मांडताना त्यांनी समलिंगी नात्यांमध्ये गुंतणा-यांची सामाजिक घुसमट समोर आणली.
जाता जाता पेंग्विन इंडियाच्या ‘फेसिंग द मिरर’ पुस्तकाविषयी सांगायला हवं. अश्विनी सुखटणकर यांनी संपादित केलेलं हे पुस्तक. समलिंगी नात्यांचं भावविश्व अनुभवायचं असेल, तर हे पुस्तक वाचायलाच हवं. शेकडो मुली या पुस्तकात भेटतात. समदेहाची आस असणा-या. त्यापोटी नाना दुःखं भोगलेल्या. त्यांना वाचताना समलिंगी नात्याचे पूर्वग्रह गळून पडल्याशिवाय राहणार नाहीत. ती म्हणते,
How does it feel to be a secret?
How does it feel to be invisible?
How does it feel to be unutterable?
How does it feel to be forbidden to be?
How does it feel to be called a joke, a threat, a mistake, a freak?
आयुष्यं उपभोगायला कुणाला अदृश्य व्हावं वाटत असेल तर तो समाज दुर्दैवी आहे. लैंगिकता आणि नैतिकतेच्या संकल्पनेतला गच्चागोळ सहन करता करता मानवी मनानं उत्क्रांतीचे टप्पे ओलांडले आहेत. हे संक्रमण रोज नव्या बदलांना घेऊन येतं. समलिंगी नाती ही या संक्रमणाचा अविभाज्य घटक आहेत, ही मानसिकता रुजेल तोच दिवस प्रेमाचा दिवस म्हणून साजरा व्हायला हवा...