आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी कविता हीच माझी राजकीय कृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कवीचा वर्ग जसा अधोरेखित करता येतो, तसाच तो वर्ग कालांतराने बदललासुद्धा जाऊ शकतो. कारण वर्गचरित्राच्या दृष्टिकोनातून समांतर रेघ आखणाऱ्या कवीची कविता ही मुळातच विद्रोहात उगम पावते आणि प्रस्थापितांना उखडवून फेकत स्वत: प्रस्थापित होते. म्हणून मला भारतीय वास्तवात विचार करताना वर्गचरित्रापेक्षा जातचरित्र अधिक प्रामाणिक आणि महत्त्वाचे वाटते...

जन्म हा जरी अपघात असला तरीदेखील आपल्याकडे विशिष्ट वर्गाला बाय बर्थ काही चॉइसेस आहेत. मागास जातीत जन्माला येणाऱ्या प्रत्येकाला बाय डिफॉल्ड पुरोगामी बनण्याशिवाय पर्यायच नसतो. या उलट दडपशाहीची परंपरा असलेल्या जातीत जन्माला आलेल्यांना प्रतिगामी अथवा पुरोगामी बनण्याचा मात्र सोयीस्कर चॉइस असतो. जात, पंथ, धर्म, लिंग बंडाच्या चिलखती कुरतडण्याच्या या लढ्याचं रूपांतर आता पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी अशा लढ्यात होत आहे.

चळवळीची भाषा वेगाने बदलत आहे. ग्लोबलायझेशननंतर उपजलेल्या दुसऱ्या पिढीचा मी एक प्रतिनिधी. पहिल्या पिढीला जागतिकीकरणाचा तुटपंुजा फायदा झाला. दुसऱ्या पिढीला तो फायदा आणि चटके दोन्ही बसत आहेत. एकविशी पार केलेल्या "खाऊजा' धोरणाने मात्र आता नव्याने उदयास येणाऱ्या तिसऱ्या पिढीच्या सर्वांगाचे लचके तोडण्याची पूर्ण तयारी करून ठेवली आहे. आमच्या हक्काचं जे आकाश इथल्या व्यवस्थेनं अत्यंत चलाखीनं डिलीट केलंय, ते आकाश पुन्हा रिस्टोर करण्याची भूमिका घेऊन मला आपणा सर्वांसोबत यायचं आहे. या रिस्टोरेशनच्या कामात प्रत्येक स्वाभिमानी, पुरोगामी, समताप्रेमी कार्यकर्ता आणि कार्यकर्तीचे सहकार्य अपेक्षित करण्याची भूमिका मला येथे मांडायची आहे. आंबेडकरी चळवळीवर आणि त्यातील कार्यकर्त्यांवर मित्र चळवळींकडून होणारे आरोप मला खोडून काढताना किमान समान कार्यक्रमावर कसं एकत्रित येता येईल, या भूमिकेवरच फोकस करायचा आहे. आधीच्या पिढीने प्रसवलेल्या उद्रेकाचं रूपांतरण आता नवनिर्मितीच्या प्रांगणात करण्याची, स्वत:चं स्वतंत्र सौंदर्यशास्त्र लिहिण्याची भूमिका, स्वत:चं आकाश नव्याने पांघरण्याची भूमिका मला आपल्यासमोर घेऊन यायची आहे.
माणूस काळानुरूप बदलत जातो. त्यासोबत बदलत जातं ते त्याचं ज्ञान, आकलन आणि त्याच्या जाणिवा. जाणिवा जसजशा प्रगल्भ होत जातात, तसंतसं त्याचं सामाजिक पातळीवरील अस्तित्व अधिकाधिक गडद होत जातं. आयुष्याच्या एका फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये त्याचे पक्षांतरच झालेलं असतं. त्याच नियमाला धरून प्रत्येक कलावंताचं आयुष्य घडतं अथवा बिघडत असतं. याला कवी अपवाद ठरू शकत नाही. कवी हा फक्त केवळ शब्दांपुरता, त्यातील व्याकरणाच्या नियमांपुरता सीमित नसतो. तो प्रतिनिधी असतो, त्याच्या जाणिवांचा, त्याच्यासारख्या जाणिवा जपणाऱ्या असंख्य अव्यक्त मनांचा. म्हणून प्रत्येक कवीला स्वत:चं वर्गचरित्र असतं. त्याचं रखरखणारं जातचरित्र जरी जाणूनबुजून नजरेआड केलं जात असतं, तरी त्यामुळे त्याची दाहकता निश्चितच कमी झालेली नसते. या जातचरित्राच्याच दाहकतेतून सत्तरच्या दशकानंतर ज्वालामुखीच्या वेगानं प्रसवलेल्या आंबेडकरी साहित्यानं आपल्या वेदना अतिशय तीव्र आणि आक्रमक रूपात मांडल्या. विशेष म्हणजे, त्या अगदी स्वत:च्या, वेशीबाहेरच्याच भाषेत मांडल्या. ज्या समाजाला जगण्यासाठी, स्वत:चं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पावलापावलांवर संघर्ष करावा लागायचा, त्या समाजातून आलेलं साहित्य आग ओकणारं असणं, हे स्वाभाविकच होतं. या साहित्याच्या मांडणीतील आक्रमकतेमुळे त्याला सरसकटपणे पुरुषी ठरवलं गेलं. ‘गोलपीठा’ असो किंवा ‘रॉकगार्डन’... नामदेव ढसाळ ते अरुण काळे आणि लोकनाथ यशवंत, प्रज्ञा पवारांपासून ते अनेक नवकवींच्या कवितेतील आक्रमकता ही जरी बुरसटलेल्या मेंदूला झिणझिण्या आणणारी असली, तरी त्यातील करुणाभाव हा निश्चितच पसायदानापेक्षा काकणभर सरस आहे.

आंबेडकरी कालखंडानंतर उदयाला आलेल्या पहिल्या पिढीनं कमालीची गरिबी पाहिली. पहिली पिढी ही तशी गरीबच, बेरोजगार पण पाश्चात्त्य शिक्षणाचं दूध प्यायलेली, जशास तसे उत्तर देणारी होती. कोणत्याही प्रकारची सेटलमेंट नाकारणाऱ्या युवांची ती पिढी होती. ‘गोलपीठा’च्या आगमनाने साहित्यात नव्या वादळाची नांदी झाली. स्त्रीवादी साहित्याचं उत्तम उदाहरण असलेला ‘गोलपीठा’ मात्र कायम वेश्यांच्या वेदना चितारणारा काव्यसंग्रह म्हणूनच स्त्रीवादी चळवळीने पाहिला, हे निश्चितच क्लेशकारक होते. इथल्या व्यवस्थेने कायम शूद्र ठरविलेल्या समाजघटकांमध्ये अतिशूद्र असलेल्या महिला वर्गाला त्यांच्या हक्काचं मुक्तपीठ उभारून देण्याचे काम दलित पँथर आणि विद्रोही साहित्याने केले आहे आणि हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ असले, तरी स्त्रीवादी चळवळ हे स्वीकारायला का तयार होत नाही, याचे नीटसे कारण अजूनही कोणी प्रस्तुत करू शकलेले नाही. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते हे कायम शोषणाविरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. परंतु दर वेळेस त्या कार्यकर्त्याला दलित पितृसत्तेच्या चौकटीत तपासून पाहणं, आणि त्यांच्या प्रत्येक कृत्याला केवळ पुरुषी कृत्य म्हणून ओळख देणं, हे कितपत संयुक्तिक आहे? मागास जातीतील प्रत्येक तरुण स्त्री व पुरुष कार्यकर्ते हे अन्यायाविरोधातील चीड आणि संताप अतिशय जहाल भाषेत आणि प्रतिक्रियेत व्यक्त करणारे राहिले आहेत. त्यांची जहाल प्रतिक्रिया ही कायम इथल्या शोषकांच्या अमानवी क्रियेला दिलेली प्रतिक्रिया होती, हे कसे विसरून चालेल.

दलित पितृसत्तेची दाहकता मला मान्य आहे. या वृत्तीपायी माझ्या आईचा उद‌्ध्वस्त झालेला संसार मी पाहिला आहे. माझ्या लहानपणापासून या व्यवस्थेची खेटरं खात आम्ही आयुष्य नव्याने उभं केलं आहे. पण त्यामुळे मागास जातीतील सर्वच्या सर्व पुरुष हे पितृसत्ताकवादी मानसिकतेचे आहेत, असा अर्थ तर निघत नाही ना... प्रत्येक चळवळीने आणि चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्याने आता जनरलाइज्ड स्टेटमेंट करण्यापेक्षा व्यक्तिसापेक्ष वागण्यावर अधिकाधिक भर द्यायला हवा, तरच मित्र चळवळी जोमाने काम करू शकतील, अन्यथा ही नव-अस्पृश्यता खूपच धारदार होत जाईल. राजकारणी पक्षांतर करू शकतात. कारण तेथे वैचारिक भूमिकांचा मुद्दा येतच नाही. त्यामुळे कोणी, कुठेही, कसाही आला, गेला तरी त्याचे सामाजिकदृष्ट्या उमटणारे पडसाद फारसे विशेष नसतात. कवीच्या बाबतीत मात्र तसे म्हणून चालत नाही. कवीचा वर्ग जसा अधोरेखित करता येतो, तसाच तो वर्ग कालांतराने बदललासुद्धा जाऊ शकतो. कारण वर्गचरित्राच्या दृष्टिकोनातून समांतर रेघ आखणाऱ्या कवीची कविता ही मुळातच विद्रोहात उगम पावते आणि प्रस्थापितांना उखडवून फेकत स्वत: प्रस्थापित होते. म्हणून मला भारतीय वास्तवात विचार करताना वर्गचरित्रापेक्षा जातचरित्र अधिक प्रामाणिक आणि महत्त्वाचे वाटते.

आपल्याला वर्गलढ्याला आपले योगदान द्यायचेच आहे. परंतु जातवर्चस्ववाद हा सांप्रत व्यवस्थेतील सर्वात मोठा दहशतवाद मुळापासून उखडवून टाकण्यासाठी आपल्याला सज्ज व्हावेच लागेल. एक कवी म्हणून जन्माला येताना मला आणि आपणा सर्वांना आपली राजकीय भूमिका आणि राजकीय कृती ही इतरांना शब्दातून समजावून सांगण्यासोबतच त्यांची अंमलबजावणी हीच आपली ओळख आपल्याला बनवावी लागणार, यात शंका नाही. कविता ही अभिव्यक्ती असते. त्यापेक्षा ती असते, तुमची राजकीय कृती. हे ज्या दिवशी ध्यानात आलं, त्याच दिवशी माझ्या जाणिवेतील कवितेचा आकृतीबंध एकदमच मोठा झाला. कविता ही व्यक्त होण्याच्या माध्यमापलीकडची असून ती आपलं जातचरित्र, वर्गचरित्र, लिंगचरित्र अधोरेखित करीत असते. ज्या हाडामांसाच्या गोळ्याचे जात-वर्ग-लिंगचरित्र या व्यवस्थेकडून जबरदस्तीने अधोरेखित केले गेलेले असते, त्यांच्यासाठी त्यांची कविता ही लढ्याचं निर्णायक हत्यार असते. या हत्याराची धार जेवढी जहाल तेवढीच फसवीदेखील. कारण दुधारी तलवारीचं हत्यार ज्याच्या हातात असतं त्याचे हात आणि मनगट त्या कवितेएवढेच ताकदवार असायला हवेत. अन्यथा शोषकांवर उभारलेलं हत्यार कधी आपल्या गळ्याचा घोट घेईल, याची काही गॅरंटी देता येणार नाही.

शब्दांकन -विष्णू जोशी
vishnujoshi80@gmail.com
पुढील स्लाइडमध्ये, वैभव छाया यांचा थोडक्यात परिचय
बातम्या आणखी आहेत...