आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समागम पश्चात आचरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वात्स्यायनाचे ‘कामसूत्र’ केवळ स्त्री-पुरुष शरीरापुरते मर्यादित नाही, तर जीवन आणि त्यातील जीवनरसांविषयीचा तो एक समग्र दृष्टिकोन आहे...

का मसूत्रात ‘रतावरम्भासानिक’ या प्रकरणाचा समावेश केला गेला आहे. या प्रकरणात प्रामुख्याने नागरकाच्या शृंगाराचे वर्णन आपल्याला वाचायला मिळते. प्रकरणाच्या सुरुवातीला त्याच्या शयनगृहात असलेल्या रम्य वातावरणाचे वर्णन आले आहे. हे रम्य वातावरण निर्माण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सुगंधी धूप, उत्तम बिछाना, तसेच संगीत यांचाही उल्लेख या प्रकरणात आलेला आहे. नागरकाचा आपल्या पत्नीबरोबर उत्तम शृंगार व्हावा, या हेतूने अशा वातावरणाची निर्मिती ‘कामसूत्र’कार अपेक्षितो. या रम्य वातावरणात नागरकाचे खाजगी सेवक आणि मित्र परिवार यांची उपस्थिती सुरुवातीचा काही काळ असावी. त्यानंतर उत्तम स्नान केलेली आणि अलंकार धारण केलेली आपली पत्नी, हिच्या समवेत एकांतात नागरकाने शृंगार करावा, असे सूचन आहे. विवाहानंतरच्या पहिल्या काही शृंगारासंबंधीचे हे वर्णन असावे, असे अनुमान आपण यावरून काढू शकतो.

यानंतर नागरकाने आपल्या पत्नीबरोबर रम्य वातावरणात कशा प्रकारे शृंगार करावा, याचे विस्ताराने वर्णन या प्रकरणात वात्स्यायनाने केले आहे. संभोगानंतर नागरक आणि त्याच्या पत्नीने कोणत्या प्रकारे आचरण करावे, याचेही मार्गदर्शन ‘कामसूत्रा’त पुढे आले आहे. संभोगानंतर पत्नी आणि पती या दोघांनी वेगवेगळ्या प्रसाधनगृहांमध्ये जाऊन आपल्या गुप्त इंद्रियांची स्वच्छता करावी. त्यानंतर पुन्हा एकत्र बसून ताम्बुल सेवन करावे. येथे ताम्बुल याचा अर्थ विड्याचे पान आणि याबरोबर असलेल्या पाचक गोष्टींचे सेवन ‘कामसूत्र’काराला अभिप्रेत असावे. आयुर्वेदीय ग्रंथामध्ये ताम्बुल सेवनाचे शरीरासाठी असणारे उपयोग वर्णन केले आहेत. त्याचाही अभ्यास त्या काळी वात्स्यायनाने केला असावा. ताम्बुल सेवनानंतर प्रकृती आणि ऋतू यांना अनुसरून चंदनाचे अनुलेपन पुरुषाने स्त्रीच्या शरीरावर करावे. चंदन हे अत्यंत सुगंधी असल्याने त्याच्या लेपनामु‌‌ळे मनाचा उत्साह वाढतो आणि प्रसन्नताही निर्माण होते. म्हणून येथे चंदनाचा लेप लावण्यासंबंधी मार्गदर्शन केले गेले आहे.

ताम्बुल सेवनासाठी प्रामुख्याने नागवेलीचे पान वापरण्याचा प्रघात आहे. हे पान औषधी गुणाचे असते. ते पचन सुलभ करते. त्या पानाबरोबर थोडासा चुना आणि अन्य काही पाचक पदार्थांचा समावेश होतो. आपल्या देशात उत्तरेकडे असे पान खाण्याची परंपरा आढळते. अर्थात, या पानात कोणताही तंबाखू किंवा तत्सम पदार्थ टाकणे मात्र अपेक्षित नाही. नागवेलीच्या पानाचा तर आयुर्वेदशास्त्राने काही आयुर्वेदीय औषधांमध्ये उपयोग केला आहे. ‘लघु सुत शेखर’ हे आम्ल पित्त, शीत पित्त यावर वापरले जाणारे औषध आहे. त्यामध्ये नागवेलीच्या पानांचा रस असतो. वात्स्यायनाने अशा या ताम्बुलाचा उपयोग कामशास्त्रातही केलेला आपल्याला दिसतो.
चंदनाच्या अनुलेपनानंतर पुरुषाने स्त्रीला पुन्हा आलिंगन द्यावे, असे ‘कामसूत्र’ म्हणते. यानंतर नागरक आणि त्याची पत्नी या दोघांनी प्रकृती आणि ऋतू यांना अनुसरून जलपान आणि गोड चवीच्या फळाचे सेवन करावे. येथे केळी, चिकू, द्राक्षे, आंबा इत्यादी गोड फळे ‘कामसूत्र’काराला अपेक्षित असावी. गोड फळे ही प्रामुख्याने शरीरातील रस धातू आणि शुक्र धातू यांना पोषक अशी असतात, असे आयुर्वेद या भारतीय मूळ असलेल्या वैद्यकशास्त्राने सांगितले आहे.

‘कामसूत्र’काराने गोड फळाच्या या गुणधर्माचाच नव्हे, तर त्या वेळी उपलब्ध असणाऱ्या विविध भारतीय शास्त्रांचाही ‘कामशास्त्रा’ला पूरक म्हणून उपयोग करून घेतला आहे. जलपानाचाही उल्लेख या प्रकरणात आलेला आहे. संभोगानंतर शरीरात द्रवधातू कमी होऊ नये आणि मनाची व शरीराची तृप्ती व्हावी, यासाठी या ठिकाणी जलपानाची योजना ‘कामसूत्र’कार करतो. गोड फळे, जलपान याप्रमाणेच स्त्री-पुरुषांनी संभोगानंतर काही विशिष्ट आहार कल्पनांचा उपयोग करण्यास सांगितले आहे. उदारणार्थ- अच्छ, रसक, युष, आम्लयवागु इत्यादी (या आहार कल्पनांचेही सविस्तर वर्णन आयुर्वेदशास्त्रात मिळते.) या आहार कल्पना रस धातूला पोषक अशा आहेत. आंबा हे फळ उत्तम शुक्रवर्धक म्हणून प्रसिद्ध आहे. (उन्हाळ्याच्या मोसमात टीव्हीवर झळकणाऱ्या ‘स्लाइस’ आणि ‘आमसूत्र’च्या जाहिरातीतली सेन्शुअस मूडमधली कतरिना कैफ बघून शृंगार आणि आंब्याचा असलेला संबंध वाचकांना सहज उलगडेल.) यानंतर स्त्री आणि पुरुषाने आकाशातील चांदण्या तसेच सप्तर्षी इत्यादींचे दर्शन घ्यावे. त्यांच्या सहवासात एकमेकांशी प्रेमाचा संवाद करावा. आकाशातील या रम्य गोष्टींचे दर्शन घेतल्याने आणि प्रेमळ संवाद केल्याने पती-पत्नींचे मन उल्हासित होते. त्यांच्यातील परस्पर प्रेम आणि जिव्हाळादेखील वाढण्यास मदत होते. त्यामुळे संभोगानंतर पती-पत्नीचे शरीर आणि मन या दोन्हींचा विचार ‘कामसूत्र’काराने त्यांच्या निरामय कामजीवनासाठी शास्त्रीय पद्धतीने केला आहे, असे आपल्याला दिसते. तारकांचे दर्शन आणि प्रेमळ संवाद झाल्यानंतर पती-पत्नी यांनी शयनगृहात जाऊन वेगवेगळ्या बिछान्यांवर निजावे, असे पुढे कामसूत्रात सुचवण्यात आले आहे.
(ayurvijay23@rediffmail.com)
बातम्या आणखी आहेत...