मागील लेखांकात स्त्री आणि पुरुष यांच्या एकत्र येण्याची म्हणजेच पर्यायाने त्यांच्या संभोगाची फलश्रुती
आपण पाहिली. या संभोगातून निर्माण होणारा गर्भ स्थिर राहण्यासाठी स्त्री आणि पुरुष यांच्यातील भोगेच्छा आणि भोगानंद असणे अत्यंत महत्त्वाचे असते, असे ही फलश्रुती सांगताना वात्स्यायनाने म्हटले आहे. त्यापुढे त्याने स्त्री आणि पुरुष या दोहोतील संभोगसुखाबद्दल आणि एकूणच त्यांच्यातील संभोगक्रियेबद्दल अतिशय विस्तारपूर्वक भाष्य केलेले आहे.
स्त्रीची संभोगेच्छा ही निरंतर राहते, असे वात्स्यायन म्हणतो. त्याने त्यासाठी कुंभाराच्या चाकाची उपमा वापरलेली आहे. हे चाक सुरुवातीला स्थिर असते. पुढे त्याला गती प्राप्त होते. ती गती बराच काळ तशी राहते आणि मग काही काळाने ती थांबते. स्त्रीची संभोगेच्छा याप्रमाणे सुरुवातीला स्थिर, पुढे काही काळ निरंतर असते.
कामसूत्रामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे बाभ्रव्य या विद्वानाच्या मते, स्त्रीला सुरुवातीपासून संभोगाच्या शेवटपर्यंत आनंद मिळतो, तर पुरुषाला मात्र संभोगाच्या शेवटी वीर्यस्खलन झाल्यानंतर आनंद मिळतो. वात्स्यायनाने मात्र संभोगातील हा आनंद स्त्री आणि पुरुष या दोघांनाही सारखाच म्हणजे संभोगाच्या शेवटी मिळतो, असे मत व्यक्त केले आहे. अर्थात, अवस्था आणि अनुभूती यानुसार स्त्री आणि पुरुष यांना मिळणाऱ्या संभोगसुखात भिन्नता आढळते. कारण पुरुष हा या प्रक्रियेतील कर्ता असतो आणि स्त्री ही मात्र अधिकरण असते. पुरुष हा संभोग करत असतो, तर स्त्री ही संभोग करवून घेत असते. तरीदेखील स्त्री आणि पुरुष या दोन्ही घटकांना संभोगातून मिळणारे रतीसुख हे सारख्याच प्रमाणात असते, असे वात्स्यायनाचे सांगणे आहे.
आजच्या युगात वात्स्यायनाचा हा विचार अतिशय महत्त्वाचा ठरतो. स्त्री ही उपभोग्य असल्याची चुकीची कल्पना काहींच्या मनात उगाचच रूढ झालेली आहे. त्यामुळे स्त्रीकडे बघण्याचा अशा काही जणांचा दृष्टिकोनही बिघडलेला आहे आणि या स्त्री-पुरुष संबंधातील पुरुष जातीचे वर्चस्वही चर्चेचा विषय बनू पाहात आहे. कामशास्त्रात मात्र वात्स्यायनाने स्त्री-पुरुष संबंधात या दोन्ही घटकांची भूमिका, तसेच त्यांना त्यामधून मिळणारे सुख किंवा आनंद समान असल्याचे सांगितलेले वास्तव आजच्या काळातही विशेष करून लक्षात घेण्यासारखे आहे.
यानंतर वात्स्यायनाने संभोग पद्धतीचे प्रत्यक्ष वर्णन याच अध्यायात पुढे केले आहे. संभोग म्हणजे स्त्री आणि पुरुष यांनी एकत्र येणे. पुरुषाचे लिंग आणि स्त्रीची योनी यांचा प्रत्यक्ष संभोग घडून येणे. या संभोगाच्या दोन अवस्था वात्स्यायनाने सांगितल्या आहेत. (१) प्रथमरत
(२) द्वितीयरत. संभोगाच्या सुरुवातीला स्त्रीला पुरुषाने चुंबन, आलिंगन या क्रियांनी द्रवित करावे व नंतर प्रचंड वेगाने संभोग करावा. हे वर्णन करत असताना कामसूत्रामध्ये कामाग्नीचा उल्लेख आलेला आहे. संभोगाच्या सुरुवातीपासून पुढे हळूहळू स्त्रीमधील कामाग्नी प्रज्वलित होत गेल्यास दोघांनाही संभोगसुख मिळू शकते. या संपूर्ण प्रक्रियेत स्त्रीला उदासीन राहून चालत नाही. संभोग उत्तम पद्धतीने व्हावा, म्हणून स्त्री आणि पुरुष यांनी आधीपासून तयारी केली पाहिजे, असे वात्स्यायन सांगतो. स्त्री आणि पुरुष या दोन्ही घटकांमध्ये चांगली कामोत्तेजना असली पाहिजे. कामकलेत अज्ञान असल्यास प्रथम मिलन अयशस्वी होते, असेही त्या ठिकाणी वात्स्यायन स्पष्टपणे सांगतो. या ठिकाणी प्रत्यक्ष संभोगक्रियेचे वर्णनही पुढे आले आहे. पुरुषाचे लिंग स्त्रीच्या योनीमध्ये प्रवेशित झाल्यावर घर्षण होऊन वीर्यस्खलन होते. संभोगक्रियेचे विविध टप्पेही वात्स्यायन सांगतो. त्यामध्ये स्त्रीने पुरुषाला आकर्षित करावे, येथपासून ते तिने आपले शरीर पुरुषाला समर्पण करण्यापर्यंत प्रत्यक्ष संभोगाच्या टप्प्यांचे वात्स्यायनाने केलेले वर्णन हे खऱ्या अर्थाने नवदाम्पत्यांना मार्गदर्शक ठरावे, असे आहे.
वरील विवेचनात कामाग्नीचा उल्लेख आलेला आहे. स्त्रीचा कामाग्नी प्रज्वलित असणे हे उत्तम संभोगसुखासाठी आवश्यक असते. या ठिकाणी आयुर्वेदशास्त्राचा संदर्भ पाहणे उचित ठरेल, असे वाटते. कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये अग्नी संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे. आयुर्वेदाने अन्न पचवणारा एक जाठराग्नी, तसेच रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि शुक्र या सात शरीरधातूंचे सात अग्नी सांगितलेले आहेत. निरामय कामजीवनासाठी स्त्री आणि पुरुष यांच्यामधील शुक्र धातू बलवान असणे आवश्यक असते. तो बलवान होण्यासाठी आपण घेत असलेल्या आहारामध्ये दूध, साजूक तूप, खजूर, केळी, द्राक्षे, आंबा इ. शुक्र धातूला पोषक असे पदार्थ असणे गरजेचे असते. या पदार्थांचे रूपांतर शुक्र धातूमध्ये करण्याचे कार्य शुक्र धातूचा अग्नी करत असतो. हा अग्नी प्राकृत स्थितीत असला तर हे रूपांतर सुलभ होते. वर उल्लेखलेला कामसूत्रातील कामाग्नी हादेखील शरीरातील शुक्र धातूशी संबंधित असा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
वरील विवेचनात वात्स्यायनाने कामकलेचा उल्लेख संभोगक्रियेच्या संदर्भात केलेला आहे. कामकला नीट अवगत नसली तर प्रथम मिलन हे अयशस्वी होते, असे स्पष्टपणे वात्स्यायन सांगतो. आजच्या काळातही वात्स्यायनाचे हे म्हणणे लक्षात घ्यायला हवे. विशेषत: नवदाम्पत्य होणाऱ्या स्त्री आणि पुरुष या दोघांनीही कामशास्त्राचा म्हणजेच कामकलेचाही डोळसपणे अभ्यास केला पाहिजे. तसा तो केलेला असेल तर विवाहानंतरचे त्यांचे प्रथम मिलन यशस्वी होऊ शकेल. कामकलेत अज्ञानी असलेल्या पती-पत्नींना प्रथम मिलनात अपयश आले तर त्यांची मानसिकता ढासळण्याची शक्यता असते. वैद्यकीय व्यवसायात काही रुग्णांच्या संदर्भात याचा अनुभव आम्हा डॉक्टर मंडळींना येत असतो. अर्थात, हे ज्ञान मिळवून देण्याची सामूहिक जबाबदारी पालक-डॉक्टर तसेच शिक्षकांची आहे, हे विसरून चालणार नाही.
(ayurvijay23@rediffmail.com)