आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रहार आणि सित्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील लेखांकात वात्स्यायनाच्या ‘कामसूत्रा’तील संवेषण विधी या प्रकरणातील सविस्तर विवेचन आपण पाहिले. या प्रकरणानंतर वात्स्यायनाने संभोग क्रियेतील प्रहार आणि सित्कार यांचे वर्णन करणारे प्रकरण या ‘कामसूत्रा’त लिहिले आहे. त्या प्रकरणाला त्याने ‘प्रहरण-सित्कार’ असे नाव दिले आहे. यामध्ये पुरुषाने संभोग समयी स्त्रीवर करावयाच्या (प्रेमळ)प्रहाराच्या विधीचे, आणि स्त्रीने त्या प्रहाराला प्रतिक्रिया म्हणून करावयाच्या सित्कार विधीचे वर्णन आहे.

संभोगासनांच्या संदर्भात वात्स्यायनाने एक महत्त्वाचा मुद्दा ‘कामसूत्रा’त सांगितला आहे. तो म्हणजे, सर्व प्रकारची संभोगासने सर्व स्त्रियांनी करू नयेत. या ठिकाणी त्याने या आसनांचा उपयोग त्या त्या प्रदेशातील परंपरेनुसार करावा, असेही सांगून ठेवले आहे. प्रहार आणि सित्कार यांचे वर्णन असलेल्या प्रकरणात सुरुवातीलाच वात्स्यायनाने काम या संकल्पनेवर मजेशीर अशी टिप्पणी केलेली आहे. काम हे स्वभावाने विवादास्पद आणि कुटिल आहे, असे वात्स्यायन या ठिकाणी सांगतो. हे त्याने असे का म्हटले, याचे स्पष्टीकरण मात्र त्याने या ठिकाणी दिलेले दिसत नाही. परंतु ‘काम’ या पुरुषार्थाबद्दल अनेक आचार्यांची अनेक मते असल्याने ते विवादास्पद आहे, असे त्याने म्हटले असावे. याची प्रचिती आपल्याला ‘कामसूत्रा’मध्ये विविध ठिकाणी येते. संभोगासनांचे विविध प्रकार सांगताना जलसंभोग हा एक प्रकार काही अन्य आचार्यांनी सांगितल्याचे वात्स्यायनाने म्हटले असून त्याला मात्र असा जलसंभोग मान्य नाही, असे वेगळे मत स्पष्टपणे मांडलेले दिसते. मात्र काम या संदर्भातील टिप्पणीनंतर वात्स्यायनाने संभोगातील पुरुषाने स्त्रीवर करावयाच्या प्रहाराचे चार प्रकार सांगितले आहेत. १. अपहस्तक २. प्रसृतक ३. मुष्टी ४. समतल. या प्रहारांमुळे स्त्रीला काही प्रमाणात जो त्रास होतो, त्यामुळे तिच्या मुखातून त्यावर स्वाभाविक प्रतिक्रिया उमटते, याला वात्स्यायनाने ‘सित्कृत’ असे म्हटले आहे. कारण त्यामध्ये स्त्रीच्या मुखातून ‘सी-सी’ असा आवाज विशेषत्वाने बाहेर पडतो. ही स्त्रीची प्रतिक्रिया आठ प्रकारची असते, असे ‘कामसूत्र’कार सांगतो. १. हिंकार २. स्तनित ३. कूजित ४. रुदित इत्यादी. आठ प्रकारे स्त्रीची या प्रहारांवर ओरडण्याची प्रतिक्रिया असते. नायकाने संभोग समयी स्त्रीवर प्रहार केल्यानंतर त्या स्त्री नायिकेने विविध पक्ष्यांच्या आवाजात सित्कृत करावे, असे यापुढे वात्स्यायन सुचवतो. हे पक्षी पुढीलप्रमाणे कबूतर, कोकीळ, हंस, मधुकर, लवा इत्यादी. यानंतर नायिकेला नायकाने आपल्या मांडीवर घेऊन तिच्या पाठीवर मुष्टिप्रहार करावा. त्यावर नायिकेने प्रतिहल्ला करावा. नायकाने स्त्रीच्या दोन्ही स्तनांच्या मध्ये उलट्या हाताने हळुवारपणे प्रहार करावा. त्याचा वेग हळूहळू वाढवावा. नायिकेने यावर कष्टसूचक असे ध्वनी काढावे, अर्थात त्याला कोणताही विशिष्ट क्रम वात्स्यायनाने सुचवलेला नाही. मुष्टिप्रहाराने नायकाचे समाधान झाले नाही, तर स्त्रीच्या डोक्यावर त्याने उलट्या हाताने प्रहार करावा. स्त्रीने यावर प्रतिक्रिया म्हणून जीव्हामुलीय शब्द आपल्या मुखातून काढावेत. या ठिकाणी संभोग समयी प्रहार करताना, स्त्रीच्या शरीराचा योग्य तो विचारही करावा, असे वात्स्यायन सांगतो. स्त्रीला या प्रहाराने इजा होणार नाही, याची काळजी घेण्यास त्याने सांगितले आहे, हे या ठिकाणी विशेषत्वाने नमूद करावे लागेल.

संभोग सुरू असताना बांबूची गाठ फुटण्यासारखा जो ध्वनी निर्माण होतो, त्याला दुत्कृत असे म्हणतात. पुरुषाने संभोग प्रसंगी उन्मत्त होऊन स्त्रीला इजा होईल अशी क्रिया किवा प्रहार करू नये, असे कामसूत्रकाराने सांगितले असले तरी एखाद्या कामांध पुरुषाने पीडायुक्त प्रहार अशा वेळी केल्यास स्त्रीने त्यास प्रतिक्रिया द्यावी, असेही वात्स्यायन पुढे सांगतो. संभोग संपल्यानंतर मुखातून निघणाऱ्या ध्वनीला ‘रुदन’ म्हणतात. यानंतर या प्रकरणात वात्स्यायनाने स्त्री आणि पुरुष यांच्या स्वाभाविक गुणांचे वर्णन केले आहे. कठोरता तसेच साहस असे गुण पुरुषामध्ये असून कोमलपणा, असमर्थता असे स्वाभाविक गुण स्त्रीमध्ये आढळतात. त्यामुळे संभोग समयी रममाण होताना पुरुष हा कठोर असल्यामुळे स्त्रीवर प्रहार करतो, तर स्त्री आपल्या कोमल स्वभावामुळे ते प्रहार सहन करीत ‘सी सी’ असा आवाज करते. काही वेळा याच्या विरुद्धही घडू शकते, असेही ‘कामसूत्र’कार पुढे नमूद करतो. दक्षिण भारतात प्रहाराचे काही प्रकार प्रचलित आहेत- उदा. १. किला २. कर्तरी ३. विद्वा इत्यादी. परंतु वात्स्यायनाच्या मते, मात्र ते फारसे योग्य नाहीत. कारण यामध्ये संभोग समयी स्त्रीला इजा पोहोचू शकते. हे सांगताना वात्स्यायनाने या संदर्भात घडलेल्या काही प्रत्यक्ष घटनांचा मागोवा या ठिकाणी घेतला आहे. चोलराज या राजाने चित्रसेना या वेश्येच्या छातीवर प्रहार केल्यावर ती मृत्युमुखी पडली. तर कुंतल देशाच्या राजाने महादेवी मलयुवतीवर प्रहार केला आणि ती मरण पावली. पुरुषाने प्रहार करताना स्त्रीच्या एकूणच शरीराची योग्य ती काळजी घ्यावी, असेच ‘कामसूत्र’कराला येथे सुचवायचे आहे. या ठिकाणी चित्रसेना या वेश्येचा उल्लेख आला आहे, त्या अर्थी त्या वेळीही देहविक्रय करणाऱ्या स्त्रिया होत्या आणि काही राजे त्यांच्याकडे जात होते, हे स्पष्ट होते. या प्रकरणाच्या शेवटी, वात्स्यायनाने संभोग क्रियेच्या वेळी सांगितलेल्या सर्व क्रिया सर्व स्त्रियांना चालतात, असे नाही, असेही स्पष्ट केले आहे. या बाबतीत त्या त्या देशाची परंपरा पाळावी, असे ‘कामसूत्र’कार सांगतो.
(ayurvijay23@rediffmail.com)