आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaidya Vijay Kulkarni Article About Sex And Kamsutra

सुखी संसारासाठी...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जो पती पत्नीचे मनोविज्ञान न समजता तिची उपेक्षा करतो, तो तिच्या तिरस्कारास प्राप्त होतो. पतीने पत्नीला आश्वस्त आणि विश्वस्त करावे आणि मगच संभोग करावा. अन्यथा ती भय आणि क्रोध यांनी युक्त होऊन विद्रोहिनी बनण्याची शक्यता असते.
मागील लेखांकात पती आणि पत्नी यांचे विवाहानंतरचे वर्तन कसे असावे, याबद्दल कामसूत्रकाराने केलेले काही मार्गदर्शन आपण पाहिले. त्याच कन्याविस्त्रभम प्रकरणात याबद्दल आणखी थोडे दिग्दर्शन पुढे मिळते. नवविवाहिता ही पहिले काही दिवस परिचय होईपर्यंत पूर्णपणे मोकळी होत नाही. तिच्या पतीने तिला सुसंवादाने मनवण्याचा प्रयत्न करण्यास वात्स्यायन सांगतो. तसेच ती क्रुद्ध होणार नाही असेही वर्तन पतीने ठेवावे, असे तो सांगतो. पती आणि पत्नी यातील संवाद चांगला निर्माण व्हावा, म्हणून वात्स्यायनाने त्यांच्यातील माध्यम म्हणून पत्नीच्या सखीचा उपयोग करण्यासही सुचवले आहे, हे या ठिकाणी विशेषत्वाने नमूद केले पाहिजे.

अनेक प्रेमचित्रपटांमध्ये नायक-नायिकांच्या संवादाचे माध्यम म्हणून आजही सखीची भूमिका कथानकामध्ये महत्त्वाची ठरते, हे आपण बघतो. या ठिकाणीही पती आणि पत्नींच्या प्रारंभिक चर्चेसाठी कामसूत्रकार सखीची भूमिका मोलाची समजतो. यानंतर या प्रकरणात पुढे संभोगाचे विस्ताराने वर्णन केले गेले आहे. त्यामध्ये पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे आलिंगन, चुंबन, नखक्षत, दंतक्षत यांचा उल्लेख कामसूत्रकार या अध्यायात पुन्हा करतो. अर्थात याचे विस्ताराने वर्णन आपण पूर्वी काही लेखांकांमध्ये पाहिलेले असल्याने पुनरुक्तीचा दोष येथे टाळला आहे. पतीने विवाह झाल्यावर पहिल्या काही दिवसांतच चातुर्य दाखवावे आणि पत्नीला वश करावे, असे वात्स्यायन सांगतो. यापुढे या दोघांचाही संसार उत्तम चालावा, म्हणजेच पर्यायाने त्यांच्यामध्ये परस्परांबद्दल प्रेम निर्माण व्हावे, यासाठी आवश्यक असणारे एक महत्त्वाचे सूत्र, जे विशेष करून नवविवाहित पुरुषांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे कामसूत्रकाराने पुढे सांगितले आहे. प्रीती उत्पन्न करणे, पत्नीचा मान राखणे, विश्वास संपादन करणे या तीन गोष्टी ज्या पुरुषाला साध्य होतील, त्या पुरुषाबद्दल त्याच्या पत्नीला प्रेम वाटू लागेल. पती आणि पत्नी यांच्या सुरू होणाऱ्या संसाराचा रथ नीट चालावा, यासाठी वात्स्यायनाने पतीसाठी वरील तीन महत्त्वाची सूत्रे सांगितलेली आहेत. ही सूत्रे अर्थातच त्रिकालाबाधित सत्य आहेत. आजही नव-विवाहितांना आपल्या संसारात उपयुक्त ठरतील अशी ही मार्गदर्शक सूत्रे आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाहीत.
स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांशी विवाहबद्ध होणे म्हणजे केवळ शरीरसंबंध नसून त्यांची मने एकमेकांशी नीट जुळणे आणि परस्परांबद्दल प्रेम, जिव्हाळा, सहानुभूती निर्माण होणे हेसुद्धा अभिप्रेत आहेत. कामसूत्रकाराने त्याच्या कामसूत्रात कामजीवनाबद्दल चर्चा आणि मार्गदर्शन करताना पती आणि पत्नी यांना जीवनात उपयुक्त ठरणाऱ्या अनेक गोष्टींचे विवेचन केले आहे. वात्स्यायनाने पुढे या प्रकरणात असेही सांगून ठेवले आहे, की जो पती पत्नीचे मनोविज्ञान न समजता तिची उपेक्षा करतो, तो तिच्या तिरस्कारास प्राप्त होतो. पतीने पत्नीला आश्वस्त आणि विश्वस्त करावे आणि मगच संभोग करावा. अन्यथा ती भय आणि क्रोध यांनी युक्त होऊन विद्रोहिनी बनण्याची शक्यता असते. येथेसुद्धा वात्स्यायनाने पत्नीच्या मनाचा विचार प्राधान्याने केलेला दिसतो. या प्रकरणानंतर या अधिकारणातील पुढील प्रकरण बालोपक्रमणम् या नावाचे आहे. पूर्वी विवाहाचे दैव आदी चार प्रकार कामसूत्रात सांगितले आहेत.
त्याखेरीज गांधर्व, राक्षस, पिशाच्च इ. अन्य काही विवाह प्रकार या अध्यायात सांगितले आहेत. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची गोष्ट वात्स्यायन सांगतो ती म्हणजे, बालपणापासून एखाद्या कन्येशी मैत्री करून पुढे तिच्याशी विवाह करण्यासही हरकत नाही, कारण ती अनेक वर्षांपासून माहिती असते. परिचयही घनिष्ट झालेला असतो. त्यामुळे त्यांचा संसार अधिक सुखी होण्याची शक्यता असते, असे कामसूत्रकाराला वाटत असावे. यापुढे वात्स्यायनाने गरीब आणि अनाथ मुलाने आपल्या श्रीमंत असलेल्या मामाकडे राहून त्याच्या मुलीशी विवाह करावा, अशी एक विशेष गोष्ट सुचविली आहे. आजच्या काळातही अनेक जण आपल्या मामाच्या मुलीशी विवाह करताना आढळतात. ही प्रथा वात्स्यायनाच्या काळातही होती, असे वरील वर्णनावरून आपल्याला दिसते. अर्थात, वात्स्यायनाने गरीब आणि अनाथ अशा मुलांना या प्रकारचा सल्ला दिलेला दिसतो. हल्ली मात्र तो सल्ला जसाच्या तसा पाळला जात नाही, ही गोष्ट वेगळी.
गरीब आणि अनाथ मुलाला मामाची मुलगी न मिळाल्यास त्याने अन्य बिरादरीच्या मुलीशी गांधर्व विवाह करावा. लहानपणापासून कन्येला अनुरक्त करण्यासाठी तिच्याबरोबर विविध प्रकारचे देशी खेळ खेळावे, असे कामसूत्रकाराने यापुढे सांगितले आहे. उदा. फुलांच्या माळा करणे, वयानुरूप विविध खेळ खेळणे, भातुकली, बाहुल्यांचे खेळ इ. विविध देशी खेळांचे वर्णन या प्रकरणात आहे. या वर्णनाप्रमाणेच नायिका जर वयाने लहान असेल तर तिला विविध प्रकारची खेळणी आणून द्यावीत, असेही कामसूत्रकार सुचवितो. या ठिकाणी बालविवाहाचे वर्णन आले आहे की काय, अशी शंका वाचकांच्या मनात उपस्थित होणे शक्य आहे. परंतु पूर्वी कामसूत्रकाराने विद्यार्जन, अर्थार्जन या गोष्टींचा उल्लेख कामजीवन सुरू करण्यापूर्वी कामसूत्रात केलेला आहे. त्यामुळे बालविवाहास कामसूत्रकाराची मान्यता किंवा समर्थन असावे, हे विधान करणे धाडसाचे ठरेल.
अशा प्रकारे वात्स्यायनाने कामसूत्रातील या प्रकरणात विवाहापूर्वीचे जीवन तसेच विवाहानंतरचे वर्तन, विवाहाचे अन्य प्रकार आणि सुखी संसार होण्यासाठी पतीसाठी काही मार्गदर्शन असे सर्व वर्णन आपण आतापर्यंत पाहिले. त्यातील बरेचसे आजही मार्गदर्शक ठरावे असे आहे.
ayurvijay23@rediffmail.com