आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaidya Vijay Kulkarni Article About Sex, Rasik, Divya Marathi

समागमातील रागांचे प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अन्य शास्त्रे माहीत नसूनही कामशास्त्राचे ज्ञान असणारा नायक हा स्त्रियांकडून सन्मानित होतो. धर्म, अर्थ आणि काम या त्रि-वर्णाचे ज्ञाता या चौसष्ट कलांना स्त्रीच्या रक्षणाचे उपाय म्हणून समजतात. गणिका तर त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून पूजतात. दुष्ट लोकही त्यांचा आदर करतात. या अशा चौसष्ट कला प्रत्येक गृहस्थाने आत्मसात केल्या पाहिजेत.
मागील लेखांकात वात्स्यायनाने संभोगानंतर पती-पत्नीने कोणत्या क्रिया कराव्यात, याचे केलेले वर्णन आपण पाहिले. त्यामध्ये तांबुल-सेवन, चंदनाचा लेप, आकाशातील तारकांचे दर्शन आणि एकमेकांमध्ये प्रेमळ संवाद अशा काही गोष्टींचा समावेश कामसूत्रातील रतारंभावसानिक या प्रकरणात कामसूत्रकाराने केलेला आहे. त्यानंतर संभोगादरम्यानचे काही राग प्रकार कामसूत्रकार वर्णन करतो. रागांचे प्रकार वर्णन करण्याआधी रतीक्रीडेतील राग कशामुळे वाढतो, हे वात्स्यायन सांगतो. राग आणि अनुराग यांची चर्चा करताना पुन्हा आलिंगन, चुंबन यांचा अवलंब केल्यास प्रसन्नता आणि राग वाढतो. पहिल्यांदा एकमेकांकडे पाहिल्यावर मनोभावना कशी होती आणि पहिल्यांदा वियोग झाल्यावर किती दु:ख होते, याची चर्चा केल्याने रती राग वाढतो, असेही कामसूत्रकार पुढे सांगतो. येथे राग याचा अर्थ रतीक्रीडेतील रंगत, असा घ्यावा लागेल. आपल्याला मन:स्ताप झाल्यावर येणारा राग किंवा शास्त्रीय संगीतातील राग येथे अपेक्षित नाही.
या रतीक्रीडेतील रागांचे काही प्रकार वात्स्यायनाने सांगितलेले आहेत. १. रागवत २. आहार्य राग ३. कृत्रिम राग ४. व्यवहित राग ५. पोटारत राग ६. खलरत ७. अयन्त्रीतरम् ८. मध्यम राग हे विविध प्रकारचे चांगले आणि वाईट असे रतीविशेष आहेत. यातील रागवत हा राग प्रकार म्हणजे शरीर आणि मनाने एकत्र येणाऱ्या दोन जिवांचे एकमेकांकडे कटाक्ष टाकून डोळ्याला डोळा भिडून प्रेम उत्पन्न होणे आणि त्या स्नेहपूर्ण स्थितीमध्ये त्यांचा समागम होऊन त्या विशिष्ट रागाची निर्मिती होणे, असा अर्थ कामसूत्रकाराने सांगितला आहे. मध्यम राग म्हणजे, दोघांनी एकमेकांकडे बघितल्याने परस्पर कामासक्ती निर्माण न होता केवळ परस्पर आवड निर्माण होणे; तर कृत्रिम राग म्हणजे, कोणत्याही प्रकारचा स्नेह नसताना केवळ दोन जिवांचा एकमेकांशी समागम होणे. अशा प्रकारे वात्स्यायनाने विविध राग प्रकारांचे विवेचन या प्रकरणात केलेले आहेत. यामध्ये चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकार सांगितल्याचे कामसूत्रकार येथे नमूद करतो. त्यातील चांगले प्रकार स्वीकारावे आणि वाईट प्रकार अवलंबू नयेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. कामशास्त्रामध्ये समाजातील कामजीवनातील वेगवेगळ्या परंपरा, चालीरीती यांचा सर्व अंगांनी कामसूत्रकाराने उल्लेख केलेला आहे. परंतु ते सर्वच्या सर्व जसेच्या तसे स्वीकारावे, अशी मात्र त्याने अपेक्षा ठेवलेली दिसत नाही. ही गोष्ट येथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवी. याच प्रकरणात राग वेशेषनानंतर वात्स्यायनाने या दोन जिवांच्या काही कारणाने होणाऱ्या कलहाचा उल्लेख केलेला आहे. या कलहाचे वाणी कलह, कर्म कलह, प्रहनन असे विविध प्रकार त्याने वर्णन केले आहेत. अशा प्रकारे कलह निर्माण होण्यामागे दुसरी स्त्री असते, असे कामसूत्रात म्हटले आहे. याचा स्पष्ट अर्थ असाही होतो की, या दोन जिवांमध्ये म्हणजेच पती-पत्नीमध्ये कलह निर्माण होऊ नये, म्हणून पतीने एकपत्नीव्रताचा अवलंब करणे त्या वेळीही कामसूत्रकाराला अपेक्षित असावे. परंतु अशा कारणाने पती-पत्नीमध्ये कलह निर्माण झाला तर पत्नी रागावते. तिचा तो राग (संताप) शांत करण्याचा पतीने प्रयत्न करावा. त्यासाठी आवश्यकता भासल्यास साहाय्यकाची मदत घ्यावी, असे वात्स्यायन सुचवतो. या ठिकाणी साहाय्यकाचे पीठमर्द, वीट आणि विदूषक असे प्रकार सांगितले आहेत. त्यांच्या समजावण्याने क्रोधी स्त्रीने आपला क्रोध विसरून आपल्या पतीकडे पुन्हा जावे, असेही कामसूत्र सांगते.
यानंतर समागम करणाऱ्या स्त्री-पुरुषांपैकी पुरुष म्हणजेच नायक हा चौसष्ट कलांनी युक्त असावा, असे कामसूत्रात पुढे सांगितले आहे. सदर नायक हा अन्य शास्त्रांमध्ये कितीही निपुण किंवा विद्वान असला तरी जर त्याला पूर्वी सांगितलेल्या चौसष्ट कला अवगत नसतील तर तो नायक बनण्यास पात्र नाही, असे वात्स्यायन सांगतो. या चौसष्ट कलांनी युक्त असणारा पुरुषच स्त्रीला आवडतो, असेही वात्स्यायन पुढे म्हणतो. अन्य शास्त्रे माहीत नसूनही कामशास्त्राचे ज्ञान असणारा नायक हा स्त्रियांकडून सन्मानित होतो. धर्म, अर्थ आणि काम या त्रि-वर्णाचे ज्ञाता या चौसष्ट कलांना स्त्रीच्या रक्षणाचे उपाय म्हणून समजतात. गणिका तर त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून पूजतात. दुष्ट लोकही त्यांचा आदर करतात. या अभिनंदनीय अशा चौसष्ट कला प्रत्येक गृहस्थाने आत्मसात केल्या पाहिजेत. कारण या चौसष्ट कला सुभगा आहेत, सिद्धा आहेत, सुभगन करणी आहेत, असे आचार्यांनी शास्त्रामध्ये सांगितले आहे. अशा चौसष्ट कलांनी युक्त नायकाला सर्व प्रकारच्या स्त्रिया सन्मानाने बघतात. कामसूत्रकाराने या चौसष्ट कलांचे विस्ताराने वर्णन पूर्वी केलेले आपण मागे पाहिले आहे. या ठिकाणी त्याने पुन्हा एकदा त्यांचे स्मरण करून दिल्याचे आपल्याला जाणवते. स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये स्नेह निर्माण होण्यासाठी या चौसष्ट कलांचा उपयोग होतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अशा प्रकारे या अध्यायात कामसूत्रकाराने रती-क्रीडेसंबंधी राग प्रकारांसह विवेचन केलेले आपल्याला आढळते. या रती क्रीडेमध्ये स्पर्श, गंध, श्रवण, दृष्टी इत्यादीचा संबंध असतो, हे अर्थातच सर्वांना विदित आहे. स्त्री-पुरुषांच्या समागमामध्ये स्पर्शाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. स्पर्श हा मानवाप्रमाणेच अन्य प्राण्यांमध्येही कामजीवनात महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे गंध, श्रवण, दृष्टी यांचेही यामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कामोत्तेजना निर्माण होण्यासाठी या सर्वांचा उपयोग होतो, हे वेगळे सांगायला नको.
ayurvijay23@rediffmail.com
पुढील स्‍लाइडवर पाहा, संबंधित फोटो..