आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

का अभ्‍यासावा वात्स्यायन?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या युगातही विवाहितांनी आणि विवाह करू पाहणाऱ्यांनीही वात्स्यायनाच्या कामसूत्राचा नीट अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. कारण वात्स्यायनाने आपल्या ‘कामसूत्रा’त निरामय कामजीवनाप्रमाणेच संसारातील अन्य गोष्टींचाही सल्ला देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

मा गील लेखात आपण कामसूत्रातील विवाहयोग समजून घेतला. यामध्ये पती आणि पत्नी यांनी परस्परांची निवड करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत, तसेच पत्नीने आपल्या घरात कोणत्या गोष्टी नियोजनबद्ध रीतीने कराव्यात, याचे विवेचन आपण पाहिले. यानंतर सदर प्रकरणात पती आणि पत्नी यांचा संसार सुखाचा होण्यासाठी अतिशय उपयुक्त असे मार्गदर्शन वात्स्यायन करतो.

पत्नीचे कर्तव्य स्पष्ट करताना, पत्नीने आपल्या पतीला आवडेल असे भोजन बनवण्याचा सल्ला इथे कामसूत्रकार देतो. पत्नीने बाहेरून घरात येणाऱ्या पतीचे स्वागत करावे. पती जर पैशाची उधळपट्टी करीत असेल, तर त्याला पत्नीने एकांतात समजून सांगावे. येथे संसारात अपेक्षित असणारे नियोजनच जणू काही वात्स्यायन सांगतो. आपले स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे. येथेही वात्स्यायनाची आरोग्याबद्दलची दृष्टी दिसते. कारण स्वयंपाकघर स्वच्छ असेल, तर तिथे बनवला जाणारा आहार स्वच्छ बनतो. त्यामुळे आपले आरोग्यही चांगले राहू शकते. यापुढे पत्नीला काही चुकीच्या सवयी टाळण्यास कामसूत्रकार सांगतो. उदा. डोळे मोठे करून पाहणे, वाईट बोलणे, दारात उभे राहणे, इत्यादी.

यानंतर पत्नीने आपल्या त्वचेची आणि मुखाची स्वच्छता बाळगण्याचा सल्लाही तो देतो. पत्नीने आपल्या घामाचा वास किंवा तोंडाची दुर्गंधी येणार नाही, याची दक्षता घावी. तिला आपल्या पतीच्या जवळ जाण्याची इच्छा झाल्यास आपल्या त्वचेला तिने सुगंधी लेप लावावे आणि अंगावर अलंकार धारण करावे. (हल्लीच्या काळात आधुनिक पद्धतीने बनवलेले विविध प्रकारचे कृत्रिम सेंट पती/पत्नी विशेषतः शहरी भागात वापरताना दिसतात. पण हे कृत्रिम सेंट सतत वापरणे मानवी आरोग्याला धोक्याचे आहे. त्याऐवजी नैसर्गिक अत्तरे किंवा कामसूत्रकाराने सांगितलेले सुगंधी लेप वापरणे पती आणि पत्नी या दोघांसाठी आरोग्यदायी आणि आनंददायी ठरते.) पत्नीने आपल्या पतीप्रमाणे व्रत आणि नियम पाळावे. आपल्या उपयोगी असणाऱ्या स्वस्त वस्तू गरजेअनुसार खरेदी करून ठेवाव्या. त्याचप्रमाणे घरामध्ये मीठ, तेल, तूप, तिखट, सुगंधी द्रव्य व विविध औषधी यांचा संग्रह करावा. विविध भाज्यांचे बी आपल्या अंगणात लावावे. आपल्या संसारासाठी पुढील वर्षात येणाऱ्या खर्चाचे अंदाज पत्रकदेखील पत्नीने तयार करावे. तसेच रोजचा जमाखर्चही लिहावा, त्याचबरोबर पत्नीने दुधाचे तूप, मोहरीचे तेल, तसेच विविध प्रकारचे प्राणी पाळणे, या संसाराला पूरक असलेल्या गोष्टी आत्मसात कराव्या.

पत्नीने पतीच्या मित्राचा यथोचित सत्कार करावा. याचा अर्थ, पतीकडे आलेल्या मित्रपरिवाराला ‘अतिथिदेवो भव’ या न्यायाप्रमाणे चांगले खाऊ-पिऊ घालावे. घरातील स्त्रीने आपल्या सासू-सासऱ्यांचा योग्य तो मान राखावा, असाही सल्ला कामसूत्रकार देतो. पत्नीने आपल्या घरातील सेवकांशी चांगली वागणूक ठेवावी. घरातील कोणतीही वस्तू बाहेर देण्यापूर्वी तिने आपल्या पतीची परवानगी घ्यावी.

यानंतर पती प्रवासाला गेल्यावर पत्नीने घर कसे सांभाळावे, याचेही मोलाचे मार्गदर्शन वात्स्यायन पुढे करतो. पत्नीने अशा वेळी आपले सौभाग्य अलंकार सोडून अन्य दागिने बाजूला काढून ठेवावे. सासू-सासऱ्यांकडे तिने विशेष लक्ष द्यावे. घरखर्च जपून करावा. पतीने प्रवासाला निघण्यापूर्वी सुरू केलेली कामे पूर्ण करावी. प्रवासातून पती घरी परत आल्यावर योग्य ते स्वागत करावे. एकचारिणी पत्नीने कर्तव्य म्हणून आपल्या पतीच्या कल्याणाची कामना करावी आणि सदाचार ठेवावा.

या संपूर्ण विवेचनात वात्स्यायनाने संसारातील अनेक व्यावहारिक गोष्टींचे मार्गदर्शन केलेले आहे. संसार चांगला चालावा यासाठी पती आणि पत्नीने कसे वागावे, याचे उत्तम विवेचन यात आहे. अगदी पत्नीने घरात कोणत्या वस्तू साठवाव्यात, याचेही वर्णन त्यात आहे. घराचे वर्षाचे अंदाजपत्रक, जपून खर्च करणे, काही कला आत्मसात करणे, पाहुण्यांचे स्वागत करणे, अशा आदर्श पत्नीच्या अनेक गुणांचे वर्णनही यात आढळते. त्याचबरोबर पती प्रवासाला गेल्यास पत्नीने घर कसे सांभाळावे याचेही उत्तम मार्गदर्शन वात्स्यायन करतो. यावरून ‘कामसूत्र’काराचे सुखी संसार करण्यासाठी असलेले मार्गदर्शन किती उपयुक्त आहे, हे लक्षात येते.

आजच्या काळातही संसाराची दोन चाके असणाऱ्या पती आणि पत्नी या दोहोंमध्ये योग्य समन्वय राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या युगातही विवाहितांनी आणि विवाह करू पाहणाऱ्यांनीही वात्स्यायनाच्या कामसूत्राचा नीट अभ्यास करणे ही काळाची गरज आहे. कारण वात्स्यायनाने आपल्या ‘कामसूत्रा’त निरामय कामजीवनाप्रमाणेच संसारातील अन्य गोष्टींचाही सल्ला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज अनेक नवविवाहितांना अशा मार्गदर्शक सूत्रांची सुखी संसारासाठी असलेली गरज लक्षात घेता, कामसूत्रातील मार्गदर्शनाचा योग्य तो सदुपयोग त्यांनी करून घ्यावा असे वाटते.
वैद्य विजय कुलकर्णी
ayurvijay23@rediffmail.com