आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नागरकाचे आचरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या लेखांकात नागरकाचे घर कुठे आणि कसे असावे, त्याचे विभाग, शयनगृहाची सजावट आणि दुपारचा भोजन विधी येथपर्यंत वात्स्यायनाने केलेले मार्गदर्शन आपण बघितले. भोजनानंतर दुपारी नागरकाने थोडी झोप घ्यावी, असे कामसूत्रकार सांगतो. येथे आयुर्वेदाने सांगितलेल्या दिनक्रमाशी वात्स्यायनाचा मतभेद दिसतो. कारण, आयुर्वेदशास्त्राने दिवसा झोपणे आरोग्याला हिताचे नाही, असे म्हटले आहे. दिवसा झोपल्याने शरीरात अधिक प्रमाणात स्निग्धगुण निर्माण होतो. यामुळे अंग जड होते, शरीरात अतिरिक्त चरबी साठू लागते. मधुमेह, स्थूलता, पचनाचे विकार या तक्रारी दिवसा झोपल्याने वाढू शकतात. दिवसा झोपल्याने कामशास्त्रात नागरकाला अपेक्षित असणारी ऊर्जा मिळू शकते, असा हेतू यामागे असावा. असो. दुपारच्या झोपेनंतर नागरकाने संध्याकाळी सुमधुर अशा संगीत गोष्टी ऐकाव्या. संगीत श्रवणाने आपले मन प्रसन्न होते, हे आपण सर्व जण जाणतो. नागरकाने मन प्रसन्न ठेवण्यासाठी संगीताचे श्रवण करावे, असे कामसूत्रकाराने त्यामुळेच सुचवले असावे. संगीताचे महत्त्व प्राचीन काळापासून अनेक भारतीय विद्वानांनी सांगितले आहे. वात्स्यायनही याला अपवाद नाही. त्याने तर नागरक वृत्तात संगीताचा उल्लेख केला आहेच; त्याशिवाय ६४ कलांमध्येही संगीताचा समावेश केला आहे.

नागरकाने सायंकाळी संगीत श्रवण केल्यावर आपल्या साहाय्यकांबरोबर अभिसारिकेची प्रतीक्षा करावी. नायिका आणि आपले मित्र यांच्यासोबत वार्तालाप करावा. याचाच अर्थ, नागरकाने सायंकाळचा वेळ हा मनाच्या प्रसन्नतेसाठी ठेवण्यास कामसूत्रकार सांगतो. यानंतर वात्स्यायनाने नागरकाच्या नायिकेबरोबरच्या शृंगाराचा उल्लेख केला आहे. या शृंगारापूर्वी नायिकेची वस्त्रे पाण्याने भिजली असल्यास ती नागरकाने बदलावी, असेही म्हटले आहे. यानंतर नागरकाने विविध गोष्टी कराव्या; त्यामध्ये पदगोष्टी, काव्यगोष्टी, जलगोष्टी, गीतगोष्टी, नृत्यगोष्टी, वाद्यगोष्टी यांचा समावेश आहे. या गोष्टींच्या उल्लेखाकडे पहिले असता त्या प्रामुख्याने कला क्षेत्राशी आणि साहित्य क्षेत्राशी निगडित आहेत, असे लक्षात येते. याबरोबरच जलगोष्टीचाही उल्लेख येथे वात्स्यायन करतो. नागरकाची आणि त्याच्या नायिकेची जलक्रीडा त्याला अपेक्षित दिसते. यानंतर विविध प्रकारचे क्रीडा प्रकार नागरकाने खेळावे, असे त्याने सांगितले आहे. दर १५ दिवसांनी किंवा एक महिन्याने नगरात असलेल्या सरस्वती भवनात नागरकांचे एकत्रीकरण व्हावे. या ठिकाणी अनेक नागरक समूहाने एकत्र यावेत, अशी अपेक्षा वात्स्यायनाने व्यक्त केली आहे. स्थायी नटांनी त्यांची कला नागरकांसमोर दाखवावी. येथे नागरकांनी समूहाने नाट्यकलेचा आस्वाद घ्यावा, असेही वात्स्यायन सांगतो. विविध कलांचा आस्वाद नागरकांनी केवळ आपल्या मनोरंजनासाठी न घेता या कलांमुळे एकूण वातावरण मंगलमय व्हावे आणि सर्व समूहाचे कल्याण व्हावे, अशी वात्स्यायनाची यामागे कल्पना दिसते. यामुळे नागरकाचे एकूण आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकेल.

पुढे नागरकाच्या सुरा आणि मद्य सेवनाबद्दल वात्स्यायन वर्णन करतो. प्रामुख्याने द्राक्षासारख्या फळांपासून बनवलेले औषधी गुणांनी युक्त असे मद्य वात्स्यायनाला येथे अपेक्षित असावे, असे वाटते. त्या काळी आयुर्वेद शास्त्राने विविध आसवं-अरिष्टांचा औषधांमध्ये उपयोग करून घेतलेला आहे. ही आसवं-अरिष्टं मद्य कल्पनेवर आधारित होती. आजही आयुर्वेद चिकित्सेत त्याचा उपयोग वैद्यकीय सल्ल्याने करून घेता येतो. अर्थात, नागरकाने सुरा आणि मद्याचे सेवन फार मोठ्या प्रमाणावर करण्याबद्दल वात्स्यायन कुठेही उल्लेख करताना दिसत नाही. त्यामुळे नागरकाने त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे. अर्थात, ते मद्य किंवा सुरा हे औषधी गुणांनी युक्त असल्यास केव्हाही चांगले. आजच्या काळातही द्राक्षासव, पंचकोलासव, दशमुलारिष्ट, कुमारीआसव अशा अनेक आस्वारिष्टांचा उपयोग विविध विकारांसाठी आम्ही वैद्य मंडळी करतो. यानंतर नागरकाने उद्यानयात्रा करावी. येथेही उद्यानात गेल्याने नागरकाला प्रसन्नता यावी, अशीच अपेक्षा दिसते. पुढे ग्रीष्म ऋतू असल्यास नागरकाने ग्रीष्मातील उकाडा सहन व्हावा यासाठी जलक्रीडा करावी, असे कामसूत्रकार सांगतो. आयुर्वेद शास्त्रानेही व्यक्तीचे आरोग्य चांगले राहण्यासाठी ऋतुचर्या पाळावी, असे सांगितले आहे.

भारतीय कालमानानुसार ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर, आणि वसंत असे वर्षाचे सहा ऋतू होतात. त्यापैकी साधारणपणे एप्रिल आणि मे असे दोन महिने ग्रीष्म ऋतू समजला जातो (सध्या तो सुरू आहे) या काळात वातावरणात प्रचंड उष्णता असते. शरीराला ती सहन व्हावी, यासाठी प्रत्येक व्यक्तीने या काळात थंड पाण्याच्या संपर्कात असावे, असे आयुर्वेदाने सांगितले आहे. यातच जलक्रीडेचाही समावेश होतो. नेमकी अशाच प्रकारची जलक्रीडा वात्स्यायनाने नागरकाकडून ग्रीष्म ऋतूमध्ये अपेक्षित केली आहे.

यानंतर यज्ञरात्री उत्सव, कौमोदीजागरण, सुवसंतउत्सव अशा विविध उत्सवांमध्ये नागरकाने सहभागी व्हावे, असे कामशास्त्रात सांगितले आहे. यज्ञरात्रीचा काळ सध्याच्या दीपावली उत्सवाप्रमाणे तर कौमोदी जागराचा काळ सध्याच्या कोजागिरी पौर्णिमेप्रमाणे दिसतो. सुवसंत उत्सव हा वसंत ऋतूमध्ये साजरा करायचा आहे, हे त्याच्या नावावरूनच समजते. याप्रमाणे नागरकाने विविध कला, विविध उत्सव यांमध्ये सहभागी व्हावे, नगरात राहणार्‍या नागरकांप्रमाणे ग्रामीण भागात राहणार्‍या नागरकानेही अशा प्रकारेच आपली दिनचर्या आणि रात्रीचर्या पाळावी. येथे कामसूत्रातील नागरक वृत्त नावाचा अध्याय समाप्त होतो.

वैद्य विजय कुलकर्णी
ayurvijay23@rediffmail.com
बातम्या आणखी आहेत...