आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍वरांचे शिवधनुष्‍य!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जसं सगळ्यात सोप्या भाषेत लिहिणं ही जगातली सगळ्यात अवघड गोष्ट असते, तसंच सोपं भासणारं गाणं गाणे हीसुद्धा एक अवघड गोष्ट असते. लतादीदींचं गाणं असं वरवर खूप सोपं वाटतं, पण जेव्हा एखादी गायिका ते गाण्याचा प्रयत्न करते, ते शिवधनुष्य पेलण्याइतके अशक्यप्राय असते...  


लता मंगेशकर यांचे गाणे, त्यांचे करिअर, त्यांचे आयुष्य या साऱ्या गोष्टी त्यांच्यानंतरच्या पिढ्यांतील प्रत्येक गायिका अभ्यासत आल्या आहेत. खरंतर लता मंगेशकरांना आदर्श मानूनच अशा शेकडो गायिकांचे करिअर घडले आहे. हे करताना त्यांचे गाणे, त्यांचे आयुष्य यांचा अभ्यास ज्या ज्या गायिकांनी केला, त्यामध्ये मीही एक आहे. दीदींनी जो खडतर प्रवास केला, अफाट मेहनतीने जे यश मिळवले, त्याला खरंच तोड नाही. त्यांनी आपल्या प्रतिभेने आणि दैवी सुरांनी, पार्श्वगायनातील हे सर्वोच्च स्थान प्राप्त केले , ही गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते आहे. 


माझ्या लहानपणी रेडिओवर कार्यक्रम चालायचे, त्यातून लतादीदींचे गाणे प्रथम ऐकायला मिळाले. लताबाई, आशाबाई, महंमद रफी, किशोरकुमार, मन्ना डे आणि अशा अनेक गायक-गायिकांंची गाणी त्यावेळी माझ्या कानावर पडायची. पण, स्त्री गायिका म्हणून गाणे सादर करणाऱ्या त्या सर्वोत्कृष्ट गायिका असल्यामुळे मला लतादीदींबद्दलच अधिक आकर्षण वाटायचे. त्यांची गाणी ऐकताना खूप सहज वाटायची, पण गाताना ती अवघड व क्लिष्टही असायची. दीदींच्या गाण्यांची चाल इतकी सोपी वाटते, पण ते गाताना ती चाल आपण त्याच प्रमाणात का  गाऊ शकत नाही, असे मला कायम वाटायचे. पण नंतर मला उमगले, लता मंगेशकर हे एक अभ्यासक्षेत्र आहे. हे अभ्यासक्षेत्र एखाद्या पीएच. डी.चा स्वतंत्र विषय होऊ शकते इतके व्यापक आणि खोल आहे. माझ्यापुरते बोलायचे, तर मी जेव्हा अभ्यास या दृष्टीने त्यांचे गाणे ऐकत गेले, तेव्हा त्यातून बऱ्याच गोष्टी शिकले. माइकवर गाणे, लाइव्ह गाणे, स्टेजवर गाणे, रेकॉर्डिंगच्या स्टुडिओतले सर्व टेक्निक सांभाळून गाणे, या विविध प्रकारांमधील लतादीदी किती वेगळ्या आहेत, या गोष्टी अभ्यासातून मला थोड्याफार कळायला लागल्या. ही माझी प्रक्रिया अजूनही सुरू आहे. 


लतादीदींनी गायलेल्या मराठी गाण्यांपैकी माझे अत्यंत आवडते मराठी गाणे म्हणजे ‘मालवून टाक दीप चेतवून अंग अंग’ आणि लतादीदींच्या हिंदी गाण्यांपैकी माझे सर्वात आवडते गाणे म्हणजे ‘लग जा गले’. आता हे कबूल करायला हरकत नाही. लतादीदींची जी अतिशय कठीण गाणी आहेत, ती गायला अजूनही मी घाबरते. ‘लग जा गले’ हे गाणे जो कोणी ऐकतो, तो सहज मंत्रमुग्ध होतो. मी हे गाणे यापूर्वी किमान एक हजार वेळा तरी विविध प्रसंगी गायले असेन. पण इतक्या वेळा गाऊनही मला त्या गाण्याची भीती वाटते. अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर लता मंगेशकरांची गाणी गाणे, हे शिवधनुष्य पेलण्यासारखे अवघड आहे. आणखी एक उपमा देते की, लतादीदींची गाणी म्हणजे, हिऱ्याची मोठी खाण आहे. त्यातून  तुम्हाला पाहिजे, तो हिरा निवडा, असे जर कोणाला सांगितले, तर तशी निवड करणे खरंच अशक्य आहे.  लतादीदींच्या गाण्यातील हरकती, आलाप, ताल, सूर अशा साऱ्याच गोष्टी अफाट ताकदीच्या आहेत. त्यांच्यासारखे गाणे हे सहजशक्य नाही. त्या ज्या पद्धतीने गाणे गातात, ते गणित मला असे वाटते, आजतागायत कोणालाही जमलेले नाही. कॉपी सगळे करतात, पण लतादीदींसारखे गाता येणे, खरंच खूप अवघड आहे. ‘ज्ञानेश्वर माउली’ हा दीदींचा एक अल्बम आहे किंवा ‘अभंग तुक्याचे’ असा एक अल्बम आहेत. हे दोन अल्बम जरी ऐकले तरी लक्षात येते, की लताबाईंना स्वरसम्राज्ञी का म्हणतात ते! मी माझे गुरुजी सुरेश वाडकरांकडे जेव्हापासून गाणे शिकायला जाऊ लागले, तेव्हापासून ते मला लतादीदींच्या गाण्यांची अनेक वैशिष्ट्ये सांगत आले आहेत. ते म्हणतात, संगीत वादक व गायक यांचा जो अजोड मेळ लतादीदी गाणे गात असताना दिसतो हे आणि हे फक्त एकच देवी करू शकते, त्या म्हणजे लतादीदी! 


लतादीदींना अनेक जण माँ असेही म्हणतात.  अशा प्रसंगी मला वाटते, लता मंगेशकरांकडून आजच्या गायिकांनी काय घ्यावे तर तो, त्यांचा विनम्रपणा आणि त्यांचे गाणे जगणे. एखादे गाणे म्हणणे आणि गाणे बोलणे, हे दोन्ही वेगळे आहे. दीदी गाणे गाण्यापेक्षा, गाणे बोलतात, म्हणजे, त्या गाण्यातील शब्दांच्या भावना इतक्या जिवंत करतात की, गाण्यात वर्णन केलेला अनुभव ते ऐकणाऱ्याच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहातो. लतादीदी गाणे बोलतात, ते याअर्थी. त्यांचे गाणे बोलण्याची ही शैली खूप छान आहे. एखादे दुसऱ्या भाषेतले गाणे, जेव्हा आपल्याला गायला संधी मिळते, तेव्हा ते असे गावे की त्या भाषेतल्या ऐकणाऱ्या लोकांना ते गाणे त्यांचे वाटावे. दीदींचे उर्दूूचे उच्चार अतिशय चपखल आहेत. इतर भाषांत गाताना त्या भाषेत, त्या शब्दांचा जसा उच्चार होतो, तशाच पद्धतीने तो उच्चार करण्यासाठी दीदींनी अफाट अभ्यास केला आहे. सगळ्याच गायिका गातात, पण उच्चारांमध्ये जर का थोडीशी जरी कमतरता असली, तर कसे वाटते माहिती आहे? एखादी नवरी खूप छान नटून बसली आहे. तिचा साजशंृगार  झाल्यावर सर्वात शेवटी तिच्या कपाळावर बिंदी लावली गेली, की तिचा तो मेकअप किंवा साज पूर्ण होतो. तसेच गाण्यातील उच्चारांचेही आहे. उच्चार व त्या शब्दांतील भावना जर त्या भाषेच्या वळणानुसारच तशाच्या तशा गायिकेच्या गळ्यातून उतरल्या, तर त्या गाण्याला पूर्णत्व येते. दीदी कोणत्याही भाषेतले गाणे गायल्या, तरी त्या भाषेचे जे वळण आहे, त्यानुसार होणाऱ्या उच्चारणाला सर्वोच्च महत्व देतात. अशा या श्रेष्ठ गायिकेला भेटण्याची संधी दोन वेळा आली होती, पण काही कारणाने ती हुकली. तरी मी त्यांची निस्सीम अनुयायी राहणारच आहे. लता मंगेशकर यांचा आदर्श ठेवून आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू शकतो का? त्याचे उत्तर माझ्या मनाने ‘हो’ असे दिले. आता, लतादीदींना मानाचा मुजरा करणारा, त्यांच्याच गाण्यांचा एक कार्यक्रम मी करावा, असे मनात आहे. अजून तो योग काही कारणाने आलेला नाही. पण भविष्यात मी असा कार्यक्रम नक्कीच करणार आहे, कारण माझ्या आदर्शाचे मला अशा रीतीने ऋण फेडायचे आहे...


- वैशाली भैसणे-माडे 

बातम्या आणखी आहेत...