आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाफा धुंद रानभरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावलांच्या सावल्या
अवेळीच लुप्त व्हायला लागल्या
की समजावं, हा अग्निदिव्याचा क्षण
आपलं प्रत्येक पाऊल समिधा
आणि समोरचा रस्ता
धगधगता होम...
काळाची पावलं ओळखून त्यावर भाष्य करणार्‍या वैशाली नायकवडे नुकत्याच शिक्षिका म्हणून निवृत्त झाल्या आहेत. मराठी, हिंदी, संस्कृत या भाषांवरील प्रभुत्वामुळे त्यांनी जशी मराठीतून वाङ्मयनिर्मिती केली, तशीच ‘मेघदूत’चा संस्कृत, मराठीतून गद्य, पद्य अनुवादही केला. ‘मातीचे वारसदार’ या ग्रामीण कथासंग्रहासोबतच संवाद, सलतं चंद्रबन, तूच अजुनी घरात रोवून आदी त्यांचे कवितासंग्रहदेखील प्रकाशित झाले आहेत.
परंपरागत श्रद्धेपोटी
ती तिच्या नसलेल्या ‘त्याच्यासाठी’
घालत राहिली तुळशीला पाणी
तुळस बहरताना आता मातीलाही अपराधी वाटतं
तिच्या उमलत्या मंजिर्‍यांचं
पोरकेपण स्वीकारणार कोण?
‘स्व’च्या आत्मभानामुळे रूढिप्रिय समाजव्यवस्थेला हादरे देण्याचं काम स्त्रियांच्या साहित्याने प्रभावीरीत्या सातत्याने केले आहे. पूर्वी कुटुंबाच्या व सासर-माहेरच्या भावनिक गुंत्यात रमलेल्या स्त्रिया आज घर-संसार सांभाळून नोकरीच्या, व्यवसायाच्या जबाबदार्‍या सक्षमपणे सांभाळताना स्वत:ची वेगळी मुद्रा निर्माण करत आहेत. पण हे करताना नव्या प्रश्नांना, समस्यांना सामोरे जाताना त्यांची दमछाक होते आहे. आपल्या संस्कृतीने स्त्रियांच्या प्रत्येक नातेसंबंधाचे (आई, आजी, बायको, बहीण, प्रेयसी इ.) उदात्तीकरण केल्यामुळे प्रत्येक वेळी त्यागाची अपेक्षा स्त्रीकडूनच केली जाते. या सर्व अपेक्षांची पूर्तता करता करता तिची होणारी शारीरिक, मानसिक, भावनिक कोंडी 1980 नंतरच्या स्त्रियांच्या कवितेतून वेळोवेळी व्यक्त झाली आहे. व्यक्त होताना एक प्रकारे धीटही झाली आहे. असा आशय धीटपणे मांडणार्‍या कविता वैशाली नायकवडे लिहीत आल्या आहेत. उमलत्या मंजिर्‍यांच्या पोरकेपणाबद्दल युगायुगांपासून अनेक जणींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. (राधा, मीरा, सीता, द्रौपदी, कुंती) पण त्यांचे उत्तर देणे आजपर्यंत कुणालाही जमले नाही. प्रीतीचे आरंभीचे आवेग ओसरल्यानंतर काही अटळ पराभव स्वीकारावे लागतात. त्या मानसिक पडझडीच्या वेळी ‘तो’ कधीच आपला नसतो, याची होणारी जाणीव खूप पीडादायी असते. स्त्री-पुरुष संबंधातील हा तणावपूर्ण काळ जीवघेण्या यातनांचा असतो, तरी पण जीव लावणं आणि नंतर जळत राहणं हे अखंडपणे चालूच राहतं. हेच आपलं प्राक्तन असं समजून मिटल्या ओठांनी सगळं सहन करत अनेक स्त्रिया जगत आहेत. याचं प्रत्ययकारी चित्रण वैशाली नायकवडे यांनी केलं आहे.
ओठांवर बोट ठेवून, असलेला भूतकाळ
अचानक ‘मी’ला, उभं करतो
आरोपीच्या पिंजर्‍यात
आणि घ्यायला लावतो ‘शपथ’
‘मर्मा’वर बोट ठेवून...
असं आरोपीच्या पिंजर्‍यात उभं राहून रिक्त मनानं आयुष्यातील पोकळीकडे भरल्या डोळ्यांनी ‘ती’ जेव्हा पाहते, तेव्हा सगळंच हातातून निसटल्याची जीवघेणी कळ तिच्या काळजात उठल्याशिवाय राहत नाही. असं मोजक्या शब्दांत वर्मावर बोट ठेवण्याचं काम कविता करते...
स्त्रिया मुळातच कणखर असतात, पण मातृत्वाच्या सृजनतेमुळे त्या प्रेमळ, हळव्या बनतात आणि इथंच सगळी गोची होते. एकदा का हळवं झालं की काठिण्य गळून पडतं आणि माणूस दुबळा होतो. या दुबळेपणातून पुढे असहाय अगतिकता त्यांच्या वाट्याला येते. आणि मग परिस्थितीनुसार तडफडणं, चडफडणं ओघानं आलंच. तरीही नैसर्गिक चिवट वृत्तीमुळे पुन:पुन्हा उभं राहण्याचं बळ एकवटून, त्या निष्ठापूर्वक जीवन जगताना दिसतात. म्हणून तर वैशाली नायकवडे लिहितात :
ऋतू बेइमान होतात, तरी माणसं
इथं तिथं जीव लावीत राहतात
नायकवडेंनी मानवी मनाचा वेध घेताना समर्पक शब्दात मितवी भाषेत मुक्तछंदाचा आधार घेतला. निसर्ग प्रतिमातून व्यक्त होताना त्या म्हणतात,
चाफा धुंद रानभरी, गंधी वेढली वल्लरी
सोनकिरणांचे स्मित, माती उत्कटली उरी
कवी कुठं राहतो? काय करतो? गरीब आहे की श्रीमंत? स्त्री आहे की पुरुष? कुठल्याच प्रश्नात वाचकांना रस नसतो. त्यानं किती उत्कट, अस्सल, भिडणारं लिहिलंय हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. ते आवडलं की त्याच्याशी भावनिक नातं जडतं. वैशाली नायकवडेंची कविता असंच नातं जोडते. निसर्गकविता, प्रेमकविता, सुख-दु:खाची, उपेक्षेची आणि विरह- वेदनेची कविता लिहिताना त्या त्या भावनेशी समरस होऊन लिहिल्यामुळे वैयक्तिक असूनही वैश्विक रूप घेते.
तसं पाहिलं तर सर्जनशील साहित्यनिर्मिती म्हणजे नुसतीच रांगोळीच्या ठिपक्यांची, रेषांची आरास नसते तर सर्जनशील साहित्य म्हणजे मानवी जीवनातील नानाविध अनुभवांना भिडून माणूस समजून घेणे असते. माणसाच्या जगण्याचा, त्याच्या माणूसपणाचा अर्थ शोधत जाणे असते. हे जर झालं नाही तर ती कलाकृती केवळ शब्दांच्या रंगीत पोकळ ठिपक्यांची नुसती आरास बनून राहते.
कोल्हापूरजवळ इचलकरंजीत राहणार्‍या, जगण्याचे कडू-गोड अनुभव पचवून उत्तर आयुष्यातील क्षणांकडे परिपक्व दृष्टीने पाहणार्‍या वैशाली नायकवडे यांची कविता म्हणूनच आढीत आलेल्या पिवळ्याधम्मक आंब्यासारखी रसदार, मधाळ आहे. आपल्यासाठी झिजणार्‍यांच्या ऋणात राहण्याची कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. जागतिकीकरणात तुटत जाणार्‍या, एकाकी झालेल्या, निराश, व्याकूळ मनाला नातेसंबंधांवर विश्वास ठेवून नात्याची वीण घट्ट करण्याची उभारी देणारी आहे. बाईपणाचा तिरस्कार न करता ‘बाईपणाचा’ अवघड ‘घाट’ समजून घेत त्याच्यावर प्रेम करणारी व मनाची उमेद वाढवणारी आहे.
आपणही रंग व्हावे, वाटे गंधात नहावे
रंग-गंधाच्या रूपात, विरघळुनिया जावे
tadegawkarsanjiwani@yahoo.com