आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vaishali Shende Article About Need Of Having A Family

विवाह आणि करिअर दोन्ही महत्त्वाचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मधुरिमा’ या पुरवणीमध्ये मागील सप्ताहात प्रकाशित झालेला ‘विवाह की करिअर?’ हा ममता तिवारी यांचा लेख वाचला. आजच्या तरुणींच्या अंतर्मनातल्या द्वंद्वाला मोकळं करण्याचा प्रयत्न चांगला झाला. परंतु त्याची दुसरी बाजूही मांडणे क्रमप्राप्त ठरते.

अलीकडेच घडलेली एक ताजी घटना. इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची शेवटची परीक्षा देणारी स्नेहा माझ्या मुलीसोबत पेपर संपल्यानंतर भेटायला आली. गप्पा झाल्या. पुढं काय करायचंय, असं विचारताच तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. ‘रडू नकोस? काय झालं ते तर सांग?’ असे म्हणताच तिचा बांध फुटला. ‘माझ्यासाठी इथपर्यंतचंच शिक्षण बस्स झालं. आईबाबा म्हणतात, की लग्न झाल्यानंतर काय करायचं ते कर? मुलीची जात. वय वाढलं की कुणी फिरकत नाही घराकडे. लग्नानंतरही, सासरच्यांनी होय म्हटले तरच करिअर, नाही तर मुलं सांभाळायची. घरच्या मंडळींनी आमंत्रणं पाठविलीत. दिवाळीपर्यंत लग्न होईल.’ हे ऐकल्यानंतर ‘चॉइस’चा प्रश्नच कुठे उरतो. संघर्ष करून जगण्याची धमक असणार्‍या मुली सोडल्या तर बहुतांश मुली घरच्या मंडळींच्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाहीत.

माझी सहकारी नैना. वयाची पस्तिशी गाठलेली. पारंपरिक मुशीत वाढलेली. कार्यालय सोडल्यास अन्यत्र भावाशिवाय किंवा आईशिवाय न जाणारी. कुणाही मुलाशी बोलायला न धजावणारी. पंचविसाव्या वर्षापासून मुलं बघायला आली. कधी मुलांनी तर कधी घरच्यांनी नाकारलं. आमची एक सहकारी शिवानी. पंचवीस वर्षांची. तिचं लग्न झालं. मधुचंद्राहून परत आल्यानंतर रिकाम्या वेळात तिच्याशी गप्पा मारत असताना तिच्या मधुचंद्राची पहिली रात्र कशी होती हे ऐकताच नैना सैरभैर झाली आणि तिथून निघून गेली. थोड्या वेळानंतर एकट्यात माझ्याजवळ येऊन हमसून-हमसून रडू लागली.

‘तुम्ही जेव्हा अशा गोष्टी करता तेव्हा मला घाबरायला होतं. मला झोप लागत नाही. विचित्र स्वप्न पडतात. स्वप्नात कुणीतरी माझ्यासोबत असल्याचे भास होतात. मग माझी चिडचिड वाढते. आईवरच राग निघतो.’ तिच्या बोलण्यावरून तिच्या नैसर्गिक लैंगिक इच्छेचं दमन होत असल्याचं प्रत्ययास आलं. तिच्या आईला भेटून यावर बोलले तर ‘कुणालाही कसं द्यावं? आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. आमच्या तोलामोलाचं स्थळ असावं असं वाटणं चुकीचं का? आता वय वाढतंय, कुणी वयात बसणारा मुलगाच मिळत नाहीये. नोकरी आहे. पगार आहे. राहील आमच्यासोबतच,’ असं म्हणाली.
मानवी उत्क्रांतीच्या काळापासूनच सजीवांमध्ये लैंगिक आकर्षण राहिलं आहे. आणि या एका गोष्टीमुळेच सजीवसृष्टी अबाधित आहे. सामान्यांना खाणेपिणे, निद्रेएवढीच गरज मैथुनाची आहे. नैसर्गिक भावनांचा कडेलोट केला तर समाजस्वास्थ्य बिघडणार, हेही तितकंच खरं आहे. मग करिअर करणार्‍यांनी विवाह नाकारला तर त्यांच्या नैसर्गिक गरजांचे काय? इतरत्र मार्गाचा अवलंब केल्यास त्याला ‘अनैतिकतेच्या’ चौकटीत टाकून त्यांच्याकडे पाहण्याचा निकोप दृष्टिकोन गलिच्छतेत परावर्तित होतो.

आमच्या शेजारची रचना. मुलींनी जास्त शिकून काय करायचं आहे, असे समजून आईवडिलांनी बारावीनंतरचं तिचं शिक्षण बंद केलं. मुलं बघायला आली, की तिच्या साधारण दिसण्यानं नापसंत करायची. हे जितकं खरं, तितकंच तिचं कमी शिकलेलं असणंही कारणीभूत ठरायचं. तिला शिकू दिलं असतं तर कदाचित स्वत:च्या पायावर उभं राहाता आलं असतं. पण तिच्या करिअरला घरातूनच ब्रेक मिळाला. तिच्या भावाचं लग्न झालं, तर ती पहिल्या रात्री काय होत असेल हे चोरून पाहाताना आढळली. तिच्यावर मानसोपचारतज्ज्ञाचे उपचार सुरू आहेत.

विवाह की करिअर हा सामाजिक जाणिवेचा प्रश्न आहे. मुलींनाच हा प्रश्न का पडावा, लग्नानंतर मुलंदेखील करिअरसाठी घर, गाव, अथवा देश सोडून जातात. आणि सारी मंडळी हसतहसत त्याच्या उच्चतम प्रगतीकरिता सहकार्य करतात. तीच बाब मुलींच्या बाबतीत स्वीकारली गेली तर? नवराबायको यापलीकडे जाऊन दोहोंनी सहचर्याच्या नात्याने एकमेकांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले तर मुलींना दोन्ही गोष्टी आनंदानं स्वीकारता येतील. त्यासाठी लिंगभेदविरहित सामाजिक दृष्टिकोन विकसित होणे गरजेचे आहे.

आपल्या सामाजिक परिवेशात आपल्याला कुटुंबातल्या प्रत्येक घटकाची सवय झालेली आहे. स्वत:ला व्यक्त करण्याचा तो ‘कम्फर्ट झोन’ आहे. यापलीकडे जाऊन ‘एकटेपणाचा’ विचार करणारी माणसं ‘असामान्य’ असतात. सामान्यांना ती दु:ख देणारी घातक बाब ठरू शकते. आपल्या अवतीभवती अशी उदाहरणं आहेत की, लग्नानंतरही त्यांनी आपली करिअर पूर्ण केलीत. ‘व्हिजन’ एक असणारी अनेक दाम्पत्यंही आपल्याला माहीत आहेत. तात्पर्य करिअरएवढीच जोडीदाराचीही आवश्यकता आहे. कुटुंबातले ममत्व, जिव्हाळा, आपलेपण अनन्यसाधारण आहे. आपली वाट पाहाणारं कुणी तरी आहे हे जाणूनच जगण्याला बळ मिळतं. ते कसं मोडावं आणि कसं सोडावं हा यक्षप्रश्न आहे. आपल्याला काय वाटतं?
(यात नमूद केलेल्या व्यक्तींची नावे बदलण्यात आली आहेत.)