आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Bhagwat Article About Woman's, Divya Marathi

श्रद्धा, बुद्धि‍निष्ठता आणि स्त्रीवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिचर्ड डॉकिन्सच्या पुस्तकांनी 80च्या दशकात मला एकदम चमकवले होते. इतका करकरीत रॅशनल विचार माझ्यासारख्या निम्न आर्थिक स्तरातून आलेल्या, कोल्हापुरासारख्या सरंजामी वातावरणातल्या शहरात वाढलेल्या, तरीही एकूण श्रद्धा आणि तिचे सामाजिक आविष्कार साशंक मनाने स्वीकारलेल्या ब्राह्मण बाईला नवलाचा वाटला होता. माझ्या घरात परंपरेने चालत आलेल्या श्रद्धाविषयांना मीही प्रश्न केले होते. पाळी असताना गौरी का बसवायच्या नाहीत? त्याही बायका आहेत ना? सत्यनारायण कशासाठी? इतके भिकारी देवळाबाहेर असताना अंबाबाईला दुधातुपाचा अभिषेक कशासाठी? इतकी सुंदर काळ्या पाषाणातली मूर्ती त्या अभिषेकांनी झिजणार नाही का? हे प्रश्न विचारणारी मी विक्षिप्त ठरत असले तरी भोवतालच्या मंगळागौरी जागवणे आणि हरितालिका पुजणे यातून समाजगटाचे सदस्यत्व मला अनायसे मिळत होते. शिवाय सृष्टीशी जोडणारा काहीएक भाव त्यातून निर्माण होत होता.

एकंदरीत भोवतालच्या वेगवेगळ्या नातेसंबंधांच्या आणि परिसराच्या जाळ्यात मी गुंतत होते. मी प्रश्न करत राहिले. शोध घेत राहिले. पुढे फ्रॉइड वाचला आणि त्याने संस्कृतीतील भयंकर अस्वस्थता तपासताना श्रद्धेतून निर्माण होणार्‍या अथांगतेच्या भावनेचा उल्लेख केला असला, तरी त्याचे विश्लेषण त्याने बुद्धीच्या धारदार साधनांनीच केले. विज्ञान असले तरच कला आणि धर्म असू शकतात. विज्ञान गमावले तर हे दोन्हीही आपण गमावतो, असे गोथेचे म्हणणे त्याने मान्य केले तरी त्याने हेही सांगितले, की हे सगळे कळूनही बुद्धी मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. कारण इरॉस किंवा दुसर्‍याशी जोडून घेण्याची, प्रेम करण्याची आणि प्रेमापोटीच दुसरा दुखावला जाऊ नये याची चिंता करण्याची आणि त्या चिंतेपोटी असुरक्षित होण्याची व त्यातून स्वत:ला व दुसर्‍याला हिंसकपणे वेठीला धरण्याची- या सर्व प्रेरणाही मूलभूत जैविक आहेत. पुढे व्यापक सामाजिक गटाचे सदस्यत्व सांभाळत मी चळवळींच्या विचारांशी जोडली जात असताना एकेक गोष्टी समजत गेल्या. धर्मातून मिळालेले सामाजिक सदस्यत्व हे एक तर जातिनिहाय सुखकारक/दु:खकारक असते. शिवाय त्याचा दर्जा लिंगभावानुसारही ठरत असतो. या सामाजिक संस्थांपलीकडे असलेला धर्म संस्थात्मक व्यवहारात सापडत नाही. नैतिक प्रश्नांचा ऊहापोह हा धर्मसंस्थेखेरीजही होऊ शकतो.

देव संकल्पनेचा शोध घ्यायचाच असेल तर धर्मसंस्थेच्या बाहेरच घेणे शक्य आहे. बुद्धीला आव्हान देणार्‍या इतक्या गोष्टी भोवताली असतात, की त्यामुळे बुद्धीच्या उत्सुकतेतून मिळणारे स्वातंत्र्य हे अधिक नम्र करत जाणारे असते. निखळ कुतूहलातून आपण स्वत:चे आणि दुसर्‍याचे स्वातंत्र्य सहज स्वीकारू शकतो. त्यामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता या मानवी मूल्यांची स्थापना अशा विवेकातूनच होणे शक्य आहे. सत्याचा शोध एकारलेला असू शकत नाही. विज्ञानाच्या पद्धतीदेखील संवादी, एकमेकांशी चर्चा करत, देवाणघेवाण करत, सहकार्याची शिस्त जोपासणार्‍या असतात. सत्याचा शोध घेण्याचे प्रयत्न बुद्धी करत राहणार. सत्य म्हणजे काय? या प्रश्नाचा शोध सर्व काळातील विचक्षण आणि संवेदनशील मने घेत आली आहेत. ‘पृथ्वी गोल आहे’, ‘दुधात साखर घातली की दुधाची चव बदलते’, ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ ही सगळीच विधाने सत्याचा दावा करतात. पहिले डोळ्यांना दिसणारे, दुसरे जिभेला कळणारे आणि तिसरे सिद्ध करून दाखवता न येणारे तरी करून दाखवता येणारे; पण तरीही आपण असे मानतो की, सगळीच विधाने त्यांच्या त्यांच्या परिघात सत्य म्हणून जाणवतात.

जग घडत असताना ते जितके आपल्या बुद्धीतून घडले आहे, तितकेच ते जैविक प्रेरणांमधूनही घडले आहे. त्यामुळे बुद्धिनिष्ठता म्हणजे कुठेतरी पृथ्वीला तरफ लावण्यासाठीचा अंतराळातला काल्पनिक बिंदू नाही. ती जगण्यात असते. जगण्याचा अविभाज्य घटक असते. जगण्याच्या अनुभवांचे विश्लेषण करूनच त्यावर उपाय शोधता येतो. स्त्रीवादाने स्त्रियांची आत्मकथने केंद्रस्थानी आणली; कारण स्त्रीचा आवाज आणि तिच्या वेदनेचे वास्तव लक्षात घेतल्याखेरीज सत्य शोधता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. हेच तत्त्व मग सर्वच बुद्धिनिष्ठ विचारविश्वांना लागू होते. उदाहरणार्थ, स्त्रीवादी न्यायतत्त्वप्रणाली ही स्त्रियांच्या अनुभवांना केंद्रस्थानी ठेवायला सांगते. न्यायतत्त्वप्रणालीची बांधणी पुरुषकेंद्री अनुभवाच्या आणि आकांक्षांच्या माध्यमातून केली गेली असल्यामुळे स्त्रीच्या अनुभवांचे विश्लेषण न्यायविचाराला व्यापकता देऊ शकेल. साहजिकच स्त्रीचा अनुभव हा शारीर संवेदनांच्या संदर्भातही तपासायला लागेल, असे त्यातून समोर येते. उदाहरणार्थ, गरोदरपण, बाळंतपण, स्तनपानाचे काम, मासिक ऋतुस्रावाची वेदना या शारीर अनुभवांचा विचार मानवी वस्तुस्थितीचा विचार करताना आणि त्याच्या समस्येवर उत्तरे शोधताना करावा लागेल. तो शारीर अस्तित्वाच्या संदर्भात महत्त्वाचा मानावा लागेल. ताराबाई शिंदे आणि मुक्ता साळवे यांनी 19व्या शतकात निबंधलेखनासारख्या बुद्धिनिष्ठ आकृतिबंधातून हे अत्यंत प्रभावीपणे मांडले. आधुनिक स्त्रीवादाची भारतातील सुरुवात तिथून होते.
(शब्द पब्लिकेशनच्या ‘संदर्भासहित स्त्रीवाद’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील संपादित अंश)
संदर्भासहित स्त्रीवाद
संपादक - वंदना भागवत, अनिल सपकाळ, गीताली वि. म.
मूल्य - 700 रुपये