‘मला पहिल्यांदा पीरियड्स आले त्या वेळी मी शाळेत होते. अचानक हे काय होतं आहे म्हणून घाबरून घरी निघून आले. आईला हे सगळे सांगितले. पण एका महत्त्वाच्या कामासाठी आईला बाहेरगावी जावे लागणार होते. ते टाळता येण्यासारखे नसल्यामुळे ती निघून गेली. आई गेल्यानंतर मला थोडी भीती वाटली. काय करावे सुचत नव्हते. घरात बाबा होता, पण त्याच्याशी याबद्दल कसे बोलावे हे कळत नव्हते. पण ओटीपोटातल्या वेदना वाढल्या तशी मी रडायला लागले. ते पाहून बाबाच माझ्या जवळ आला. माझ्या डोक्यावरून हात फिरवला. जाताना आईने बाबाला माझ्याबाबतची कल्पना दिली होती. त्यानंतर त्याने मला औषध आणून दिले.
माझ्या वेदना थांबल्यानंतर बाबा माझ्या जवळ येऊन बसला. त्यानंतरचा अर्धा तास बाबाने, मला या नैसर्गिक चक्राबद्दल माहिती दिली. त्याच्यासोबतच्या मोकळ्या बोलण्यामुळं माझी घालमेल कमी झाली. नंतरचे तीन दिवसही बाबाने माझी खूप काळजी घेतली. महत्त्वाचा टप्पा असलेले आयुष्यातले हे पहिले चार दिवस केवळ बाबामुळे कायम स्मरणात राहतील. माझ्या आणि बाबांमधे आज असलेल्या निकोप नात्याचा तो पाया होता असं आज वाटतंय,’ नुकतंच बारावी पूर्ण केलेली आणि संगीत विषयात करिअर करण्याचं ध्येय असलेली आस्था पराग मांदले हिनं सांगितलेला हा बोलका अनुभव. किशोरवयीन मुलींच्या जडणघडणीत आईइतकाच वडिलांचाही भावनिक-मानसिक सहभाग अत्यावश्यक आहे हे अधोरेखित करणारा.
मासिक पाळी हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला शारीरिक स्थित्यंतराचा काळ. मुलींना स्त्री-पुरुषातल्या मूलभूत वेगळेपणाची जाणीव होते ती याच काळात. आईच्या उदरातून जन्मणा-या प्रत्येक पुरुषाच्या निर्मिती प्रक्रियेचं मूळ हे याच मासिक पाळीत असतं. आणि त्यामुळेच अशा नाजूक अवस्थेत बाबानेही मुलीला आपल्या मायेची ऊब द्यावी. म्हणजे मग मुलगी-आई-वडील यांच्यातलं परस्परांमधलं नातं अधिक निकोप आणि पारदर्शी होईल. शिवाय या काळातल्या मानसिक-भावनिक पाठिंब्यामुळं पाळीच्या दरम्यानं होणारा शारीरिक त्रासही तुलनेने कमी प्रमाणात होतो, असे शरीरशास्त्र सांगते. पाळी हा जसा शारीरिक बदलांचा मोठा टप्पा आहे तसाच तो मानसिक उलथापालथींचा, भावनिक गुंतागुंत वाढवणारा आणि वैचारिक गोंधळ निर्माण करणारा काळ आहे. म्हणूनच अशा काळात आई-वडिलांनी मुलीचं भावविश्व समजून घ्यायला हवं. तिला वेळोवेळी मार्गदर्शन करत राहायला हवं, जेणेकरून अशा टप्प्यावरच्या शेअरिंगसाठी तिला आईइतकाच बाबाबद्दलही विश्वास वाटेल.
‘आई-वडील-मुलगी-मुलगा यांच्यातलं नातं चौकोनी असण्यापेक्षा वर्तुळाकार असावं. दुर्दैवानं मासिक पाळीसारखा विषय परंपरेनं मोकळ्या चर्चेसाठी निषिद्ध मानला आहे. पण हे अत्यंत चुकीचं अाहे,’ असं पराग मांदले म्हणतात. एका ठरावीक वयानंतर मुलामुलींच्या शरीरात कसे बदल होतात, त्याचा अर्थ आणि महत्त्व काय आहे, या बदलांचा भावी जीवनावर होणारा परिणाम याबद्दल शास्त्रीय माहिती आई-बाबा दोघांनीही मुलींना सोप्या शब्दांत द्यायला हवी. ज्या मुलींसोबत त्यांच्या पालकांचा, विशेषत: बाबांचा संवाद असतो, अशा मुली तुलनेनं जास्त परिपक्व असतात. नात्यातला मोकळेपणा त्यांना काही लपवून ठेवण्यापासून परावृत्त करतो. मात्र त्यासाठी बाबाने मित्राच्या भूमिकेत राहायला हवे, असे पराग यांना वाटते.
किशोरवयीन मुलींना वाढवताना त्यांच्या संदर्भातल्या जबाबदारीचं परस्परात विभाजन करण्याऐवजी आता आई-वडिलांनी कालसुसंगत पालकत्व सजगतेनं पार पाडण्याची गरज आहे. एकमेकांच्या भूमिकेत शिरून आवश्यकतेप्रमाणं मुलींना मार्गदर्शन, पाठिंबा देत खुलेपणानं संवाद साधावा. कारण हाच संवाद नात्यातली व्यक्त होण्यासाठीची सहजता वाढवू शकतो. बाबाने मुलीला ‘तू आता मोठ्ठी झालीस’ अशी सतत आठवण करून देत, ‘असे वागू नको, मोठ्याने हसू-बोलू नकोस, असे कपडे घालू नकोस’ची बंधने घालण्याऐवजी, फुलपाखरासारखे मुक्त उडणा-या, उत्साह ओसंडून वाहणा-या लेकीला तिचे ‘ती’ होणे कसे सहज-स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे, आणि हे ‘उमलणे’ किती सुंदर आहे याची जाणीव करून द्यावी. म्हणजे मग आस्थासारखी प्रत्येक मुलगी, माझा बाबाच माझा बेस्ट फ्रेंड आहे, असे अभिमानाने म्हणू शकेल.
vandana.d@dbcorp.in