आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसाराच्या गाडीला कौतुकाचं वंगण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आटपाट नगर होतं. नगरातल्या टू-बीएचके राजवाड्यात राजा-राणीनं संसार थाटला होता. हम दो-हमारे दोचा आटोपशीर संसार. महागाईशी दोन हात करण्यासाठी राजा-राणी दोघंही नोकरी करायची. राजाचं काम फिरतीच होतं. सकाळीच तो घराबाहेर पडायचा. राणी मात्र घरचं सगळं आवरून प्रत्येकाचा डबा वेळेत तयार करायची, राजकन्या-राजपुत्राला शाळेत सोडून नोकरीवर जायची.
संध्याकाळी परतताना त्या दोघांना ती घेऊन येई. येताना वाटेत न चुकता भाजी खरेदी करायची. राजवाड्यात आल्यानंतर एकीकडे संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर दुसरीकडे मुलांचा अभ्यास. शिवाय सणवार, पै-पाहुणे वेगळेच. राजा मात्र फक्त नोकरी करूनच थकून जायचा. राजवाड्यातली इतर कामं करावी लागतात, याची त्याला जाणीवही नव्हती. मी पैसा कमावून आणल्यामुळेच राजवाड्यातले व्यवहार सुरळीत सुरू आहेत, असा त्याचा समज. राजाची नेमकी हीच गोष्ट राणीला खटकायची. पण बिचारी बोलणार कुणाला? राजाकडून कौतुकाचे दोन शब्द ऐकण्यासाठी ती आसुसली होती. रोजची धावपळ, मानसिक ओढाताणीविरुद्ध शेवटी राणीच्या तब्येतीने बंड पुकारलं. राजवैद्यांनी आठवडाभर पूर्ण विर्शांतीचा सल्ला दिला. आठ दिवस सहज निभावून नेऊ, असं राजाला वाटलं. पण कसलं काय, सकाळी बेड-टीची सवय असलेल्या राजाच्या दोन दिवसांतच नाकी नऊ आले. मुलांना दात घासण्यासाठी ब्रश देण्यापासून संध्याकाळी अभ्यास घेईपर्यंत राजाची दमछाक होऊ लागली.
स्वयंपाकघरातली कसरत तर वेगळीच. राजानं मेहनतीनं तयार केलेला स्वयंपाक, डब्यातला खाऊ तर मुलं तोंड वाकडं करत नाइलाजाने संपवत. राणीचं औषधपाणी, नोकरी अशी कसरत करून राजा मेटाकुटीला आला. या धावपळीचा नोकरीवर परिणाम न होता तरच नवल. राजदरबारातल्या सहकार्‍यांशी क्षुल्लक गोष्टीवरून राजाचे सतत खटके उडू लागले. या प्रकाराने राजा हवालदिल झाला. सहज निभावून नेण्याची शेखी मिरवणार्‍या राजाला हल्ली वेगळाच विचार सतावत होता. इतकी वर्षे राणीने एकटीने आपल्या संसाराचा गाडा कसा काय रेटला? तोही विनातक्रार. संसाराच्या गाडीतल्या दुसर्‍या चाकाला कौतुकाचं, समजुतीचं वंगण हवं असतं हे आपल्याला का कळलं नाही? संसाराच्या उरलेल्या प्रवासात राजानं राणीशी वागण्याचं धोरण बदललं हे सांगणे न लगे. तुम्हीही असंच काहीसं ठरवलं असेल तर साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.
vandana.d@dainikbhaskargroup.com