आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Dhaneshwar About Education And Career, Divya Education

युवकांसाठी नवदृष्टीचे ‘निर्माण’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उच्च शिक्षणानंतर गलेलठ्ठ पगाराची नोकरी म्हणजे करिअर नाही. ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, याचं आजच्या तरुणाईला बहुदा विस्मरण झालं आहे. करिअर घडवताना समाजातल्या इतर गोष्टींकडे वेळ द्यायला तरुण पिढीकडे वेळच नाही. कित्येक वर्षे नोकरी करून, भरपूर पैसा कमावल्यानंतरही अनेकजण समाधानी दिसत नाहीत. मात्र ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘निर्माण’च्या माध्यमातून ही अस्वस्थता दूर करण्याची संधी तरुण-तरुणींना मिळाली आहे.

मूळ औरंगाबादचा असलेला डॉ.विठ्ठल साळवे. 2011 ला वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो निर्माण च्या संपर्कात आला. आयुष्याकडे पाहण्याची नवी दृष्टी निर्माणमुळे मिळाली, असं त्याला वाटतं. म्हणूनच गडचिरोलीपासून चार किलोमीटरवरील दुर्गम भागात सेवा देण्याचा त्याने निर्णय घेतला. समविचारी पत्नीचाही पाठिंबा मिळाल्याने सध्या साळवे दांपत्य दुर्गम भागात आरोग्य सेवा देत आहे.

कधी कर्तव्य, तर कधी जबाबदारी, तर कधी गरज म्हणून शिक्षण, नोकरीच्या चक्राला प्रत्येक तरुण बांधला गेला आहे. व्यावहारिक पातळीवर ते कदाचित योग्यही असेल, पण या चक्रामुळे आयुष्य ‘अर्थ’पूर्ण होतं, पण परिपूर्ण नाही. भौतिक सुखं मिळतात, पण समाधान नाही. समृद्धी येते पण स्वस्थता कायमची गमवावी लागते. आणि याची जाणीव अनेक तरुणांना बेचैन करते. काहीजण या अस्वस्थतेतच मागील पानावरून पुढे सुरू ठेवतात तर काही जण नवी वाट शोधण्यासाठी धडपडतात. शासकीय योजना मागास भागापर्यंत पोहोचवणारा गोपाळ महाजन, आकाश बडवे, ग्रामीण भागात विज्ञान-तंत्रज्ञान पोहोचवणारा नाशिकचा मयूर सरोदे, यवतमाळची कल्याणी वानखेडे, गरजूंना आरोग्य सेवा देणारा परभणीचा डॉ. गजानन फुटके, औरंगाबादचा डॉ. शिवप्रसाद थोरवे, या आणि यासारख्या अनेक धडपडी मंडळींची टीम निर्माणच्या माध्यमातून, राज्यातल्या दुर्गम भागात स्वत:चं कौशल्य वापरून उज्ज्वल समाज घडवण्यासाठी नि:स्वार्थ सेवा देत आहे.

निर्माणची सुरुवात : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय आणि राणी बंग यांच्या पुढाकाराने 2006 मध्ये निर्माणची सुरुवात झाली. नंतर अनिल अवचट, विवेक सावंत सारखी मंडळीही या उपक्रमाशी जोडली गेली. निर्माण ही युवकांमधल्या नेतृत्वगुणांना दिशा देणारी, सामाजिक भान जागवणारी शिक्षण प्रक्रिया आहे. युवकांना सामाजिक समस्यांची जाणीव व्हावी, त्यावर उपाय शोधण्यासाठी त्यांनी एकत्र यावं, या प्रक्रियेमधून त्यांनी स्वत:चा शोध घ्यावा. त्यांना जगण्याचं ध्येय सापडावं, या उद्देशाने निर्माणची सुरुवात झाली. निर्माणच्या माध्यमातून राज्याच्या 30 हून अधिक जिल्ह्यातील दुर्गम, मागास भागांमध्ये आजच्या घडीला अनेक डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, शिक्षक, वाणिज्य-विज्ञान-कला शाखेचे विद्यार्थी, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत समस्यांवर काम करताहेत. लोकांमध्ये मिसळून त्यांना अपेक्षित असलेले बदल घडवत आहेत.

निर्माणची कार्यपद्धती : सकारात्मक बदल घडवण्याची तीव्र इच्छा असणार्‍यांना कौशल्य, पोषक वातावरण मिळवून देण्यासाठी निर्माणतर्फे काम केलं जातं. या प्रक्रियेअंतर्गत, तीन शिबिरांची एक मालिका तयार करण्यात आली आहे. वर्षातले एकूण 24 दिवस, तीन टप्प्यांत विभागून शोधग्राम सर्च, गडचिरोली इथं हे शिबिर भरवलं जातं. यात दुर्गम भागातील आरोग्य, शिक्षणाशी संबंधित विविध समस्या, मागास लोकांचा जीवनस्तर उंचावण्यात येणार्‍या अडचणींवर चर्चा केली जाते. हे अडथळे कसे पार करता येतील याचा अभ्यास केला जातो. यासाठी प्रत्यक्ष काम करणार्‍या लोकांसमवेत संवाद साधला जातो. शिवाय सहभागी विद्यार्थ्यांच्या विचार, भावनांची व्यापकता वाढवण्याच्या दृष्टीनं, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, गटचर्चा, अनुभवाधारित स्वयंशिक्षणावरही शिबिरात भर दिला जातो. राज्याच्या विविध भागांतील अनेक उच्चशिक्षित युवकांनी इथून प्रशिक्षण घेतलं आहे.

स्वत: पलीकडच्या जगासाठी काहीतरी करण्याची तळमळ असणारे, करिअर करताना समाजसेवा किंवा समाजसेवा हेच करिअर बनवू इच्छिणारे, आपल्यातल्या कौशल्याचा, क्षमतेचा समाजासाठी उपयोग करू इच्छिणारे, आणि मुख्य म्हणजे स्वत:हून पुढाकार घेतल्याशिवाय व्यवस्था बदलणार नाही यावर ठाम विश्वास असणार्‍यांसाठी निर्माण ही एक सुवर्ण संधी आहे. तुम्हालाही यात सहभागी व्हायचं असेल तर 15 ऑगस्टपर्यंत,http://nirman.mkcl.orgया संकेतस्थळावर किंवा nirmaanites@gmail.com या मेल आयडीवर अधिक माहितीसाठी संपर्क साधावा.

काय म्हणतात प्रशिक्षणार्थी...
> व्यवस्थेला नावं ठेवण्यापेक्षा त्यातले कच्चे दुवे शोधून काम कसं करता येईल हे निर्माणमुळे शोधता आलं.
अमृता ढगे, अंबरनाथ
> जगायचं कशासाठी या प्रश्नाचं उत्तर निर्माण मध्ये आल्यावरच मिळालं.
डॉ. मुकुंद जाधव, सांगली
> बहुतेक सामाजिक समस्या परस्परांशी जोडलेल्या असतात आणि त्यांची उत्तरही. त्या सोडवताना त्यातला दुवा शोधण्याची दृष्टी निर्माणने दिली.
- मुक्ता नावरेकर, नाशिक
(vandana.dhaneshwar@gmail.com)