आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रसिका’ला वाचवायलाच हवं...!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात एकाच दिवशी दोन परस्परविरोधी मथळ्याच्या बातम्या झळकल्या. त्यातल्या ‘पहिल्या महिला लढाऊ पायलट हवाई दलात दाखल’ या बातमीनं एक स्त्री म्हणून ऊर अभिमानानं भरून आला, परंतु त्याचवेळी ‘विवाहितेची आत्महत्या’ या बातमीनं डोकं बधिर झालं. एकाच समाजातल्या स्त्रियांचं वास्तववादी, परंतु परस्पर विरोधाभास दर्शवणारं चित्र ठसठशीतपणे डोळ्यांसमोर उभं राहीलं.

खरं तर कुठल्याही वयोगटातल्या स्त्रियांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण दररोज वाचतो, पाहतो, ऐकतो. एका निर्विकार शून्यतेनं. मात्र मागील काही वर्षांत विवाहित महिलांच्या आत्महत्यांनी ‘कथित सुशिक्षितांना’ विचार करायला भाग पाडलं आहे.

औरंगाबादेत नुकतीच घडलेली एक घटनाही अशाच पद्धतीची. रसिका फड या ३२ वर्षीय विवाहितेनं सासरच्या छळाला कंटाळून जीवन प्रवास संपवला. विहिरीत उडी टाकण्यापूर्वी तिनं आपल्या सात वर्षांच्या मुलीला आधी टाकलं आणि नंतर स्वत: उडी घेतली. दैवयोगानं चिमुरडीच्या आयुष्याची दोरी बळकट असल्यानं ती वाचली. नवरा, सासू-सासरे आणि नणंद यांच्या मानसिक, शारीरिक, भावनिक आणि मुख्य म्हणजे मुलगा हवा या कारणामुळे होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून रसिकानं हे टोकाचं पाऊल उचललं. एम. ए. इंग्लिश, एलएलबी असं उच्च शिक्षण घेतलेल्या रसिकाचा असा शेवट सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला.

औरंगाबादेतली ही आत्महत्या हे एक प्रातिनिधिक उदाहरण. पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूरसारख्या मोठ्या शहरामध्येही उच्चशिक्षित स्त्रियांच्या मुलांसह आत्महत्या करण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. या विधानाच्या सत्यतेसाठी बहुदा कुठल्याही अहवालाच्या दाखल्याची गरज भासू नये. वास्तविक आत्महत्येचा निर्णय एका रात्रीतला नसतो. वैयक्तिक, वैवाहिक, व्यावसायिक किंवा सार्वजनिक जीवनातल्या मोठ्या अपयशाची मालिका त्यामागे असते.

सततची निराशा, अवहेलना आणि वारंवार होणाऱ्या उपेक्षेची एक साखळी त्याला कारणीभूत असते. लोकं काय म्हणतील या मानसिकतेपोटी स्वीकारलेली अगतिकता असते. प्रतिकूलतेवर मात करण्याचा धीर खचल्यानं निर्माण झालेल्या सैरभैर मानसिकतेचा तो दृश्य परिणाम असतो. टोकाच्या या निर्णयाला अडचणी आणि समस्यांचं व्यवस्थित संतुलन साधण्यातली कमतरता या निकषांवर संबंधित व्यक्ती तर जबाबदार असतेच, परंतु तिची मनोव्यथा समजून घेत, तिला आत्महत्येपासून परावृत्त करण्याच्या निकषांवर पालक-नाते‌वाईक-मित्रमंडळी-सहकारीही कमी पडतात. त्याशिवाय स्त्रियांना सातत्यानं एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त करू पाहणारी, तिची योग्यता नाकारणारी, वर्चस्व राखू पाहणारी आणि पारंपरिकतेचा घोषा लावणारी पुरुषी मानसिकता हा तर खूप मोठा घटक या सर्व गोष्टींना कारणीभूत आहे. कारण ‘सोशल स्टेटस’च्या मानसिक दबावापायी बहुतांश स्त्रिया आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल चकार शब्द उच्चारत नाहीत. त्यातूनही एखादीनं आपल्या कुटुंबाजवळ, जवळच्या व्यक्तीजवळ याविषयी चर्चा केलीच तर तिला निमूटपणे सहन करण्याचा सल्ला देणारेच जास्त. वास्तविक अशा मन:स्थितीतून जाणाऱ्यांची आस्थेनं विचारपूस, मानसिक आधार आणि समुपदेशन हेच मोठं औषध असतं. मात्र भावनिक पातळीवरची एवढी मूलभूत गरजही पूर्ण न झाल्यानं, मुळातच हार पत्करलेली मानसिकता आणखीनच बळावत जाते. त्यातूनच मग ‘रसिका’सारखी प्रकरणं घडतात.

इथे यासंदर्भात लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे शहरी, निमशहरी महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातल्या महिलांचं आत्महत्येचं प्रमाण खूप कमी आहे. पदरी फारसं शिक्षण नाही. आर्थिक परिस्थिती बेताची. कमावण्याची साधनं तुटपुंजी. त्यातच खाणाऱ्या ढीगभर तोंडांचा मेळ बसवण्याची कसरत, अशी स्थिती असतानाही या महिला आयुष्याला खंबीरपणे सामोऱ्या जातात. अर्थात ग्रामीण भागातलं सामाजिक तसंच एकत्र कुटुंब पद्धतीचा दबाव याला मुख्यत्वे कारणीभूत आहे हे लक्षात घ्यायला हवं. म्हणूनच आर्थिकदृष्ट्या फारशा सक्षम नसतानाही स्वत:च्या हिमतीवर निभावून नेण्याबाबत शिक्षित महिलांच्या तुलनेत ग्रामीण स्त्रिया काकणभर सरसच ठरतात.

रसिकाच्या प्रकरणात, ती इतकी उच्चशिक्षित आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जलसंधारण विभागात नोकरीला असताना मुलीसह तिला जीव द्यावासा का वाटला असेल हे अखेरपर्यंत गूढच राहणार आहे. आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या पायावर उभं असतानाही तिला भेडसावणारी सामाजिक असुरक्षितता हे कसलं द्योतक मानायचं?

लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेल्या अशा कितीतरी ‘रसिका’तुमच्या आमच्या रोजच्या पाहण्यातल्या आहेत. पण ‘आपल्यापर्यंत आलेलं नाही ना’ हा विचार करत ‘सेफ झोन’मधलं जगणं आपण पसंत केलंय. त्यामुळे त्यांच्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो, परंतु आपल्या आवाक्यातले लहान लहान प्रयत्न अशा अनेक रसिकांना वाचवू शकतात. नव्हे आपण त्यांना वाचवायलाच हवं. दु:ख, अडचणी सगळ्यांनाच असतात. समस्यांची चळत प्रत्येकांच्याच आयुष्यात लागलेली असते, पण या सगळ्यांसह चालत राहण्याचं कसब हे ज्याचं त्यालाच साधायचं आहे. कारण आयुष्य प्रवाही आहे. काळ आणि वेळ कुणासाठीही थांबत नाही. अगदी ‘आज मदहोश हुआ जाये रे’ सारखी तरल अवस्था असो किंवा ‘सीने मे जलन,आँखो मे तुफान’ सारखी भणंग अवस्था असो. जगणं थांबवायचं नसतं, मनात इच्छा असो किंवा नसो. म्हणून आयुष्याच्या शर्यतीत ‘तिला’ पळता आलं नाही तरी चालेल, पण ‘ती ’ चालत राहिली पाहिजे. ‘रसिका’पासून ते अवनी, मोहना आणि भावना यांच्यापर्यंतचा ‘तिचा’ प्रवास आर्थिक आणि भावनिकदृष्ट्या अधिकाधिक कणखरपणे व्हायला हवा. म्हणजे इतर अनेकींच्या आयुष्यातली धुगधुगी जागती राहील. अजून सगळं संपलेलं नाही, बदल घडू शकतो, नव्यानं सुरुवात करता येईल हा आशावाद ‘तिच्या’ जगण्यात उमेद आणू शकतो. प्रतिकूलतेमधला आत्मविश्वास आणि सुखातलं भान ‘तिला’ येऊ शकतं. समाज म्हणून आपण फक्त इतकंच करूया. ‘तिच्या’सोबत चालूया. कधी मार्गदर्शनाच्या तर समुपदेशनाच्या रूपात...

इथे मदत मागू शकता
कौटुंबिक, वैयक्तिक किंवा कार्यालयीन समस्यांमुळे पराकोटीच्या नैराश्येत गेलेल्या महिलांना अनेकदा आपले दु:ख कुणाजवळ मोकळे करावे, हे सुचत नाही. आपल्यासमोरील प्रश्नांना उत्तर मिळेल की नाही, हेही माहीत नसते. अशा वेळी पुढील काही हेल्पलाइन नंबर्स तुम्हाला नक्की मदत करतील. याद्वारे आपले योग्य समुपदेशनही होऊ शकते.

प्रत्येक शहर आणि तालुका स्तरावर महिला तक्रार निवारण केंद्र असते. या ठिकाणी शारीरिक वा मानिसक छळाबाबत तक्रार नोंदवता येते. अनेकदा तक्रार नोंदवताना आपले नाव आल्याने बदनामी होईल, ही भीती महिलांच्या मनात असते. मात्र महिला तक्रारदारांना स्वत:चे नाव देणे बंधनकारक नसते, याबद्दल महिला अनभिज्ञ आहेत.

१०९१ हा महाराष्ट्र पोलिसांच्या दामिनी पथकाचा हेल्पलाइन नंबर आहे. आपत्कालीन मदतीसाठी या क्रमांकावर फोन करता येतो.
सुरक्षा अॅप : हे राज्य पोलिसांचे अॅप असून याद्वारे संकटात सापडलेल्या महिलांना पोलिस तसेच कुटुंबीयांनाही त्वरित मदतीसाठी संपर्क साधता येतो.

तज्ज्ञांचा सल्ला घ्या
आयकॉल : ०२२-२५५२११११ : टाटा इन्स्टिट्यूटची ही सुविधा भारतभर सुरू अाहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी मराठीत बाेलणाऱ्या समुपदेशकांची नेमणूक करण्यात अाली अाहे. मानसशास्त्र वा समुपदेशन विषयात उच्च पदवी घेतलेल्या तरुणांची अायकाॅलमध्ये समुपदेशक म्हणून नियुक्ती करण्यात अाली अाहे. समुपदेशनाचे काम पूर्णत: विनामूल्य केले जाते. ९२२५१३९४३३ : मधू चाैगावकर, मुंबई (पाठिंबा संस्था) ९८२३०८३१७३ : डाॅ. नीलम मुळे, नाशिक (संवाद कन्सलटन्सी) ९९८७६५३०४३ : साईली पाध्ये-पराडकर ( मॅरेज अॅण्ड बिहेविअर काैन्सिलर)

वंदना धनेश्वर, मंजिरी काळवीट, औरंगाबाद
vandana.d@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...