आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंकू ते पार्च्ड व्हाया अस्तित्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘कुंकू’मध्ये शांताताईंनी पहिली बंडखोर अभिनेत्री साकारल्याला ८० वर्षं पूर्ण होतील. त्यानंतरच्या समांतर, विनोदी, रोमँटिक आणि गल्लाभरू चित्रपटांच्या गर्दीत स्त्रीप्रधान चित्रपट बॅकफूटवर गेला. पण गेल्या दशकभरात स्त्रीप्रधान चित्रपटांना प्रेक्षकांनी पुन्हा आपलंसं केलंय...

गेल्या काही वर्षांत महिला दिनाचा मुहूर्त साधण्याची चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शकांमध्ये जणू चढाओढ लागल्यासारखी वाटते आहे. त्याच्याच परिणामी वेगळ्या पठडीतले बहुतांश स्त्रीप्रधान चित्रपट गेल्या काही वर्षांत आठ मार्च आणि त्याच्या आसपासच्या शुक्रवारी प्रदर्शित झाले. झपाट्यानं घडणारं सामाजिक स्थित्यंतर आणि त्याला अनुसरून मोठ्या पडद्याबाबत प्रेक्षकांच्या बदललेल्या अभिरुचीचा याला संदर्भ असला तरीही चाकोरीबाहेरच्या विषयाला हात घालण्याच्या निर्माते आणि दिग्दर्शकांच्या धाडसाला दाद द्यावीच लागेल.
चित्रपटाची मुख्य कथा फिरणार नायकाभोवती. ‘नायिका’ म्हणजे परिघावरची आणि ‘सहकलाकार’ या सदरात मोडणारी, नेत्रसुख देणारी व्यक्तिरेखा अशी कित्येक वर्षे बॉलिवूडमधल्या नायिकांची प्रतिमा मर्यादित होती. प्रेक्षकांचा तर दूरच पण खुद्द नायिकांचाही याला फारसा आक्षेप नव्हता. मात्र सत्तर आणि त्यानंतरच्या दशकातल्या विजय तेंडुलकर, श्याम बेनेगल, सत्यदेव दुबे, गोविंद निहलानी, केतन मेहता आणि तत्कालीन चित्रपटधुरिणांनी लिहिलेल्या, निर्मिलेल्या, वा दिग्दर्शिलेेल्या समांतर चित्रपटांच्या आशयगर्भ लाटेनं, चित्रपटातल्या नायिकेला ‘दिसणं’ आणि ‘दाखवणं’ यापुढं एक पाऊल टाकायला प्रेरित केलं. स्त्री भूमिकेला स्वत:चा चेहरा दिला. तिथूनच पुढे चित्रपटातील स्त्रीपात्रांना स्वत:ची मतं असणं, त्यांनी ती मतं मांडणं, एखाद्या विषयाबाबत ठाम भूमिका घेणं, प्रसंगी त्यासाठी बंडखोरी करणं या पद्धतीनं विकसित करून सादर करण्यात आलं. स्त्रीपात्रांबद्दलच्या या सकारात्मक दृष्टिकोनामुळं त्यांची चित्रपटातली भूमिका आणि त्यांच्यासाठीचं संवादलेखनही वेगळ्याच उंचीवर पोहोचलं. अर्थ, सारांश, मासूम, मिर्च मसाला, बँडिट क्वीन, यांसारखे हिंदी चित्रपट याचीच प्रचिती देतात.

हिंदीच्या तुलनेत मराठी चित्रपटसृष्टीनं सक्षम व्यक्तिरेखा पडद्यावर उभी करण्यात बाजी मारलेली दिसते. कुंकू हा चित्रपट त्याची साक्ष देतो. १९३७च्या या पहिल्या सामाजिक बोलपटात अभिनेत्री शांता आपटे यांनी पडद्यावरची प्रथम बंडखोर स्त्री भूमिका साकारली. शांताताईंपासून सुरू झालेल्या मराठीतल्या या सक्षम व्यक्तिरेखांचा प्रवास, मीनाक्षी शिरोडकर, ललिता पवार, हंसा वाडकर, उषा किरण, सूर्यकांता, स्मिता पाटील ते अगदी तब्बू (अस्तित्व), अदिती देशपांडे (नॉट ओन्ली मिसेस राऊत), मुक्ता बर्वे (जोगवा,) स्मिता तांबे (७२ मैल एक प्रवास), सोनाली कुलकर्णीचा (पोश्टर गर्ल) असा सुरू आहे.

चित्रपटसृष्टी हिंदी असो वा मराठी, त्यातल्या काही मोजक्या स्त्री व्यक्तिरेखांचा धावता आढावा घेण्याचं निमित्त म्हणजे, स्त्रीप्रधान चित्रपटांचा वाढत जाणारा ट्रेंड. प्रेक्षकांचा त्याला मिळणारा प्रतिसाद. अशा चित्रपटांसाठी वास्तवाला धरून केलेली विषयाची निवड आणि मांडणी. पडद्यावरच्या स्त्रीपात्रांना स्वतंत्र अस्तित्व म्हणून उभं करण्याची धडपड. एक माणूस म्हणून नायिकांची, त्यांच्या मताची-विचारांची आणि आयुष्याकडे पाहण्याच्या स्वतंत्र दृष्टिकोनाची दखल घेण्याचा हा प्रघात रुळतोय. असे चित्रपट, सर्वच पातळ्यांवर प्रस्थापित संकेतांना आव्हान देऊ पाहत आहेत. या अनोख्या प्रयोगांमधून चित्रपटसृष्टीनं पारंपरिकतेची झूल उतरवल्यानं, २०००च्या दशकात अशा नायिकाप्रधान चित्रपटांनी शंभरी ओलांडली.

कॉल गर्ल्स, बार डान्सरच्या आयुष्यावर बेतलेला तब्बूचा चांदनी बार, काॅर्पोरेट कल्चरमधला भ्रष्टाचार आणि नात्यांचा स्वार्थासाठी वापर यावर भाष्य करणारा बिपाशा बसूचा काॅर्पोरेट, मायलेकीच्या नात्यांची गुंफण दर्शवत स्वप्नांना पूर्ण करण्याच्या जिद्दीची कथा सांगणारा स्वरा भास्करचा निल बट्टे सन्नाटा, फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रातले कच्चेपक्के धागेदोरे उलगडणारा करिना कपूरचा हिराॅइन आणि प्रियांका चोप्राचा फॅशन, नृत्यासाठी या कलेच्याच माध्यमातून संपूर्ण गावकऱ्यांशी पंगा घेणाऱ्या माधुरीचा आजा नच ले, वृत्तपत्रक्षेत्रातील पोल खोलणारा कंकणा सेनचा पेज थ्री, क्रीडा क्षेत्रातल्या पात्रतेच्या चाचण्या, त्याचे निकष, या सर्वांमधल्या ‘गेम’बद्दल नाराजी असूनही केवळ देशप्रेमापोटी खेळणाऱ्या प्रियांका चोप्राचा मेरी कोम, एकटीनं केलेल्या परदेश प्रवासाचं धाडस किती आनंद देऊन जाते हे सांगणारा कंगना राणावतचा क्वीन, स्वत:च्या दिसण्याबद्दलचा न्यूनगंड बाळगू नका असा संदेश देणारा भूमी पेडणेकरचा दम लगा के हैशा, चित्रपटसृष्टीतल्या वृत्तीवर स्पष्ट आणि थेट भाष्य करणारा विद्या बालनचा डर्टी पिक्चर आणि सामािजक प्रश्नांची पार्श्वभूमी लाभलेले कहानी, डेढ इश्किया यांसारख्या चित्रपटांच्या उल्लेखाशिवाय ही यादी अपूर्णच राहील.

या दशकातल्या चित्रपटांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नायिकांनी रोमॅन्टिसिझमच्या फ्रेममधून बाहेर पडत अॅक्शन चित्रपटांमध्येही जलवा दाखवण्यासाठी पुढाकार घेतला. माधुरीचा अंजाम, गुलाब गँग, राणी मुखर्जीचा मर्दानी, ऐश्वर्या रॉयचा जज्बा, आलिया भटचा हायवे, सोनाक्षी सिन्हाचा अकिरा, अनुष्का शर्माचा एन एच १०, प्रियांका चोप्राचा गंगाजल-२, तापसी पन्नूचा बेबी यांचा इथं आवर्जून उल्लेख करावा लागेल. आपल्यावरचा ‘हॉट अॅक्ट्रेस’ हा शिक्का पुसून वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी या माध्यमातून केला. त्यामुळेच अलीकडच्या काळातल्या अभिनेत्री आपली भूमिका अधिक डोळसपणे निवडताना दिसताहेत, असं म्हणावं लागेल. शिवाय पडद्याप्रमाणेच पडद्याबाहेरच्या भूमिकेबद्दलही त्या अधिक जागरूक असल्याचं दिसतं. मग ती आपल्या सावळ्या रंगावर झालेल्या टीकेला सडेतोड उत्तर देणारी नंदिता दास वा तनिष्ठा चॅटर्जी असेल किंवा नुकत्याच झालेल्या पाकिस्तानी कलाकारांबाबत आपलं परखड मत व्यक्त करणारी काजोल.

गाणी गाणारी सुंदर प्रेयसी, करवा चौथ करणारी सोज्ज्वळ बहू, आदर्श मुलगी, या टिपिकल इमेजमधून ही नायिका बाहेर पडू पाहतेय. तिच्या आसपासचं वास्तव जग झपाट्यानं बदलतंय, हे कदाचित तीसुद्धा अनुभवतेय. या जगात आपल्यासारखीच हाडामांसाची असणारी स्त्री, कुठल्या प्रसंगांना सामोरी जाते, त्याचे पडसाद कसे उमटताहेत हे ती पाहतेय. आपल्या ७० एमएमच्या सुरक्षित चौकटीबाहेर ‘हिराॅइन’ ठरायचं असेल तर कस लागतो तो धिटाईचा, मानसिक कणखरतेचा, निर्णयक्षमतेचा, आणि धडाडीचा, हे तिच्या लक्षात आलंय. आणि त्यामुळेच शारीर सौंदर्याला प्राधान्य देणाऱ्या उथळ भूमिका स्वीकारून घडीभरची सवंग लोकप्रियता मिळवण्याऐवजी, सामाजिक बांधिलकी जपत ‘रिल लाईफ’ नायिका ‘रिअल लाईफ’ नायिकेसाठी वेगळी रचनात्मक दृष्टी देऊ पाहताहेत, हेही नसे थोडके.

वंदना धनेश्वर, औरंगाबाद
vandana.d@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...