आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Vandana Dhaneshwar Article About Music Reality Show

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक गणिताचे जुळवलेले ‘सूर’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छोट्या पडद्यावर चॅनल्सची संख्या वाढते आहे तसा संगीतविषयक रिअ‍ॅलिटी शोजचा रतीब पडतो आहे. यामुळे घरटी प्रत्येक मायबापाला लेकरू सुरात रडत असल्याचा साक्षात्कार होत आहे. चॅनलतर्फे ऑडिशनची दवंडी पिटल्यावर संबंधित ठिकाणी लांबच लांब रांगा दिसतात. स्पर्धात्मक युगाची तोंडओळख व्हावी, आपल्या ‘प्रॉडक्ट’चं मार्केटमध्ये नाव व्हावं ही सहज मानवी प्रवृत्ती उचल खाते. शेवटी निवड झाल्याचं घोषित झाल्यानंतर, ‘याचसाठी केला होता अट्टहास’ म्हणत हे जीव अत्यानंदानं घराकडे वळते होतात.

अशा शोमध्ये सहभागी होण्याचा द्राविडी प्राणायामाचा सुरुवातीचा गमतीचा भाग वगळला तर यातल्या अनेक बाबी गांभीर्यानं घेतल्या जात नाहीत हीच संगीतविषयक रिअ‍ॅलिटी शोची शोकांतिका आहे. ८ ते १५ वयोगटातली मुलं स्टेजवर येऊन गाण्याच्या तयारीचं सादरीकरण करतात. मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रिटींना शोमध्ये पाहुणे म्हणून बोलावलं जातं. प्रेक्षकांचे एसएमएस आणि परीक्षकांनी दिलेल्या गुणांच्या आधारे विजेता-उपविजेता घोषित केला जातो. लाखो रुपयांची बक्षिसं वाटली जातात. गाजावाजा करून ग्रँड फिनाले साजरा करत चारचाकीसुद्धा बक्षीस म्हणून दिल्या जातात. मात्र ज्या मुलांना जिंकता आलं नाही, ती मुलं कुठं जातात, अशी मुलं भविष्यात गायनकला जोपासतात की नाही, हे जाणून घेण्यात कुणालाच रस नसतो. बरे, अशा शोजना परीक्षक म्हणून बर्‍याचदा फिल्म स्टार्सना का बोलावले जाते हेही न सुटलेले कोडेच आहे. स्पर्धकाची प्रत्येक गाण्यानंतर मुक्तहस्ते गुणगान करणारी सेलिब्रिटी मंडळी पाहून चक्रावून जायला होतं.

दुसरीकडे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक अत्यंत बाष्कळ आणि रटाळ संवाद साधत कार्यक्रम पुढे नेत असतात. चित्रपटांचं प्रमोशन करण्यासाठी येणार्‍या पाहुण्यांंबद्दल तर न बोललेलंच बरं. अशा कार्यक्रमांमध्ये क्वचितच शास्त्रोक्त संगीताची फेरी असते (अपवाद मराठी शोचा) त्यामुळे मग चारदोन उडत्या चालीची फिल्मी गाणी सादर केली की आपल्याला खूप छान गाणं म्हणता येतं, असा स्पर्धकांसह त्यांच्या पालकांचाही समज होतो. मग अशा कार्यक्रमातून तयार होतात ते निव्वळ ‘प्रासंगिक कलाकार’. हेच गाण्याच्या रिअ‍ॅलिटी शोचं चिंता करायला लावणारं वास्तव आहे. केवळ प्रायोजकांची आणि मोबाइल कंपन्यांची आिर्थक गणितं साधली जावीत, यासाठीच असे सूर आळवले जातात की काय, असा प्रश्न उपस्थित होतो. मनपसंत क्षेत्रात करिअर करण्यासाठी आधी त्याचा पाया पक्का असणं, शास्त्रोक्त पद्धतीनं गायन शिकणं, ते सादर करण्याचं महत्त्व आजच्या पिढीतल्या पालकांनाच नाही. याचं गांभीर्याच्या अभावी ते पाल्याला अशा स्पर्धांमध्ये उतरवण्याची घाई करतात.

गायन ही केवळ कला नाही. अथक परिश्रमांनी, देहभान विसरून केली जाणारी ती साधना आहे. संगीत शिकण्याची ही प्रक्रिया शेवटच्या श्वासापर्यंत सुरू असते. पंडित कुमार गंधर्व यांच्याशी विवाह झाल्यानंतर वसुंधरा कोमकली यांनी पंडितजींच्या शिष्या हे नातं आयुष्यभर जपलं हे उदाहरण या ठिकाणी पुरेसं बोलकं ठरावं. संगीताबद्दलचा असा समर्पणभाव होता म्हणूनच मोगूबाई कुर्डीकर, विष्णू पलुस्कर, गंगूबाई हनगल, एम.एस. सुब्बलक्ष्मी, भीमसेन जोशी, किशोरी आमोणकर, वीणा सहस्रबुद्धे, मालिनी राजूरकर, आरती अंकलीकर-टिकेकर अशी दिग्गज पिढी तयार होऊ शकली. त्यांच्या सुश्राव्य गायनामुळे रसिक श्रोत्यांचे ‘कान तयार’ झाले. आणि हीच त्यांच्या हुकमी गायकीची पावती आहे. यांच्यापैकी अनेक जण कोवळ्या वयात व्यासपीठावर गायले हे खरं, मात्र रागदारी-सुरावटी त्यांच्या रक्तात मुरलेल्या होत्या. सूर-ताल-लय हा त्यांचा श्वास होता. गाणं हा त्यांना मिळालेला वारसा होता. या आणि यांच्या काळातल्या अनेकांनी गुरूंकडून सतत शिकत राहून कायम विद्यार्थिदशेतच राहणं पसंत केलं. शिकतानाच कलेचा वारसा पुढच्या पिढीकडेही सोपवला. स्वत:ला गायक म्हणवणार्‍या आजच्या पिढीनं विशेषत्वानं लक्षात घेण्यासारखी ही बाब आहे. मुख्य म्हणजे या पिढीतल्या शिष्यांच्या वाट्याला गुरूंच्या कौतुकाचे शब्द सहजी मिळाले नाहीत. रियाज करत राहिल्यास शिष्य यापेक्षाही उत्तम काही देऊ शकतो हा शिष्यावरचा विश्वास आणि शिष्याकडून अधिकाधिक चांगलं घडावं, त्यात सातत्य राहावं हा हेतू कदाचित त्यामागे असावा.

संगीत परंपरेच्या या काही मोजक्या उदाहरणांचा उल्लेख या ठिकाणी करण्याचं कारण एकच की, सध्याचे संगीत रिअ‍ॅलिटी शोज, त्यातले परीक्षक, स्पर्धक कुठे आहेत, सांगीतिक क्षेत्र समृद्ध होण्याच्या दृष्टीनं ते कुठलं गुणात्मक योगदान देत आहेत याचा विचार व्हायला हवा. या पार्श्वभूमीवर, मेरी आवाज सुनो हा एक सुखद अपवाद होता असंच म्हणावं लागेल. १९९६मध्ये दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित झालेला हा पहिला रिअ‍ॅलिटी शो. विविध फेर्‍यांमधून चाललेला हा शो वर्षभर सुरू होता. पंडित जसराज, भूपेन हजारिका, मन्ना डे आणि लता मंगेशकर परीक्षक होते. एसएमएस किंवा तत्सम कुठल्याही भावनिक पाठिंब्याच्या आवाहनाशिवाय स्पर्धकांचं परीक्षण केलं गेलं. आणि त्यासाठी निकष होता स्पर्धकाचा आवाज, त्याच्या गाण्याचा आवाका आणि आवाजाचा पोत. केरळचा प्रदीप सोमसुंदरम आणि दिल्लीची सुनिधी चौहान या पहिल्या शोचे विजेते होते. अन्नू कपूरसारख्या जाणकार आणि संगीत क्षेत्रातल्या दर्दी माणसाकडे, मेरी आवाज सुनोच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी होती. अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन कसं असायला हवं याचा तो उत्कृष्ट नमुना होता.

मात्र, आजकालच्या अशा कार्यक्रमांतून नेमकं काय साध्य केलं जातं? थोड्याशा तयारीनं आपण गायक होऊ शकतो किंवा गाण्याच्या लकबीची हुबेहूब नक्कल केली की सहज दाद मिळवता येते, गाणं शिकण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागत नाही असा घातक समज नवीन पिढीत रूढ होतो आहे. आपण जे गातो आहोत त्यामागचा अर्थ जाणून न घेता निव्वळ स्पर्धेसाठी म्हणून गाणं म्हणणं ही वृत्ती बळावते आहे. अशा शोजमधून िवशिष्ट स्पर्धकांनाच संधी मिळणार असेल, पराभवाच्या नकारात्मक मानसिकतेमुळे काहींच्या आयुष्यातले ‘सूर’ कायमचे हरवणार असतील, सेलिब्रिटी वागणुकीमुळे मिळणारं यश डोक्यात जाऊन लहान वयातच ‘मी’पणा जन्म घेणार असेल तर अशा रिअ‍ॅलिटी शोजमुळे केवळ प्रायोजक आणि मोबाइल कंपन्यांचा गल्ला भरण्याला हातभार लागतो, असं म्हणायला जागा आहे. अशा वृत्तीमुळे कला शिकण्याचं गांभीर्य असणारे साधक निर्माण होण्याऐवजी ‘हंगामी कलाकारांची’ संख्या वाढेल हे नक्की...

वंदना धनेश्वर, औरंगाबाद
vandana.d@dbcorp.in