आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Dhaneshwar Article About Santosh Garje And Sahara Orphanage At Gevrai

सहारा देण्‍यातला 'संतोष'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड जिल्ह्यातील गेवराईपासून साडेतीन किलोमीटरवर माळरानावर उभी असलेली एक पत्र्याची इमारत. पाहताक्षणी त्यात विशेष वाटणार नाही. पण या इमारतीत गेल्यानंतर वेगळेपण नक्की जाणवते. सहारा परिवाराच्या या बालग्रामच्या इमारतीमध्ये प्रथमदर्शनी लक्ष वेधते ती तिथली दानपेटी. नेहमी दिसणा-या जाडजूड पत्र्याच्या, चहुबाजूंनी झाक
लेल्या दानपेटीऐवजी इथे आहे अनोखी, पूर्णपणे पारदर्शक दानपेटी. सहाराच्या एकूण पारदर्शी कामाप्रमाणे.
ही गोष्ट आहे संतोष गर्जे या ‘कफल्लक’ तरुणाच्या ‘श्रीमंत’कामाची. पुरेसं शिक्षण, कौटुंबिक पार्श्वभूमी, अनुभव, मार्गदर्शन यापैकी काहीही पाठीशी नसताना संतोषनं उभ्या केलेल्या चिमुरड्यांच्या परिवाराची. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना त्यांचं बालपण परत मिळवून देण्यासाठी तो करत असलेल्या धडपडीची. अनाथ मुलांना हक्काचा निवारा देण्यासाठी तो घेत असलेल्या अविश्रांत मेहनतीची. ही गोष्ट जितकी रोमहर्षक आहे, तितकीच त्याच्या ध्येयाच्या धाडसाची. त्याची गोष्ट जितकी प्रेरणा देणारी आहे, तितकीच अपयशानं खचून जाणा-या युवकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी.
भाचीच्या
त्रासातून प्रेरणा
संतोषचे कुटुंब ऊसतोडणी कामगारांचे. काही वर्षांपूर्वी त्याच्या मोठ्या बहिणीचे अकाली निधन झाले. बहिणीच्या लहानग्या मुलीची आबाळ त्याने जवळून अनुभवली. याचा त्याच्या मनावर एवढा परिणाम झाला की पोरक्या झालेल्या, ऊसतोडणी कामामुळे आबाळ होणा-या मुलांना हक्काचा निवारा मिळवून देण्याची खूणगाठ त्याने बांधली. काहीतरी करायचंय, पण नक्की काय हे संतोषला समजत नव्हतं. मात्र या अस्वस्थतेतही तो शांत बसला नाही. त्यानं कामाला सुरुवात केली. 2004 मध्ये गेवराई येथे सहारा अनाथालय स्थापन केलं. स्थापनेपासून आजपर्यंतच्या या प्रवासात संतोषने अनेक चढउतार पाहिले. हा मुलगा काय करणार म्हणून सुरुवातीला ऊसतोडणी कामगार आपल्या मुलांना अनाथालयात पाठवत नव्हते. तेव्हा संतोषनं घरोघरी फिरून मुले गोळा केली. त्यांच्या पालकांना भरवसा दिला. पत्र्याच्या खोल्यांमध्ये ‘सहारा’ला सुरुवात केल्यानंतर महिनाभरातच जीवनावश्यक वस्तूंची चणचण भासू लागली. त्या वेळी संतोषने दारोदार फिरून भीक मागून मुलांसाठी अन्न मिळवले. मुलांच्या गरजेच्या इतर वस्तू जमवल्या. दररोजच्या या संघर्षाची झळ त्याने मुलांपर्यंत कधीच पोहोचू दिली नाही. 2009पर्यंत संतोषच्या ‘सहारा’चं काम असंच सुरू होतं. त्यानंतर त्यानं आसपासच्या गावांत फिरून मुलांसाठी मदत मागायला सुरुवात केली. त्यामुळे ओळखी वाढल्या. लोकांचं सहकार्य मिळू लागलं.
सहारा ते बालग्राम
उधारीवर पत्रे घेऊन तीन खोल्यांच्या शेडमध्ये सुरू झालेला सहारा परिवार आता स्वत:च्या वास्तूत स्थलांतरित होतो आहे. या नवीन प्रवासात आता संतोषला पत्नी अ‍ॅडव्होकेट प्रीती यांची मोलाची साथ लाभली आहे. आठ मुलांच्या साथीने सुरू झालेल्या सहारा अनाथालयात आज सहा ते अठरा वयोगटातली चाळीस मुले-मुली आहेत. चार वर्षांच्या उमेशपासून बीए प्रथम वर्षात शिकणा-या परमेश्वरपर्यंत सगळ्यांनाच परस्परांविषयी खूप आत्मीयता आहे.
‘सहारा’मधल्या मुलांचे प्रत्येक आठवड्याला गट पाडून त्यांच्यावर जबाबदा-या दिल्या जातात, असं बालग्राममधल्या कामाची पाहणी करता करता संतोषने सांगितलं. यातून दोन गोष्टी साध्य झाल्या. प्रत्येक मुलावर श्रमप्रतिष्ठेचा व स्वावलंबनाचा संस्कार झाला आणि कामामध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव नसतो हेही त्यांच्या मनावर बिंबवता आल्याचंही तो सांगतो. नव्या वास्तूत स्थलांतर केल्यानंतर आता या मुलांना व्यावसायिक शिक्षण-प्रशिक्षणाच्या सुविधा पुरवण्याचा मानस असल्याचे संतोषने स्पष्ट केले.
अनेक माणसे जोडली
अमरावतीच्या डॉ. अविनाश सावजींच्या सेवांकुर संस्थेच्या एका शिबिराला संतोष उपस्थित राहिला होता. या शिबिरापासूनच ख-या अर्थाने मला बाहेरच्या जगाला ओळखता आले असे संतोष सांगतो. ‘या शिबिरातून खूप नवी माणसं सहाराशी जोडली गेली. माझ्या प्रयत्नांना मनुष्यबळाची साथ मिळाली. आमचा ग्रुप वाढत गेला. मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमा मिश्र, विकास-प्रकाश आमटे, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, सिंधुताई कुलकर्णी, अहमदनगरच्या स्नेहालयचे गिरीश कुलकर्णी या मोठ्या माणसांपर्यंत पोहोचता आलं. माझं काम व्यापक पातळीवर पोहोचवण्यात या सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे,’ असं संतोषने सांगितलं. या ओळखींमधून औरंगाबादच्या हरीश-महेंद्र जखोटिया व सुशील पिपाडा यांनी मिळून सहाराच्या बालग्राम प्रकल्पासाठी गेवराईत तीन एकर जागा दिली आहे. त्याच जागेत आता सहारा परिवार स्थलांतरित होणार आहे.
युवकांना संदेश
संतोषला कॉलेजमध्ये जाऊन शिकण्याची संधी मिळाली नाही. पुस्तकी ज्ञानही त्याच्याकडे फारसं नाही. मात्र जगण्याच्या आणि जगवण्याच्या धडपडीतून येणारं अनुभवाचं शहाणपण त्याच्याकडे आहे. त्यामुळेच आजच्या तरुणांनी भावना आणि व्यवहाराची सांगड घालणारं करिअर निवडावं असं त्याला वाटतं. आयुष्याला अर्थ देणारं, समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देतं तेच खरं करिअर, असं संतोषला वाटतं. ‘करिअर म्हणजे फक्त यश हे समीकरण डोक्यातून काढून टाका. इतरांसाठीही काही करता येते याची अनुभूती घ्यावी, अशा कामातून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न तरुणांनी करावा,’ असं तो सुचवतो.
आजच्या जेवणाचा प्रश्न मिटत नाही तोच संतोषसमोर ‘उद्या’ आ वासून उभा असायचा. आर्थिक चणचण तर कधी संपणारच नाही अशी त्याची परिस्थिती होती. मात्र अशाही स्थितीत मागे फिरावे असे त्याला कधी वाटले नाही. तो हताश झाला नाही. घेतलेल्या निर्णयाचा त्याला पश्चात्ताप झाला नाही. स्वीकारलेल्या कामात तडजोड करून शॉर्टकट मारावेसे वाटले नाहीत. परिस्थितीला, नशिबाला दोष द्यावासा वाटला नाही. सिस्टिमला शिव्या घालाव्याशा वाटल्या नाहीत.
उलट भेटणा-या माणसांकडून, आलेल्या अडचणींतून काही शिकायला मिळतंय यातच त्याला आनंद होता. सहारामधल्या लहानग्यांच्या चेह-यावर फुललेलं हसू पाहतच त्याने स्वत:चा आणि इतरांचा प्रवास सुसह्य बनवला. सुविधांची रेलचेल, ढीगभर पदव्यांची भेंडोळी, सहजतेने मिळणारा आणि नको तिथं खुळखुळणारा पैसा हाती असतानाही आयुष्य संपवायला निघालेले आजचे तरुण, असं काहीतरी काम करून आयुष्यात ‘संतोष’ शोधू शकतील?
vandana.d@dainikbhaskargroup.com