आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Dhaneshwar Article About Women Not Following A Career

करिअर अर्ध्यावर सोडताना...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरूच्या एका गुंतवणूक व्यवस्थापन कंपनीत एमडी असणार्‍या वैशाली कस्तुरे. दोनशे-अडीचशे जणांच्या गटाचं नेतृत्व करणार्‍या. कौटुंबिक कारणांमुळे वैशाली यांना नोकरीमध्ये काही तडजोडी कराव्या लागल्या. आता त्या आठवड्यातले तीन दिवस कार्यालयात जातात आणि उरलेले तीन दिवस लॅपटॉपवर घरी काम करतात. वैशाली यांनी अनेक वर्षे कंपनीसाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन कंपनी व्यवस्थापनाने त्यांना ही विशेष सवलत दिली आहे.

दुसरं उदाहरण, बंगळुरूच्याच गिरिधर जी.एस. या ई अँड वाय शेअर्ड सर्व्हिसेस कंपनीच्या सीओओचं. गिरिधर यांनी, बालविकारतज्ज्ञ असलेल्या पत्नीची प्रॅक्टिस व्यवस्थित सुरू व्हावी म्हणून काही काळासाठी नोकरीतून ब्रेक घेतला. अपत्याचं संगोपन आणि कुटुंबाची घडी बसल्यावर, पत्नीची प्रॅक्टिस सुरळीत झाल्यानंतर तीन वर्षांनी त्यांनी नवीन नोकरीत पुन्हा जम बसवला.

वैशाली यांच्यासारखं सांभाळून घेणारं कंपनी व्यवस्थापन किंवा बायकोसाठी काही काळ ब्रेक घेणारा गिरिधरसारखा समंजस नवरा प्र्रत्येकीच्या वाट्याला येईलच असं नाही. त्यामुळेच कितीतरी जणी नोकरी-करिअर अर्ध्यावर सोडून देतात. परिस्थिती किंवा आर्थिक अडचणींमुळे बहुतांश मुलींना मनाजोगत्या क्षेत्रात करिअर करता येत नाही. बर्‍याच जणींच्या गुणवत्तेच्या गाडीला लग्नाचे ब्रेक लावले जातात. आणि मग दहावी-बारावीमध्ये गुणवत्ता यादीत झळकलेल्या अनेक हुशार मुली काही वर्षांनंतर साचेबद्ध आयुष्य जगताना दिसतात.

शिक्षण, नर्सिंग, प्राध्यापक, खासगी नोकरी, आरोग्य, समाजसेवा यांसारख्या क्षेत्रातलं महिलांचं अस्तित्व दखल घेण्यासारखं आहे. मात्र मोजक्या महिलांच्या चाकोरीतल्या यशावर समाधान मानणं थांबवायला हवं. कृषितंत्रज्ञान, विज्ञान संशोधन, अंतराळविज्ञान, खगोलशास्त्र, फोरेन्सिक सायन्स, डिप्लोमसी, पर्यावरण, रिअल इस्टेट, अ‍ॅनिमेशन, बायोटेक यांसारख्या बुद्धीचा कस लागणार्‍या क्षेत्रात महिला गुणवत्तेला मात्र ओहोटी लागलेली दिसते.

पारंपरिकतेचा पगडा
सिल्व्हिया अ‍ॅन ह्युलेट या भारतासह जगातील विविध देशांतल्या महिलांंसदर्भात संशोधन करणार्‍या जागतिक ख्यातीच्या संशोधक. ह्युलेट दहा वर्षांपासून टॅलेंट इनोव्हेशन संस्थेच्या माध्यमातून, करिअरिस्ट महिलांच्या प्रेरणा, त्यांची ध्येयं, स्त्रियांच्या अर्थार्जनातले अडथळे या संदर्भात काम करत आहेत. ह्युलेट यांनी भारतात केलेल्या एका पाहणीच्या आधारे काही निष्कर्ष मांडले आहेत. त्यानुसार, नोकरी अर्ध्यावर सोडणार्‍या महिलांचे प्रमाण 36 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तसंच देशातील महिला आणि पुरुषांनी मिळून समसमान काम केल्यास जीडीपी रेट अर्थात सकल देशांतर्गत उत्पादनाचा टक्का 27 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो.

स्त्री-पुरुषांनी समसमान काम करणं हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो. कारण पुरोगामीपणाचा कितीही आव आणला तरी करिअर की कुटुंब असा तडजोडीचा प्रश्न जिथे उपस्थित होतो, तिथे तडजोडीसाठी महिलांना सरसकट गृहीत धरलं जातं. स्त्रीची इच्छा, तिची गुणवत्ता, शिक्षण, सामाजिक स्तर या बाबी दुय्यम ठरतात. वरचढ ठरते ती पारंपरिक विचारसरणीच. आणि याच विचारसरणीला बळी पडलेल्या कित्येक जणींच्या हुशारीला पूर्ण वाव, संधी आणि प्रोत्साहन मिळत नाही. जोडीदाराचा असमंजसपणा आणि कुटुंबाच्या असहकारामुळे बुद्धीला गंज चढलेल्या कितीतरी जणी आसपास दिसतात.

व्यापक दृष्टिकोनाचा अभाव
ग्रामीण भागात महिला साक्षरतेचं प्रमाण वाढलंय. त्यामुळे खेडोपाडी शिकणार्‍या विद्यार्थिनी, शहरातील विद्यार्थ्यांच्या बरोबरीने गुण मिळवतात. एकीकडे ही गोष्ट दिलासादायक, सकारात्मक आहे. मात्र लग्नाच्या बाजारात किमान पदवीधर मुलगी हवी, अशी अट हल्ली असते. मुलीला चांगलं स्थळ मिळावं, या उद्देशाने ग्रामीण भागातले पालक मुलींना शिकवतात. दरम्यान, एखादं बर्‍यापैकी स्थळ सांगून आल्यास त्या मुलीचं शिक्षण मध्येच थांबतं आणि शाळेसाठी दररोज कित्येक मैलांची पायपीट करणार्‍या, धुणीभांडी करून, चहाची टपरी चालवून किंवा भाजी विकून शिक्षणासाठी पै-पै साठवणार्‍या मुलीला शिक्षणाची हौस मारून संसारात मन रमवावं लागतं. शहरातही परिस्थिती वेगळी नाही. पालकांनी पदरमोड करून शिकवलेल्या, अगदी पदव्युत्तर पदव्या मिळवलेल्या अनेक महिलांचं विश्व आज घरापुरतंच मर्यादित राहिलं आहे. बायको वा सुनेने फक्त घर सांभाळावं या परिपाठामुळे, विशिष्ट पॅटर्न, सिलॅबस, ट्यूशन्स, यशाचा फॉर्म्युला, यांचं वर्चस्व हाणून पाडत, जीवतोड मेहनत करून भरघोस गुण मिळवणार्‍या कितीतरी जणी उर्वरित आयुष्यात काहीच करता आले नाही म्हणून कुढत बसतात. त्यांचं शिक्षण ना त्यांच्या स्वत:च्या उपयोगी पडतं, ना कुटुंबाच्या, ना समाजाच्या.

प्रयत्न हवेत सर्वोत्कृष्टतेसाठी
घरातील ज्येष्ठांचा सांभाळ, मुलांचं संगोपन-शिक्षण, लग्नानंतरच्या कौटुंबिक जबाबदार्‍या, नवर्‍याची नोकरी यांसारख्या कारणांसाठी महिला स्वत:च्या करिअरकडे पाठ फिरवतात. त्यातूनही तारेवरची कसरत करून काही जणी नोकरी-व्यवसायात स्वत:ची प्रतिभा सिद्ध करतात. स्वत:च्या क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र अशा धडपड्या महिलांचा टक्का कमीच आहे. पंचवीस ते तीस टक्के नोकरी करणार्‍या महिलांपैकी फक्त पाच ते सहा टक्केच महिला आपापल्या क्षेत्रात सर्वाेकृष्टतेसाठी आग्रही असलेल्या दिसतात. जागतिक महिलांच्या बाबतीत हेच प्रमाण जवळपास वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच फक्त अंगभूत गुणवत्ता असणं, शिक्षण मिळणंच महत्त्वाचं नाही. शिक्षणाचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोग, अनुभव घेत आणखी शिकणं, नवी आव्हानं पेलताना उत्कृष्टाचा ध्यास असणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या निकषावरही महिलांनी स्वत:मधल्या गुणवत्तेचा पुरेपूर वापर होण्याबद्दल आग्रही असणं गरजेचं आहे.

चित्र बदलू शकतं
लग्न, संसार, कुटुंब या गोष्टी समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आहेत हे खरं. मात्र हे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी कुणा एकालाच नेहमी तडजोड करावी लागू नये, याचं भानही राखलं जावं. महिलांमध्ये क्षमता आहे, त्यांना करिअर करायचं असेल तर सर्वच आघाड्या सांभाळाव्यात, अशी आडमुठी भूमिका सोडून दिल्यास कितीतरी प्रश्न सहज सुटू शकतात. जबाबदारीची समान विभागणी, कुटुंबाचं सहकार्य आदी केवळ पुस्तकी वाक्यं न राहता प्रत्यक्षात उतरायला हवीत. तरच गुणवत्ता यादीत झळकणार्‍या मुलींचं कौतुक करण्याला काही अर्थ प्राप्त होईल.

काही प्रतिक्रिया
अर्थशास्त्रात एमफिल केले. लेक्चरर व्हायचे होते. पण लग्नानंतर सेट-नेट, पीएचडी अभ्यासासाठी वेळच मिळत नाही. कौटुंबिक कारणांमुळे पूर्णवेळ नोकरी शक्य नाही म्हणून अर्धवेळ नोकरी करते. इतकं शिकूनही काहीच करता आलं नाही, याचं वाईट वाटतं. - विनया गांगल, नाशिक

बीएचएमएस केलं आहे. मुलाच्या शिक्षणासाठी काही वर्षे प्रॅक्टिस थांबवली. मुलं मोठी झाली. प्रॅक्टिस पुन्हा सुरू करायची आहे. पण आत्मविश्वासच उरलेला नाही. - सुनीता जाधव, औरंगाबाद (बदलेले नाव)

लग्नानंतर नोकरी करण्यासाठी भक्कम आधार हवाच. प्रत्येक वेळी तो मिळतोच असं नाही. त्यामुळे अपत्याच्या संगोपनाचा प्रश्न उभा राहतो. उच्च शिक्षण असूनही लग्नानंतर नोकरी करता आली नाही. पण आता कथ्थकमधलं शिक्षण पूर्ण करायचं ठरवलंय. - राजश्री पोहेकर, औरंगाबाद

मी एमबीए आहे. पती इंजिनिअर तर सासरे डॉक्टर अशी उच्च शिक्षणाची परंपरा आहे. सून उच्चशिक्षित असावी पण तिने नोकरी करू नये, या विचारांमुळे आता घरीच असते. - संध्या पवार, सोलापूर (बदलेले नाव)

व्यवसायानं आर्किटेक्ट होते. सुरुवातीला सासू-सासर्‍यांनी सहकार्य केलं. मात्र पतीची-माझी नोकरी वेगळ्या गावी. यामुळे ओढाताण होऊ लागली. त्यामुळे नोकरी सोडली. आता घरीच असते. - धनश्री मिरजकर, नाशिक
vandana.d@dainikbhaskargroup.com