आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Dhaneshwar Cover Story Police Officer's Wife

सकाळच्या ए‍कत्रित वेळेच्या टॉनिकची जादू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिस आयुक्त आणि त्यांचं कुटुंब म्हटलं की, डोळ्यांसमोर येते ती लाल दिव्याची गाडी. गणवेशात तत्परतेने आजूबाजूला वावरणारी मंडळी, आपलं स्टेटस जपणारे अधिकारी आणि त्यांच्या घरचे सदस्य. लाल दिव्याच्या गाडीतून फ‍िरणा-या तमाम अधिका-यांबद्दल जनतेच्या मनात आदर असतो, धाक असतो आणि त्यांच्या जीवनशैलीविषयी कुतूहलही. आणि त्यामुळेच की काय, अशा लोकांपासून सर्वसामान्य जनता जरा दूरच राहणे पसंत करते. मात्र, या सर्व समजुतींना बगल देऊन आपला साधेपणा जपणारी, कर्तव्य बजावणारी मंडळीही असतात. कामाच्या अनियमित वेळा, पुरेशा विश्रांतीचा अभाव, सतत धोक्यात असणारा जीव आणि सुट्यांच्या कमतरतेमुळे कुटुंबासाठी मिळणारा अत्यल्प वेळ यावर मात करून ही मंडळी सेवेचं-संरक्षणाचं व्रत निरंतर सुरू ठेवतात. स्वत:च्या पदाचा मोठेपणा न मिरवता चारचौघांसारखी वागणारी मंडळीही याच गणवेशाच्या आड दडलेली असतात. अशांपैकी एक म्हणजे औरंगाबादचे पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह आणि त्यांच्या पत्नी सरोज.

सरोज आणि राजेंद्र सिंह मूळचे हरियाणाचे. मात्र, नोकरीच्या निमित्ताने अनेक वर्षं महाराष्ट्रात राहावं लागल्यानं, आम्ही आता पक्के महाराष्ट्रीय झालो आहोत, असं सरोज अभिमानाने सांगतात. इथल्या संस्कृतीशी एकरूप झाल्याचा त्यांना आनंदच आहे. ‘ताणतणाव हा प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो. आपण त्याला किती महत्त्व देतो यावर त्याचं गांभीर्य अवलंबून असतं. कामाच्या अनियमित वेळा, जीविताला असलेला धोका यामुळे तणावाची परिस्थिती अनेकदा उद्भवली आहे. मात्र, कामाशी संबंधित सर्व गोष्टी ते घराच्या बाहेरच सोडून येतात. घरी आल्यानंतर ते सामान्यांप्रमाणे एक पती आणि मुलांचे बाबा असतात. सकारात्मकतेने परिस्थिती हाताळण्याचं कसब त्यांच्याकडे असल्यामुळेच हे शक्य होतं,’ असं श्रीमती सिंह कबूल करतात.

आज लग्नाला २६ वर्षं लोटली. एकमेकांच्या वाढत्या सहवासानुसार परस्परांतील समजूतदारपणा वाढत गेल्याने तणावाचं विशेष काही वाटत नाही, असं सरोज यांनी सांगितलं. ‘वास्तविक मी पॉलिटिकल सायन्समध्ये एम.ए. माहेरी वडील वकील, तर भाऊ डॉक्टर. राजेंद्र यांनाही पोलिस खात्याची कुठलीच पार्श्वभूमी नाही. मात्र, बँकिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय पोलिस सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही सर्वांनी अर्थातच त्यांना सपोर्ट केला,’ असं त्या म्हणतात.

‘प्रीती आणि सुमित या दोन्ही मुलांना लहानपणापासून सामान्य मुलांप्रमाणेच वाढवलं. तुमचे वडील पोलिस खात्यात आहेत त्यामुळे तुम्हाला घरातले मदतनीस, घराबाहेर पडल्यावर बाहेरची माणसं, कोणीही विशेष वागणूक देईल अशी अपेक्षा ठेवू नका, हे मनावर बिंबवलं. कारण हे सर्व तुमच्या वडिलांच्या मेहनतीचे आहे, तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर हे सगळं मिळवायचं आहे, हे त्यांना समजेल यासाठी मी सतत दक्ष राहिले. त्यासाठी आम्ही दोघांनीही आमचं वागणं त्या पद्धतीचं ठेवलं. मुलांच्या शाळेतल्या ओपन हाऊसला आम्ही केवळ त्यांचे पालक म्हणूनच हजर राहिलो. शिवाय दैनंदिन जीवनातली कामंही मी याच पद्धतीनं आटोपते. किराणा आणणं, इतर खरेदीसाठी मी सामान्य गृहिणीसारखीच घराबाहेर पडते. त्यातूनही कारने खरेदीसाठी गेले तरी रस्ते वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्याच्या मी ड्रायव्हरला सूचना केलेल्या असतात. त्यामुळे आज मुलं कळती होऊनही त्यांना खाकी गणवेश, लाल दिव्याची गाडी किंवा विशेष वागणुकीचं आकर्षण नाही. सार्वजनिक जीवनात वावरताना आमची मुलं चारचौघांसारखीच वागतात,’ असं सरोज यांनी गप्पांदरम्यान सांगितलं.

‘मुलं लहान होती तेव्हा मला स्वत:साठी वेळ नाही देता यायचा. शिवाय राजेंद्र यांच्याही कामाच्या वेळा निश्चित नसल्यामुळे मला मुलांना वेळ देणं आवश्यक होतं. मात्र, आता मुलं अभियांत्रिकी शाखेतलं शिक्षण घेऊन मोठी झाली आहेत. त्यामुळे मला स्वत:साठी पुरेसा वेळ देता येतो. पोलिस खात्यातील अधिकारी-कर्मचा-यांच्या पत्नीची, नवरा वेळ देत नाही ही सामान्यपणे तक्रार असते.

मात्र, यावर आम्ही दोघांनी उपाय शोधून काढला आहे. मला बागकामाची आवड आहे. आतापर्यंत जिथं-जिथं नेमणूक झाली तिथं-तिथं क्वार्टर्समधल्या अंगणात मी भाजीपाला, फुलझाडं, फळझाडं लावली आहेत. औरंगाबादमधल्या घरीही छोटीशी बाग तयार केली आहे.
रोज सकाळी मी आणि राजेंद्र या बागेत थोडा वेळ काम करतो. तो आमचा एकमेकांसाठीचा विशेष वेळ असतो, त्या दरम्यान आमचं बोलणं होतं. मुलांबद्दल-नातेवाइकांबद्दल आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चाही होते. हाच सकाळचा वेळ आम्हाला एकत्र मिळतो.
एकमेकांसाठी तो देत असल्याने मग दिवसभरात इतर वेळी आम्ही सोबत नसलो किंवा बाहेरगावी कामानिमित्त त्यांना काही दिवस जावे लागले तरी त्याबद्दल नाराजी वाटत नाही,’ असं सरोज आवर्जून सांगतात. त्यांना तेव्हा कदाचित लक्षात आलंही नसेल की, हा किती महत्त्वाचा मंत्र त्यांनी सर्वच जोडप्यांना दिला आहे.