रुग्णालयाचा आयसीयू विभाग.ऐंशीच्या आसपास वय असलेल्या एक अत्यवस्थ आजी. दोन दिवसांपेक्षा जास्त जगणार नाहीत,, असं डॉक्टरांचं निदान. मात्र महिनाभरावर आलेल्या एकुलत्या एक नातीचं लग्न पाहण्यासाठी त्या आजींचा जीव गुंतलेला. ते पाहून रुग्णालयातले काही आजी-आजोबा एकत्र येऊन एक निर्णय घेतात. डॉक्टरांची परवानगी काढतात. आणि त्या आजीच्या समोर एकुलत्या एक नातीचं आयसीयूमध्ये लग्न लावतात. त्याच संध्याकाळी त्या आजी शेवटचा श्वास घेतात.
कुठल्याही चित्रपटात शोभून दिसेल असा हा प्रसंग. मात्र, ना हा प्रसंग फिल्मी आहे, ना त्यातली माणसं काल्पनिक. हा प्रसंग घडलाय औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात. आणि त्यातले लग्न लावून देणारे आजी-आजोबा आहेत तिथले सेवाव्रती. रुग्णालय शब्द उच्चारल्यानंतर मनात डोकावणा-या पारंपरिक विचारांच्या चौकटीला छेद देत, रुग्णालयातील कर्मचा-यांप्रमाणेच काम करणा-या सेवाव्रती आजी-आजोबांनी नवा आदर्श समवयस्कांसमोर घालून दिलाय. या आजी-आजोबांमध्ये कधी असतात, कर्मठ विचारांचे असूनही रुग्णाच्या काळजीपोटी नमाज अदा करणारे जगन्नाथ कहाळेकर, तर कधी असतात या सेवाव्रतींचे समन्वयक प्रल्हाद पानसे, कधी रुग्णांना औषध सेवनाबद्दल मार्गदर्शन देणारे बाबूराव सदाव्रते, तात्कालिक उपचार कक्षात रुग्णांना धीर देणारे चंद्रकांत देशपांडे, उमाकांत कागवटे, तर कधी रुग्णालयात नियमित येणारे डॉ. शोभा आणि मधुकर तांदळे दांपत्य. यांच्यासारखी जवळपास ५४ मंडळी आज रुग्णालयात सेवाव्रती म्हणून कार्यरत आहेत. कुठल्याही व्यावहारिक लाभाच्या अपेक्षेशिवाय. निरलस आणि नि:स्पृह वृत्तीने पंधरा वर्षांपासून ही मंडळी इथल्या कामात गुंतलेली आहेत.
हेडगेवार रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. अनंत पंढरे १९९७-९८मध्ये कामानिमित्त अमेरिका दौ-यावर गेले असताना त्यांनी ह्यूस्टनमधल्या एमडी अँडरसन या कॅन्सर रुग्णालयाला भेट दिली. त्या वेळी त्या रुग्णालयातला व्हॉलंटिअर प्रोग्रॅम त्यांनी बघितला. भारतात परतल्यावर, निवृत्त हातांना काहीतरी काम द्या, असा आग्रह करणारे भालचंद्र कुलकर्णी आणि प्राजक्ता पाठक यांच्याशी पंढरे यांची गाठ पडली. आणि त्यानंतर हळूहळू साकारली सेवाव्रती ही संकल्पना. कुलकर्णी आणि पाठक आजी-आजोबा हे अर्थातच पहिले सेवाव्रती. तेव्हापासून आजतागायत सेवाव्रतींची संख्या वाढते आहे.
विविध क्षेत्रांतून, मोठ्या पदांवर निवृत्त झालेली पन्नासहून अधिक मंडळी सध्या इथं नियमित सेवा देतात. डॉ. पंढरे यांच्या संकल्पनेतून रुजलेल्या या उपक्रमाची दखल अहमदाबादच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटनेही घेतली आहे. शिवाय मुंबई, पुण्यातल्या अनेक रुग्णालयांतही ही संकल्पना अनुकरण्यात आली आहे.
सेवाव्रती आजी-आजोबांनी इथं नियमित यायलाच हवं, असा कुणाचाही आग्रह नाही. किंवा ही मंडळी सेवा देतात म्हणून त्यांना कुठल्याही वैद्यकीय सेवा मोफत पुरवल्या जात नाहीत. त्यांना मानधन दिलं जात नाही. त्यांच्या कामाची कुठेही जाहिरात नाही. ही मंडळी स्वेच्छेनं प्रवासखर्च करून रुग्णालयात येतात. रुग्णालयातील डॉक्टर आणि प्रशासकीय कर्मचा-यांच्या बरोबरीनं रुग्णसेवा करतात. रुग्णालयाचा स्वागत कक्ष असो किंवा ऑपरेशन थिएटर, रक्तपेढी असो किंवा प्रसूती विभाग, प्रिस्क्रिप्शनसंदर्भातलं मार्गदर्शन असो किंवा रुग्णांना रिपोर्ट देणं, तात्कालिक सेवा विभाग किंवा बाह्यरुग्ण नोंदणी असो; प्रत्येक विभागात सेवाव्रती आजी-आजोबा
आपल्या क्षेत्रानुसार, शारीरिक क्षमतेनुसार सेवा देतात. बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांना मदत करतात. धीर देतात. रुग्णांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देतात. दानशूर मंडळींनी सेवाव्रतींसाठी दिलेल्या निधीचा हिशेब ठेवला जातो. त्या पैशातून रुग्णांसाठी चहा, जेवण, नाष्ट्यासारख्या सुविधा पुरवल्या जातात. प्रत्येक कामाचं नियोजन, कामातली-वागण्यातली शिस्त आणि कर्तव्याबद्दल समर्पणभाव जपणं हा या सेवाव्रतींचा स्थायीभाव बनला आहे. या आजी-आजोबांचा काम करण्याचा उत्साह, उपयोगी पडण्याची वृत्ती, वागण्यातली ऋजुता यामुळे डॉक्टर-प्रशासन आणि रुग्ण यांच्यातल्या संवादाचा पूल म्हणजे हे आजी-आजोबा आहेत.
जगन्नाथ कहाळेकर हे ९४ वर्षांचे आजोबा इथले सर्वात ज्येष्ठ सेवाव्रती. वयोमानामुळे त्यांना खूप सेवा देता येत नसली तरी ते दररोज रुग्णालयात येतात. अॅडमिट असलेल्या सर्व रुग्णांची आस्थेने विचारपूस करतात. विशेष म्हणजे संपूर्ण रुग्णालयात रुग्णांना भेटण्यासाठी फिरताना ते लिफ्टचा अजिबात वापर करत नाहीत. सेवाव्रतींमध्ये काही तरुण मंडळीही आहेत. प्राथमिक शिक्षिका असणारी मीनाक्षी सूर्यवंशी ही २८ वर्षांची तरुणी त्यांपैकीच एक. ज्येष्ठ नागरिकांकडे बोलण्यासारखं, सांगण्यासारखं खूप असतं. मात्र, ते ऐकून घ्यायला आजच्या पिढीकडे वेळच नाही. अशा परिस्थितीत सेवाव्रतींसोबत काम करणं ही गोष्ट आत्मिक समाधान देणारी आहे, असं ती सांगते. शिवाय अधिकाधिक तरुण मंडळींनी यासाठी पुढे यावं, असंही ती म्हणते. रुग्णालयाच्या स्वागत कक्षात असलेल्या फळ्यावर सुंदर अक्षरात सकारात्मक दिशा देणारा सुविचार लिहिणं हे मीनाक्षीचं वैशिष्ट्य. ते काम ती नित्यनेमाने करते.
आयुष्याच्या संध्याकाळी जाणवणारी विचित्र अस्वस्थता प्रत्येक ज्येष्ठ नागरिक अनुभवत असतो. मात्र, सेवाव्रती या नियमाला अपवाद ठरले आहेत. उत्साह, चैतन्य आणि सकारात्मकतेचा अविरत स्रोत या आजी-आजोबांमध्ये आहे. विशेष म्हणजे सेवाव्रती झाल्यानंतर आपल्या वैयक्तिक आयुष्यातही खूप चांगले बदल झाल्याचं हे सेवाव्रती मोकळेपणाने सांगतात. लोकांमध्ये मिसळल्यामुळे व्यक्तिगत दु:खाचा विसर पडतो. करण्यासारखं अजून खूप काही आहे, याची जाणीव होते. आपलीही समाजाला गरज आहे, ही भावना जगण्यासाठी नवी ऊर्जा देत असल्याचं, जगण्याची उभारी मिळत असल्याचं ते सांगतात.
आजच्या व्यावहारिक जगात दानधर्मही जिथे करकपात मिळण्याच्या अपेक्षेने केला जातो तिथे सेवाव्रती आजीआजोबा करत असलेलं काम निश्चितच निव्वळ टीव्ही पाहण्यात, सकाळ-संध्याकाळ बागेत बाकावर बसून घरच्या व्यक्तींबाबत तक्रारी करण्यात किंवा बिछान्यात पडून आपल्या असल्या-नसल्या आजाराचं कौतुक करून घेणा-या ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे. श्रीकृष्णानं भगवद्गीतेत सांगितलेला निष्काम कर्मयोग यापेक्षा वेगळा नाही हे नक्की.
सहज सुचलं म्हणून...
रुग्णालयात प्रवेश केल्यावर लक्ष वेधतो तो सुंदर अक्षरात सुविचार लिहिलेला फळा. डॉक्टर, पेशंट, त्यांचे नातेवाईक यांना दिवसभराची सकारात्मक ऊर्जा पुरवणारा. आजार बरा करण्याइतकाच रुग्ण-डॉक्टर संबंध नसतो. त्यापलीकडे या दोघांमध्ये असलेलं भावनेचं, विश्वासाचं नातं जपतात-वृद्धिंगत करतात ती ही सेवाव्रती मंडळी...
(असा उपक्रम आपल्या शहरात सुरू करण्याची इच्छा असणा-या डॉक्टरांनी डॉ. अनंत पंढरे यांच्याशी ९८२२४३५५५० या क्रमांकावर संपर्क साधावा.)