आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार्मिंग चाळिशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सभोवताल पाहण्याची नवी दृष्टी, सूर्यास्ताचा नव्याने आनंद घेण्याची संधी, शरीर-मनाचं संतुलन राखण्यासाठीची पर्वणी, राहून गेलेल्या गोष्टी करण्याची संधी अशा सकारात्मकतेने चाळिशीला सामोरं जात सायकलिंगचा विश्वविक्रम करणा-या नागपूरच्या डॉ. सुनीता धोटे यांच्याविषयी...

नागपूर ते पुद्दुचेरी हे १,४१२ किलोमीटरचं अंतर. सलग सात दिवस सायकल प्रवास. दररोज बारा ते पंधरा तासांत कापलेलं २२५ किलोमीटरचं अंतर, यादरम्यान केवळ पंधरा मिनिटांचा ब्रेक आणि तब्बल सहा शहरं ओलांडून गाठलेलं लक्ष्य. पंचविशीतल्या तरुणांनाही लाजवेल असं हे वर्णन आहे चाळिशीतल्या आपल्या एका मैत्रिणीचं. सायकलिंगमध्ये एक नवा विक्रम भारतीय महिलेच्या नावावर असावा, यासाठी धडपडणारी ती ध्येयवेडी मैत्रीण आहे, नागपूरची डॉ. सुनीता धोटे. नुकतीच वयाची चाळिशी ओलांडलेल्या सुनीता यांनी या सायकल प्रवासाच्या निमित्ताने वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान तर पटकावलं आहेच, शिवाय भारतीय महिलांना चाळिशीकडे पाहण्याचा नवा ‘अ‍ॅटिट्यूड’ही दिलाय.
सुनीता यांची आई गृहिणी तर वडील हवाई दलामध्ये. पारंपरिक विचारसरणीत सुनीता यांचं बालपण गेलं तरीही त्यांनी आपल्याला आवडणा-या उंच उडी आणि सायकलिंगसारख्या खेळांची आवड जोपासली. राष्ट्रीय पातळीपर्यंतची कामगिरी त्यांनी करून दाखवली. लग्नानंतर सुनीता यांच्या आवडी-निवडीला त्यांच्या सासरच्या मंडळींनी खूप प्रोत्साहन दिलं. त्यामुळेच लग्नानंतर पोहायला शिकून सुनीता नॅशनल चॅम्पियन बनण्यापर्यंतची मजल मारू शकल्या. सध्या त्या नागपुरातल्या रामदेवबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये व्यवस्थापन विषयाच्या प्राध्यापिका आहेत.
'वय हा मुद्दा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा नाहीच. मॅटर करतो तो तुमचा दृष्टिकोन. तुमचा आत्मविश्वास. प्रत्येक स्त्रीमध्ये ही शक्ती असतेच; पण ती ओळखण्यात ती मागे पडते. वाढत्या वयाचा अडसर वाटतो. त्यामुळे आपल्याला आनंद वाटणा-या गोष्टी महिलांनी कराव्यात, असं मला वाटतं. या रेकॉर्डच्या निमित्ताने मी पहिल्यांदाच रेसर सायकल चालवली. या प्रयोगात थोडी धाकधूक होतीच, मात्र लक्ष्य गाठायचंच, हा निश्चय पक्का होता. प्रवासाच्या तिस-याच दिवशी रेसर सायकल पंक्चर झाली. पर्यायी सायकलची व्यवस्था होती; पण थोडं नैराश्य आलंच. पण त्या वेळी माझ्या मुलाशी फोनवरून बोलल्यानंतर मला खूप हुरूप आला. मी प्रवास पूर्ण केला,' उंच, तरतरीत, उत्साही आणि भरभरून गप्पा मारणा-या सुनीता आपल्या खास ‘वैदर्भीय टच’मध्ये प्रवासाचं वर्णन करतात तेव्हा सुनीता यांनी चाळिशी पार केलीय, यावर विश्वास बसत नाही.
या प्रवासानं आपल्याला सर्वार्थानं समृद्ध केलं. आत्मविश्वास, धडाडी, हिंमत, धोका पत्करण्याची मानसिकता, अवघड प्रसंगांना सामोरं जाण्याची तयारी या सर्वच पातळ्यांवर स्वत:ला नव्याने तपासून पाहण्याची संधी या निमित्ताने मिळाल्याचं सुनीता सांगतात.
चाळिशी म्हणजे निवृत्तीचा उंबरठा, असा सर्वसाधारण समज असतो. कौटुंबिक जबाबदा-या स्थिरावलेल्या असतात. भौतिक सुखाची, आर्थिक बेरीज-वजाबाकीची गणितं आपापल्या चौकटीपुरती जुळवली गेलेली असतात. विशीतली धडपड आणि तिशीतली गडबड मागे पडलेली असते. कुटुंबातला प्रत्येक जण स्वत:च्या विश्वात रमलेला असतो. परस्परांवरचं अवलंबित्व कमी झालेलं असतं. तुलनेनं कामं कमी आणि अस्ताव्यस्त पसरलेला वेळ, असा हा काळ महिलांसाठी जरा त्रासदायक ठरतो. घरात आपली गरज उरलेली नाही ही भावना गृहिणींना सतावते, तर नोकरी करणा-यांचा महिलांचा दुहेरी पातळीवर झगडा सुरू असतो. महिलांच्या या अस्वस्थतेत भर घालते ती मेनॉपॉजची चाहूल. एकूणच शारीरिक आणि मानसिक आंदोलनांना सामोरं जाणा-या महिलांच्या दृष्टीने मग हा काळ डोकेदुखी ठरतो. मात्र, आयुष्याच्या उत्तरार्धाचा आरसा असणा-या या चाळिशीकडे जर सकारात्मकतेने पाहता आलं तर? तर नक्कीच चाळिशीचं अस्तित्व केवळ वयोमानाच्या आकड्यापुरतंच मर्यादित राहील. एखादी गोष्ट पार पाडायचीच याचा पक्का निश्चय जेव्हा मनाशी होतो तेव्हा तुम्ही तुमच्या ध्येयाच्या अर्ध्या वाटेपर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला असतो, या अनुषंगानं स्वत:च्या क्षमता नव्यानं आजमावून पाहायला काय हरकत आहे? एखादा नवा छंद, प्रवास, गाण्यांच्या मैफली, समवयस्क मित्रमैत्रिणींसोबत सामाजिक उपक्रमाचे प्रयोग वास्तवात उतरवायला काय हरकत आहे? प्रत्येकीला अगदी सुनीता यांच्यासारखा विश्वविक्रम करणं जमेलच, असं नाही; पण आपल्या वाट्याला आलेल्या आभाळात मनसोक्त भरारी मारण्याचा प्रयत्न तरी आपण करून बघितला हे समाधानही थोडके नसे. शेवटी चाळिशीला मिडलाइफ क्रायसिस म्हणून कुढत बसायचं की सुनीतासारखं लाइफ बिगिन्स अ‍ॅट फॉर्टी म्हणून अनोळखी दिशेने झेप घेण्याची हिंमत दाखवायची, हे शेवटी आपणच ठरवायचं.