आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Dhaneshwar Story About Women’s Self Help Groups

महिलांची ‘पत’ कायम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातल्या शांताबाई. शेतात सालदारी करून पोट भरणारं त्यांचं कुटुंब. कमावणारी मंडळी मोजकीच. आर्थिक ओढाताणीमुळे मुलांना पुढं शिकवता येत नव्हतं. काहीतरी करून ही परिस्थिती बदलायचीच असं शांताबाईंनी ठरवलं. गावातल्या त्यांच्यासारख्याच इतर काही जणींना त्यांनी एकत्र आणलं. छोटा गट बनवला. त्या गटाच्या माध्यमातून दर महिन्याला त्या सगळ्या जणी ठरावीक रक्कम बाजूला टाकू लागल्या. काही महिन्यांनंतर शांताबाईंनी गटाची नोंदणी केली. गटाला मिळणा-या सवलतींबद्दल जाणून घेतलं. बचतीच्या आधारे मिळू शकणा-या कर्जाबद्दल माहिती करून घेतली. गटसदस्यांसोबत चर्चा करून कर्ज काढणं कसं फायद्याचं ठरू शकतं हे पटवून दिलं. शांताबाई आणि त्यांच्या गटानं कर्ज काढून किराणा सामानाचा व्यवसाय सुरू केला. त्यातून इतर महिलांनाही स्वत:च्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली. मुलांना शिकवण्याचं शांताबाईंचं स्वप्नही प्रत्यक्षात उतरलं.
कडा-आष्टी तालुक्यातल्या सुमनताईंची गोष्टही अशीच. घरी कोरडवाहू जमिनीतून फारसं उत्पन्न नाही. त्यामुळे सुमनताई पतीसह गावात हंगामी काम करून चरितार्थ चालवायच्या. थोडंफार तरी नियमित उत्पन्न मिळू शकेल असं काहीतरी करायचं यासाठी सुमनताईंची खटपट सुरू होती. त्यांनी जमीन विकून आलेल्या पैशात कर्ज काढून भर घातली. छोटीशी जागा घेतली. दोन शिलाईयंत्रं विकत घेतली. शिवणकामाचं दुकान थाटलं. टेलरिंगसोबतच आता त्या शिवणकामाचे क्लासेसही घेतात.
०आर्थिक जागरूकता- स्त्री सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या महिला बँकेचं जाळं खेड्यापाड्यापर्यंत कधी पोहोचेल हे सांगता येणार नाही. मात्र शांताबाई, सुमनताईंसारख्या हजारो महिलांनी स्वत:च्या आर्थिक बळकटीकरणासाठी फार पूर्वीच पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातल्या महिलांच्या कर्ज घेण्याच्या प्रमाणात दुपटीने झालेली वाढ हे त्याचंच द्योतक. पुरेसं शिक्षण गाठीशी नसलं तरी व्यवहाराला अत्यंत चोख असलेल्या या ग्रामीण भागातल्या महिला. त्यांनी गेल्या काही वर्षांत आर्थिक स्वावलंबनाच्या माध्यमातून केवळ वैयक्तिकच नाही तर सामाजिक परिस्थितीमध्येही आमूलाग्र बदल घडवला आहे. या महिलांनी गावातल्या गावात इतर महिलांसाठीही उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले आहेत. बचत गटाच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक पातळीवर कर्ज काढून त्यांनी नियमित उत्पन्नाचा मार्ग शोधलाय.
बदलती सामाजिक परिस्थिती, वाढत्या गरजा आणि चांगलं जीवनमान जगण्याची तीव्र इच्छा यामुळे खेड्यापाड्यातल्या या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक जागरूकता निर्माण झाली आहे. मुलांच्या शिक्षणासाठी, पाळणाघर, ब्यूटी पार्लर, शिवणकाम, किराणा सामान-कापड व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय, गृह उत्पादनं, बचत गटांतर्गतचा कर्जपुरवठा आणि सावकाराच्या कचाट्यातून सुटकेसारख्या असंख्य कारणांसाठी ग्रामीण भागातल्या महिला कर्ज काढण्यासाठी पुढे येत आहेत.
०बँकेचे व्यवहार आत्मविश्वासाने - या सगळ्या महिलांमधला एक समान धागा म्हणजे त्यांच्यात असलेला आत्मविश्वास. सुरुवातीला चारचौघात वावरताना बिचकणा-या या महिला आता मोठ्या धिटाईने बँकेचे सर्व व्यवहार पार पाडतात. पूर्वी केवळ मुलगा अथवा नव-याच्याच सोबतीने या महिला बँकेत यायच्या. मात्र आता एकटीने सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे.
कर्ज मिळवण्यासाठी बँकेत जाणं, कर्जप्रक्रिया समजावून घेणं, व्याजदराचा हिशेब, कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव, कर्ज खातं उघडणं, या सगळ्या गोष्टी या महिला अगदी व्यवस्थित पार पाडतात. पुढाकार घेऊन याच्याशी संबंधित किचकट गोष्टीही शिकून घेतात. विशेष म्हणजे आपण ग्रामीण भागातील असल्याचा कुठलाही न्यूनगंड मनात न बाळगता, जे समजले नाही त्याबद्दल न लाजता त्या चौकशी करतात. कर्ज काढणं आणि त्याची परतफेड या महिला स्वत:च करत असल्यामुळे अवलंबून न राहण्याची धाडसी वृत्ती या महिलांची बनली आहे.
०कर्जफेडीत तत्परता - कर्जाचा पुरवठा आणि त्याच्या परतफेडीसंदर्भात विविध सवलती तसेच पर्याय ग्रामीण भागातल्या महिलांसाठी उपलब्ध आहेत. बहुतांश महिला उत्पादक विविध कारणांसाठी कर्ज काढतात. अन्य कर्जदारांच्या तुलनेत ग्रामीण भागातल्या महिलांचे कर्ज परतफेडीचे प्रमाण जवळपास 95 टक्के आहे हे विशेष. सहकारी, खासगी किंवा सरकारी बँकेकडून काढलेल्या कर्जाची महिला वेळेत आणि नियमित परतफेड करतात. महिलांच्या या वैशिष्ट्यामुळे बँकिंग क्षेत्रात महिलांची पत कायम आहे. अशा महिला कर्जदारांसाठी बँकेकडून व्याजदरात खास सूट दिली जाते. ग्रामीण महिला कर्जदारांसंदर्भात विशेष बाब म्हणजे या महिला आधीचं कर्ज वेळेत परत करून पुन्हा नवीन कर्ज काढण्यासाठी उत्सुक असतात. वर उल्लेख केलेल्या शांताबाईंच्या बचत गटानं आधीच्या दोन्ही कर्जांची परतफेड करून आता तिस-यांदा पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला आहे.
०धोका पत्करण्याची मानसिकता - बँकेच्या कर्जाची फेड करता येईल का, ज्या कारणासाठी कर्ज काढतो आहोत तो उद्देश सफल झाला नाही तर, किंवा बँकेचे हप्ते थकले तर यासारख्या सर्व शक्यतांचा डोळसपणे विचार करून, नियोजनपूर्वक या महिला कर्ज काढण्यासाठी पुढे येत आहेत. मनातल्या इच्छा-आकांक्षांना मूर्त रूप देण्यासाठी प्रसंगी थोडा धोका पत्करण्याचीही तयारी त्यांनी केली आहे. ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान या परंपरागत मानसिकतेतून आता या महिला बाहेर पडू लागल्या आहेत.
आर्थिक व्यवहार करण्याचा विश्वास महिलांच्या अंगी यावा, भाषा, शिक्षण, सामाजिक स्तर अशा भिन्न-भिन्न वर्गांतल्या महिलांना आर्थिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारने महिला बँकेचा उपक्रम सुरू केला. या बँकेचा लाभ तळागाळातल्या महिलेपर्यंत पोहोचण्यासाठी अजून बराच वेळ लागणार आहे. मात्र खेड्यापाड्यातल्या अल्पशिक्षित महिलांनी एकमेकींच्या साथीने, बिकट वाट वहिवाट करण्यासाठी दाखवलेली ही हिंमत ग्रामीण महिला सक्षमीकरणाच्या वाटेवरचा मैलाचा दगड ठरली आहे हे नक्की...