आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रासंगिक देशभक्‍ती' नको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर दोन वर्षांनी नवऱ्याच्या बदलीमुळे पॅक-अनपॅक करावा लागणारा संसार. त्याच्या सोबतीशिवाय पार पाडाव्या लागणाऱ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या. चारचौघींसारखं सरळसाधं नसलेलं आयुष्य. अस्थिरतेमुळे स्वत:च्या करिअरला घालावी लागणारी मुरड. अनिश्चिततेत उगवणारा आणि तणावात मावळणारा दिवस. सीमेवर तैनात लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीच्या जीवनाची झलक आजच्या एकाहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त.

‘अधिकाधिक वेळ, लक्ष आणि समर्पण मागणारी नवऱ्याची सैन्यातली नोकरी ही त्याची पहिली बायको आहे, हे आम्ही स्वीकारलंय. त्यामुळे नवरा वेळ देत नाही, अशी लाडिक तक्रार करायला आम्हाला वावच नाही. वर्षातून फारतर दोन महिने सोबत असतो. त्यातूनही कधी फोन येईल, गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यानं ड्यूटीवर त्वरित हजर व्हावं लागेल याचा काहीच नेम नसतो. पण तरी एकमेकांसोबतचा मोजका वेळ आम्ही विस्मयकारक जगतो. आम्ही सोबत असतो तो प्रत्येक क्षण नवा असतो. त्यामुळेच लग्नाच्या १५ वर्षानंतरही आमचं नातं टवटवीत आहे. इतर कुठल्याही व्यवसायामधला नवरा मिळाला असता तर मला नाही वाटत की, हे शक्य झालं असतं...’ १९९८ च्या बॅचचे आणि सध्या श्रीनगरला पोस्टिंग असलेले कर्नल संजय शेरखाने यांच्या पत्नी वर्षा, दूरध्वनीवरून सांगत होत्या.
 
सोलापूरचं माहेर असलेल्या वर्षा घागरे यांचा विवाह २००२मध्ये कर्नल संजय यांच्यासोबत झाला. भारतीय लष्कर सेवेची कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी वर्षा यांना नाही. शिवाय लष्करातील नोकरीमधलं आयुष्य याबद्दल काही विशिष्ट समज त्यांच्या मनात होते. त्यामुळे सुरुवातीला संजय यांच्याशी विवाह करण्याबद्दल त्या साशंक होत्या. मात्र संजय यांचा स्वभाव, त्यांचं कुटुंब, आणि दोघांमधल्या संवादाने वर्षा यांच्या मनातील गैरसमज दूर होऊन त्यांनी लग्नाला होकार दिला. नवरा आणि सासरच्या सहकार्यामुळे वर्षा यांनी लग्नानंतर बीए बीएड करत शिक्षण पूर्ण केलं. विवाहानंतर काही काळ नेपाळ, भूतान, बांगलादेश अशा विविध ठिकाणी कर्तव्य बजावल्यानंतर आता कर्नल संजय श्रीनगरमध्ये कार्यरत आहेत. मिळणाऱ्या सुटीचा पुरेपूर फायदा घेता यावा आणि प्रवासातला वेळ वाचावा म्हणून वर्षा सध्या जम्मूत मुलांना सोबत घेऊन राहतात. सततची अनिश्चितता आणि अस्थिरतेच्या वातावरणाचा कंटाळा येत नाही का या प्रश्नावर, ‘अशा परिस्थितीचाही आता सराव झाला आहे. त्यात वेगळं काही वाटत नाही. आणि मी ताण घेतला तर मुलांना आणि नवऱ्याला मॉरल सपोर्ट कोण करणार,’ असा प्रतिप्रश्नच त्या उत्तरादाखल करतात.
‘शत्रूचा अचानक हल्ला’ या शब्दाइतकाच ‘सेपरेट फॅमिली’ हा शब्दही आर्मी ऑफिसर पत्नीच्या कपाळावर आठ्या निर्माण करणारा असतो. अर्थात नवऱ्यापासून दूर राहाणं त्यांना कालांतरानं सवयीचं होतं. मात्र तरीही रोजचं आयुष्य जगतानाच्या लहानमोठ्या समस्या, मुलांसंदर्भातले निर्णय, सणवार-कौटुंबिक सोहळे, आदि प्रसंगी नवरा सोबत असायला हवा होता असं अनेकदा वाटून जातं. मात्र परीक्षा पाहणाऱ्या या प्रसंगांनी आपापसातलं नातं घट्ट व्हायला मदतच होते, असं वर्षा यांना वाटतं. लग्नानंतर लगेचच भारत-बांगलादेश सीमेवर संजय यांची नेमणूक झाली. त्या वेळी सीमेवरच्या पलिया जिल्ह्यातल्या गौरीफंटा इथं एका तंबूत काढलेले दिवस सगळ्याच अर्थांनी लक्षात राहिल्याची आठवणही त्यांनी आवर्जून सांगितली.  मध्यंतरी जम्मू-काश्मिरात जवानांवर, लष्करी अधिकाऱ्यांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. ‘निषेध नोंदवण्याची ही पद्धत लाज आणणारी आहे. जनतेनं भरलेल्या करामधूनच जवानांना सोयीसुविधा पुरवल्या जातात अशी टीकाही वारंवार होते. आपला जीव धोक्यात घालून सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांबद्दल जर अशा भावना असतील तर फक्त  १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला प्रासंगिक देशभक्ती का दाखवता,’ असा सवाल त्या ठणकावून विचारतात. मी केवळ कर्नलची पत्नी आहे म्हणून देशातल्या लोकांना उपदेश करणार नाही. तो माझा अधिकारही नाही. पण देशरक्षणाचं क्षेत्र संजयसारखे जवान स्वत:हून निवडतात, अशा जवानांच्या निर्णयाचा आपण आदर राखायला हवा. सामान्य नागरिक कल्पनाही करू शकणार नाही अशा परिस्थितीत ही माणसं सीमेवर खडा पहारा देताहेत. त्यांच्यामुळेच आपण सुरक्षित आहोत. त्या जवानांना नैतिक पाठिंबा देण्याऐवजी त्यांच्याविषयी राजकारणी आणि जबाबदार व्यक्ती बेलगाम वक्तव्य करतात तेव्हा खूप दु:ख होतं, अशा शब्दात वर्षा आपली खंत व्यक्त करतात.
वेगवेगळ्या ठिकाणी बदली होणाऱ्या या अधिकारी आणि जवानांच्या पत्नींचा विरंगुळा काय असेल याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. त्याबद्दल सांगताना वर्षा म्हणतात, फॅमिली क्वार्टर्सच्या ठिकाणी एकत्र राहणाऱ्या सगळ्या महिलांची मिळून वेलफेअर सोसायटी असते. ‘त्याच्या माध्यमातून आम्ही स्वत:साठी आणि समाजासाठी अनेक उपक्रम राबवत असतो. तोच आमचा विरंगुळा असतो. अचानक ओढावणाऱ्या प्रसंगात सोसायटीतल्या महिलांची परस्परांना असणारी भावनिक सोबत  शब्दांपलिकडची असते,’ असंही त्या सांगतात.
 
सध्या आसामात पोस्टिंग असलेले सुभेदार अनंत जाधव यांच्या पत्नी अश्विनी कुटुंबासह डोंबिवलीत राहतात. लष्करी सेवेतलाच नवरा हवा, ही अश्विनी यांची इच्छा होती. संयुक्त कुटुंबामुळे पतीच्या बदलीचं विशेष काही वाटत नाही. मुलं वाढवताना त्यांचं बालपण पाहण्यासाठी, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये, कलागुणांच्या कौतूकसोहळा प्रसंगांत नवरा सोबत नसतो याची उणीव नक्कीच भासते. पण नवरा लष्करी सेवेत आहे, याचा आनंद त्या दु:खावरचा खूप मोठा उतारा आहे, असं त्या म्हणतात. लग्नानंतर महिनाभरात अनंत यांची कारगिलला बदली झाली. खराब हवामानामुळे त्यांच्यासोबतचे अठरा जवान दगावले. त्या दिवसातल्या आठवणी सांगताना आजही त्यांचा गळा दाटून येतो.    
 
आमचं लग्न झालं त्या वेळी आजच्यासारखी मोबाइलची चंगळ नव्हती. आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच त्यांच्याशी बोलणं व्हायचं. कधी फोन येईल हेही निश्चित नसायचं. त्यामुळे मी घरीच थांबायचे, त्यांच्या फोनची चातकासारखी वाट बघत. अवघ्या दहा मिनिटांच्या त्या बोलण्यानं कितीतरी ऊर्जा मिळायची, हुरूप यायचा. फौजी नवरा हवा ही उमेदीतल्या वयाची इच्छा होती. पण त्यातले खरे खाचखळगे लग्नानंतर कळायला लागले. मात्र या सगळ्यांवरही मी मात करायला शिकले. आता कुठल्याही प्रकारच्या प्रसंगाला सामोरं जाण्याइतकी ताकद मी अनंत यांच्या सहवासातून मी मिळवलीय, असंही अश्विनी सांगतात.

उणे पन्नास अंश सेेल्सिअस तपमानात हाडं गोठवणारी थंडी असणाऱ्या सियाचीनची सीमा असेल किंवा भाजून काढणाऱ्या उन्हातली राजस्थानातील जैसलमेरची सीमा; अशा परस्परविरुद्ध आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणात सैन्य दलातले अधिकारी - जवान आपलं कर्तव्य बजावत आहेत. कुठलाही मोबदला, पुरस्कार किंवा कौतुकाच्या अपेक्षेशिवाय. सेवाभावनेनं त्यांनी स्वत:ला देशासाठी वाहून घेतलंय.

भौतिक सुखवस्तू आयुष्य नाकारून ते निष्ठेनं सीमारक्षण करत आहेत. वर्षा आणि अश्विनी यांच्यासारख्या सहचरिणी हा या जवानांचा ‘बॅकबोन’ आहे. समाजातल्या इतर महिलांच्या कर्तृत्वाप्रमाणे या स्त्रियांची फारशी दखल घेतली जात नसली तरी जवानांच्या यशात त्यांच्या पत्नीचाही तितकाच मोलाचा वाटा आहे. कारण इतर चारचौघींसारखं आखीवरेखीव आयुष्य नाकारत त्यांनी सैन्यात नोकरी करणाऱ्या पतीची जाणीवपूर्वक निवड केलीय. ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यांचं वेगळेपण आहे. सततची अनिश्चितता, प्रवासातलं आयुष्य, एकहाती निभावून न्याव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या, साथीदाराचा मर्यादित सहवास, पतीच्या आयुष्यातले अपेक्षित - अनपेक्षित धोके या सगळ्याच पार्श्वभूमीवर अशा महिलांचंं योगदान आणि महत्त्व हे एखाद्या, ‘बॅकस्टेज आर्टिस्ट’पेक्षा नक्कीच कमी नाही.
 
 vandana.d@dbcorp.in
 
बातम्या आणखी आहेत...