आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही साऱ्या बेगम जान...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-पाक फाळणीने अनेक वेदनादायी कथा-उपकथा जन्माला घातल्या.
    त्यातली एक कथा ‘बेगम जान’ची. बरीचशी लेखक-दिग्दर्शकाच्या कल्पनेतली. येत्या आठवड्यात पडद्यावर झळकणार आहे. त्यातली बेगम जान ही कोठेवाली. फाळणीनंतर देश तोडणारी ओढलेली रेषा तिच्या हवेलीवरून गेली. मात्र, कुणालाही न जुमानता तिने हवेलीतून हलण्यास नकार दिला. त्यातून आत्मसन्मानाचा, आत्मरक्षणाचा संघर्ष पेलला. सामाजिक-सांस्कृतिक दबाव झेलले. एक स्त्री म्हणून, एक वेश्या म्हणून वाट्याला आलेले भोग भोगले, परंतु हार नाही मानली. अर्थात, हा झाला सिनेमा. प्रत्यक्षातही आज अनेक ठिकाणच्या वेश्यांना, त्या वास्तव्य करून असलेल्या वेश्यावस्तींना वेगवेगळ्या मार्गांनी, वेगवेगळ्या निमित्ताने लक्ष्य केले जात आहे. विशेषत: बिल्डर लॉबीच्या प्रभावामुळे त्यांच्या अस्तित्वावरच घाव घातले जात आहेत.  
मुंबईतली बदनाम वस्ती असलेल्या कामाठीपुऱ्यातल्या वेश्या येणारा प्रत्येक दिवस ‘बेगम जान’चा संघर्ष अनुभवताहेत....

हा पत्ता बदनाम आहे. इथली प्रत्येक बाई बदनाम आहे. प्रत्येक बदनाम बाईची बदनाम कहाणी आहे. या कहाणीला ना भिंतीचा सुरक्षित आडोसा आहे, ना डोक्यावर हक्काचं छप्पर आहे. आता हा बदनाम पत्ता पुसला जाणार आहे आणि त्या पत्त्यावर वस्तीला असलेली ती बदनाम बाई कायमची बेदखल होणार आहे...
*****
कोलकात्याच्या सोनागाचीनंतर मुंबईचा कामाठीपुरा आणि फॉकलंड रोड हे देशातले सगळ्यांत मोठे म्हणजे, जवळपास पाच हजार देहविक्रय करणाऱ्या महिलांची वस्ती असलेले बदनाम परिसर. फॉकलंड रोडवरच्या पांडू महाराज चाळ, कोळसा गल्ली, फातिमा गल्लीमध्ये बहुतांश बांगलादेशी महिला आहेत. तर कॅफे हाउस, दाणेवाला चाळ, शांताबाई बिल्डींग, सायकल गल्ली हा एरिया नेपाळी महिलांचा समजला जातो. कर्नाटकातून देहविक्रयासाठी आणलेल्या महिला या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आहेत. दुसरीकडे, कामाठीपुरा हा परिसर दोन भागांत विभागला गेलाय. मराठी, मारवाडी, गुजराती अशी संमिश्र पांढरपेशांची वस्ती असणारा एक भाग; तर एक ते चौदा क्रमांकाच्या गल्ल्यांमधून असणारी वेश्या वस्ती हा दुसरा भाग. त्यातही ११ ते १४ या गल्ल्यांमध्ये सर्वाधिक देहविक्रय करणाऱ्या महिलांचं वास्तव्य आहे. 

जवळपास दीड दशकं या परिसरांमध्ये वास्तव्य करून व्यवसायाच्या आधारे गुजराण करणाऱ्या या महिला आज मात्र एका नव्या आणि अनपेक्षित संकटाला सामोऱ्या जात आहेत. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत स्वत:चं अस्तित्व टिकवण्याची अडचण सुटता सुटत नाही तोवर डोक्यावरचं छप्पर वाचवायचं कसं, हा यक्षप्रश्न त्यांच्या पुढ्यात उभा ठाकलाय. याला कारण आहे, ती देहविक्रयाच्या व्यवसायासाठी वापरली जाणारी जागा. फॉकलंड रोड आणि कामाठीपुरा या दोन्ही ठिकाणी जिथं या महिला व्यवसाय करतात, ती जागा खाजगी मालकीची आहे. मात्र बंधनं आणि मर्यादा न जुमानता अस्ताव्यस्त पसरणारं शहर, पर्यायानं जागेला आलेला सोन्याचा भाव यामुळे िबल्डरांनी जागा मालकांना अ‌व्वाच्या सव्वा मोबदला देऊन या जागा विकत घेण्याचा सपाटा लावला आहे. जागा ताब्यात घेऊन, देहविक्रय करणाऱ्या महिलांना तिथून काढून टाकण्याचा हा डाव, वेश्यांचं पुनर्वसन अशा गोंडस नावाखाली सुरू आहे. आजघडीला कामाठीपुऱ्यातली पहिली गल्ली बिल्डरांनी संपूर्ण ताब्यात घेतली आहे. शिवाय सातव्या गल्लीतला वरचा पूर्ण टॉवरही रिकामा केला गेेला आहे...
*****
‘मै आपसे बात करना चाहती हूँ।’
‘ए चल हट ना. धंदे के टाईम पे दिमाग मत पका।’
‘आप यहाँ तक कैसे पहुँची ये मुझे समझना है।’
ग्रँट रोडवरून खेतवाडीकडे जाणाऱ्या पी. बी. रोडवर उभ्या असलेल्या तिने माझ्या नजरेला नजर देऊन पाहिलं. काही क्षण शांततेत गेले. मला तिच्याशी बोलायचंच आहे, हे तिच्या लक्षात आलं.
‘आओ. अंदर आ जाओ।’
विचित्रशा कुबट-कोंदट वासानं मेंदूला मुंग्या आणणारी जेमतेम दहाबाय बाराची अंधारी खोली. तिथंच दाटीवाटीनं चार कॉट ठेवलेल्या. छतावर दोऱ्या बांधलेल्या. त्या दोऱ्यांवरून प्रत्येक कॉटला स्वतंत्र पडद्यानं सेपरेशन केलेलं. कॉटच्या खाली कोपऱ्यात एक पितळी स्टोव्ह, तवा-परात, मीठमसाल्याचा छोटा डबा, पोळपाट-लाटणं, वाटी-ताटली असा ‘संसार’ मांडलेला. त्यातल्याच एका कॉटवर आम्ही बसलो. जुजबी ओळखीनंतर आपलं नाव शब्बो असल्याचं तिनं सांगितलं. तिच्याशी काय आणि का बोलायचं, हे सांगितल्यावर म्हणाली, 
‘अच्छा तो आप पेपरवाली दिदी है।’ ती हसून म्हणाली.
‘हाँ।’
‘वो क्या है नं पैली बार किसी ने मेरेकू ‘आप’ करके इज्जत से बुलाया. अच्छा लगा।’
‘हॅप्पी न्यू इयर’ सिनेमातल्या दीपिका पदुकोनच्या स्टाइलमध्ये तिनं उच्चारलेल्या ‘इज्जत’ शब्दावर मला हसू आलं.
‘आपको यहाँ किसने पहुँचाया...?’ 
तोंडओळख झाल्यानंतर थोडं मोकळं बोलू पाहणारी, वयाच्या तिशीतली, गोरीपान, मजबूत बांध्याची शब्बो या प्रश्नानं अस्वस्थ झाली. जखमेवरची खपली अचानक काढल्यानंतर होणारा त्रास तिच्या डोळ्यात स्पष्टपणे दिसला. शब्बो मूळची मालेगावची. दहावी शिकलेली. शेजारी राहणाऱ्या अस्लमवर तिचा जीव जडला. अस्लम कामानिमित्त मुंबईला जाऊन-येऊन असायचा. त्याला तिथे नोकरी असेल, या विश्वासावर शब्बोच्या पालकांनी त्यांचा निकाह लावून दिला. शब्बो मुंबईत आली. वर्षभरात जुळी मुलं झाली. मात्र त्यानंतर अस्लमचे खरे रंग दिसू लागले. हाताला काम नाही, त्यात दारूचं व्यसन. वाईट संगतीमुळे शेवटी अस्लमनं शब्बोला विकून टाकलं. स्वत:सह मुलांना दोन घास मिळवण्यासाठी शब्बोला धंद्यासाठी उभं राहावंच लागलं.  
ही कथा फक्त शब्बोचीच नाही. मुंबईच्या फॉकलंड रोड आणि कामाठीपुरा परिसरातल्या रजिया, चंदा, शारदा, लक्ष्मी, चंपा, रेणुका, महजबी, रेश्मा, सायरा, रूपा अशा इतर अनेकींची आहे. विश्वासघाताच्या बळी ठरलेल्या या सगळ्या जणी सारख्याच. नावं असलेल्या, पण ओळख नसलेल्या. या सगळ्याच जणींच्या बोलण्यातून प्रत्यक्ष जगण्यातली विसंगती तर समोर आलीच; पण आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक शोषणाच्या भयानक साखळीचं विदारक चित्रही नव्याने उघड झालं. शिक्षणाचा अभाव, दलालांकडून होणारा शारीरिक, भावनिक आणि मानसिक छळ, कोठ्याच्या मालकिणीला द्यावा लागणारा हिस्सा, सामाजिक उपेक्षेमुळे परतीचे बंद झालेले मार्ग, स्वत:च्या मुला-मुलींच्या अधांतरी भविष्यासाठी क्रमप्राप्त असणाऱ्या आर्थिक तरतुदीची चिंता आणि या सगळ्या अस्थिर आयुष्यात डोक्यावरचं छप्परही हिरावून घेतलं जाणार, या भावनेनं घेरून आलेली असुरक्षितता साऱ्या जणींच्या शब्दा-शब्दांतून व्यक्त होत राहिली...
*****
मुंबईच्या वेश्या वस्तीतल्या या महिलांमध्ये ट्रॅफिकिंग आणि फसवणूक, विश्वासघात करून आणलेल्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे, असं या महिलांच्या मुलांसाठी गेल्या तीस वर्षांपासून “प्रेरणा’ ही समाजसेवी संस्था चालवणाऱ्या प्रिती पाटकर सांगतात. या व्यतिरिक्त अपत्य झाल्यानंतर देवाला वाहणं, या जोगत्यांच्या पूर्वापार अंधश्रद्ध परंपरेतूनही या व्यवसायात लोटल्या गेलेल्या मुलींची संख्या भरपूर आहे. वास्तविक शरीरविक्रय करणाऱ्या महिलांचं रिकाम्या केलेल्या कोठ्यांमध्ये पुनर्वसन केलं जाणं अपेक्षित आहे. तशी तरतूदही सरकार दरबारी आहे. 

मात्र फक्त कागदोपत्री. प्रत्यक्षात विकासकांकडून सुरुवातीला अकरा महिन्यांच्या लीजवर जागा भाड्यानं घेतल्या गेल्यात. त्यातल्या काही ठिकाणच्या कोठ्यांमध्ये साडी कलरिंग, रेशीम-जरदोसी वर्क, चामड्याच्या पर्स आणि पाकिटं बनवण्याचे छोटेखानी कारखानेही सुरू झालेत. मात्र वेश्या पुनर्वसनाच्या नावाखाली सुरू असलेल्या या नाटकात एकही स्त्री पात्र नाही. अर्थात, यातल्या कुठल्याच कारखान्यात एकाही महिलेला समाविष्ट करून घेण्यात आलेलं नाही. रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. त्यामुळे पैसा कमावण्यासाठी या महिलांनी नालासोपारा, साायन, पनवेल, घाटकोपर, कळवा, विक्रोळी, मुलुंड, भिवंडी, भांडुप अशा उपनगरांचा आसरा घेतलाय. त्यामुळे देहविक्रयाचा व्यवसाय जैसे थे; जागेत फक्त बदल, एवढाच काय तो फरक.  

मुळात वेश्यावस्तीतली जागा ही कायदेशीरदृष्ट्या या महिलांच्या नावावर नाही. आणि हाच या महिलांना न्याय मिळवून देण्यातला मोठा अडसर असल्याचं, प्रिती पाटकर सांगतात. रिकाम्या केलेल्या वेश्यावस्तीतच या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वत:च्या पायावर उभं करता येणं सहज शक्य आहे. प्रेरणा, अपने आप, आशा महिला संस्था यांसारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं यातून मार्गही काढता येऊ शकतो; मात्र घोडं अडतं ते राजकीय आणि सामाजिक इच्छाशक्तीपाशी. याचं ताजं उदाहरण म्हणजे, दिल्लीत मार्च अखेरीस झालेली परिषद. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ललिता कुमारमंगलम यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. यात नोकरदार महिला, गृहिणी, एकल मातांवरचे अन्याय, त्यावरच्या उपायांच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा झाली. पण देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या समस्यांबद्दल मात्र परिषदेत विशेष चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही. माध्यमांनीही या संदर्भातल्या बातमीत वेश्यावस्तीतल्या महिलांचा संदर्भ अनुल्लेखानं बाजूला सारलेला दिसला. या मुद्द्याबाबत पाटकरांनी व्यक्त केलेलं मत नक्कीच विचारात घेण्यासारखं आहे. त्या म्हणतात, या वस्तीतल्या स्त्रियांनाही त्यांचं आयुष्य पुन्हा नव्यानं जगण्याची संधी मिळायला हवी. आणि या महिला तसा प्रयत्न करत असतील तर लोकांनी नॉन जजमेंटल होणंही गरजेचं आहे. विनाकारण एखाद्याचा भूतकाळ सातत्यानं खरवडून काढण्यात काय हशील आहे?

हेही खरंच की, जगाचा असा कटू अनुभव घेऊनही आपल्या पुढच्या पिढीनं मात्र बाहेरच्या जगात नाव कमवावं, स्वत:ची ओळख निर्माण करावी, असं या महिलांना वाटतं.  त्या प्रबळ इच्छेला विविध स्वयंसेवी संस्थांनी कृतीचं पाठबळ दिलंय. वेश्यावस्तीतल्या महिलांच्या मुलांसाठी रात्रनिवारा शाळा या संस्थांनी सुरू केल्या आहेत. अरुणा कातकर, वैशाली कारंडे, छाया जगताप, मुग्धा दांडेकर यांसारख्या मेेहनती कार्यकर्त्यांची फळी या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. शिवाय या व्यवसायातून महिलांना बाहेर काढून त्यांना व्यावसायिक शिक्षण-प्रशिक्षण देऊन त्यांच्यात आरोग्याबाबत जागरुकता निर्माण केली जाते आहे. अशाच उपक्रमातून या व्यवसायातून बाहेर पडून स्वत:च्या पायावर उभ्या असलेल्या रेणुका (मूळ सोलापूरची. नोकरीचं अामिष दाखवून मुंबईत आणून तिला विकण्यात आलं. ‘प्रेरणा’च्या कार्यकर्त्यांनी तिची सुटका केली. पुढे रेणुका शिकली. मुंबईत आली तेव्हा सही म्हणून अंगठ्याचा शिक्का मारणारी ही रेणुका आता आत्मविश्वासाने स्वत:चं नाव इंग्रजीत लिहिते.) आणि चंदा (आशा महिला संस्थेच्या मदतीने सावरली. मग स्वत:च्या मुलाला शिकवलं. तिचा मुलगा ताज ग्रुप ऑफ हॉटेल्समध्ये नोकरी करतोय. स्वत:च्या भाकर-तुकड्याची भ्रांत असतानाही तिनं आपल्या निधन झालेल्या बहिणीच्या मुलाच्या संगोपनाचीही जबाबदारी उचलली. आज तो मुलगाही स्वत:च्या पायावर उभा आहे.) याही तिथं भेटल्या. परंतु, शोषणाचं चक्र भेदण्याचं धाडस दाखवणाऱ्या रेणुका आणि चंदांची संख्या नगण्य म्हणावी इतकी कमी. म्हणूनच तीन बाय सहाच्या पलंगापासून सुरू होणारं आणि त्या पलंगापाशीच संपणारं आयुष्यच बहुतेकींच्या वाट्याला आलं आहे.  
मात्र, फॉकलंड रोड आणि कामाठीपुरा भागातल्या या भेटीदरम्यान सगळ्यांत आठवणीत  राहिली आहे, ती अलेक्झांंडर बिल्डिंगमधली शारदा. या चार मजली इमारतीत आम्ही गेलो, तेव्हा ती स्वयंपाक करत होती. आमच्याशी थोडं बोलल्यानंतर आम्हाला निरोप द्यायला पायऱ्यांपर्यंत आली. पायऱ्या जुनाट लाकडी, तेल आणि पानाच्या पिचकाऱ्यांनी ओशट झालेल्या, काहीशा अंधाऱ्या होत्या. त्यावरून जीव मुठीत धरून उतरत असताना वरून मोबाइलमधल्या बॅटरीचा झोत टाकत शारदा म्हणाली, जपून उतरा बरं ...
पूर्वी कधीही न भेटलेल्या मला, तिला असं का सांगावंसं वाटलं असेल, असं त्या क्षणी मनात आलं. पण मुंबईच्या उन्हाळ्याचाच तो गुण असावा कदाचित. म्हणजे, उकाडा प्रचंड असतो, त्यामुळे शरीरावर घामही निथळत असतो. वाढलेल्या तापमानानं वैतागही आणलेला असतो, पण त्याच वेळी वातावरणातली आर्द्रता मात्र तुमच्या जिवाची घालमेल होऊ देत नाही. तुम्हाला अस्वस्थ करत नाही. शारदामध्ये मला अशाच आश्वासक आर्द्रतेचा अंश जाणवला. 
*****
निरोप घेताना प्रत्येकीच्या घर नावाच्या खोलीतले देवी-देवतांचे फोटो लक्ष वेधून घेत होते. उदबत्तीचा दरवळ आणि ताज्या फुलांचे हार, नुकतीच देवपूजा झाल्याचं दर्शवत होते. दर क्षणाला शोषणाच्या आगीत आयुष्य पोळून निघत असताना अनामिक शक्तीवरचा इथल्या बायकांचा विश्वास कोड्यात टाकत होता आणि पाठोपाठ प्रश्नही पडत होते-आणखी पाच वर्षांनी हे बदनाम चेहरे, याच पत्त्यावर सावरलेल्या आयुष्यासह नव्या रूपांत भेटतील? की बाजारकेंद्री व्यवस्थेने लादलेल्या विकासाच्या नावाखाली कायमचे दिसेनासे होतील? 
सिनेमात प्रश्न चुटकीसरशी सोडवता येतात. सुटतातही. पण दोन दिवसांच्या भेटीत कामाठीपुऱ्याच्या वस्तीत अनुभवला तो सिनेमा नव्हता, तर ते अनुत्तरित प्रश्नांची दाहकता असलेलं विषण्ण वास्तव होतं. तुमचा, माझा आणि समाज म्हणून आपल्या सगळ्यांचा अखेरपर्यंत पाठलाग करणारं...

लेखिकेचा संपर्क - ७८७५०९४०८३

vandana.dhaneshwar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...