आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विझणा-या निखा-यात फुलणारं स्वप्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मशान हा शब्द उच्चारला तरी अस्वस्थ वाटतं. मन निराशेनं भरून येतं. त्यावरून दिवसभर स्मशानभूमीमध्ये वावरणाऱ्यांच्या मानसिकतेची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. मात्र औदासिन्याची भावना बाजूला सारून कौटुंबिक गरजेपोटी ‘तिने’ हिंंमत दाखवली.
नवी वाट शोधून जबाबदाऱ्या पार पाडल्या. निखाऱ्यांमध्येही उच्च शिक्षणाचं स्वप्न
‘फुलवणाऱ्या’ माधुरी वानखेडेची ही गोष्ट...
‘इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते.’
कविवर्य सुरेश भट यांच्या ‘एल्गार’ या काव्यसंग्रहातल्या एका कवितेची ही सुरुवात. मात्र मरण आणि सरण याबद्दलची ही कविकल्पना वास्तवात तितकीशी सुखावह नक्कीच नसते. मृत्यू, अंत्यसंस्कार आणि स्मशानभूमी याबद्दल सर्वसामान्यांच्या मनात उदासीनतेची भावना असते. त्यामुळेच बहुधा स्मशानभूमीकडे सहसा कुणी फिरकत नाही. विशेषत: महिला. काही समाजाचा अपवाद वगळता महिलांनी अंत्यसंस्कारासाठी जाण्याची पद्धतही नाही. स्मशानभूमीच्या देखभालीसाठी उपस्थित असणाऱ्या कुटुंबातील महिलांशिवाय त्या परिसराच्या आसपास महिलांचा वावर ही तशी दुर्मीळ बाब.
मात्र, अपवादांवर मात करत अमरावतीच्या माधुरी राजेंद्र वानखेडेनं एक वेगळं उदाहरण समाजासमोर घालून दिलंय. वयाची अवघी विशी ओलांडलेली माधुरी, स्मशानभूमीमध्ये काम करते. तिथं आलेल्या मृतांना विश्वस्तांतर्फे श्रद्धांजली वाहणं, त्यासाठीची माहिती देणं, फुलं वगैरे साहित्य उपलब्ध करून देणं, आणि इतर कार्यालयीन मदत करण्याचं काम ती पाहते.
अमरावतीपासून चाळीस-पंचेचाळीस किलोमीटरवरचं राजुरा हे माधुरीचं मूळ गाव. तीन भावंडांमध्ये ती मधली. तिच्या थोरल्या बहिणीचं लग्न झालंय, तर धाकट्या भावाचं शिक्षण सुरू आहे. माधुरीचे आईवडील शेती करतात. मात्र त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नात घरखर्च, शिक्षणाचा खर्च भागत नव्हता. माधुरीचं बारावीपर्यंतचं शिक्षण झालं होतं. पण पुढं शिक्षण घ्यायचं तर पैशांचा प्रश्न होता. मग घरखर्चाला हातभार लागावा म्हणून माधुरी अमरावतीला आली. एका दवाखान्यात तिने अर्धवेळ नोकरी मिळवली. ती करता करता नर्सिंगचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. त्याच दरम्यान, अमरावतीच्या हिंदू स्मशानभूमीच्या विश्वस्तांनी तिला कार्यालयात नोकरी करणार का, अशी विचारणा केली. स्मशानभूमी कार्यालयात आणि एकूणच त्या वातावरणात नोकरी म्हटल्यावर माधुरीसुद्धा सुरुवातीला थोडी बिचकली होती. पण या नव्या नोकरीत तिला आधीच्या नोकरीपेक्षा थोडा जास्त पगार मिळणार होता. त्यामुळे तिनं हे काम स्वीकारण्याचं पक्कं केलं. लोक काय म्हणतील? नातेवाईक संबंध ठेवतील का आपल्या कुटुंबासोबत? मित्रमैत्रिणींची काय प्रतिक्रिया असेल? किंवा जिथं स्त्रियांची उपस्थिती अगदीच नगण्य अशा वेगळ्या वातावरणात काम कसं करणार, असे असंख्य प्रश्न तिलाही पडले. मात्र, स्वत:चं आणि भावाचं शिक्षण, घरखर्च हे सगळं डोळ्यासमोर दिसत होतं. त्यामुळे शांतपणे निर्णय घेऊन तिनं हे नव्या नोकरीचं आव्हान स्वीकारलं.
आई-वडलांची विशेष सहमती नसल्यामुळे, सुरुवातीला माधुरी हे काम अर्धवेळ करत होती. मात्र आता गेल्या तीन वर्षांपासून ती तिथे पूर्णवेळ काम करते. अमरावतीमध्ये किरायानं खोली घेऊन राहणाऱ्या माधुरीला सोबत म्हणून तिची आईही येऊन राहते. हे काम नव्यानं करायला लागल्यानंतरचा एक अनुभव सांगताना माधुरी म्हणते, अमरावतीला आल्यानंतर पहिल्यांदा जिथं किरायानं खोली घेतली होती तिथं मी फक्त नोकरी करते, इतकंच सांगितलं होतं. मात्र काही महिन्यांनी त्यांना मी स्मशानभूमीत काम करते, असं कळलं. त्यानंतर त्यांनी मला ती खोली सोडून जायला सांगितलं. एखाद्या कामाकडे पाहण्याचा लोकांचा असा दृष्टिकोनही असू शकतो, हे अनुभवल्यानंतर खूप वाईट वाटल्याचं माधुरी सांगते. पण त्याच वेळी ‘अंत्यविधीसाठी कधी कधी काही महिलाही येतात, त्या आस्थेनं माझ्याकडे येतात, विचारपूस करतात, तेव्हा खूप छान वाटतं,’ असंही ती म्हणते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे शिक्षणात काही वर्षांचा खंड पडला असला तरी माधुरीनं आपली स्वप्नं विझू दिलेली नाहीत. सध्याची नोकरी करता करता पुढचं शिक्षण घ्यायचा तिचा निश्चय आहे. या वर्षी पदवीला प्रवेश घेणार असल्याचं ती सांगते. आपलं शिक्षण काही काळासाठी थांबवावं लागलं असलं तरी भावाचं शिक्षण सुरू असल्याचा तिला आनंद आहे, आणि सुरुवातीला नाराज असलेल्या आईवडलांचाही आता पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचं समाधानही आहे.
ज्या वयात इतर मुली महाविद्यालयात शिक्षण घेतात, मित्रमैत्रिणी सहली, गॅदरिंग, खरेदी अशी कॉलेज लाइफची मजा घेतात, त्या वयापासून माधुरी घरची जबाबदारी पालकांच्या बरोबरीनं उचलते आहे. हा आनंद हरवला का, या प्रश्नावर ती म्हणते, नोकरीमुळे हे सगळं मागं पडलं असं नाही वाटत. कारण मी मैत्रिणींच्या संपर्कात असते. त्या व्यतिरिक्त जुनी गाणी ऐकण्याची आणि वाचनाची आवड मी जोपासलीय, मग वेगळंं नाही वाटत. शिवाय राज्यभरात अतिशय नीटनेटक्या आणि स्वच्छ स्मशानभूमी असलेलं शहर अशी अमरावतीची ओळख आहे. त्यामुळे इथल्या वातावरणात कधीच भीती, निराशा वगैरे वाटली नाही. उलट आता पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर इथं फावल्या वेळेत अभ्यासही करता येईल, असंही माधुरी म्हणते. माधुरीनं जे काम स्वीकारलं आहे तशा पद्धतीच्या कामात अजूनही महिला जवळपास नसल्यातच जमा. त्यामुळे ही नोकरी सोडून दुसरीकडे काम शोधावं असं वाटलं का, यावर तिनं दिलेलं उत्तर, तरुणाईला वास्तवाची जाण करून देणारं आहे. ती म्हणते, एखादा माणूस कुठं आणि काय काम करतो, यावर त्या माणसाची लायकी कशी काय ठरवता येईल? आणि अशी इतरांची लायकी, स्थान ठरवायचा कुणी कुणाला अधिकार दिलाय? मेहनतीचे, कष्टाचे चार पैसे मिळवून देणारं कुठलंही काम चांगलंच असतं. माझ्या या कामामुळे माझ्या आई-वडलांवरचा थोडा भार मी कमी करू शकते, याचा मला आनंद वाटतो. महाविद्यालयीन शिक्षण घेताना प्रत्येक मुला-मुलीने अर्धवेळ काम करायला हवं, असं मला वाटतं. त्याशिवाय आपण खर्च करतो तो पैसा कमवायला काय, कसे, नि किती कष्ट करावे लागतात, हे त्यांना कसे समजेल, असा सवाल ती करते. आणि त्याच वेळी आपल्या आवश्यकतेच्या काळात, सर्व सामाजिक संकेत बाजूला सारून नोकरीच्या रूपानं पाठिंबा देणाऱ्या, हिंदू स्मशान भूमीच्या सर्व वरिष्ठांबद्दल कृतज्ञताही व्यक्त करते.
स्वाभिमान अन् ताठ मानेनं जगण्यासाठी, स्वत:सह कुटुंबाला उभं करण्यासाठी, शिकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी माधुरीनं वेगळी वाट निवडली, तीसुद्धा स्वेच्छेनं. लोकापवादाला न जुमानता या वाटेवरचं तिचं प्रत्येक पाऊल अधिक धीटपणे, आत्मविश्वासानं पडत राहो, अशा सदिच्छा आपण व्यक्त करू या.
vandana.d@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...