आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एव्हरेस्ट’ मनिषा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाठीवर १५ किलो वजन. उणे ७० अंश तपमान. ताशी १८०च्या वेगाने वाहणारे वारे. आणि नजरेसमोर एव्हरेस्ट शिखर. पण क्षणार्धात हवामानाचा नूर पालटला. अवघं १७० मीटर अंतर शिल्लक असताना मनिषाला माघारी परतावं लागलं. एकीकडे कवेत येता येता निसटलेलं स्वप्न आणि दुसरीकडे परतीच्या वाटेवर खराब हवामानाचा बळी ठरलेल्या सहकारी गिर्यारोहकांचे मृतद


‘खरं तर कॅम्प २-३ पासूनच आम्हाला खराब हवामानाचे निरोप मिळत होते. नासाकडून बेस कॅम्पकडे येणाऱ्या या सिग्नल्समध्ये आगामी दोन दिवस गेल्या शंभर वर्षातले सर्वाधिक खराब हवामानाचे दिवस असतील, अशी नोंद होती. मात्र एव्हरेस्टसाठी अंतिम चढण सुरू होणाऱ्या कॅम्प-४पर्यंत जाण्याचा निर्णय मी आणि शेर्पानं चर्चा करून घेतला. ‘डेथ झोन’ म्हणूनही हा भाग ओळखला जातो. कॅम्प -४पर्यंत पोहोचलो. पण वातावरण अधिकच बिघडत गेलं. ताशी १८०च्या वेगानं वारे वाहात होते. हाडं गोठून गेली होती. पण माघारी फिरायचं नाही हे पक्कं ठरवलं होतं. सामान्य स्थितीत या ठिकाणी गिर्यारोहक २४ तासांपेक्षा अधिक काळ थांबू शकत नाही. मात्र एव्हरेस्ट गाठायचंच या जिद्दीनं मला त्या डेथ झोनमध्ये ४८ तास जिवंत ठेवलं. बहुतांश सहकारी तिथेच थांबले. पण मात्र पुढे जाण्याच्या निर्णयावर मी ठाम होते. शेर्पाशी सल्लामसलत केली. ऑक्सिजनचं गणित मांडलं. पुढं जाण्यासाठी तयार झालो. कॅम्प-४, बाल्कनी एरिया, ट्रँग्युलर फेस, साउथ समिट, आणि हिलरी स्टेप एक, दोन, तीन आणि त्यानंतर एव्हरेस्ट असा तो मार्ग होता. वाऱ्याचा वेग १५० पर्यंत खाली आला होता. मात्र हिलरी स्टेप एकच्या पुढे गेलो तर जिवंत परत येऊ शकणार नाही असा शेर्पानं निर्वाणीचा इशारा दिला. परतण्याशिवाय पर्याय नव्हता. डेथ झोन सोडताना तिथे २०० सहकारी गिर्यारोहकांचे तंबू होते. परतताना मात्र त्यापैकी फक्त सहा तंबू उभे होते. दोन जण जिवंत,’ पूर्ण होता होता अर्धवट राहिलेेल्या स्वप्नाची गोष्ट मनिषा सांगत होती. आणि तिचा हा प्रवास ऐकता ऐकता मी आश्चर्य, विस्मय, उत्सुकता, भीती, कौतुक अशा भावनांचं मिश्रण अनुभवत होते.


मनिषा वाघमारे आणि तिचं कुटुंब मूळ परभणीचं. वडील क्रीडापटू. मनिषानेही व्हॉलीबॉल आणि दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीचं क्षेत्र निवडलं. पुुण्याच्या बालेवाडीत प्रशिक्षण घेतलं. आज औरंगाबादेतल्या महिला महाविद्यालयात ती क्रीडा संचालक आहे. इंडियन कॅडेट फोर्सच्या शिबिरात, एव्हरेस्ट सर केलेल्या गिर्यारोहकांचे अनुभव तिने ऐकले. साहसी क्रीडा प्रकारांकडे ओढा असलेल्या मनिषाने मग एव्हरेस्ट सर करण्याचा ध्यास घेतला. कमांडर विनोद नरवडे, जगदीश खैरनार आणि फिटनेस कोच शशिकांत सिंग यांनी तिला मार्गदर्शन केलं. शारीरिक आणि मानसिक तयारी करून घेतली. मनिषानेही बेसिक, अॅडव्हान्स आणि रेस्क्यू माउंटेनिअरिंगचे कोर्सेस केले. दररोज सकाळी तीन आणि संध्याकाळी तीन असे सहा तास व्यायामासाठी दिले. एव्हरेस्टच्या मुख्य चढाईच्या आधी मनिषानं हिमालयातल्या २४ पर्वतारोहण मोहिमांमध्येही भाग घेतला. सराव केला. 


जगातल्या सात खंडांमधली अत्युच्च शिखरं सर करण्याचा तिचा मानस आहे. त्यापैकी चार तिने पूर्ण केली आहेत. ऑस्ट्रेलिया खंडातलं सर्वोच्च शिखर कमी वेळेत सर करण्याऱ्या मनिषाच्या पथकाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेलीय. हा विक्रम लिम्का बुकमधे नोंदला गेलाय.


५६ ते ५८ दिवसांच्या या मोहिमेतली लक्षात राहिलेली घटना म्हणजे बेस कॅम्पशी तुटलेला संपर्क, मनिषा सांगत असते. वातावरण खराब असल्यामुळे बेस कॅम्पकडून आम्हाला मेसेज येणं बंद झालं होतं. आमचा संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यावरून मी आणि माझा शेर्पा जिवंत राहिलो नसल्याचा त्यांचा समज झाला. तसा निरोपही माझ्या घरी पोहोचवण्यात आला. पण दोन दिवसांनंतर पुन्हा संपर्क झाला. माझ्या कुटुंबियांनी सुटकेचा श्वास घेतला.’


या मोहिमेमधल्या सर्वात आनंददायी घटनांचा उल्लेख करताना मनिषानं दोन गोष्टी आवर्जून सांगितल्या. पहिली होती, पहिले एव्हरेस्टवीर तेनसिंग नोर्गे यांच्या मुलाची आणि इटलीचे गिर्यारोहक रेनहोल्ड मेसनर यांची भेट. मोहिमेवर निघण्याआधीपासूनच मनिषा नोर्गे यांच्या संपर्कात होती. बेस कॅम्पवर भेटलेल्या नोर्गे यांनी मनिषाची आपुलकीनं चौकशी केली. तिला सूचनाही दिल्या. हिलरी स्टेप -१वरून कॅम्प २ला परतल्यानंतर बचाव पथकाने मनिषा, नवदीप, शेर्पा दावाचिरींग यांची सुटका केली. प्रतिकूल वातावरणामुळे तब्येतीवर विपरित परिणाम झाल्यानं मनिषाच्या फुप्फुसांना संसर्गाची सुरुवात झाली होती. तिला सिव्हिल हॉस्पिटलला दाखल करण्यात आलं. तिथे तिची भेट घेण्यासाठी आले होते, रेनहोल्ड मेसनर. जगातील सर्वोच्च शिखरं ऑक्सिजन सिलेंडरच्या मदतीशिवाय सर केल्याचा विक्रम मेसनर यांच्या नावे आहे. वातावरणाचा इतका मोठा फटका बसल्यानं मनिषा एव्हरेस्ट नाही गाठू शकली, मात्र ती त्या वातावरणातही टिकून राहिली, जिवंत परतली म्हणून त्यांनी तिच्या हिमतीला दाद देत आनंद व्यक्त केला.


२८,८६५ फूट उंचीचं एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा बाळगणं ही सोपी गोष्ट नाहीच. दीड ते दोन महिन्यांच्या या मोहिमेमध्ये दैनंदिन नैसर्गिक आन्हिकांची काय व्यवस्था असा प्रश्न पडणं साहजिकच. शिवाय स्त्रियांच्या मासिक पाळीचा मुद्दाही असतोच. प्रदूषण आणि गिर्यारोहकांची सोय लक्षात घेऊन मोहिमेदरम्यान डायपर वापरणं सक्तीचं असतं. मासिक पाळीतल्या दिवसांकरता महिला गिर्यारोहकांना स्वतंत्र मेडिकल किट पुरवण्यात येतं. तपमान अत्यंत कमी असल्यामुळे पाळीच्या दिवसात तसा विशेष शारीरिक त्रास वगैरे होत नाही. मात्र पाठीवरचं सामान, थंडीपासून बचाव करणाऱ्या कपड्यांनी संपूर्ण झाकलेलं शरीर, स्नान करून स्वच्छ न होता येणं आणि तशाच अवस्थेत चढत राहाणं अशा अवघडलेल्या अवस्थेची अडचण वाटते हे खरंच. मात्र डोळ्यांसमोर सतत एव्हरेस्ट दिसत असतो, त्यामुळे या गोष्टी क्षुल्लक वाटतात, असं मनिषा म्हणते.


एव्हरेस्ट आणि तत्सम मोहिमांमधे शेर्पा माेलाची भूमिका निभावत असतात. शेर्पा जितका जास्त अनुभवी, सर्व अडचणींना सरावलेला, तितकी मोहीम यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. किंबहुना शेर्पाच्या अचूकतेवरच मोहिमेचं यशापयश अवलंबून असतं. मनिषासोबतचा दावाचिरींग हा शेर्पा फक्त बारावी शिकलेला होता. मात्र बर्फावर कुठं पाऊल टेकवणं सुरक्षित आहे, परिसरातली हिमशिखरं, तिथली वादळं, बर्फाची दरी, दरीची खोली याचा नेमका अंदाज त्याला होता. शिवाय डेथ झोनमध्ये मनिषा ४८ तास जिवंत राहू शकली, हिलरी स्टेप-१ पर्यंत जाऊ शकली ते शेर्पाच्या ऑक्सिजन सिलेंडरच्या गणितामुळेच. अंतिम टप्प्यापर्यंतचं अंतर, ते अंतर कापताना शरीरातली किती ऊर्जा खर्च होईल, जवळ ठेवलेल्या द्रवरूप अन्नपदार्थांमधून किती कॅलरीज मिळणार आहेत, हे लक्षात घेऊन पाठीवरच्या सिलेंडरमधून किती पॉइंटनी ऑक्सिजन पुरवठा सुरू ठेवायचा याचं दावाचिरिंग यांचं गणित अत्यंत अचूक होतं. म्हणूनच हिलरी स्टेप-१ ला आल्यावर, बेस कॅम्पकडून वाऱ्याचा वेग १८० वरून १५० पर्यंत कमी झाल्याचा संदेश मिळूनसुद्धा पुढं न जाण्याचा निर्णय दावाचिरींग तारतम्यानं घेऊ शकला.


लग्न की करिअर, अशा हिंदोळ्यावर असणाऱ्या मुलींसाठी मनिषा वाघमारे हे उत्तम उदाहरण ठरावं. वर्षभरापूर्वी पहिल्या मोहिमेवर जाण्याआधीच मनिषाचं लग्न ठरलं होतं. तिचे भावी पती फूटबॉलपटू आहेत. मात्र पहिल्या प्रयत्नात यश हुकलं म्हणून उमेद सोडून तिने बोहल्यावर चढण्याचा पर्याय निवडला नाही. एक एप्रिलला पुन्हा एव्हरेस्ट मोहिमेवर ती निघणार आहे. लग्न झालं की, सुरुवातीची वर्षे स्थिरस्थावर होण्यात, नविन जबाबदाऱ्या पेलण्यात निघून जातील, याची जाणीव मनिषाला आहे. शिवाय बाळंतपणानंतर स्त्रियांचं शरीर पूर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो, याचीही तिला कल्पना आहे. या सगळ्यात काही वर्षे निघून जातील. त्यानंतर वयाचा विशिष्ट टप्पा पार केल्यावर एव्हरेस्टचं ध्येय गाठणं गुंतागुंतीचं होऊ शकतं हे समजून उमजून मनिषाने, ‘आधी लगीन एव्हरेस्टचं’ असा निर्णय घेतलाय. माहेर,भावी सासरचा मनिषाच्या ध्येयवेडेपणाला पाठिंबा आहे हेही उल्लेखनीयच. शिवाय मित्रपरिवार, महिला महाविद्यालयातल्या सहकाऱ्यांच्या मदतीचाही ती कृतज्ञापुर्वक उल्लेख करते.  


एव्हरेस्ट मोहिमेसाठी पुन्हा एकदा नव्यानं कंबर कसणाऱ्या मनिषाच्या धाडसाचं, आत्मविश्वासाचं कौतुक तर आहेच. पण विशेष आहे ती पहिल्या मोहिमेतल्या अनुभवानंतरही अर्धवट मोहीम फत्ते करण्याची तिची जिद्द. मनिषाची हीच वृत्ती तिला सामान्यांपासून ‘खास’ बनवते. प्रत्यक्ष मृत्यूला जवळून पाहून आल्यावरही जिवाची जोखीम पुन्हा का उचलावीशी वाटते, या प्रश्नावर ती हसून म्हणते, ‘बस करायचंच आहे. आधीच्या प्रयत्नात आलेल्या अडचणींना मी ट्रेलर समजतेय. मी एव्हरेस्ट सर करेन तेव्हाच सिनेमा संपेल. यशानं खूप थोड्या अंतरावरून हुलकावणी दिली तेव्हापासून अस्वस्थता आहे मनात. एव्हरेस्टवर तिरंगा फडकवेन तेव्हाच शांत वाटेल,’ अशा शब्दांत मनिषा दुर्दम्य इच्छाशक्ती व्यक्त करते. 


आंतरराष्ट्रीय गिर्यारोहणात मराठवाड्याचं नाव उंचावणारी मनिषा पहिलीच. मात्र मोहिमेसाठी निधी जमवताना मराठवाडा विद्यापीठ आणि काही संस्थांचे दृष्टिकोन निराशाजनक होते अशी खंत ती व्यक्त करते. दानशूर व्यक्तींनी, संस्थांनी निधीसाठी पुढ येण्याचं आवाहन तिने केलंय.


‘गो व्हेअर यू फील मोस्ट अलाइव्ह’ असं मनिषाचं व्हॉट्सअॅप स्टेटस आहे. अर्थात तुम्हाला अधिक प्रसन्न, उत्साहवर्धक आणि जिवंतपणाचा अनुभव जिथे येईल तिथेच जा. तेच काम करा. मृत्यूशी दोन हात करण्याची तयारी ठेवून मनिषा सध्या तंतोतंत तेच करते आहे. मनिषाच्या या ताज्यातवान्या आणि चोख मोहिमेसाठी टीम मधुरिमाच्या एव्हरेस्ट शुभेच्छा.


vandana.d@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...