आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंब चिंब होऊ...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पावसाचे तुषार कधी झेललेत अंगावर?
इच्छा झाली आणि रिमझिम पावसात
निघाले चिंब भिजायला, असं झालंय कधी?

प्रत्येक थेंबातून ओसंडणारं चैतन्य, धरित्रीला येणारी हिरवाई, त्याच्या प्रफुल्लपणाचा आस्वाद घ्यायलाच हवा
थेंबाथेंबातलं हे पाऊसपण अनुभवायलाच हवं

कधी कधी असंही थोडंसं मनसोक्त जगू
आवडत्या पावसात चिंब-चिंब होऊ

मुलांचा हट्ट, नवर्‍याची फर्माईश
कंटाळवाणं रूटीन जरा बाजूला सारू
स्वत:साठी हक्काचा वेळ काढू
आवडत्या पावसात चिंब-चिंब होऊ
आठवणीतला पाऊस
पावसाची आठवण
रंगांसोबत मृदगंधाची उधळण
मनात साठलेल्या अन्
डोळ्यात दाटलेल्या पावसाला
ओंजळीचं कोंदण घालू
आवडत्या पावसात चिंब-चिंब होऊ

मृग-रोहिणी-स्वातीचा उत्सव
डोळे भरून पाहू
जाई-जुईचा सुगंध भरभरून घेऊ
अलवार स्पर्शाच्या जाणिवेनं
मोहरून जाऊ
आवडत्या पावसात चिंब-चिंब होऊ

सईच्या संगतीनं असंही करू
हिरव्याकंच ऋतूत पर्वतीवर फिरू
जमलं तर सिंहगडही पालथा घालू
भटकत-भटकत स्वत:त हरवून जाऊ
आवडत्या पावसात चिंब-चिंब होऊ

कधी आशा, रफी कधी किशोर गुणगुणू
धीरगंभीर जगजित मनात साठवू
छानशी लकेर घेऊन स्वत:वर
खुश होत नि‌खळ आनंदात गिरकी घेऊ
आवडत्या पावसात चिंब-चिंब होऊ

कधी अंगणातला पाऊस
खिडकीत निवांत बसून पाहू
बहिणाबाई, कुसुमाग्रज तर कधी
इंदिरा, अरूणाच्या सोबतीनं
शब्दसरितेत न्हाऊ
आवडत्या पावसात चिंब-चिंब होऊ

जमलं कधी तर असंही करू
बाइकवर मस्तपैकी लाँग ड्राइव्हला जाऊ
पावसाच्या सरी झेलत बेभान होऊ
टपरीवरचा आयता चहा
खमंग भज्यांची लज्जत चाखू
आवडत्या पावसात चिंब-चिंब होऊ

काही क्षणांसाठी असंही वागू
औपचारिकता वगैरे सगळं विसरून जाऊ
पावसाची रिमझिम ऐकत एकटंच बसू
माणसांची गर्दी, शब्दांची दाटी टाळून
नि:शब्दतेच्या कैफात बुडून जाऊ
आवडत्या पावसात चिंब-चिंब होऊ

काल आणि उद्या यांच्या कात्रीतला आज
आसुसून जगू अन् मग पुन्हा..
भिजलेल्या मातीसारखा निर्मितीचा ध्यास घेऊ
बरसून रितावलेल्या नभासारखं पारदर्शी होऊ
आवडत्या पावसात चिंब-चिंब होऊ

वंदना धनेश्वर, औरंगाबाद
vandana.d@ dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...