आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Dhaneshwer Article On Lebour Room Experience

सृजन कळांचा साक्षिदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा अनुभव आहे ऋषिकेश घोटणकर या आपल्या मित्राचा. सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला मूळ अहमदनगरचा ऋषिकेश नोकरीनिमित्त लंडनला असतो. कौटुंबिक कार्यानिमित्त तो सध्या भारतात आलेला आहे. ‘लेबर रूममधली महिलेच्या पतीची उपस्थिती’ या विषयावर बोलताना त्याने मोकळेपणाने आपले अनुभव मधुरिमा वाचकांसाठी सांगितले.
‘ऑपरेशन थिएटरमध्ये आपल्या पार्टनरला कसं सांभाळून घ्यायचं याबद्दल मित्रांसोबत शेअरिंग झालेलं होतं. शिवाय डॉक्टरही वेळोवेळी मार्गदर्शन करतच होते. मात्र, तरीही मनावर ताण होता. मुळातच लेबर पेनचा काळ अनिश्चित असतो. त्यात प्राचीसाठी हा काळ तेरा ते चौदा तासांपर्यंत लांबल्याने माझी अस्वस्थता वाढली होती. शेवटी शेवटी येणाऱ्या कळा प्राची कशा सहन करत असेल हे पाहून तर मला माझं अस्वस्थ होणं क्षुल्लक वाटायला लागलं. मात्र, बाळाच्या जन्मानंतरच्या पहिल्या दर्शनानं तिची सहनशक्ती सार्थकी लागल्याची भावना माझ्या मनात आली. पराकोटीच्या कळा सहन करून जर स्त्री आपल्याला बाबा होण्याचा अत्युच्च आनंद देत असेल तर बाळाच्या जन्माच्या वेळी उपस्थित राहण्याचं धाडस होऊ घातलेल्या बाबाने दाखवावंच,’ असं ऋषिकेशला वाटतं. बायकोच्या प्रसूतीदरम्यान तिच्या पतीनं लेबर रूममध्ये उपस्थित असणं ही बाब परदेशात गृहीत धरली जाते.

किंबहुना तिथल्या डॉक्टर्सचाही तसा आग्रह असतो. प्रसूत होणाऱ्या बायकोला आधार वाटावा आणि काही अडचणी निर्माण झाल्या तर त्वरित निर्णय घेतले जावेत, हा त्यामागचा मुख्य उद्देश. भारतात मात्र अजूनही ही पद्धत फारशी रुळलेली नाही.
अर्थात मुंबई-पुण्यासारखी शहरं त्याला अपवाद आहेत. मात्र, या ठिकाणीही अशा बाबांचं प्रमाण अगदीच बोटावर मोजण्याइतकंच. शहरात अशी स्थिती, तर ग्रामीण भागाबद्दल विचार न केलेलाच बरा.
मुळातच प्रसूतीदरम्यान आपणही लेबर रूममध्ये थांबू शकतो, याची माहिती भारतातल्या किती पुरुषांना आहे याबद्दलच शंका आहे. त्यातूनही डॉक्टरांनी लेबर रूममध्ये थांबण्याबद्दलची कल्पना दिली तर किती जण यासाठी तयार असतात, हा स्वतंत्र चर्चेचा विषय होऊ शकतो. भारतीय कुटुंबरचनेत परंपरेचा टेकू घेऊन प्रत्येक कामांची स्त्री-पुरुष अशी सोयीस्कर विभागणी केली गेलीय. मुलांचा जन्म-संगोपन, शिक्षणासारख्या जबाबदाऱ्या स्त्रियांवर टाकल्या गेल्यात. कुटुंबासाठी अर्थार्जनापलीकडे काही कर्तव्यं असतात याची जाणीवही पुरुषांना फारशी दिसत नाही. मग अशा वेळी प्रसूतीदरम्यान बायकोला मानसिक आधार वगैरेंसारख्या गोष्टी त्यांच्या गावीही नसतात. म्हणूनच ‘तिथं आपलं काय काम’ असा विचार करत लेबर रूमबाहेर येरझाऱ्या घालण्यात धन्यता मानणारेच अधिक!

बाळाचा जन्म अनुभवणं ही जशी स्त्रीसाठी आनंदाची बाब तशीच ती पुरुषांसाठीही असायला हवी. म्हणूनच बाळाच्या जन्माच्या वेळी बाबाची उपस्थिती आवश्यक आहे. फक्त प्रसूत होणाऱ्या महिलेला मानसिक आधार एवढाच त्यामागचा दृष्टिकोन नक्कीच नाही. मानवी जीवनात सहन करता येणाऱ्या वेदनांमध्ये, प्रसूती वेदना या सर्वाधिक तीव्रतेचा असतात, असं शरीरविज्ञान सांगतं. म्हणूनच प्रसूती म्हणजे वेदनांची परिसीमाच. मग अशा प्राणांतिक वेदना सहन करून पत्नी आपल्या बाळाला कशी जन्म देते, प्रसूतीदरम्यान तिला कोणकोणत्या टप्प्यांतून जावं लागतं, आत्यंतिक कळा सहन केल्यानंतरही बाळाच्या दर्शनानं आनंदून जाण्याचं बळ तिला कुठून मिळत असेल आिण या सगळ्यांमधून तरून जाऊन नव्या जोमानं ती बाळाच्या संगोपनात कशी गढून जाते, असा प्रश्न प्रत्येक बाबाला पडायला हवा. या प्रश्नांची उत्तर शोधण्याचं कुतूहल जागं असावं.

‘लेबर रूममधली पतीची उपस्थिती हा केवळ त्या जोडप्यापुरता मर्यादित खासगी मुद्दा’ असं म्हणून टोलवण्याचा किंवा ‘हे काय काही तरी भलतंच’ म्हणून नाकं मुरडण्याचाही विषय नक्कीच नाही. जन्मानंतरच्या बाळाच्या देखभालीमध्ये पुरुषांचं योगदान, त्यांच्या संगोपनातला सहभाग, अपत्य वाढवताना येणाऱ्या इतर अनुषंगिक जबाबदाऱ्या, त्यायोगे कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि अपत्याच्या स्वभावाची जडणघडण यांच्यावर दूरगामी पण सकारात्मक परिणाम यामुळे घडून येऊ शकतो. अर्थात त्यासाठी त्या पद्धतीची सामाजिक पार्श्वभूमी तयार होणंही तितकंच गरजेचं आहे.

प्रसूतीदरम्यान पत्नी ज्या त्रासातून जाते याचा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा पुरुष घेतील तेव्हा आपल्याला जन्म देणाऱ्या आईकडे, आयुष्यभर सोबत करणाऱ्या बायकोकडे, पाठिंब्याची अपेक्षा करणाऱ्या बहिणीकडे, स्नेहभाव जपणाऱ्या मैत्रिणीकडे आणि सहकार्याची अपेक्षा करणाऱ्या ऑफिसमधल्या महिला सहकाऱ्यांकडे पाहण्याची त्याची दृष्टी कदाचित बदलू शकेल. शिवाय केवळ मुलगा हवा असण्याच्या हट्टापायी महिलांवर लादली जाणारी बाळंतपणं कमी होऊ शकतात. गर्भपातासाठी धरला जाणारा आग्रह कमी होऊ शकतो. प्रत्येक घरातल्या एका पुरुषाच्या मानसिकतेत जरी फरक पडला तर पुरुषी मानसिकता बदलणं ही खूप अवघड, अशक्य वाटणारी गोष्ट राहणार नाही.

आधुनिक युगात जगण्याच्या धडपडीत पती-पत्नींमध्ये वैचारिक, भावनिक, मानसिक मतभेद ही अटळ बाब आहे. दोघांमधला विविध पातळ्यांवरचा संघर्ष टाळता आला नाही तरी त्याची तीव्रता नक्कीच कमी करता येऊ शकते. मग त्याची सुरुवात बाळाच्या जन्माच्या सोहळ्यापासूनच का नको? असह्य वेदना पार करून संपूर्ण कुटुंबाला अक्षय्य आनंद देणाऱ्या बायकोच्या नाजूक अवस्थेत पतीनं एक पाऊल पुढं यावं. कारण त्या काही क्षणांत परस्परांना दिलेल्या आधारामुळेच बाबा-आई-बाळ यांची एकमेकांसोबतची ‘नाळ’ घट्ट जोडली जाऊ शकते. शेवटी, ‘बाबा’ होत असतानाच्या आनंदात ‘आई’पणाच्या कळाही वाटून घेता यायलाच हव्यात ना...

vandana.d@dbcorp.in