आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्टकर्‍यांची 'आशा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरामध्ये जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग ही खरं तर नागरिकांच्या वैयक्तिक बेशिस्तीमुळे निर्माण झालेली सामाजिक समस्या. सामूहिक कृतीचा अभाव, उदासीनता यामुळं ही समस्या दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करते आहे. मात्र कचरा निर्मूलन आिण व्यवस्थापनात स्वत: खारीचा वाटा उचलून इतर महिलांना त्यासाठी संघटित करणाऱ्या औरंगाबादच्या आशा डोके यांनी तथाकथित ‘सुशिक्षितांपुढे’ एक चांगलं उदाहरण घालून दिलं आहे.

‘कचरा उचलनं ह्ये माजं कामच हाये. मला त्येच्याबद्दल काई घान वाटत नाही. कारन म्या कचरा करत न्हाई. लोकायनी केलेला कचरा उचिलते. मंग कचरा करनाऱ्यांस्नी घान वाटाय पायजे की कचरा उचलनाऱ्य२ांस्नी, ह्ये तुमीच सांगा म्यॅडम...’ चाळिशीच्या आसपास वय असणाऱ्या आशाताईंना भेटायला गेले तेव्हा त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मी निरुत्तर झाले.

मूळ जालन्याच्या बोरगाव या छोट्या गावच्या आशाताई लग्नानंतर पोटापाण्याच्या शोधात औरंगाबादला आल्या. सुरुवातीला काम मिळेना तेव्हा लोकांच्या घरी धुणीभांडी, पोळ्या करणं अशी कामं त्यांनी केली. मोलमजुरीतून मिळणारं नवऱ्याचं उत्पन्नही जेमतेम. घरखर्च भागवण्यासाठी जास्त उत्पन्न देणाऱ्या कामाच्या शोधात त्या होत्या. त्या वेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काही बायका कचरा उचलण्याचं काम करायच्या. त्यांनी आशाताईंनाही हे काम करण्याबद्दल विचारलं. ताईंनी तेे करण्याचा निर्णय घेतला. त्यातून बऱ्यापैकी पैसा मिळू लागला. मात्र तो कचरा ज्यांच्याकडे विकायच्या तो दुकानदार जास्त कमिशन मागायचा. यावर उपाय शोधण्याच्या विचारात असणाऱ्या आशाताईंना एक िदवस घरेलू कामगार संघटनाचं एक पत्रक मिळालं. काय आहे ते तरी पाहू म्हणून आशाताई त्या संघटनेच्या कार्यालयात गेल्या. तिथूनच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. घरेलू कामगारांप्रमाणेच, आपल्यासारख्या महिलांचीही संघटना असावी या विचाराने महाराष्ट्र काच-कचरा वेचक संघटना स्थापन झाली. आजच्या घडीला औरंगाबादमधल्या जवळपास तीन हजार कचरा वेचणाऱ्या महिलांचं नेतृत्व या संघटनेच्या माध्यमातून आशाताई करताहेत. सुरुवातीच्या काळात सायकलवरून दूरदूर फिरून आशाताईंनी या व्यवसायातल्या महिलांना संघटित करण्यासाठी प्रयत्न केले. एकत्र येण्याचं महत्त्व पटवून दिलं. दुकानदार कचऱ्याला देत असलेला भाव, लाटलं जाणारं कमिशन यावर उपाय म्हणून आशाताईंनी पंधरा वर्षांपूर्वी किरायाच्या जागेत स्वत:चं दुकान थाटलं. पण केवळ महिला म्हणून इतर दुकानदार त्यांना त्रास देऊ लागले. त्यामुळं काही वर्षे त्यांना दुकान बंद करावं लागलं. त्या काळात रिकाम्या जागेचं भाडंही त्यांनी भरलं पण हार मानली नाही. पुन्हा दुकान सुरू केलं. तेव्हापासून कचरा वेचणाऱ्या महिलांकडून त्या इतर दुकानदारांपेक्षा थोडा जास्त भाव देऊन कचरा विकत घेतात. शिवाय कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या इतर होलसेल दुकानदारांच्या संपर्कात राहिल्यानं, रिटेल दुकानदारांना कमिशन म्हणून द्यावा लागणारा पैसा ताईंनी वाचवला आहे. इतर महिलांनाही त्यांच्याबद्दल विश्वास वाटत असल्यानं, त्या ताईंकडेच येतात. मुख्य म्हणजे, संघटनेतल्या महिलांचं जीवनमान सुधारण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. यातल्या महिलांची राष्ट्रीयकृत बँकेत खाती उघडून, त्यांची आर्थिक परिस्थिती बदलावी म्हणून ताई प्रयत्नशील आहेत. कचरा वेचणाऱ्या महिलांच्या आरोग्यासंदर्भात आता कायमस्वरूपी काही करायचं असल्याचं त्या सांगतात.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढं आलेल्या आशाताई केवळ आसपासच्या महिलांसाठीच काम करून थांबल्या नाहीत. आपल्या या कामाला त्यांनी सामाजिक कर्तव्याची जोड दिली. कामाच्या दरम्यान योगायोगानं त्या सिव्हिक रिस्पॉन्स टीम अर्थात सीआरटीच्या संपर्कात आल्या. सीआरटीच्या, घनकचरा व्यवस्थापन उपक्रमात त्या आपल्या महिलांच्या चमूसह सहभागी झाल्या. सीआरटीमध्ये सहभागी झाल्यापासून या महिला, नागरिकांना कचऱ्याच्या ओला, सुका, जैविक आिण वैद्यकीय अशा वेगवेगळ्या वर्गीकरणाबद्दल माहिती देतात. कचऱ्याच्या पद्धतशीर नियोजनाचं महत्त्व, त्यामागचं कारण, पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम आिण कचरा व्यवस्थापनामुळं होणाऱ्या दूरगामी फायद्याबद्दल सांगतात. शिवाय आपल्या संघटनेतील महिलांनाही अशाच पद्धतीनं कचरा गोळा करण्यास सांगतात. त्यामुळं अर्थातच या महिलांकडच्या विकण्यायोग्य कचऱ्याचं प्रमाण वाढलं आहे. फक्त औरंगाबाद शहरातच नव्हे तर इथल्या वाळूज महानगरातल्या अनेकांना अाशाताईंनी कचरा वेचण्याचं तंत्र समजावून सांगून उत्पन्नाचं साधन मिळवून दिलं आहे. सुरुवातीला कचरा वेचण्याच्या कामाचा न्यूनगंड बाळगणाऱ्या आशाताई आज मात्र आपल्या कामाबद्दल आनंदानं माहिती देतात. आपल्या कामाच्या माध्यमातून का होईना पण शहर सुंदर आणि स्वच्छ करण्याच्या कामी आपण खारीचा वाटा उचलल्याचा त्यांना अिभमान आहे. आज केवळ औरंगाबादमधल्या कचऱ्या वेचणाऱ्या महिलांनाच नाही तर पुणे, मंुबई, नाशिक आिण दिल्ली या ठिकाणी स्थापलेल्या संघटनेच्या महिलांनाही त्या मार्गदर्शन करतात. विशेष म्हणजे औरंगाबाद इथं मध्यंतरी घनकचरा व्यवस्थापनावर एका आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडलेल्या परिषदेत विविध तज्ञांनी मत व्यक्त केली. फर्राटेदार इंग्रजी बोलणारी मंडळी आसपास असतांनाही आशाताईंनी न भांबावता माय मराठीत आपलं म्हणणं मांडलं. कचरा वेचक महिलांच्या समस्यां मांडून यावर काय करायचं ते तुम्हीच सांगा म्हणून खणखणीत सवालही उपस्थितांना विचारला.

परिस्थितीमुळं शिक्षण नाही. शिक्षण नाही म्हणून काम नाही. काम नाही म्हणून पैसा नाही. पैसा नाही म्हणून पुन्हा परिस्थिती जैसे थे. हे आपल्या वाट्याला आलेलं दुष्टचक्र आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये, हातावर पोट असणाऱ्या, आपल्यासारख्या कचरा वेचणाऱ्या इतर बायकांनाही दोन पैसे राखता यायला हवेत, अशी त्यांची भावना आहे. त्या तीव्र इच्छेमुळेच परिस्थिती बदलण्यासाठी आशाताईंनी कंबर कसली आहे. समोरच्या व्यक्तीशी डोळे भिडवून थेट संवाद साधण्याची आशाताईंची पद्धत त्यांच्यातल्या आत्मविश्वासाची साक्ष देते. त्यांच्या या कामाचं कौतूक म्हणून महिला दिनी औरंगाबादेतील एक संस्थेतर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. त्या वेळी त्यांना देण्यात आलेलं मानपत्र त्यांनी त्यांच्या दुकानात लावलेलं आहे. हे मानपत्र मिळण्यामागे आपल्यासोबतच्या सर्वच महिलांचे कष्ट आहेत. महिलांनी केलेल्या श्रमाचं ते प्रतीक आहे आिण ज्या कामासाठी ते मिळालंय तिथंच ते असावं, हा त्यामागचा विचार आहे. रस्त्यावरच्या कचराकुंडीजवळून जाताना दुर्गंध सहन होत नाही म्हणून प्रत्येकजण तोंडाला रुमाल लावतो. त्यावरून आपण आशाताई आिण त्यांच्यासारखं काम करणारी मंडळी दररोज कुठल्या दिव्यातून जात असतील याची कल्पना तर नक्की करू शकतो. मात्र याबद्दल फक्त सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी प्रत्येकानं कृतीप्रवण होणं महत्त्वाचं.
vandana.d@dbcorp.in