आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Vandana Khare Article About Adivasi Girls’ Education Outside School

शालाबाह्य ज्ञानप्रक्रियेचा परीसस्पर्श

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आक्का पावरा. नंदुरबार जिल्ह्यातल्या दुर्गम भागात एका आदिवासी पाड्यावर राहणारी एक मुलगी. सातवीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण तिने आश्रमशाळेत राहून पूर्ण केले. पण दहावीची परीक्षा पार पडली आणि पुन्हा एकदा ती आपल्या पाड्यावरच्या झोपड्यात परतली. आपल्या आईवडिलांसोबत ती शेतावर मजुरीला जायला लागली. आक्काला वाचनाची अतिशय आवड. पण तिच्या त्या छोट्याशा गावात रोजचे वर्तमानपत्रदेखील येत नसे, मग वाचनालय कुठून असणार? तिला दिवसेंदिवस एक अक्षरही वाचायला मिळेना! तिच्या मनाची नुसती घालमेल व्हायला लागली. आईवडील तर अशिक्षितच होते, पण एक काका मात्र एका संस्थेचे काम करीत होते. त्यांच्या ट्रेनिंगची काही ना काही पुस्तके घरात येऊन पडलेली असत, जी आक्कापासून दूर उंचावर लपवून ठेवली जात. या पुस्तकातली माहिती तिच्यासारख्या वाढत्या वयातील मुलीच्या हाती पडू नये असेच त्यांना वाटत असावे.
एक दिवस घरात कोणी नसताना ती माळ्यावर चढली आणि ती पुस्तके तिने हावरटासारखी वाचून काढली. असं होतं तरी काय या पुस्तकांमध्ये? स्त्रियांचे आरोग्य, माता बालसंगोपन, गाव स्वच्छता, एचआयव्ही / एड्स या विषयांबद्दलची माहिती.

ती वाचून आक्काच्या मनातली उत्सुकता वाढत गेली. जर या पुस्तकांमध्ये इतकी उपयोगाची माहिती आहे, तर प्रत्यक्ष ट्रेनिंग कसे असेल? तिने आपल्या घरातल्या माणसांना विचारून पाहिले, पण कुणीच दाद देईना. मग मात्र तिने सत्याग्रहाचा मार्ग पत्करला! एक दिवस चुलत्यांना ट्रेनिंगला घेऊन जाण्यासाठी युनिसेफची गाडी आलेली तिने पाहिली आणि ती सरळ त्या गाडीतच जाऊन बसली. आज काही झालं तरी मी तुमच्यासोबत ट्रेनिंगला येणारच, असा तिने हट्टच धरला! एवढ्या प्रयत्नांनंतर मात्र तिला हवे होते ते ज्ञान तिच्या पदरी पडले. त्या ट्रेनिंगमुळे आक्काच्या आयुष्याला एक निराळे वळण मिळाले. पुस्तकात वाचलेल्या माहितीपेक्षा कितीतरी जास्त माहिती तिला मिळाली आणि ही माहिती केवळ स्वत:पाशीच न ठेवता गावातल्या इतर मुली आणि महिलांपर्यंत पोचवण्याचा तिचा निश्चय याच ट्रेनिंगमध्ये पक्का होत गेला.


या घटनेला जवळजवळ दहा वर्षांचा काळ उलटला आहे. त्या शिबिरात केलेल्या निश्चयाला तिने मूर्तरूप दिले आहे. आक्काने युनिसेफसोबत स्वयंसेवक म्हणून काम करता करता आपला र्नसिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आज ती जिल्ह्याच्या ठिकाणी नर्स म्हणून पूर्णवेळ काम करते आहे.
आक्काप्रमाणेच चंद्रपूरची सोनिया, लातूरची जानका, परभणीची हुमेरा, जालन्याची वर्षा, यवतमाळची शिरीन अशा असंख्य मुली गावोगावी भेटतात. स्वत:च्या घरातली गरिबी, लवकरात लवकर लग्न उरकून टाकायचा दबाव, शैक्षणिक वातावरणाचा अभाव, दळणवळणाच्या सोयीसुविधांची वानवा अशी सगळी मुलींच्या स्वप्नांचे पंख छाटायची सामाजिकता असूनदेखील या मुलींनी उडायची हिंमत सोडलेली नाही. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतूनही त्यांनी अतोनात कष्ट करून स्वत:ची वैयक्तिक प्रगती तर साधलीच आहे; पण त्याच बरोबरीने त्यांनी आपल्या भोवतालच्या सामाजिक वास्तवातदेखील सकारात्मक बदल घडवून आणले आहेत. अनेक जणींनी स्वत:चेच नव्हे तर गावातल्या इतर मुलींचेही बालविवाह थांबवले आहेत. अंगणवाडी योजनांमधला भ्रष्टाचार थांबवला आहे, शाळाबाह्य मुलांना शाळेची गोडी लावली आहे, मासिक पाळीसारख्या संवेदनशील विषयाबाबतच्या अनिष्ट समजुती दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. ज्या समाजात मुलींना ताठ मानेने चालायचीसुद्धा परवानगी नसते अशा जगात एवढी मोठी झेप घेण्यासाठी त्यांच्या पंखांमध्ये इतके बळ कुठून येत असेल?


खरं तर या मुलींना कधी सामाजिक चळवळींची कुठलीच पार्श्वभूमी लाभलेली नव्हती. पण तरीही त्यांच्यात वैयक्तिक महत्त्वाकांक्षेसोबत सामाजिक न्यायाची टोकदार जाणीव दिसून येते. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या सगळ्या मुलींना एक वेगळ्या प्रकारच्या ज्ञानप्रक्रियेचा परीसस्पर्श झालेला आहे! त्यांना फोटोग्राफी, लेखनकौशल्य, फिल्ममेकिंग, पार्टिसिपेटरी थिएटर अशा कार्यशाळांच्या माध्यमातून जे शिक्षण मिळाले, ते शाळा-कॉलेजात मिळणा-या औपचारिक शिक्षणाहून खूप निराळे आहे. आपल्या पाठ्यपुस्तकातून मिळणारी एकसुरी आणि एकरेषीय माहिती स्वत:च्या मनाशीसुद्धा संवाद साधायची संधी देत नाही! पण या मुलींना युनिसेफमार्फत होणा-या निरनिराळ्या शिबिरांतून एकमेकींशी संवाद साधायची आणि आपल्या सामाजिक वास्तवाला प्रश्न विचारायची संधी मिळत गेलेली आहे. आपल्याला काय आवडते, हवे आहे ते बोलून दाखवायची हक्काची जागा मिळाली. शिबिरात शिकवणा-या प्रशिक्षिकांच्या रूपाने रोल मॉडेल्स पाहायला मिळाली. एक दिवस आपल्यालाही असे बनता येऊ शकते असा आत्मविश्वास त्यातून तयार होत गेला. कार्यशाळेत एक मिनिटभराची फिल्म बनवायच्या निमित्ताने किंवा न्यूजलेटरसाठी लेख लिहिताना होणा-या चर्चांमुळे सामाजिक न्यायाची जाणीव आकार घेत गेली. आपल्याला येणा-या वैयक्तिक अडचणींना असलेले सामाजिक परिमाण त्यातूनच त्यांना उमजत गेले.


चंद्रपूरजवळच्या दादापूरसारख्या चिमुकल्या खेड्यात राहणा-या कविताला फॅशन डिझायनर बनण्यासाठी किंवा नंदुरबारच्या आदिवासी पाड्यातल्या आक्काला नर्स बनण्यासाठी जेवढे शारीरिक कष्ट उपसावे लागतात; त्यापेक्षा कितीतरी पट जास्त मानसिक ताकद एकवटावी लागते. ही ताकद त्यांना अशा कार्यशाळांमधून मिळते. आम्ही जेव्हा ग्रामीण मुलींसाठी एक मिनिटाची फिल्म बनवण्याच्या किंवा सहभागी पद्धतीचे नाट्यप्रयोग उभे करण्याच्या कार्यशाळा घेतो तेव्हा अनेक लोक विचारतात की जेमतेम आठ दिवसांच्या शिबिरातून ग्रामीण मुली फिल्ममेकर बनतील का? चार दिवसांच्या लेखनकौशल्याच्या शिबिरातून त्या पत्रकार बनतील का? आज लातूर आणि चंद्रपूरमधल्या मुली दर महिन्याला स्वत:चे भित्तिपत्र मासिक बनवतात. आपापल्या गावात शाळांमध्ये, पंचायत समितीमध्ये ते मासिक लावतात, लोकांनी ते वाचावे यासाठी प्रयत्न करतात. स्वत: लिहिलेल्या लेखांबद्दल लोकांचे काय मत आहे ते जाणून घेतात, त्यानुसार पुढच्या वेळी त्यावर चर्चा करतात. मासिकाच्या डिझाइनमध्ये फेरफार करतात. या मुली पुढे जाऊन एखाद्या मासिकाच्या संपादक बनतील का? किमानपक्षी गावातल्या वृत्तपत्रात त्यांना वार्ताहर म्हणून तरी काम मिळेल का? कदाचित मिळेलही. खरं तर ही शक्यता अगदीच कमी आहे. पण हे स्वत:चे मासिक बनवायच्या निमित्ताने त्या दर महिन्याला एकत्र येतात, एखादा विषय ठरवून चर्चा करतात, मते मांडतात, मोकळेपणाने अनुभवांची देवाणघेवाण करतात. कदाचित त्या एखादा लेख लिहून थांबतीलही. पण त्या निमित्ताने त्यांच्या मनात सुरू झालेली ज्ञानप्रक्रिया मात्र त्यांना जन्मभर साथ देईल हे नक्की!


पॉलो फ्रिअरे नावाचे जगप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ म्हणतात - शिकण्याची खरी सुरुवात कृतीतून होते. भोवतालच्या परिस्थितीच्या विश्लेषणामुळे त्याला योग्य आकार मिळतो आणि पुढची अर्थपूर्ण कृती करायला आधार मिळतो. यासाठी शिक्षणाने औपचारिकतेच्या चौकटी ओलांडून जायची गरज असते.